27 May 2020

News Flash

निर्भयानंतरचे प्रश्न…

<span style="color: #ff0000;">दुसरी बाजू</span><br />दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर आपण सगळेजण आतून हललो. आपण बदलू असंही वाटलं होतं. पण खरोखरच तसं घडलंय का? आसपासचं वातावरण पाहिलं तर

| January 10, 2014 01:01 am

दुसरी बाजू
दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर आपण सगळेजण आतून हललो. आपण बदलू असंही वाटलं होतं. पण खरोखरच तसं घडलंय का? आसपासचं वातावरण पाहिलं तर तसं काही दिसत नाही..
नमस्कार मंडळी,
बघता बघता २०१३ साल संपलं. नव्या वर्षांचा पंधरवडाही पंधरा मिनिटांत संपल्यासारखा संपला.
आधीपेक्षा हल्ली काळ लगेच संपल्यासारखा प्रत्येकाला वाटतो. म्हणजे आताच्या कोणत्याही एक किलोच्या पॅक्ड फूडमध्ये वजनात २०० ग्रॅमने मारल्यासारखा.. पण काळच तो. आज काळ बदललाय, काळाबरोबर माणूसही बदललाय म्हणून, काळ काही तासाला दहा-पंधरा मिनिटं हळूच खात नाही. तो ६० मिनिटांचाच असतो. पण त्या निर्धारित तासातली १०-१५ मिनिटं, आपणच कुठंतरी खाल्लेली असतात; १०० रुपयांतले २०-२५ रुपये, आपणच हिशेबात धरलेले नसतात; एका लिटरमधलं छोटंसं मापटं आपणच मधल्यामध्ये गटकावलेलं असतं; शपथेवर खरं सांगतो म्हणून सांगितलेल्या बातमीतला, थोडासा म्हणून बराच भाग आपणच ‘इकडे तिकडे’ केलेला असतो किंवा पोलिसाने पकडल्यावर ‘‘कशाला १०० ची पावती फाडताय; घ्या काहीतरी’’ म्हणून, ५०ची नोट आपणच सरकवलेली असते; इतकंच नाही तर आपल्या हातून झालेल्या छोटय़ाशा चुकीनंतर माफी मागण्यापेक्षा आपण प्रसंगी कायमचं वैरही पत्करायला तयार होतो.
वास्तव आणि ‘आपल्याला अपेक्षित असलेला वर्तमान’ यामध्ये एक गॅप पडत चाललेली आहे आणि ती आपणच निर्माण करून ठेवली आहे. आणि आज ती इतकी वाढलेली आहे की, अनेकांचं आयुष्य या मधल्या गॅपच्या संदिग्धतेतच सामावलेलं आहे. मग ही गॅप घर खरेदीमधल्या, कागदावरची किंमत आणि प्रत्यक्ष व्यवहारातल्या ‘ऑन’च्या रकमेची असो, एखाद्या १८ रु.च्या शीतपेयाच्या छापील किमतीपेक्षा ‘थंड करून देण्यासाठी’ म्हणून घेतलेल्या वाढीव २ रु.ची असो; घाईघाईत दिलेल्या ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली अपघातातल्या खऱ्या आणि जाहीर केलेल्या मृतांच्या संख्येत असो; वा वाढत्या अपेक्षांमुळे नात्यांतल्या जनरेशनची गॅप असो..
समोर घडणाऱ्या प्रत्येक बाबीतलं सत्य मनापासून तपासून बघणं जिकिरीचं वाटू लागलंय, कठीण होत चाललंय किंवा त्याची किंमत परवडेनाशी झालीय. किंबहुना शक्यतो कोणतंही सत्य, सत्य म्हणून आपल्याला नकोसंच झालंय. कारण आपल्या कल्पनेतल्या इमल्यापेक्षा, सत्यातला तोकडा पडलेला इमला आपल्याला आपल्या कमीपणाची जाणीव करून देतो आणि हे आपल्याला आज तसं सहन होईनासं झालं आहे.
