शरीरासाठी पोषक मूल्यांचा अभाव असूनही चवीने मधुर व दिसायला पांढरीशुभ्र असणारी साखर लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच आवडते. जाम, बिस्कीट, चहा, कॉफी, शीतपेये, चॉकलेट, केक व मिठाई अशा अनेक पदार्थात साखरेचा सढळपणे वापर केला जातो. सल्फर डायऑक्साइड वायू, फॉर्मालीन, रिफायनिंग व ब्लिचिंग या सर्व रासायनिक प्रक्रियांतून घट्ट उसाचा रस आटविला जाऊन पांढरीशुभ्र दाणेदार साखर बनवली जाते. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर साखर एक शुद्ध रासायनिक पदार्थ बनतो आणि अशी ही साखर वर्षांनुवष्रे टिकते. ती कधीही खराब होत नाही. कारण रासायनिक विषारी पदार्थाचा माराच इतका असतो की साखरेला कीड कधीच लागू शकत नाही. परंतु या सर्व प्रक्रियांमुळे साखर आपल्या शरीराला त्रासदायक ठरते. कारण त्यातील मौल्यवान घटक साखर बनवताना नष्ट होतात. साखरेत प्रथिने, जीवनसत्त्व, खनिजद्रव्य, क्षार यांचा अभाव असतो तर फक्त कबरेदक अधिक प्रमाणात असतात आणि त्यामधून फक्त शरीराला उष्मांक (कॅलरी ) मिळतात. त्यामुळेच अतिचहा, अतिसाखरेचे पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा, उच्चरक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, संधिवात हे आजार निर्माण होतात. शरीरातील इन्सुलीन साखर पचविण्यातच खर्ची पडते व त्यातूनच मधुमेहासारख्या आजाराची लागण होते.
साखर पचविण्यासाठी स्वादुपिंडाला फार मेहनत घ्यावी लागते आणि या कामासाठी स्वादुपिंडातील इन्सुलीन फार खर्ची होते. त्यामुळे इन्सुलीनची कमतरता निर्माण होऊन मधुमेह हा आजार निर्माण होतो. यासाठी साखरेचा वापर अगदी गरजेपुरताच करावा. एक ग्रॅम साखरेमधून ११६ उष्मांक (कॅलरी) मिळतात. एक कप चहामध्येही अनेक जण दोन चमचे साखर घेतात. एक चमचा साखरेतून दोन गव्हाच्या पोळ्या खाण्याइतके उष्मांक आपल्या शरीराला मिळतात. अशा पांढऱ्या शुभ्र दिसणाऱ्या साखरेचा धोका आपण वेळीच ओळखला नाही तर ‘साखरेचे अती खाणार त्याला देव नेणार’ तसेच ‘मुंगी होऊन साखर खाण्यापेक्षा हत्ती होऊन लाकडे तोडा’ म्हणजेच अंग मेहनत करा आणि मधुमेह टाळा असे वाक्यप्रचार वापरात येतील.
मधुमेह हा सर्वाना माहिती असणारा आजार आहे. परंतु योग्य माहिती नसल्यामुळे या आजाराविषयी अनेक गरसमज आहेत. रक्त शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत जात असल्याने रक्तातील वाढलेल्या साखरेचे दुष्परिणाम पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, मूत्रवहन प्रणाली, पचनसंस्था, त्वचा, श्वसन संस्था व डोळ्यांवर दिसून येतात. मधुमेहाचे निदान होण्याआधी चार-पाच वष्रे आधी ती व्यक्ती मधुमेहाच्या पूर्वावस्थेत असते. अशा अवस्थेत जर योग्य वैद्यकीय उपचार व जीवनशैली निवडली तर शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी होऊ शकतात. याचबरोबर लठ्ठपणा, अल्पश्रम, मानसिक ताण, शरीरातील अंतस्रावी ग्रंथींचा चढउतार, विविध व्याधींचा परिणाम, यकृतात बिघाड मधुमेहास कारणीभूत ठरत आहेत.
– डॉ. विनयकुमार अग्रवाल, फिजिशियन व क्रिटिकल केयरतज्ज्ञ
मधुमेह व हृदयरोग या दोन जीवघेण्या आजारांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. १० वर्षांपूर्वी हृदयरोग असलेल्या १०० रुग्णांपैकी ३० जणांना मधुमेहाचा त्रास असायचा पण आजमितीला १०० पैकी ८० रुग्ण हे मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेह होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये अनियमित जीवनशैली, असंतुलित आहार किंवा जंक फूड खाणे, तणाव अथवा चिंता तसेच या सर्व कारणांनी वाढणारे वजन यांचा समावेश आहे. त्यामुळे मधुमेहाचे आपल्या आयुष्यातील आगमन रोखायचे असेल तर त्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे किंवा वाढलेले वजन किमान १० ते २० टक्क्यांनी घटविणे हा एक प्रमुख उपाय सांगितला जातो. हृदयरोग व मधुमेह यांचे परस्परांशी घट्ट नाते आहे, हृदयरोग असलेल्याला मधुमेहाची भीती नसते, परंतु मधुमेहाच्या प्रत्येक रुग्णाला हृदयरोगाचा धोका असतो.
–डॉ. पवनकुमार, हृदयशल्यविशारद