युरोपच्या उत्तरेला स्कँडिनेव्हिया नावाचा द्वीपकल्प आहे. त्याच्या पश्चिम भागात नॉर्वे हा निसर्गसुंदर देश दक्षिणोत्तर पसरलेला आहे. या उभ्या, निमुळत्या देशाचा वरचा अर्धा भाग आíक्टक वर्तुळात आणि खालचा अर्धा भाग उत्तर अटलांटिक समुद्रात आहे. या नितांत सुंदर देशाच्या भूमीत आढळणाऱ्या अगणित हिमखाडय़ा (फियोर्डस), हिरव्या-जांभळ्या सूचिपर्ण वृक्षांची जंगले, बर्फाळ आíक्टक पठारे, उंचच उंच बर्फाच्छादित डोंगर आणि जागोजागची उतरत्या गवताळ छप्परांची लाल-हिरवी-पिवळी घरे ही अत्यंत विलोभनीय आहेत. तसेच या पर्वतीय मुलुखातील लोकजीवनाशी जोडलेल्या काही अद्भुत लोककथाही रंजक आहेत.

नॉर्वेच्या पश्चिम भागात  सॉग्नेफियोर्ड नावाची एक प्रचंड मोठी हिमखाडी किंवा फियोर्ड आहे. ती नॉर्वेतील सर्वात मोठी आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी हिमखाडी होय. इथून सुमारे दोनशे किलोमीटर आतपर्यंतचा प्रदेश हा नॉर्वेच्या ‘सोग्न ऑग् फियोर्डेन’ काउंटीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या पर्वतीय प्रदेशात अनेक लहान-मोठे धबधबे पाहावयास मिळतात. त्यांतील ‘जोस्फॉस्सेन’ नावाचा धबधबा अगदी जगप्रसिद्ध आहे. तिकडे जाण्यासाठी ‘फ्लॅमबाना रेल्वे’ नावाच्या एका छोटय़ा ट्रेनने प्रवास करावा लागतो. अत्यंत अवघड अशा या पर्वतीय प्रदेशात जाण्यासाठी हा  रेल्वेमार्ग १९२० साली तयार केला गेला होता. अवघ्या २० किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग तयार करणे हे त्याकाळी अत्यंत अवघड काम होते. या पर्वतीय प्रदेशात अवजड यंत्रसामुग्री नेणे अशक्य होते. त्यामुळे दोनशे कामगारांनी अहोरात्र काम करून, हातांनी अनेक डोंगर पोखरून हा रेल्वेमार्ग तयार केला. अवघ्या २० किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गावर दहा स्टेशने, एक पूल आणि तब्बल वीस बोगदे आहेत !

