News Flash

शिक्षकांनीच आत्मपरीक्षण करावे

पायाभूत सुविधा नसलेल्या शाळेतही शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.

प्रतिनिधिक छायाचित्र

‘शिकणे-शिकवणे’ हे संपादकीय (७ नोव्हें.) वाचले. त्यात आपण शिक्षकाविषयी सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही बाबींवरील वास्तव मांडले. शिक्षकांनी संप पुकारला तेव्हा जुन्या शिक्षकांची आठवण झाली. काही वर्षांपूर्वीचा काळ असा होता की, शिक्षकांना आपला बराचसा वेळ पटसंख्या वाढवण्यातच घालावा लागत असे. शाळा सुरू होण्यापूर्वी त्यांना पालकांच्या भेटी घेऊन आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी विनवणी करावी लागत असे तेव्हा कुठे विद्यार्थी शाळेत येत असे. खरे पाहिले तर ही सर्वात मोठी जबाबदारी आताच्या शिक्षकांची कमी झाली आहे. याबरोबरच कच्च्या विटांच्या शाळा आणि स्वत:ची जागाही उपलब्ध नसलेल्या आणि कोणत्याच प्रकारच्या पायाभूत सुविधा नसलेल्या शाळेतही शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.

तेव्हापण मतदार नोंदणी, जनगणना यांसारखी बरीचशी कामे असायची. त्यांनी कधीही या गोष्टींचा बाऊ  केला नाही. तेव्हाच्या तुलनेत बरीच कामे जरी वाढली असली तरी तितकीच आव्हानात्मक कामे कमीसुद्धा झाली आहेत. या सर्व बाबींचा विचार केल्यास शिक्षकांनीच आत्मपरीक्षण करायला हवे आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करायला हवा.

– समृत ग. गवळे, लोहा (नांदेड)

गरज धोरण अभ्यासाची..

‘शिकणे-शिकवणे’ हे संपादकीय  वाचले. अग्रलेखात ना  सरकारची बाजू घेतली ना शिक्षकाची. त्यात व्यक्त केलेली अपेक्षाही रास्तच आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे याबाबत कुणाचेच दुमत नसावे. त्यासाठी बरेच शिक्षक प्रामाणिक प्रयत्नदेखील करतात. पण कुठलेही काम करत असताना एक निश्चित दिशा असल्यानंतर त्या दिशेने नक्कीच वाटचाल होऊन ईप्सित स्थळापर्यंत आपण जातो. शासनाचे काम धोरणे राबवायचे असते पण त्या धोरणामुळे नक्की काय परिणाम होतील याचा देखील अभ्यास होणे तितकेच महत्त्वाचे आहे. धोरण राबवत असताना त्याचे चांगले आणि वाईट परिणाम हे होणारच. पण त्यात चांगल्या बाबीचा टक्का जास्तीचा असला पाहिजे हे मात्र धोरणकर्त्यांने लक्षात घेतले पाहिजे. नेमक्या याच ठिकाणी आमची कोंडी होतेय असे जाणवते. शिक्षकांकडील अशैक्षणिक कामाचा तपशील घेतला असता जाणवेल की ज्या कामासाठी शिक्षकाची नियुक्ती झालीय ती कामे नेमकी हीच का? कदाचित याचा अभ्यास केल्यास यावर उत्तर सापडेल.

– गिरीश ब. माने, लातूर

महाजनांची माफी अप्रामाणिक!

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महिलांविषयी अवमानकारक वक्तव्य केले.  महाजन यांनी आता त्याबद्दल माफी मागितली आहे. आताच्या काळात महिलांचा आदर राखणारे सशक्त कायदे आहेत. महिला आयोगाचाही समाजावर बऱ्यापैकी वचक आहे आणि महिलावर्ग निवडणुकीत मोठय़ा संख्येने मतदान करू लागला आहे. या सर्व गोष्टी अस्तित्वात नसत्या तर मग गिरीश महाजन यांनी आतासारखी विनाविलंब माफी मागितली असती का, हा खरा प्रश्न आहे. एखाद्या कृत्यामुळे किंवा वक्तव्यामुळे आपण अडचणीत येऊ  शकतो, आपले पद धोक्यात येऊ  शकते याची जाणीव झाल्यामुळे माफी मागणे आणि आपण जे काही बोललो ते सभ्यतेला आणि सुसंस्कृतपणाला धरून नाही याची मनाला टोचणी लागल्यामुळे माफी मागणे यात फार मोठा गुणात्मक फरक आहे. आपण जे काही बोललो ते विनोदाने बोललो, अशी पुस्तीही महाजन यांनी जोडली आहे. वास्तविक माणूस जेव्हा विनोदाने किंवा संतापाने बोलतो तेव्हाच तो मनात दडलेले विचार उघड करत असतो, एरवी तो तोलून-मापूनच बोलत असतो.

