शुभा खांडेकर – response.lokprabha@expressindia.com

भारतातील सुमारे १२०० पैकी ८०० अश्मलेणी या राकट, कणखर, दगडांच्या महाराष्ट्रदेशात आहेत. त्यापैकी अजिंठा लेणींसाठी मराठी माणसाने त्याच्या हृदयाचा एक विशेष कप्पा राखीव ठेवलेला असतो. अजिंठय़ाला भेट देणाऱ्या पर्यटकांना विचारले तर त्यातले बहुसंख्य पर्यटक ‘भित्तिचित्रे पाहण्यासाठी,’ असे सांगतात. अजिंठय़ामधली प्राचीन भित्तिचित्रे कल्पनातीत सुंदर आहेत, सुप्रसिद्ध व लोकप्रियही आहेत. या भित्तिचित्रांच्या प्रतिकृती, त्यातील जातक कथा, आलंकारिक वेलबुट्टय़ा आज आपल्याला घरोघरी सजावटीसाठी वापरलेल्या दिसतात. अजिंठय़ाचा हत्ती तर भारत सरकारच्या एका टपाल तिकिटावर विराजमान आहे आणि भारतातील पर्यटकांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या पहिल्या दहा स्थळांमध्ये अजिंठय़ाचा क्रमांक अग्रणी आहे.

‘रंगचित्रांकित लेणी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजिंठा शैलगृहसमूहात अंदाजे ३० पैकी फक्त पाचच लेणी अशी आहेत ज्यांना पूर्णपणे चित्रांकित म्हणता येईल. तीन लेणींमधील रंगचित्रे अर्धवट राहिलेली आहेत. तेरा लेणींमध्ये रंगचित्रांची जेमतेम सुरुवातच झाली आणि पाच लेणींमध्ये कुंचल्याचा एक फराटादेखील उमटलेला नाही! असे असूनदेखील हीच भित्तिचित्रे आपल्याला प्राचीन भारताच्या सुवर्णयुगाच्या परमोच्च शिखराचे नि:संदिग्ध दर्शन घडवतात. जातक कथांचे निरूपण असलेल्या या भित्तिचित्रांच्या माध्यमातून प्रतिभासंपन्न, कुशल चित्रकारांनी भिंतींवर उतरवलेले विस्तीर्ण, भव्य व सुशोभित वाडे आणि प्रासाद, त्यांत ऐश्वर्यसंपन्न आयुष्य जगणारे सुखासीन स्त्री-पुरुष अभिजन, त्यांची देहबोली, त्यांच्या चेहऱ्यांवरचे शांत, आश्वस्त भाव, त्यांनी नेसलेली तलम, उंची वस्त्रे, वैविध्यपूर्ण व सुबक अलंकार, ओसंडून वाहणारी सुबत्ता, तिथल्या विलासी जनजीवनाचे अनेक पैलू यातून आपल्याला अनेक गोष्टींचे आकलन होते, ते पुढीलप्रमाणे:

एक : पाचव्या शतकात ही लेणी कोरण्यात आली तेव्हाचे ऐश्वर्य आणि भरभराट.

दोन : संगीत, नृत्य, चित्रकलेच्या व इतर कलागुणांची कदर करणारा आणि अप्रतिम सुंदर अभिव्यक्ती जोपासणारा तत्कालीन सुसंस्कृत समाज.

तीन : समाजाला या सुखसमृद्धीचा मोकळेपणाने उपभोग उपलब्ध करून देणारी व्यापारउदिमाने मजबूत झालेली आर्थिक क्षमता.

चार : प्रजाजनांच्या सुखरूपतेविषयी व सुरक्षिततेबाबत जागरूक असणारी स्थिर व खंबीर राजकीय शासनव्यवस्था.

या पाश्र्वभूमीवर ही भित्तिचित्रे म्हणजे एका समृद्धीने परिपूर्ण अशा सुवर्णयुगाच्या हिमनगाचे छोटेसे दृश्य टोक आहेत. एका व्यक्तीने मात्र त्या अदृश्य हिमनगाचा कसोशीने शोध घेतला. त्या संशोधकाचे प्राध्यापक डॉ. वॉल्टर स्पिंक. अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठात ते कलेतिहासाचे मानद प्राध्यापक होते आणि २३ नोव्हेंबर २०१९ला वयाच्या ९१ च्या वर्षी त्यांचे निधन झाले, तोपर्यंत कार्यरत होते.

