उन्हाळ्याची दिनचर्या

उन्हाळ्यात ऋतूत प्रखर सूर्यकिरणे व उन्हाचे मोठे दिवस यामुळे पित्तप्रकोपास आमंत्रण मिळते.

 

उन्हाळा आला की गारेगार सरबते, आइस्क्रीम, बर्फाचा गोळा, परीक्षेनंतरची सुट्टी, सहली अशा अनेक गोष्टी येतातच. या सगळ्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर उन्हाळ्याची ऋतुचर्या जाणून घेऊन त्याप्रमाणे आहारविहारात बदल केल्यास फायदा होतो.

जीवनात आरोग्याच्या सुखकर प्रवासासाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली जीवनशैली. आयुष्याच्या बाल्यावस्था, युवावस्था आणि वार्धक्य या प्रत्येक टप्प्यावर घडणाऱ्या नैसर्गिक बदलांवर मात करून आरोग्य टिकवण्यासाठी दिनचर्या आणि ऋतुचर्या पाळण्याचा फार उपयोग होतो. ऋतूत होणाऱ्या बदलांशी शरीराने जमवून घ्यावे यासाठी विशिष्ट प्रकारचा आहारविहार अवलंबणे आणि त्या त्या अवयवांची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. प्रकृती आणि ऋतू यामुळे निर्माण होणारे आजार टाळण्यासाठी त्याची मदत होते.

उन्हाळ्यात ऋतूत प्रखर सूर्यकिरणे व उन्हाचे मोठे दिवस यामुळे पित्तप्रकोपास आमंत्रण मिळते. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना हे त्रास तीव्र स्वरूपात जाणवतात. पित्ताचा उष्ण गुण कमी होण्यासाठी शरीरात शीतलता निर्माण करणाऱ्या गोष्टींचे प्रमाण वाढवावे लागते. पित्तामुळे व उष्ण हवामानामुळे अ‍ॅसिडिटी, जळजळ, मळमळ, डोकेदुखी, चक्कर, त्वचेवरील पुरळ व खाज, डोळे-हात-पाय यांची आग होणे, अपचन, लघवीस कमी होणे/ जळजळणे असे त्रास उद्भवतात. ते होऊ नयेत किंवा झाल्यास त्यांची तीव्रता कमी व्हावी म्हणून खालील गोष्टी करता येतील.