संकुचित धार्मिकता आणि परंपराप्रियता यांचे संस्कार ज्यांच्यावर झालेले असतात त्या सर्वाचा स्त्रीविषयक दृष्टिकोन हा मध्ययुगकालीनच असतो. स्त्रियांना जाचक रूढी आणि प्रथांपासून मुक्त करणारे कायदे करण्यात आले तेव्हा याच मंडळींनी या कायद्यांना विरोध केला होता हा इतिहासच आहे. संघस्थापनेच्या ९० वर्षांच्या कालखंडात अगदी अलीकडच्या काळातही सरसंघचालकपदी एकदाही महिला कार्यकर्त्यांची निवड होऊ  नये, शंकराचार्यपदाच्या शेकडो वर्षांच्या परंपरेत एकाही महिला साध्वीची निवड होऊ  नये, किंबहुना हिंदुत्ववादी संघटनांत तसा विचार साधा बोलूनही दाखविला जाऊ  नये, ही बाबच पुरेशी बोलकी आहे. तेव्हा गिरीश महाजन जे काही बोलले ते चुकून नाही, तर ते ज्या संस्कारात वाढले त्याच्याशी प्रामाणिक राहूनच बोलले. त्यानंतरची त्यांची माफी मात्र अप्रामाणिक ठरते.

– अनिल मुसळे, ठाणे

.. मग मद्याला नाव देण्यात कसला अपमान?

‘संस्काराचे मोती’ हा ‘उलटा चष्मा’ (७ नोव्हें.) वाचला. गिरीश महाजन हे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे मद्याला ‘महाराणी’ नाव द्यावे हे विधान बेजबाबदार आणि त्यांच्या पदाला अशोभनीय आहे; पण त्यांनी केलेले विधान हे  एक वास्तव आहे हेही मान्य करायला हवे.  स्त्रीचा वापर जाहिरातीत करून ती उपभोग्य वस्तू आहे, हा संदेश अनेक वेळा आपल्याकडील अनेक कथा, कादंबऱ्यांतून, जाहिरातींमधून दिला जातो आहे. तेव्हा याचा आपण निषेध करत नाही; पण मद्याला स्त्रीचे नाव दिले की तिचा अपमान कसा काय होतो? अनेक मद्याच्या दुकानांना, परमिट रूमला महिलांची नावे दिली जातात तेव्हा तिचा अपमान होत नाही का? क्रिकेट सामन्यात चीअर गर्ल्स म्हणून मुली नाचतात तेव्हा त्यांचा सन्मान होतो का?  मद्य हे पुरुष अधिक प्रमाणात पितात. पुरुषाला स्त्री आवडते, या सार्वत्रिक सत्याचा उपयोग जाहिरातीतून केला गेला तर त्यात स्त्रीचा उपमर्द कसा होतो हे समजत नाही. तेव्हा आपण महाजनांचा धिक्कार जरूर करू या, पण  ढोंगीपणा न करता ते जे म्हणाले ते सत्य आहे, हे कबूलही करू या.

– देवयानी पवार, पुणे

जेथे शिक्षकच असमाधानी..

‘अन्यथा’ सदरातील ‘मेरे पास सिर्फ..’ हा लेख (४ नोव्हेंबर) वाचला. त्यातले काही मुद्दे अतिशय योग्य व हृदयस्पर्शी आहेत. जसे : ‘शिक्षक समाधानी असतात.. अशा समाजात ‘मला शिक्षकच व्हायचंय’ असं म्हणून शिक्षक होणाऱ्यांची संख्या मोठी असते..’ हा जो मुद्दा आहे त्याचा अनुभव नक्कीच येतो. आपल्या देशात कितीही उच्च शिक्षण घेतले तरी गरिबीतून शिक्षण घेऊन शिक्षक झालेले लोक पैसा ‘ओतू’ शकत नाहीत; त्यामुळे त्यांची उमेदीची वर्षे वाया जाऊन एक असमाधान राहतेच. हल्ली तर विद्यार्थीच बोलायला लागलेत की, ‘आपने इतना पढाई कर के ऐसा क्या तीर मारा है, खुद का घर भी नहीं खरीद सकते. आपसे ज्यादा तो हमारा बनिया और रिक्षावाला कमाता है.’ याच मुद्दय़ावर मध्ये एकदा  ‘केबीसी’ कार्यक्रमात एका शिक्षिकेने प्रकाश टाकला होता. ‘विनाअनुदानित’च्या नावाखाली तेवढय़ाच लायकीच्या शिक्षकांना अस्थिरतेत आयुष्य व्यतीत करावे लागते. अभ्यास, शिकवणे, प्रवेश इत्यादी असंख्य कामे फक्त जिवंत राहता यावे म्हणून व पिढी घडवण्याची महत्त्वाकांक्षा म्हणून अतिशय केविलवाण्या अवस्थेत करत राहावी लागतात.  लेखकाच्या लक्षात ही गोष्ट आली व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती अनुल्लेखाने मारली नाही याबद्दल धन्यवाद!