२०१२च्या डिसेंबरमध्ये घडलेली आणि २०१३ मध्ये पूर्ण वर्षभर चच्रेत राहिलेली आपल्या देशातली एक हृदयद्रावक घटना म्हणजे, दिल्लीतलं ‘निर्भया’ प्रकरण.. या प्रकरणाचा जसा घराघरात प्रत्येकावर परिणाम झाला, तसा तो खूप मोठय़ा प्रमाणावर राजकारणावर, देशातल्या कायदा सुव्यवस्थेवर आणि विदेशी समुदायाचा भारताकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरही तितकाच गंभीर परिणाम झाला. पण एखादी गंभीर घटना घडली की, त्या घटनेचे काही सकारात्मक पडसाद पडतात तसे काही अनपेक्षित, अतक्र्य आणि विचार करायला लावणारे गंभीर परिणामही होतात.

प्रसंग जसा पुढे सरकत होता.  ती हे जे काय करतेय याची तिला कल्पना आहे का?  हा प्रसंग तिची आईपण पाहते आहे. मुलीच्या बलात्काराचा प्रसंग आई कसा पाहते आहे म्हणून मी तिच्या आईकडे पाहात होतो. तर आई त्या प्रसंगात आणि मुलीच्या अभिनयात गढून गेलेली.

निर्भया प्रकरणानंतर सर्वच राज्यात त्या त्या सरकारांनी प्रचंड खबरदारीचे उपाय राबवायला सुरुवात केली. फक्त स्त्रियांसाठीच्या नव्या हेल्पलाइन्सपासून ते अगदी कॉलेजवर साध्या वेशातल्या पोलिसांच्या अचानक धाडीपर्यंत. पण आपल्या महाराष्ट्रात काही उपाय तर थक्क करणारे होते. निर्भया प्रकरणानंतर सर्वात पहिला निर्णय इथे काय घेतला होता तर ‘पुणे मुंबई पुणे’ शिवनेरीच्या वातानुकूलित बसचे पडदे काढण्यात आले. काय जबरदस्त उपाय होता ना हा? मग त्यापाठोपाठ केंद्र सरकारने गाडय़ांच्या काचांना लावण्यात येणाऱ्या फिल्म्स्वर बंदी आणली. या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात ही केस अजून सुरू आहे. त्याचा निकालही लागायचाय. पण निकालाआधीच आमचे कर्तव्यदक्ष पोलीस, जो नियम अजून बनलेलाच नाही त्या गुन्ह्य़ासाठी राजरोस, वाट्टेल तेव्हा, वाट्टेल तिथे, वाट्टेल तितक्या वेळेला कार्यवाही करून, सामान्य जनतेला वेठीला धरून, हवा तेवढा पसा दंड म्हणून गोळा करत आहेत. आर. टी. ओ. ने दिलेल्या नियमावलीत सामान्य नागरिकाला ७० टक्केपारदर्शी फिल्म लावायला परवानगी दिलेली आहे. पण ‘‘आर.टी.ओ.च्या नियमांशी आम्हाला काही कर्तव्य नाही’’ असं एक ट्रॅफिक हवालदारच मला म्हणाला. मग आर.टी.ओ.च्या नियमांशी नक्की कुणाला कर्तव्य आहे? मग सरकारने फिल्म बनवणाऱ्या कंपन्यांना त्या फिल्म्स बनवायला परवानगी नाकारली आहे का? तर तसंही नाही. बरं हा नियम फक्त मुंबईत. बाकी कोणत्याही गावात फिल्म लावली तर गुन्हा नाही. म्हणजे फिल्म लावून गाडीत अत्याचार फक्त मुंबईतच होऊ शकतात. आणि फिल्म्सच नाही तर पूर्ण काळ्या काचा लावण्याची परवानगी असलेल्या सरकारी किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गाडय़ांमध्ये असे गुन्हे घडणारच नसल्याची खात्री असल्याने या नियमांशी त्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा काहीच संबंध नाही.
मी स्वत: पाहिलेला एक प्रसंग असा होता की, पोलिसांच्या या कार्यवाहीला वैतागलेल्या एका इसमाने त्याच्या गाडीच्या खिडकीला आतून पूर्ण काळा कागद, पडद्यासारखा फक्त वरून चिकटवलेला होता. पोलिसांनी गाडी थांबवली तर त्याने कागद वर केला आणि म्हणाला फिल्म लावायला परवानगी नाही ना? कागद लावायला असं कुठं कायद्यात म्हटलंय? पोलीस काहीच बोलू शकले नाहीत; आणि त्यांनी गाडी सोडलीही. कुठे ते निर्भया प्रकरण आणि कुठे हे त्यावरचे उपाय?
