टाळेबंदी आणि करोनामुळे भटक्या विमुक्तांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. पहाटेचं उठून, कंबरेला पदर खोवून, पाठीवर सिमेंटच्या पोत्यांपासून तयार केलेली भलीमोठी झोळी डोक्यावर अडकवून, आपल्या लेकरांना सोबत घेऊन शहरातील, मध्यवस्तीतील कचराकुंड्यांमधून भंगार शोधून, घरोघरी जाऊन घसा दुखेपर्यंत ओरडत केसांवर भांडी विकून आपला उघड्यावरचा संसार चालविणाऱ्या भटक्या विमुक्त वर्गावर टाळेबंदीमुळे उपासमारीची वेळ आलेली आहे.
कुठे भंगार गोळा करता येत नाही की, भांडी विकता येत नाही. या वर्गातील बऱ्याच कुटुंबाकडे रेशनकार्डदेखील नाही. मग, खायचं काय? मुलं कशी जगावायची? चूल कशी पेटवायची? असे असंख्य प्रश्न घेऊन सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरातील भटक्या विमुक्त लोकांनी प्रा. विनायक लष्कर यांच्याशी संपर्क साधला अन् त्यांनी भटके विमुक्त युवा परिषदेअंतर्गत विधान परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. डॉ. गोऱ्हे यांनी विशेष कार्य अधिकाऱ्यांना संपूर्ण मदत करण्याची सूचना केली आणि तात्काळ आष्ट्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी त्याची दखल घेतली.
रेशनकार्ड नाही अशा ३२ कुटुंबाना पुढील १५ दिवस पुरेल इतकं तांदूळ, मीठ, चटणी, साखर… अशा किराणा साहित्याचे वाटप त्यांच्या पोटाचा प्रश्न तात्पुरता का होईना सोडविला आहे. ही मदत त्यांच्यासाठी लाख मोलाची आहे. मात्र, प्रा. विनायक लष्कर आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मदत करू भटक्या विमुक्त समाजाबद्दल संवेदनशीलता दाखवून दिली. महाराष्ट्रातील अशी अजून बरीच कुटुंबं आहेत, ज्यांच्याकडे रेशनकार्डच नाहीत. त्यामुळे किराणा मिळत नाही. परिणामी, कुटुंबावर उपाशी राहण्याची आली आहे. त्यांना किराणा साहित्य मिळण्याची नितांत गरज आहे. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, अशा जिल्ह्यांमध्ये असा भटका विमुक्त समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा विचार करून स्वयंसेवा संस्था, राजकीय पक्ष, लब्धप्रतिष्ठितांनी करून पुढाकार घ्यायला हवा.