 • सकाळी लवकर फिरायला जावे. उन्हाचा कडाका सुरू होण्यापूर्वी कोवळ्या उन्हात फिरण्यास हरकत नाही. त्यामुळे मन प्रसन्न राहते व पुरेशी हालचाल झाल्याने शरीराला बरे वाटते. आंघोळ गार किंवा कोमट पाण्याने करावी.
 • तीव्र उन्हाच्या वेळी (सकाळी १० ते दुपारी ३) शक्यतो बाहेर जाणे टाळावे. तशीच या वेळेत अंगमेहनतीची कामे व व्यायामही टाळावा. संध्याकाळी व्यायामाला किंवा फिरायला जाण्यास हरकत नाही. उन्हात बाहेर जावे लागलेच तर डोक्यावर टोपी/स्कार्फ, डोळ्यांवर गॉगल जरूर घालावा, तसेच घरची पाण्याची बाटली बरोबर बाळगावी.
 • उष्म्यामुळे डोळय़ांना इजा होऊ शकते. डोळा हा अत्यंत नाजूक अवयव असल्याने त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसातून दर दोन-तीन तासांनी डोळ्यांना गार पाणी लावावे. थंड पाण्याच्या रुमालाने डोळे पुसावेत. रात्री झोपताना गुलाबजलात बुडवलेल्या पट्टय़ा १० मिनिटे डोळ्यांवर ठेवाव्यात. डोळे सारखे लाल होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉप्स घालावेत. फ्रिजमध्ये ठेवून थंडगार केलेल्या कोरफडीच्या पानाच्या चकत्या किंवा काकडीच्या थंड चकत्यासुद्धा डोळ्यांवर ठेवता येतात.
 • त्वचेची काळजीसुद्धा या ऋतूत आवश्यक ठरते. भरपूर पाणी, पातळ पेये घ्यावीत. त्यामुळे त्वचा कोरडी न पडता मुलायम राहण्यास मदत होते. दमट हवेच्या ठिकाणी घाम भरपूर प्रमाणात येतो व त्यायोगे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. रूक्ष हवेमुळे त्वचा कोरडी होऊन रापते व त्यामुळेही त्वचेवर पुरळ येतात. खाज येऊ लागते. अशा वेळी रोज आपण जी पावडर वापरतो त्यात समप्रमाणात चंदनाची पूड (पावडर) मिसळून ती सर्वागाला लावावी. ताडगोळ्यातील जेली बारीक वाटून तीही मलमासारखी वापरता येते. कलिंगडाचा रसदेखील त्वचेवर लावण्यास वापरावा. लिंबाचा रस व ग्लिसरीन याचे दोनास-एक या प्रमाणात मिश्रण करून थोडे पाणी घालून फ्रिजमध्ये ठेवावे. हे मिश्रण आंघोळीनंतर लावता येते. उष्णतेमुळे केसांच्या मुळाशी फोड येतात, डोक्याला खाज येते. काही वेळा कोंडाही होतो. त्यासाठी केस धुण्यापूर्वी लिंबाचा रस तासभर लावून ठेवावा. छोटा चमचाभर मेथी दाणे घेऊन ते भिजवून वाटावे व त्यात केसांना पुरेल इतपत आंबट दही घालावे व हे मिश्रण केसांना २ तास लावून ठेवावे. सर्वसाधारणत: सर्वाना चालू शकतील असे हे उपाय आहेत, परंतु आपणास यातील एखाद्या पदार्थाची अ‍ॅलर्जी असेल, तर मात्र ते पदार्थ त्वचेवर वा केसांवर लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा. या दिवसांत केस शक्यतो बांधून ठेवावेत. शक्यतो मोकळे सोडू नयेत. हेअर कट करणाऱ्यांनी केसांचा ‘शॉर्ट कट’ ठेवावा.
 • सुती व सैलसर कपडे घालावेत. पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे प्राधान्याने वापरावेत. उन्हात जाताना सनकोट जरूर वापरावा.
 • दुपारी थोडी झोप घेण्यास हरकत नाही, मात्र जेवणानंतर लगेच झोपू नये. जेवण व झोप यात दीड-दोन तासांचे अंतर ठेवावे. रात्री जागरण करू नये. त्यामुळे पित्त वाढते. रात्रीची अपुरी झोप दुपारी जास्त प्रमाणात घेऊन पूर्ण करू नये. त्याने अपचनाचे त्रास उद्भवू शकतात.
 • पित्तामुळे व उष्णतेमुळे चिडचिड वाढते. सहनशक्ती कमी होते. कोकमासारख्या पित्तशामक सरबतांचा वापर या दिवसांत अवश्य करावा. गरज भासल्यास पित्तशामक गोळ्याही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येतात. मलावष्टंभ टाळावा. पोट साफ नसेल तर त्यानेही पित्ताचा प्रकोप होऊ शकतो.
 • या दिवसांत पाणी पिताना सुगंधी करून प्यावे. पाण्यात वाळा-नागरमोथा घालून ठेवावा. शक्यतो माठातील गार पाणी प्यावे. या पाण्यात मोगऱ्याची ताजी फुलेही घालता येतात. मात्र ही फुले रोज बदलावी.
 • अपचन होत असेल तर पाण्यात चिमूटभर सुंठ घालून हे पाणी घ्यावे. तहान लागली नसेल तरी दिवसभरातून सारखे थोडे थोडे पाणी पीत राहावे.
 • चालण्यासाठी सुखकर व पायांना हवा लागेल अशी पादत्राणे वापरावीत. दिवसभर बूट-मोजे घालून पाय बंद राहात असतील तर पायांना घाम येऊन बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. बूट काढल्यावर जमल्यास स्लिपर घालून बसावे.
 • आतले कपडेसुद्धा सुती व सैलसर असावेत. या कपडय़ांचे घट्ट इलॅस्टिक वा नाडी त्वचेला त्रासदायक ठरतात आणि त्या जागी चट्टे उठून खाज येऊ शकते.
 • गरम पेये शक्यतो टाळावीत. थंड रसदार फळे, फळांचा रस, उसाचा रस, कोकम, आवळा, कैरी, लिंबू यांची सरबते, ताजे ताक घ्यावे. भिजवलेले सब्जा बी जमेल त्या पेयात घालावे.
 • उन्हाळय़ात अग्नी मंद होऊन पचनक्रिया कमी झालेली असते. म्हणून हलका आहार घ्यावा. मसालेदार, तिखट पदार्थ टाळावेत. आहारात आवळा, कलिंगड, खरबूज, द्राक्षे, आंबा, पांढरा कांदा, दुधी, लाल भोपळा, पडवळ, पुदिना, शहाळे, कैरी, गूळ इत्यादींचा वापर करावा. गुणधर्माने शीतल, पित्तशामक, पचनास हलके असणारे सालीच्या, राजगिऱ्याच्या लाहय़ा यांसारखे पदार्थ आहारात घ्यावेत. अर्थात बाहेरचे सरबत, रस वगैरे पिताना त्यात घातला जाणारा बर्फ/पाणी खराब तर नसेल ना, याकडे जरूर लक्ष द्यावे.

dr.sanjeevani@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Daily routine in summer season