या प्रसंगांचं एकवेळ ठीक. पण या निर्भया प्रकरणानंतरचा मला आलेला एक अतिभयानक अनुभव तर अतिशय सुन्न करून गेला.
झी (िहदी) चॅनेलवर मध्यंतरी ‘इंडियाज् बेस्ट ड्रामेबाज’ नावाचा एक रिअ‍ॅलिटी शो होऊन गेला. त्या रिअ‍ॅलिटी शोसाठी भारतभरच्या मुलांची निवड प्रक्रिया सुरू होती. या निवड प्रक्रियेत मी परीक्षक म्हणून काम करत होतो. दिल्लीच्या ऑडिशनमध्ये मला आलेला हा थक्क करणारा अनुभव. मुलांचा वयोगट ५ ते १२. म्हणजे साधारण सातवी-आठवीपर्यंतचीच मुलं अपेक्षित होती. सकाळच्या थंडीत निवड प्रक्रिया सुरू झाली. प्रत्येक मुलाबरोबर आलेल्या पालकाला सादरीकरणावेळी आत बसण्याची मुभा होती किंवा आम्ही बसवायचोच. पहिल्या मुलाची ऑडिशन झाली आणि नंतर साधारण सातवीतली मुलगी आत आली. प्रसंगाच्या सादरीकरणावेळी बॅकग्राऊंड म्युझिकची पण तयारी वगरे करून येतात काही उत्साही पालक; म्हणून म्युझिक सिस्टीम ठेवलेली असते. त्या मुलीने सी.डी. दिली. तिचा प्रवेश सुरू झाला. म्युझिकवरून प्रसंग गंभीर असणार हे क्षणात लक्षात आलं.
मुलीचा अ‍ॅक्ट सुरू झाला. शाळेतून आलेली मुलगी, घरात खाजगी शिकवणीच्या शिक्षकाची वाट पाहते आहे. दारावरची बेल वाजते. शिक्षक येतात. हा शिक्षक प्रत्यक्ष कुणी अभिनीत करत नव्हतं, तर काल्पनिक. हा शिक्षक येतो आणि तिच्याकडे वासनेनं पाहतोय हे ती मुलगी तिच्या चेहऱ्यावर दाखवते. तो जवळ येतो, तिला खेचतो, तशी ही प्रतिकार करते. प्रतिकार कमी पडतो; ती दयायाचना करते, तो जुमानत नाही; तो इरेला पडतो आणि तिच्यावर बलात्कार करतो.. मुलगी अ‍ॅक्टमध्ये प्रसंगाअनुरूप खाली पडली होती, तिची आर्त किंकाळी.. वय वर्ष जेमतेम ११-१२.

आपल्याकडे तरुणसुद्धा कदाचित करायला लाजतील अशा गलिच्छ हालचाली, त्याची मध्यमवयीन आई सगळ्यात जास्त ‘एन्जॉय’ करत होती. हसत होती, खिदळत होती.

प्रसंग जसा पुढे सरकत होता, तशी माझी पाचावर धारण बसलेली. तिच्यावर होणाऱ्या बलात्कारापेक्षा मलाच भीती वाटू लागलेली. हे ही काय करतेय? ती हे जे काय करतेय याची तिला कल्पना आहे का? पुरुषासारखा पुरुष मी.. आतल्या आत माझंच शोषण झाल्यासारखा मी पाहात होतो. हा प्रसंग तिची आईपण पाहते आहे. मुलीच्या बलात्काराचा प्रसंग आई कसा पाहते आहे म्हणून मी तिच्या आईकडे पाहात होतो. तर आई त्या प्रसंगात आणि मुलीच्या अभिनयात गढून गेलेली. तिच्या त्या सादरीकरणाची पाच-सात मिनिटं मला युगायुगांसारखी वाटायला लागली. किंकाळीने अ‍ॅक्ट संपला आणि मला पुढचं काहीच ऐकू येईनासं झालं. मी काही क्षण बधिर झालो.
