दुचाकीवरून : ऑलिम्पिक स्पर्धा आणि सायकलिंग

पहिल्या ऑलिम्पिक क्रीडा सामन्यात दोन हजार मीटर अंतराची सायकल स्पर्धा घेण्यात आली होती.

cycling, rio, rio 2016, olympic

अथेन्स येथे १८९६ मध्ये पार पडलेल्या पहिल्या ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांमध्येही सायकल शर्यतीचा समावेश करण्यात आला होता. आज जगातील साठहून अधिक देश सायकलिंग या क्रीडा प्रकारासाठी आपले खेळाडू पाठवतात. त्यामध्ये मोरोक्को, लॅटविआ, ग्वाटेमाला इस्टोनिआ यांसारख्या छोटय़ा देशांचाही समावेश आहे. मात्र भारताला अद्याप या देशांच्या यादीत आपले स्थान पक्के करता आलेले नाही. ५ ते २१ ऑगस्ट दरम्यान ब्राझीलमधल्या रिओ दी जेनेरो या शहरात ऑलिम्पिक स्पर्धा पार पडत आहेत.
पहिल्या ऑलिम्पिक क्रीडा सामन्यात दोन हजार मीटर अंतराची सायकल स्पर्धा घेण्यात आली होती. त्यानंतर हा स्पर्धाप्रकार ऑलिम्पिक सामन्यात नियमितपणे समाविष्ट झाला. सध्या ऑलिम्पिक सामन्यात व्यक्तिगत व सांघिक स्वरूपात स्पर्धा घेतल्या जातात. १९२८ पासून कालावधी-चाचणी (टाइम-ट्रायल) सायकल स्पर्धा घेण्यास सुरुवात झाली. त्यात एका वेळी फक्त एकच स्पर्धक धावपट्टीवर सोडून तो विशिष्ट अंतर किती वेळात पार करतो, हे मोजले जाते. सर्वात कमी वेळात ते अंतर पार करणारा सायकलपटू विजेता ठरतो. पाठलाग स्पर्धा हाही एक वैशिष्टय़पूर्ण स्पर्धाप्रकार ऑलिम्पिकमध्ये आहे. आधुनिक काळात सायकल शर्यतीचे मुख्यत: तीन प्रकार जास्त प्रचलित आहेत. धावपट्टीवरील शर्यती (ट्रॅक स्पोर्ट्स), रस्ता शर्यती (रोड रेस) आणि सायक्लो-क्रॉस शर्यत.

रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये सायकिलग क्रीडा प्रकारात ट्रॅक, रोड, माऊंटन बाईक आणि बीएमएक्स या चार स्पर्धा असतील.
ट्रॅक : पहिल्या वर्षांपासूनच ट्रॅक साकिलगचा ऑलिम्पिक क्रीडाप्रकारात समावेश आहे. स्प्रिंट, टाइम ट्रायल (१ किलोमीटर) टॅन्डम आणि सांघिक पाठलाग स्पर्धाचा यामध्ये समावेश असतो. १९६४ पासून वैयक्तिक पाठलाग स्पध्रेचा यामध्ये समावेश करण्यात आला आणि १९७२ मध्ये म्युनिच येथे पार पडलेल्या स्पर्धापासून टॅन्डम हा स्पर्धाप्रकार बाद करण्यात आला.
माऊंटन : आंतरराष्ट्रीय सायकिलग युनियनतर्फे १९९० मध्ये पहिल्या माऊंटनबाईक वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. सध्या महिला आणि पुरुषांसाठी क्रॉस कंट्री स्पर्धा घेतली जाते.
बीएमएक्स : बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांना बीएमएक्स प्रकाराचा समावेश करण्यात आला.
रोड स्पर्धा : पहिल्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये रोड सायकिलगचा समावेश होता. मात्र सेंट लुईस (१९०४), लंडन(१९०८) आणि पॅरिस (१९९०) मध्ये रोड सायकिलगचा समावेश नव्हता.
प्रशांत ननावरे prashant.nanaware@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Olympic game and cycling