काळ्याकुट्ट अंधारात अचानक लखलखीत वीज चमकून क्षणभरासाठी संपूर्ण सृष्टी उजळून निघावी, तसा अजिंठा हा एका अत्यल्पजीवी, परंतु देदीप्यमान इतिहासाचा, जिवापाड जपून ठेवावा असा विलक्षण तेजस्वी तुकडा आहे. या तुकडय़ाचे सर्व बारकाव्यांसह दर्शन घडवले ते प्रा. वॉल्टर स्पिंक यांनी.

अजिंठय़ाच्या भित्तिचित्रांच्या वादातीत सौंदर्याच्या पलीकडे, अजिंठय़ाच्या ऐतिहासिक मूल्यांकनाबाबत दोन महत्त्वाच्या प्रश्नांवरून पुरातत्त्वज्ञांमध्ये प्रचंड संभ्रम होता. ते दोन प्रश्न म्हणजे ही लेणी कोणी आणि केव्हा निर्माण केली. या लेणींच्या निर्मितीस कमीत कमी दोनशे वर्षे लागली, अशी एके काळी विद्वानांची अंदाजात्मक समजूत होती, पण ही निर्मिती अवघ्या वीस वर्षांच्या कालावधीत झाली हे सप्रमाण आणि नेमकेपणाने सिद्ध करून स्पिंक यांनी अजिंठय़ाबद्दलच्या सर्व पारंपरिक समजुतींना मुळापासून उखडून फेकले. अजिंठय़ाच्या भित्तिचित्रांमधून आपल्याला दिसणारे हे सुवर्णयुग प्रत्यक्ष वास्तवात अवतरले ते पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात वाकाटक राजवंशाच्या हरिषेण नावाच्या सम्राटाच्या अवघ्या १७ वर्षांच्या कारकीर्दीत. अजिंठय़ाला  सुमारे तीनशे वर्षांपासून अस्तित्वात असलेली सातवाहनकालीन पाच लेणी वगळता, वाकाटक काळातील सर्व लेणी आणि त्या लेणींमधील प्रत्येक भित्तिचित्र, ही संपूर्णपणे या सतरा वर्षांच्या काळातील निर्मिती आहेत.

अजिंठय़ाचा कालक्रम दोनशेवरून खाडकन वीस वर्षांवर आणून ठेवणाऱ्या या त्यांच्या आश्चर्यजनक संशोधनाने पुरातत्त्व जगतात खळबळ माजली, कारण त्यांच्या तंत्रशुद्ध आणि तर्ककठोर मांडणीमुळे अजिंठय़ाच्या नंतर कोरलेल्या घारापुरी इत्यादी सर्व लेणींचा कालक्रमदेखील त्या प्रमाणात आपोआप दोन शतकांनी छोटा झाला. या संशोधनात आपल्याला स्पिंक यांची कलात्मक संवेदनशीलता आणि शास्त्रशुद्ध कार्यपद्धती यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. त्यांचे हे समावेशक संशोधन विद्वज्जगतात क्रांतिकारी, इतिहासाच्या पुनर्लेखनाची मागणी करणारे, असे ठरले आणि ‘सुधारित लघुकालक्रम’ (शॉर्ट क्रोनॉलॉजी) या नावाने जगप्रसिद्ध झाले. अजिंठय़ाची निर्मिती राजकीय प्रेरणेतून झाली हे स्पिंक यांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आणि त्याबरोबरच ही लेणी कोणी निर्माण केली, या प्रश्नाची उकलदेखील या सुधारित लघुकालक्रमामुळे निर्विवादपणे झाली. ‘केव्हा’ आणि ‘कोणी’ ही दोनही कोडी कायमची सुटली. त्यांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म बारकाव्यासदेखील ऐतिहासिक पुराव्याचा दर्जा देणाऱ्या नावीन्यपूर्ण संशोधनशैलीला जागतिक पातळीवर शास्त्रशुद्धतेची उत्तुंग मान्यता लाभली.

मात्र त्यांच्या संशोधनाची व्याप्ती केवळ कालक्रम आणि लेणींचे निर्माणकर्ते निश्चित करण्यापुरती मर्यादित नव्हती. पाचव्या शतकात वाकाटक राजवंशाच्या सम्राट हरिषेणाच्या ज्या १७ वर्षांच्या कारकीर्दीत अजिंठय़ाची निर्मिती झाली, म्हणून ते म्हणतात गुप्त नव्हे, तर वाकाटक हे भारताचे सुवर्णयुग आहे! जितक्या कमी कालावधीत अशा अप्रतिम कलाकृती पूर्णत्वास आल्या, तितके त्यांचे मूल्य आणि महत्त्व अधिक, या न्यायाने हा सतरा वर्षांचा कालच सुवर्णयुगाच्या पदवीस पात्र ठरतो, हे तर्कसंगत आहे आणि म्हणूनच हा वीस वर्षांचा सुधारित लघुकालक्रम समजून घेणे हा कळीचा मुद्दा ठरतो.