मुलांनी केलेल्या सादरीकरणावर आम्हाला मार्क्‍स द्यायचे होते. त्या मुलांशी त्यांच्या सादरीकरणावर संवाद साधायचा होता. भानावर येऊन मी मुलीला पहिला प्रश्न विचारला, ‘‘तुम्हारे साथ ऐसा हुआ है?’’ ती म्हणाली, ‘‘बिल्कूल नहीं।’’ माझा दुसरा प्रश्न, ‘‘किसने डायरेक्ट किया है तुम्हारा यह अ‍ॅक्ट?’’ त्यावरच्या उत्तराने तर मी कोसळलोच. ‘‘मेरी मम्मीने।’’ काही क्षण शांतता. मी मुलीला बाहेर जायला सांगितलं. मनामध्ये उसळलेल्या असंख्य प्रश्नांना आवरत मी तिच्या आईला थांबवलं. हा अ‍ॅक्ट तिने मुलीला का म्हणून करायला लावला असेल? असा प्रसंग खरंच मुलीवर ओढवला आहे का? त्या ठिकाणी ज्या कपडय़ांत या मायलेकी आल्या होत्या, त्यावरून त्या फार गरीब होत्या असं दिसत नव्हतं; पण फक्त कपडय़ांवरून अंदाज बांधणं मूर्खपणाचंच लक्षण. यांना या दिव्यातून जावं लागलं आणि हे व्यक्त करायची संधी नाही म्हणून तर हा प्रसंग सादर केला नसेल? नाहीतर एका रिअ‍ॅलिटी शोच्या ऑडिशनला कुणी हा प्रसंग कसा सादर करू शकतो? पण आईच्या उत्तरांमध्ये, मुलीवर असा काहीच प्रसंग आला नसल्याचं ठाम होतं. मग हा प्रश्न स्वाभाविकच होता की, आईनं हाच प्रसंग का निवडला? यावर ती माउली बोलली की, ‘‘यह अभी अभी वाकया हुआ है, आप जानते ही होंगे। इस अ‍ॅक्ट में अ‍ॅक्टिंग थी।’’ एकूण तिच्या बोलण्यातला मतलब हा होता की, तिला तिच्या मुलीकडून प्रचंड चॅलेंजिंग अ‍ॅक्ट करवून घ्यायचा होता. तिच्या बोलण्यावरून थोडक्यात तिला परीक्षकांवर इंप्रेशन पाडायचं होतं.
मुलीनं छान अ‍ॅक्टिंग केली या समाधानात आई गेली. पण मला बाकीच्या अनेक प्रश्नांनी भंडावून सोडलं होतं. एका आईनं, पोटच्या मुलीला, तेही सातवीतल्या, तिच्यावर बलात्कार होतो आहे, हे कसं आणि कोणत्या शब्दांत सांगितलं असेल? मुलीला पहिल्याच फटक्यात सगळं कळलं असेल का? कळलं नसेल तर आईने तिला काय विस्तारानं सांगितलं असेल? बलात्कार म्हणजे काय, हे त्या मुलीला निश्चित माहीत आहे का? आई तिचा स्वानुभव मुलीकडून तर व्यक्त करून घेत नाहीय? मुलीच्या सफाईदार शरीरभाषेकडे पाहून, आईनं हा प्रसंग तिला करून वगरे दाखवला असेल का? आईने?.. तिला परीक्षकांवर छाप पाडण्यासाठी दुसरं काहीच सुचू नये? आणि केवळ छाप पाडण्यासाठी हा प्रसंग सादर करायचं धाडस नेमकं कोणत्या संस्कारातून आलं असेल?.. माझ्याकडे फक्त प्रश्नच होते.
