White Shirt Cleaning Hacks : ऑफिसमध्ये फॉर्मल लूकसाठी अनेकदा पांढरा किंवा अगदी लाईट रंगाचा शर्ट आणि डार्क पँट परिधान करण्यास पसंती दिली जाते. पण, पांढऱ्या शर्टवर कोणतेही डाग लागू नये यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. पण, कितीही काळजी घेतल्यानंतरही डाग पडायचे ते पडतातच. अनेकदा घाईघाईत चहा, कॉफी पिताना शर्टवर डाग पडतात. हे डाग दिसायला तर फार वाईट दिसतातच, शिवाय काढणंही कठीण जातं. अशावेळी पांढऱ्या शर्टवरील डाग काढण्यासाठी लोक बाजारातून वेगवेगळे क्लिनिंग लिक्विड खरेदी करतात, पण त्याने फारसा फरक पडत नाही.
आता पांढऱ्या शर्टवरील चहा, कॉफीचे डाग काढण्यासाठी काळजी करण्याचे कारण नाही; तुम्ही लिंबाच्या मदतीने अगदी सहजपणे हे डाग काढू शकता. पण, कशाप्रकारे जाणून घ्या.
पांढऱ्या शर्टवरील चहा, कॉफीचे डाग कसे काढायचे? (How to Wash White Clothes)
लिंबू हे एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. त्यात अॅसिडिक गुणधर्म आहेत, जे चहा-कॉफीचे डाग काढून टाकण्यास मदत करतात. पांढऱ्या कपड्यांवरील चहा-कॉफीचे डाग काढून टाकण्यासाठी लिंबाचा वापर अनेक प्रकारे करता येतो. सर्वात सोपा आणि नैसर्गिक उपाय म्हणजे थेट लिंबाचा रस वापरणे. कॉफीच्या डाग असलेल्या भागावर लिंबाचा रस पिळून घ्या. सुमारे ३० मिनिटे ते एक तास उन्हात वाळू द्या. त्यानंतर ते थंड पाण्याने धुवा. जर डाग हलका असेल तर ही पद्धत खूप प्रभावी आहे.
लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हा देखील एक नैसर्गिक क्लिनिंग एजंट आहे, त्यामुळे लिंबासह बेकिंग सोडा वापरून हट्टी डाग काढून टाकण्यास मदत होते. थोड्याशा लिंबाच्या रसात एक चमचा बेकिंग सोडा मिसळून जाड पेस्ट बनवा. ही पेस्ट शर्टवरील चहा, कॉफीच्या डागावर लावा आणि सुमारे ३० मिनिटे सुकू द्या. नंतर थंड पाण्याने धुवा.
लिंबाचा रस आणि व्हाईट व्हिनेगर
व्हाईट व्हिनेगरमध्येही अॅसिडिक गुणधर्म आहेत, जे शर्टवरील डाग काढून टाकण्यास मदत करतात. लिंबाच्या रसात व्हाईट व्हिनेगर मिसळून ते डाग पडलेल्या शर्टवर लावल्यास प्रभावी ठरू शकते. एका भांड्यात लिंबाचा रस आणि व्हाईट व्हिनेगर समान प्रमाणात घेऊन मिक्स करा. हे मिश्रण डाग असलेल्या भागावर लावा आणि सुमारे १५-२० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर ते थंड पाण्याने धुवा.
लिंबाचा रस आणि मीठ
मीठ हे एक नैसर्गिक एक्सफोलिएंट आहे, जे हट्टी डाग काढून टाकण्यास मदत करते. यासाठी शर्टवरील डाग असलेला भाग थंड पाण्याने ओला करा. नंतर त्यावर थोडे मीठ शिंपडा आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. नंतर डाग हलक्या हाताने घासून घ्या. १५-२० मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.
कोमट पाणी आणि लिंबाचा रस
कोरड्या आणि हट्टी डागांसाठी ही पद्धत अधिक प्रभावी ठरू शकते. एका भांड्यात पाणी उकळवा. शर्टचा डाग असलेला भाग त्या भांड्यावर अशा प्रकारे धरा की वाफ थेट डागावर पडेल. नंतर डाग असलेल्या भागावर लिंबाचा रस पिळा. काही मिनिटे वाफेला काम करू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा. लक्षात ठेवा की, उकळत्या पाण्यात हात घालू नका.