ही लेणी केवळ प्राचीन भारताच्या पाचव्या शतकातील अत्यंत वैभवशाली सुवर्णयुगाचे हुबेहूब प्रतिबिंबच नव्हे, तर नेमक्या याच दोन दशकांच्या कालखंडात, विलक्षण नाटय़मय आणि वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडींनी व्यापलेल्या या सुवर्णयुगाच्या दु:खद शेवटाचा इतिहास, क्रमवार आणि अचूक सांगणाऱ्या अनन्यसाधारण आणि र्सवकष पुराव्यांचा खजिनादेखील आहे, हे त्यांनी संशोधनातून दाखवून दिले.

वर्ष १९५२ मध्ये अिजठय़ाच्या संशोधनाला सुरुवात करून सुमारे १२ वर्षांच्या संशोधनांती त्यांनी प्रथमच आपले निष्कर्ष एका परिषदेत मांडले. त्याने मोठीच खळबळ उडाली. अजिंठय़ाला पहिल्या सातवाहनकालीन टप्प्यात निर्माण झालेली पाच लेणी वगळून इतर सर्व लेणी वाकाटक काळात केवळ १७ वर्षांच्या कालावधीत झाली, असे त्यांनी जाहीर केले. इतकेच नव्हे तर अजिंठय़ाला स्पष्ट दिसत असलेल्या, पण अद्याप कोणाचे लक्ष वेधून न घेतलेल्या पुराव्यांच्या आधारे हा १७ वर्षांचा राजकीय इतिहास बारीकसारीक तपशिलांसकट त्यांनी उलगडून दाखवला.

इतिहासकारांनी वाकाटक राजघराण्यावर व विशेषत: सम्राट हरिषेण या महान सम्राटावर अन्यायच केला आहे, असे प्रा. वॉल्टर स्पिंक म्हणतात. रोमिला थापर यांच्या सुप्रसिद्ध ‘हिस्ट्री ऑफ इंडिया’च्या खंडात्मक ग्रंथांमध्ये सम्राट हरिषेणाचा उल्लेखदेखील नाही, याची खंत त्यांनी लेखी स्वरूपात व्यक्त केली. या राजघराण्याने एके काळी संपूर्ण मध्य भारतावर राज्य केले. पूर्वेला आंध्रच्या किनारपट्टीपासून पश्चिमेकडे कोंकणच्या किनारपट्टीपर्यंत सम्राट हरिषेण याचे, औट घटकेसाठी (म्हणजे सुमारे सतरा वर्षे) का होईना, आधिपत्य होते हे लेणींमधील शिलालेखांमुळे स्पष्ट होते. एवढय़ा मोठय़ा एकछत्री साम्राज्याच्या योग्य मूल्यांकनाकडे संशोधकांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. मधल्या सर्व प्रांतांचे राजे त्याचे मांडलिक होते.

सम्राट हरिषेण याला त्याच्या हक्काचे श्रेय मिळायला हवे यावर स्पिंक यांनी सतत भर दिला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर, डोक्यावर युद्धाची टांगती तलवार असताना, घाईगडबडीतदेखील अत्यंत वेगाने उत्कृष्ट कलाकृतींची निर्मिती झाल्याचे पुरावे अजिंठय़ाला पावलोपावली आपल्याला दिसतात.

या सतरा वर्षांच्या कालावधीच्या शेवटास अश्मक या मांडलिक राज्याच्या पुढाकाराने इतर मांडलिकांनी एकमेकांशी हातमिळवणी करून सामूहिक बंड पुकारले व कटकारस्थाने करून हरिषेणाचा आकस्मिक मृत्यू घडवून आणला. एक समर्थ नेतृत्व अचानक संपुष्टात आले व यानंतर अतिशय झपाटय़ाने अत्यल्प कालावधीत या बलाढय़ वाकाटक साम्राज्याचे तुकडे होऊन त्याची इतस्तत: लक्तरे उडाली व त्याचा दु:खद व भीषण शेवट झाला. एके काळी वैभवशाली, बलाढय़ आणि सुरक्षित असलेले हे साम्राज्य संपूर्णपणे धुळीला मिळाले.