त्याच ऑडिशनमध्ये नंतर एक चौथ्या इयत्तेतली मुलगी आली. तिच्याबरोबर तिची कॉलेजवयीन ‘दीदी’ होती. या मुलीच्या विनोदी नाटय़छटेत वेगळी वेगळी पात्रं तिच्या घरी येतात आणि ही मुलगी त्या त्या पात्रांची नक्कल करते असा साधारण अ‍ॅक्ट होता. अत्यंत छछोर वागणारी शेजारची भपकेबाज ‘आंटी’, चिडचिड करणारी शिक्षिका यांच्याबरोबरीने अजून एक पात्र घराच्या दाराची बेल वाजवतं. आता कोण म्हणून मी उत्सुकतेनं पाहत होतं. मुलीनंही आलेल्या पात्राचं आश्चर्य व्यक्त करत विचारलं, ‘‘अरे? गे अंकल!’’ मी उडालोच. या मुलीच्या अ‍ॅक्टमध्ये हा ‘गे अंकल’ का आला असेल? या ‘गे’ची तिला जमेल तशी नक्कल झाल्यावर तिचा अ‍ॅक्ट संपला. मी त्या मुलीला विचारलं, ‘‘गे का क्या मतलब होता है बेटा?’’ बालसुलभ स्वरांत ती म्हणाली, ‘‘हिजडा.’’ ‘‘किसने डायरेक्ट किया तुम्हारा यह अ‍ॅक्ट?’’ ती. ‘‘मेरी दीदीने.’’
मी प्रचंड कौतुकाने पाठ थोपटेन या आशेने ‘दीदी’ हसत हसत समोर येऊन उभी राहिली. याही मुलीला बाहेर जायला सांगितलं आणि तिच्या ‘दीदीला’ जरा चिडूनच विचारलं की, ‘‘चौथीच्या मुलीच्या गोष्टीत कोल्हे, ससे, सांताक्लॉज वगरे कुणीही येत नाही का?’’ माझ्या प्रश्नाने दीदीचा चेहरा खर्रकन उतरला.
ज्या मुलीला ‘गे’ या शब्दाचा अर्थही माहीत नाही, त्या मुलीकडून ‘गे’ची नक्कल करून घेण्याच्या धाष्टर्य़ाबद्दल काय बोलावं? म्हणजे कॉलेजवयीन तिच्या दीदीलाही ‘गे’ म्हणजे काय माहीत नाही, नसेल तर तिने काय म्हणून तिच्या चौथीतल्या बहिणीला या सगळ्याची ओळख करून दिली असेल? तिच्या घरातल्या कुणीही हा अ‍ॅक्ट पाहिला नसेल? आणि पाहिला असेल तर कुणालाच यात वावगं वाटलं नसेल? परत खूप प्रश्नच पडत राहिले..
त्याच मालिकेत दुपारी एका सातवीतल्या मुलाने प्रेमावरची कविता सादर केली. त्या कवितेत ‘बोल्डनेस’च्या नावाखाली प्रचंड अश्लील हावभाव तो बिनदिक्कतपणे सादर करत होता. आपल्याकडे तरुणसुद्धा कदाचित करायला लाजतील अशा गलिच्छ हालचाली, त्याची मध्यमवयीन आई सगळ्यात जास्त ‘एन्जॉय’ करत होती. हसत होती, खिदळत होती.
फॉर्मवर एका मुलीचा फोटो विसरला होता म्हणून तातडीने तिच्या वडिलांनी मुलीला फोटो स्टुडिओत नेऊन तिचे फोटो काढले होते. मुलगी नुकतीच वयात येत होती. छातीचे उठाव पुरेसे दिसतील असे टॉप अँगलचे फोटो. का? तर टी.व्ही.ची ऑडिशन म्हणजे फिल्म लाइनला असंच सगळं लागत असणार, असा त्यांचा पक्का समज.
८-१० वर्षांच्या सातशे मुलींपकी अपवादालाही कोणत्या मुलीने मोराचं वगरे नृत्य केलं नाही. शीला, मुन्नी, जलेबी बाई, फेविकॉल वगरे अत्यंत उत्तान, बटबटीत, सवंग नाचांचीच प्रात्यक्षिकं..
पालकांच्या अभिरुचीचा प्रॉब्लेम आहे? सुबत्तेचा शिक्षणाशी संबंधच राहिलेला नाहीय? चांगलं म्हणजे काय हे त्यांना माहीतच नाहीय? का ते त्यांच्या अतृप्त इच्छा ते मुलांकडून पूर्ण घेतायत?
परत फक्त प्रश्नंच..
