27 November 2020

News Flash

दुचाकीवरून : सायकलवर बसून तर पाहा!

जगातील पहिल्या सायकलला पायडल नव्हते, पण सीट होती. यावरूनच सायकलचं आणि सीटचं नातं लक्षात येतं.

जगातील पहिल्या सायकलला पायडल नव्हते, पण सीट होती. यावरूनच सायकलचं आणि सीटचं नातं लक्षात येतं. दोन पायांनी पुढे दामटवायला लागणारे हे वाहन कदाचित त्यामुळेही लोकांनी स्वीकारले असेल. कारण ढकलायचे किंवा पायडलिंगचे कष्ट जरी लागले तरी तुम्ही आरामात बसून वेगाचा आनंद लुटू शकता. कार्ल ड्रेसने बनवलेल्या १८१७ मध्ये तयार केलेल्या लौफमशीनलासद्धा (चालणारे यंत्र) लाकडाची सीट होती. त्यामध्ये बदल होत आता तुमच्या बसण्याच्या जागेसाठी शरीरशास्त्रानुसार आवश्यक सीट तयार केल्या गेल्या आहेत.
लाकडी सीटपासून सुरू झालेला प्रवास आता उच्च दर्जाच्या फोमच्या सीटपर्यंत येऊन ठेपला आहे. पूर्वीपासूनच सीट हा सायकलचा वेगळा भाग राहिली आहे. म्हणजे सीट खराब झाल्यास किंवा तुम्हाला हव्या त्या आकाराची किंवा प्रकारची सीट सायकलला सहज बसवता येते. आपल्याकडे लोकप्रिय असलेल्या घोडा सायकलला स्प्रिंगच्या सीट असत. त्या सीट खराब रस्त्यांवर सस्पेंन्शनचंही काम करत. परंतु आधुनिक सायकलींच्या सीटला स्प्रिंग नसतात आणि पुढच्या किंवा मागच्या चाकाला सस्पेंन्शनची वेगळी सुविधा केलेली पाहावयास मिळते. पूर्वी सीटची उंची वाढवण्यासाठी सायकलच्या दुकानात जावे लागत असे. पण आधुनिक सायकलींमध्ये गरजेनुसार सीटची उंची वाढवणे सोपे झाले आहे. आपण कुठल्याही साधनाशिवाय ती स्वत: कमी-जास्त करू शकतो. जुन्या कापसाच्या सीट पाण्याने भिजण्याची काळजी असे. कारण त्यावर नंतर बसण्याच्या जागी ओलावा जाणवायचा. नवीन सायकलच्या सीटचे आवरण लेदरचे असल्याने त्यावरूचे पाणी पुसले की ती लगेच कोरडी होते. साधारणपणे सायकलला एकच सीट असते. अपवाद लहान मुलांच्या सायकलींचा. काही सायकलींना लांबलचक मोठी सीट असून त्यावर एकाच वेळी दोघेजण बसू शकतात.
लांब पल्ल्याच्या सायकिलगला जाण्यासाठी किंवा डोंगरातील खडकाळ रस्त्यांवर सायकल चालवताना अनेकजण हल्ली जेल सीटला प्राधान्य देतात. बसण्याच्या जागी आधार मिळावा म्हणून ती वापरली जाते. जेल सीट पाण्यात भिजल्यास कापड पाणी शोषून घेते व ती लवकर खराब होते. त्यामुळे पावसाळ्यात जेलसीटचा काहीच उपयोग होत नाही. जेल सीटमुळे बसण्याच्या जागेवर घर्षण होण्याच्या अनेक तक्रारीसुद्धा आहेत. तसेच लांबच्या प्रवासासाठी त्याचा आधार होण्याऐवजी त्रासच जास्त होतो. त्यासाठी पॅडेड शॉर्ट्स हा पर्याय चांगला आहे. खरं तर तुम्ही नियमितपणे सायकिलग करत असाल तर तुम्हाला पॅडेड शॉर्ट्स आणि जेल सीट यापकी कशाचीही गरज भासणार नाही. तरीही प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार हा पर्याय निवडावा.

हे लक्षात ठेवा
पायडलवर उभं राहून सायकल चालवण्यापेक्षा सीटवर बसून सायकल चालवावी. सुरक्षेच्या दृष्टीनेही ते आवश्यक.
पायडलवर उभं राहून सायकल चालवल्यामुळे सायकलच्या चेनवर जोर येतो आणि तिचे आयुष्य कमी होते.
सायकलची सीट योग्य रीतीने सरळ रेषेत बसवलेली असावी. तसेच ती सल किंवा हलणारी नसावी.
योग्य फ्रेमची सायकल विकत घेतलात तरी तुमच्या उंचीनुसार सायकच्या सीटची उंची कमी-जास्त करावी.
खड्डय़ातून किंवा स्पीडब्रेकरवरून जाताना बसण्याच्या जागी त्रास किंवा झटका बसू नये यासाठी काही क्षण सीटवरून उठावे.
चढावावर सायकलच्या सीटची उंची कमी असावी, जेणेकरून पायडलिंगदरम्यान तोल गेला तर पाय जमिनीवर टेकवायला सोपे जाते.
तीव्र उतारावरून वेगात खाली येताना सीटवरच बसावे, पायडलवर उभे राहू नये. त्यामुळे अपघात होऊ शकतो.
सायकल शर्यतींमध्ये सहभागी होणारे सायकलस्वार शक्यतो पॅडेड शॉर्ट्स आणि जेल सीट यापकी एकाचाही वापर करत नाही.
पॅडेड शॉर्ट्स आणि जेल सीट एकत्रितपणे वापरणे टाळावे.
प्रशांत ननावरे prashant.nanaware@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2016 2:05 am

Web Title: proper way to sit while riding a bicycle
Next Stories
1 ऑफबीट क्लिक
2 आडवाटेवरची वारसास्थळे : मेहेकरचा शारंगधर बालाजी
3 ट्रेकिंग गिअर्स : तंबू ठोकताना..
Just Now!
X