– डॉ. स्वप्निल प्रभुलकर

धर्मातील दोषांमुळे लोप

बौद्ध धर्माला सम्राट अशोक व कनिष्कच्या काळात राजकीय आधार मिळाला. तसेच शुंग राजा पुष्यमित्राने बौद्धांवर अत्याचार केले. त्याबाबत संदर्भ फक्त बौद्ध साहित्यांत मिळतो. तो वैदिक धर्माचा अभिमानी होता. म्हणून त्याने अत्याचार केले याचे ठोस पुरावे मिळत नाहीत. त्यानंतर मिहिरगुल व बंगालमधील गौडचा राजा शशांक याने बौद्धांवर अत्याचार केले असे संदर्भ मिळत असले तरी सम्राट हर्षवर्धनच्या काळात बौद्ध धर्म चांगल्या स्थितीत होता. कारण चिनी प्रवासी युआंग श्वांग याने नालंदाला भेट दिली होती त्या काळातही बौद्ध धर्माची स्थिती चांगली होती. पुढे या धर्माला राजकीय आधार मिळाला नाही. तसेच आद्य शंकराचार्यानी बौद्धिक वादविवादात अनेक बौद्ध भिख्खूंना पराजित केले असले, तरी कुठेही हिंसेचा वापर केलेला नव्हता. मुळातच बौद्ध भिक्षुकांमध्ये स्त्रियांचा प्रवेश झाल्यानतंर ‘हा धर्म आता पाच शतकांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही’ हे वाक्य गौतम बुद्धाने आपला मित्र आनंद याला उद्देशून काढलेले आहेत. [संदर्भ – एन्शंट इंडिया – आर. एस. शर्मा, पृष्ठ क्रमांक – ११६ व ११७ ]  बौद्ध धर्मातील महायान पंथातील वज्रायान या उपपंथात सर्वात जास्त दोष शिरले होते. स्त्री-पुरुष एकत्र गुहेत राहत असत. त्या काळात या धर्माला हळूहळू ओहोटी सुरू झाली. तरीही बिहारमधील नालंदा व विक्रमशिला येथील बौद्ध शैक्षणिक केंद्रे जगात नावाजलेली होती. त्यावर हल्ला बख्तियार खिलजीने केला. त्यामुळे बौद्ध धर्माचे मोठे नुकसान झाले. हा लख्ख इतिहास आहे.

– प्रशांत कुलकर्णी, मनमाड

विवेकानंद असेही म्हणालेत!

विवेकानंदांवरील माझ्या पत्राला (लोकमानस, ६ नोव्हें.) उत्तर देणारी पत्रे (लोकमानस, ७ नोव्हें.) वाचली. ‘विवेकानंदांची पुढली वाक्येही जरूर वाचावीत’ या पत्राच्या लेखकाने विवेकानंदांची काही महत्त्वाची वाक्ये गाळली आहेत. २२ ऑगस्ट १८९२ रोजी पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटलंय, ‘देवा, ब्राह्मणांच्या रूपाने आज माझ्या देशात हिंडणाऱ्या या राक्षसांपासून माझ्या देशाचे रक्षण कर.’ आणि ७ जून १८९६ रोजी भगिनी निवेदिता यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी सांगितले, ‘आजच्या जगातील सर्व धर्म हे विडंबनाच्या रूपाने उरले आहेत. आज जगाला जर खरी कशाची गरज असेल तर ती चारित्र्याची..’

– दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा

समाजमाध्यमांनी शुल्क आकारावे

‘पप्पू नापास का झाला?’ या अग्रलेखातून (६ नोव्हें.) समाजमाध्यमे आज जगातील सर्वात प्रभावशाली गोष्ट आहे हे सत्य अधोरेखित केले आहे. वापरकर्त्यांच्या मानसिकतेवरून ते विध्वंसक की विकासक हे ठरत असते. आपल्याकडे निवडणुकांमध्ये इच्छुक उमेदवारांची ‘भाऊगर्दी’ कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून ज्याप्रकारे ‘अनामत रक्कम’ घेतली जाते, त्याप्रमाणे सर्व समाजमाध्यमांनी वापरकर्त्यांकडून शुल्क आकारण्यास सुरुवात करावी, जेणे करून बिनकामी डोक्यातून निघणाऱ्या असामाजिक जल्पकांना काही प्रमाणात तरी आळा बसेल. तसेच फेसबुकप्रमाणे इतर सर्वच माध्यमांनी ‘१ीस्र्१३ २स्र्ंे’ हा विकल्प आपल्या प्रणालीत समाविष्ट करावा जेणे करून संशयित माहितीची छाननी संबंधित कंपनी आणि पोलिसांद्वारे करवून मोकाट उधळलेल्या समाजमाध्यमी वारूला काही प्रमाणात वेसण घालू शकतो.

– प्रवीण भाऊसाहेब खेडकर, अहमदनगर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 2:27 am

Web Title: loksatta readers letter to editor on various issues
Next Stories
1 सर्व ७१४ जणांची चौकशी होणार का?
2 आकाश अर्ध अंधारलेलंच राहणार..
3 बुडीत कर्जे : अधिकाऱ्यांना शिक्षा होणे गरजेचे
Just Now!
X