या विलक्षण वेगाने घडलेल्या राजकीय इतिहासाचे अचूक प्रतिबिंब आपल्याला दाखवणारा आरसा म्हणजे अजिंठय़ाचे सुमारे तीस बौद्धधर्मीय लेणींचे संकुल आणि या आरशावरची १५०० वर्षे साचलेली धूळ पुसून हे स्वच्छ प्रतिबिंब आपल्याला दाखवणारे पुरातत्त्व संशोधक होते प्रा. वॉल्टर स्पिंक.

अजिंठय़ाच्या अश्मस्थापत्य घटकांचा अत्यंत बारकाईने अभ्यास, हा त्यांच्या सुधारित लघुकालक्रमाचा प्रमुख गाभा होता. त्याच्याशी त्यांनी सांगड घातली अजिंठय़ाला आणि इतरत्र सापडलेल्या शिलालेखांची आणि दंडी याने सातव्या शतकात रचलेले ‘दशकुमारचरित’ या गद्यकाव्याची.  अजिंठा आपल्याला एका पुस्तकाप्रमाणे वाचता येते आणि त्यांच्या सात खंडांत प्रसिद्ध झालेल्या संशोधनात त्यांनी हे प्रत्यक्ष करून दाखवले आहे. वाकाटक वंशाच्या ऱ्हासाचा तपशीलवार इतिहास, आपण विटेवर वीट ठेवून जशी इमारत रचतो, तसा प्रा. स्पिंक  यांनी पुराव्यावर पुरावा ठेवून बारीकसारीक तपशिलांसकट रचला. हा इतिहास म्हणजे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या पुराव्यांच्या अभ्यासातून निघालेल्या निष्कर्षांचा त्रिवेणी संगम आहे.

वयाच्या नव्वदाव्या वर्षांपर्यंत ते वर्षांतून दोनदा अजिंठय़ाला येत असत व विद्यार्थ्यांना अिजठय़ालाच सुधारित लघुकालक्रम प्रत्यक्ष उदाहरणे दाखवून शिकवणे आणि स्वत:च्या मूळ संशोधनाचे काम पुढे नेणे या दोन कामांत सतत गुंतलेले असत. हा नेम त्यांनी साठ वर्षांत चुकवला नाही. सहा दशके अविरत सुरू असलेला हा ज्ञानयज्ञ त्यांनी सात जाडजूड सचित्र खंडांमध्ये इंग्रजीतून प्रसिद्ध केला. शिवाय, व्हिडीओ फिल्म्स, दोनशेहून अधिक शोधनिबंध आणि प्राचीन भारतीय कलेतिहासावर विपुल लिखाण अशी भरगच्च साहित्यसंपदा निर्माण करून त्यांनी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा असामान्य प्रयत्न केला. अजिंठय़ाच्या भित्तिचित्रांच्या जतनाचे काम शासकीय पातळीवर सतत सुरू असूनदेखील १५०० वर्षांपूर्वी रंगवलेली ही चित्रे, तसेच इतर महत्त्वाचे ऐतिहासिक पुरावेदेखील चिंताजनक परिस्थितीत आहेत. या पाश्र्वभूमीवर स्पिंक यांचे प्रदीर्घ आणि मूलगामी संशोधन आणि त्यांनी या अमूल्य वारशाचे निष्ठेने आणि चिकाटीने केलेले तपशीलवार दस्तावेजीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरते.

भारत इतिहास संशोधक मंडळ, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटय़ूट, इंडियन आर्किऑलॉजिकल सोसायटी, इन्टॅक अशा अनेक संस्थांचे ते आजीव सदस्य होते व त्यांच्या नियतकालिकांसाठी लिहीत असत. त्यांनी लिहिलेले ‘कृष्णमंडल’ आणि ‘द अ‍ॅक्सिस ऑफ इरॉस’ या दोन ग्रंथांमधून त्यांच्या भारताबद्दलच्या संवेदनशीलतेची आणि ज्ञानाच्या खोली आणि व्याप्तीची कल्पना येते. सुमारे साठ दशकांच्या त्यांच्या भारताशी जुळलेल्या भावनिक बांधिलकीपोटी, सौंदर्यासक्त नजरेने निरखून, पारखून निवडलेल्या कलात्मक वस्तूंचे कायमस्वरूपी संग्रहालय खास त्यांच्या नावाने मिशिगन विद्यापीठात मांडण्यात आले आहे. भारतीय इतिहास, कला, संस्कृतीवर आणि माणसांवर मनापासून आणि पराकोटीचे प्रेम करणाऱ्या अजिंठय़ाच्या यक्षाचा हा योग्यच सन्मान आहे आणि भारतीय लोकांनी त्यांनी खुले केलेल्या ज्ञानभांडाराचा लाभ घ्यावा, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.