बलोपासनेचे महत्त्व पटवून देणारे आणि राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतवणारे समर्थ रामदास उदासी वृत्तीने गुहा, घळी अशा ठिकाणीच रमायचे. ‘दास डोंगरी राहतो, उत्सव देवाचा पाहतो’ या त्यांच्या उक्तीप्रमाणे दाट जंगलात, अवघड जागी असणाऱ्या घळी, कपारी त्यांना विशेष प्रिय होत्या. ते कायम सांगत की, माझा प्रभुराम हा कायम माझ्यासोबतच असतो. त्यामुळे त्यांनी वास्तव्य केलेल्या घळी या रामघळी म्हणून प्रसिद्ध पावल्या. उंब्रजहून चिपळूणला जाताना वाटेत हेळवाक हे गाव लागते. मुख्य रस्ता सोडून तिथे डावीकडे वळायचे. तिथून गाडी जाईल असा कच्चा रस्ता तयार केला आहे. अनेक ठिकाणी हा रस्ता तीव्र चढाचा आहे, परंतु या रस्त्याने पुढे गेले की कोंढावळे हे लहान वस्ती असलेले गाव येते. कोंढावळे ओलांडून झाडीतला चढाव चढत पुढे जावे लागते. नंतर आपण डोंगराच्या पायथ्याकडे जाऊ लागतो. पाण्याचा प्रवाह आपल्याला सामोरा येतो. आणि समोरच उंचावरून पडणारा एक मोठा धबधबा आपल्यासमोर येतो. त्याच्याच मागे लपली आहे ही रामघळ. धबधबा समोर ठेवून डावीकडच्या डोंगरावरून चढून आपण घळीच्या उंचीला येऊन पोहोचतो. उजवीकडे खोलात पाणी पडत असते आणि डावीकडे लांबच लांब पसरलेली घळ दिसते. घळीजवळच्या पाऊलवाटेने खाली उतरून धबधब्याखाली अंग शेकून घेता येते. हा सगळाच परिसर अतिशय रमणीय आहे. नीरव शांतता, पक्ष्यांचे आवाज यामुळे हा परिसर खरोखर गूढरम्य भासतो. भरवगड हा सुप्रसिद्ध किल्ला इथून जेमतेम आठ किलोमीटरवर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायरेश्वर केंजळगड

महाबळेश्वर, कोळेश्वर आणि रायरेश्वर ही पठारे अगदी मांडीला मांडी लावून बसली आहेत. ट्रेकर्ससाठी हा सारा परिसर म्हणजे मोठीच पर्वणी आहे. शिवस्पर्शाने पुनीत झालेल्या रायरेश्वर पठारावर जायला बरेच मार्ग आहेत. लोहदरा, गणेशदरा, गायदरा अशी त्यांची सुंदर नावे. पुणे-भोर माग्रे कोल्रे या गावी पोहोचायचे. इथून वर चढणाऱ्या रस्त्याला गायदरा असे नाव आहे. ऐन पावसात अगदी चिंब भिजायला इथे अवश्य यावे. आजूबाजूला असंख्य धबधबे, खूप खालीपर्यंत उतरलेले ढग, मधूनच दर्शन देणारा काळाकभिन्न केंजळगड. स्वर्गीय सुख म्हणतात ते हेच. एक संथ चढाई चढून आलो की, आपण रायरेश्वर-केंजळगड िखडीत येतो. इथून उजवीकडे लोखंडी कठडे लावलेले दिसतात. इथून वर गेल्यावर एका मोठय़ा तळ्याला वळसा घालून हा रस्ता रायरेश्वर मंदिरापाशी जातो. धुके असेल तर रस्ता काहीसा शोधायला लागतो. परंतु धुके जरा कमी झाले की, परिसराचा अंदाज येतो. ऐन श्रावण भाद्रपदात रायरेश्वरला यावे. असंख्य फुलांची उधळण झालेली दिसते. इथूनच परत मागे िखडीत येऊन केंजळगडावर जाता येते. रायरेश्वर ते केंजळगड ही डोंगरधारेवरून केलेली पायपीट फारच रमणीय आहे. केंजळगडाला असलेल्या दगडातल्या पायऱ्या अवश्य अनुभवाव्यात अशा आहेत. जरा ढग बाजूला झाले की खाली आणि आजूबाजूला दिसणारा परिसर आपल्याला खिळवून ठेवतो. केंजळगड वरून एक रस्ता परत कोल्रे या गावी उतरतो अन्यथा दुसऱ्या बाजूला खावली या गावी वाईच्या परिसरातसुद्धा उतरता येईल. आपल्याला असलेला वेळ आणि ठरवलेले वेळापत्रक या नुसार निर्णय घ्यावा. पण पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील ही पावसाळ्यातली भटकंती कायम स्मरणात राहते.

शेलारवाडीचा घोरवडेश्वर

ऐन पावसाळ्यात लांबलांबच्या ठिकाणांना भेटी दिल्या जातात पण अगदी जवळची ठिकाणें तशीच राहतात. घोरवडेश्वरबद्दल असेच काहीसे झालेय. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर सोमाटणे फाटय़ाच्या जवळच्या डोंगरावर शेलारवाडीची लेणी आहेत. या लेणींमध्येच वसला आहे श्रीदेव घोरवडेश्वर. रस्त्याच्या डाव्या बाजूला कमान आणि तिथून पायऱ्यांची वाट डोंगरावर जाते. पावसाळ्यात या पायऱ्या चढताना आजूबाजूचा परिसर फारच रम्य दिसतो. तिथून वर चढून आल्यावर ११ लेणींचा समूह दिसतो आणि त्याच्या आसपास २८ पाण्याची टाकीही खोदलेली आहेत. इ.स.च्या तिसऱ्या शतकात या लेणींची निर्मिती झाली. या लेणींमध्ये एका लेणीत एक चत्यगृह आहे. अंदाजे आठ मीटर लांब आणि सहा मीटर रुंद अशा या लेणीची उंची आहे तीन मीटर. जवळजवळ नऊ छोटय़ा खोल्या या दालनाला जोडून खोदल्या आहेत. बाजूला दुसऱ्या एका लेण्यात घोरवडेश्वराची पिंड आहे. इथल्या भिंतीवर ब्राह्मी लिपीमधील एक शिलालेख कोरलेला आहे. सिद्धम, थेरानाम भयात सिथाना अतेअसिनिया पवैत्रकय घट.. य बलिका सधाय बुधा अच चेतियाधरो.. असाच अजून एक शिलालेख या दालनाशेजारील ओवरीमध्येपण आहे. ऐन पावसाळ्यात इथे यावे. सगळा परिसर हिरवागार झालेला, ढग अगदी आपल्या हाताला लागतील इतके खाली आलेले, घोरवडेश्वराच्या डोंगरावरून धबधबे कोसळत असतात. तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर अशा किल्ल्यांच्या ऐनमध्ये असलेला घोरवडेश्वर परिसर भर पावसाळ्यात बघावा. एक धार्मिक, ऐतिहासिक आणि तितकेच निसर्गरम्य ठिकाण आपले पाय खिळवून ठेवतात.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best hill stations in maharashtra amazing hills stations in maharashtra
First published on: 13-09-2017 at 04:24 IST