या विलक्षण प्रवासाला आम्ही नॉर्वेतील बर्गन या प्रसिद्ध शहरापासून सुरुवात केली. सुरुवातीला नेहेमीच्या साध्या रेल्वेगाडीने साडेआठशे मीटर उंचीवरील ‘म्रिडाल’ नावाच्या स्टेशनपर्यंत आम्ही गेलो. आणि मग म्रिडाल येथे गाडी बदलून या छोटय़ा ‘फ्लॅम’ रेल्वेत बसलो. डोंगराळ भागात चढणीच्या मार्गावर घसरू नये म्हणून दोन रुळांच्या मधोमध दातरे असणारी ही कॉग-व्हील ट्रेन होती. जुन्या काळच्या आगगाडय़ांप्रमाणे गडद हिरव्या रंगाचे लाकडी डबे, त्यांवर सोनेरी रंगाने लिहिलेले नंबर, आतमध्ये या गाडीचा इतिहास लिहिलेले फलक आणि सामान ठेवण्याचे पितळी रॅक्स अशा या देखण्या गाडीने आम्ही फ्लॅम स्टेशनाकडे निघालो. दोन्ही बाजूंनी बर्फाच्छादित शिखरे, दऱ्याखोऱ्यांतील निळेशार फियोर्डस, खडकांचे उंचच उंच कडे आणि कडय़ांवरून वाहणारे लहान-मोठे धबधबे पाहिल्यावर नॉर्वेतील या रेल्वेमार्गाला ‘जगातील सर्वात जास्त रमणीय असा रेल्वेमार्ग’ का म्हणतात हे आम्हाला उमजले. उंचावरच्या म्रिडाल स्टेशनापासून ही गाडी वेडीवाकडी, अवघड वळणे घेत खाली उतरू लागली. उतारावर असलेल्या बर्फाळ झाडीतून पलीकडे असणारी लाल, पांढरी, पिवळी लाकडी घरे काही काळ दिसली. नंतर बराच काळ थिजून राहिलेला पण आता वितळू लागलेला एक नितळ तलाव दिसला. उतार हळूहळू वाढत गेला. अधूनमधून काही बोगद्यांमधून आमची ही गाडी पुढे गेली. आणि मग ती जोस्फॉस्सेन (Kjosfossen)) या प्रसिद्ध धबधब्यापाशी येऊन थांबली. हा जोस्फॉस्सेन धबधबा सुमारे ९० मीटर्स उंचीवरून अनेक खडकांवर आपटत-वळत वेगाने खालच्या दरीमध्ये कोसळतो. या धबधब्याच्या उजव्या बाजूला मोडकळीस आलेले एक जुनाट दगडी बांधकाम आहे. धबधबा बघण्यासाठी गाडीतले सारे प्रवासी खाली उतरले. तोच गाडीच्या सर्व डब्यांच्या ध्वनिक्षेपकांतून संगीताच्या पाश्र्वभूमीवर एक गाणे ऐकू येऊ लागले. त्या गायिकेचे स्वर विलक्षण मधुर आणि आर्जवी होते.  हे गाणे सुरू  होताच समोरच्या दरीत दूरवर दिसणाऱ्या पडीक दगडी भिंतीमागून जर्द लाल रंगाचा पायघोळ झगा घातलेली एक सुंदर तरुण स्त्री पुढे आली. तिचे मोकळे सोडलेले केस पिंगट पांढरे होते. गाण्याच्या तालावर सूत्रबद्ध पदन्यास करीत तिने दरीतल्या खडकावर नृत्य सुरू केले. आम्ही सारेजण डोळे विस्फारून ते पाहू लागलो. नंतर ती लाल परी एका मोठय़ा खडकामागे लुप्त झाली. आणि अचानक दरीच्या दुसऱ्या बाजूने ती पुन्हा प्रकट झाली. दरीतील वृक्षराजीच्या पाश्र्वभूमीवर ऐकू येणाऱ्या सुरांच्या तालावर बाहू पसरून पदन्यास करीत ती पुन्हा अदृश्य झाली आणि क्षणार्धात तिसऱ्याच जागी प्रकट झाली. असे जागोजागी लुप्त होऊन दर खेपेस निराळ्याच ठिकाणी प्रकटणाऱ्या या लाल परीच्या अद्भुत नृत्याने आम्ही सारे थक्क होऊन गेलो. दोन-तीन मिनिटांतच त्या आर्जवी गाण्याचे स्वर हळूहळू विरून गेले. त्यासरशी दरीत प्रकटणारी ती लाल परीही अदृश्य झाली. मग आम्ही पुन्हा गाडीत चढून आपापल्या जागी बसलो, आणि आमच्या फ्लॅमबाना रेल्वेने इथल्या अद्भुत विश्वातून खरोखरच्या वास्तव जगाकडे आपला प्रवास सुरू केला.

नॉर्वेमधील पुरातन लोककथांमध्ये पहाडांतल्या जंगलांमध्ये वास्तव्य करणारया  ‘हुल्ड्रा’ नावाच्या एका अरण्य-परीचा उल्लेख आहे. ही परी मुळात एखाद्या वृक्षाच्या खोडासारखी असते. परंतु अरण्यात कुणी पांथस्थ आला तर ती मनुष्यरूप धारण करून, लाल वस्त्रे  परिधान करून, आणि केस मोकळे सोडून गाणे गात पाहुण्याला भुरळ पाडण्याचा प्रयत्न करते. आणि पाहुणा जर वश झाला तर ती त्याला कायमचा गुलाम बनवून कैदेत टाकते, अशी ती आख्यायिका आहे. या आख्यायिकेचा उपयोग करून नॉर्वेमधील फ्लॅमबाना रेल्वेकंपनी या पहाडी रेल्वेमार्गावर एक थांबा निर्माण करून प्रवाशांना या हुल्ड्रा नामक लाल परीचे पाच मिनिटांचे नृत्य तिथे दाखवते. या नृत्यात हुल्ड्रा परीचे काम तीन स्त्रिया करतात. त्यामुळे निरनिराळ्या जागांवर ही लाल परी प्रकट झाल्याचा आभास निर्माण होतो. नॉर्वेतील फ्लॅम रेल्वेचा हा अनोखा प्रवास आणि हुल्ड्रा या लाल परीचे नृत्य खरोखरच अविस्मरणीय असे आहे!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय दिवाण vijdiw@gmail.com