एका प्रमुख राजकीय पक्षाचं काही दिवसांनी भव्य असं होìडग पाहिलं. ‘८ मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!’ खाली कल्पना चावला, मेरी कोम, एक देखणी गायिका, आणखी काही कर्तृत्ववान स्त्रिया, पक्षाच्या मान्यवर ताई यांच्या रांगेत, त्या दुर्दैवी ‘निर्भया’चा फोटो. मुळात हा फोटो त्या मुलीचा नाहीच. सोशल साइटवर ‘नक्की बलात्कार झालेली मुलगी कोण’ या प्रचंड उत्सुकतेपोटी एका सुस्वरूप मुलीचा जो फोटो अनेक दिवस फिरत राहिला, तोच फोटो या होìडगवर होता. म्हणजे मुळात जिच्यावर बलात्कार झाला ती तर दुर्दैवीच होती; पण ज्या भलत्याच मुलीचा फोटो वापरला गेला, ती किती दुर्दैवी? पण तो फोटो त्याच मुलीचा आहे की नाही, याची शहानिशा करण्याची गरज त्या राजकीय पक्षाला कशाला हवी? आणि समजा, खरा फोटो मिळालाच तर महिलांबद्दलची कणव जागतिक पातळीवर जाहीर करताना मुळात बलात्कार झालेल्या मुलीचा फोटो एखाद्या जबाबदार म्हणवणाऱ्या राजकीय पक्षाने असा होìडगवर छापावा की न छापावा, असे सुसंस्कृत तारतम्य त्या पक्षाने कशाला बाळगायला हवे? आणि या प्रसंगात तिला ‘शुभेच्छा’ देण्याची संधी आपल्या आधी कुणी हिरावून घेतली तर? आणि अधिक चिंतनीय पुढचा भाग हा की, फोटो कशासाठी छापलेत? तर ‘शुभेच्छांसाठी’.. ज्या मुलीवर निर्घृण अत्याचार झाला त्या मुलीला ‘शुभेच्छा’?
परदेशातून या निर्भयाला कुणीतरी ‘पुरस्कार’ जाहीर केला. पुरस्कार? साधारणत: शौर्य गाजवणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिले जातात. त्या मुलीवर जेव्हा त्या नराधमांनी झडप घातली असेल, त्या वेळी तिने दयायाचना केली असेल; त्या मुलीला जेव्हा विवस्त्र केलं असेल, त्या वेळी तिनं जिवाचा आकांत केला असेल; ज्या वेळी तिची अब्रू लुटली जात होती, त्या वेळी तिने मदतीचा धावा केला असेल. त्या वेळी तिला मदत मिळाली असं तर काही घडलं नाहीच. उलट नंतरही तिची परवडच झाली. गुन्हा नोंदवून घेण्यातली दिरंगाई, वेळेवर न मिळालेली वैद्यकीय मदत यामध्ये त्या असहाय बिचारीचा जीव गेला. या सगळ्यामध्ये तिने काय ‘शौर्य’ दाखवलं म्हणून तिला ‘पुरस्कार’ जाहीर झाला? का तिने पुरुषाची हवस, असह्य़ वेदना, जिवाची परवड, अवहेलना, अपमान, हे सगळं ‘सहन’ केलं म्हणून ‘पुरस्कार’ दिला? खरंतर तो दिवस निकम्म्या पौरुषार्थाला लागलेला काळिमा, नाकत्रेपणा मिरवणाऱ्या निलाजऱ्या व्यवस्थेवरचा धब्बा, निर्ढावलेल्या बेमुर्वतखोरशाहीचे वर्तन आणि माणूस म्हणून आपले झालेले अध:पतन या सगळ्याचं प्रतीक म्हणून आपणच आपल्यासाठी ‘निषेधदिन’ म्हणून पाळायला हवा.  
ज्या समाजाला ‘पुरस्कार’ कुणाला द्यायचा आणि ‘सांत्वन’ कुणाचं करायचं याचं तारतम्य राहत नाही, त्या समाजाकडून आपण काय अपेक्षा ठेवणार?
त्या दुर्दैवी निर्भया प्रकरणापेक्षा बाहेरचं जग जास्त क्रूर झालंय का?
उरतात ते फक्त प्रश्नच…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2014 1:01 am

Web Title: after nirbhaya
टॅग Girls,Ladies,Nirbhaya
Next Stories
1 न परवडणारा राहुलचा आदर्श!
2 दीपिका एक्स्प्रेस सुपरफास्ट
3 वाचण्याचा जागतिक आनंद!
Just Now!
X