Skin Care Routine For Beginners: नो मेकअप लुक असो किंवा पद्धतशीर सीरम, फाउंडेशन, कन्सिलर सगळ्या पायऱ्या पूर्ण करून केलेला मेकअप असो कोणताही लुक शोभून दिसण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे बेस. खरंतर मोठमोठ्या मेकअप आर्टिस्ट सुद्धा हेच सांगतात पण आज आपण मेकअपचा बेस नाही तर चेहऱ्याचा बेस कसा सुंदर करायचा हे पाहणार आहोत. आपली त्वचा जर छान मऊ, चमकणारी व नीट हायड्रेटेड असेल तर तुम्ही साधी पावडर लावूनही खुलून दिसू शकता. यासाठी अलीकडे महाग स्किनकेअर उत्पादने सुद्धा भरमसाठ प्रमाणात खरेदी केली जातात. पण आज आपण प्रसिद्ध ब्युटी इन्फ्लुएन्सर व डॉक्टरांच्या हवाल्याने स्किन केअर साठी शून्य रुपयात करता येणाऱ्या गोष्टी पाहणार आहोत. चला तर सुरु करूया..

मन व डोकं करा शांत

राय सांगतात की, अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की, मानसिक विचारांवर नियंत्रण मिळवणारा कोणताही सराव हा तुमच्या पेशींना सदृढ ठेवून वय वाढताना दिसणारे परिणाम नियंत्रणात ठेवू देतो. अगदी एक्जिमा आणि सोरायसिस सारख्या परिस्थिती सुधारण्यास देखील याची मदत होऊ शकते.

तर डॉ. हेन्ना शर्मा, सल्लागार त्वचाविज्ञान, यथार्थ हॉस्पिटल, नोएडा एक्स्टेंशन यांनी याविषयी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, ध्यानधारणेसारख्या आध्यात्मिक पद्धतींचा त्वचेच्या आरोग्याशी संबंध जोडणारे मर्यादित पुरावे असले तरी, अप्रत्यक्ष संबंध विचारात घेण्यासारखे आहेत. अर्थातच ध्यानासारख्या क्रिया या तणाव पातळी कमी करण्यासाठी व झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतात त्यामुळे त्वचेला दुरुस्ती व पुनरुत्पादनाला आवश्यक तितका वेळ मिळतो. पण या जोडीने आपली संपूर्ण जीवनशैली सुद्धा विचारात घ्यायला हवी.

थंड पेय पूर्णपणे करा बंद

वसुधा राय सांगतात की, “फक्त कोमट पाणी आणि पेये प्या कारण यामुळे तुमच्या आतड्यांचे आरोग्य आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते.”

याला अनुमोदन देत इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार, त्वचाविज्ञान, डॉ. डी.एम. महाजन म्हणाले की, तुमच्या आहारातून थंड पेये काढून टाकल्याने तुमच्या त्वचेच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. थंड पेये, विशेषत: जास्त साखर किंवा कृत्रिम गोड पदार्थ असणारी पेयं, शरीरात जळजळ वाढवू शकतात. या जलजाळीमुळे एक्जिमा आणि अकाली वृद्धत्व असे त्रास वाढू शकतात. कोल्ड ड्रिंक्स देखील शरीराचे निर्जलीकरण (डिहायड्रेशन) करू शकतात, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसते.”

त्याऐवजी, कोमट किंवा साधे पाणी प्यावे. हर्बल टी पिणे तर सर्वोत्तम, कारण यामुळे एक तर हायड्रेशन वाढते आणि पचन व रक्ताभिसरण सुधारून त्वचा सुदृढ दिसू लागते.

चेहरा धुताना पाणी कसं असावं?

तिसरा महत्त्वाचा सल्ला म्हणजे चेहरा धुण्यासाठी थंड पाणीच वापरा. यामुळे चेहऱ्याला आलेली सूज कमी होण्यास मदत होऊ शकते. राय सांगतात की, आयुर्वेदात डोळ्यांना अग्नीचे स्थान मानले जाते. त्यामुळे डोळ्यांना थंड करण्यासाठी आराम देण्यासाठी गार पाणी फायदेशीर ठरते.

हे ही वाचा<< रात्री किंवा संध्याकाळी उशिरा खाल्ल्याने वजन वाढतं का? लवकर जेवल्याने समजा रात्री पुन्हा भूक लागलीच तर काय खावं?

दुसरीकडे, डॉ. सीमा ओबेरॉय लाल, सीके बिर्ला हॉस्पिटल, गुरुग्राम येथील सल्लागार-त्वचाशास्त्रज्ञ, म्हणतात की, तुमच्या चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडल्याने काही फायदे मिळू शकतात, पण ते तात्पुरते असू शकतात. थंड पाण्यामुळे त्वचेतील रक्तवाहिन्या तात्पुरत्या आकुंचन पावू शकतात ज्यामुळे छिद्र लहान दिसू शकतात. त्याप्रमाणे विशेषत: डोळ्यांभोवती, सूज कमी होण्यास मदत होऊ शकते. काही वेळाने रक्त परिसंचरण सुधारू शकते. हा वाढलेला रक्त प्रवाह त्वचेला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे देऊ शकतो ज्याने चेहरा चमकदार, उत्साही दिसू शकतो. विशेषतः सकाळी चेहरा धुताना थंड पाणी उत्तम ठरू शकते.