सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-गुरूच्या लाभयोगामुळे शिक्षक, प्राध्यापक, सल्लागार यांना विशेष लाभ होतील. सेवावृत्तीने गरजूंना मदत कराल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचे पद भूषवाल. यश मिळवाल. सहकारीवर्गाकडून वेळेत कामे पूर्ण करून घ्याल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. त्याच्यासह नव्या योजना आखाल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. नसा, शिरा आखडल्यास त्वरित औषधोपचार करा.

वृषभ चंद्र-बुधाच्या युतीयोगामुळे हसतमुखाने आलेल्या प्रसंगाला सामोरे जाल. विनोदबुद्धीने इतरांवर छाप पाडाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांपुढे नव्या कल्पना मांडाल. सहकारीवर्गाच्या अडचणी दूर कराल. जोडीदाराच्या शब्दाला त्याच्या कार्यक्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. जोडीने प्रवासयोग येतील. कुटुंबातील सदस्यांना योग्य सल्ला द्याल. ज्येष्ठ मंडळींचे आरोग्य सांभाळा. मूत्राशय, मूत्रिपड यांच्या कार्यात अडथळे येतील.

मिथुन चंद्र-गुरूच्या लाभयोगामुळे हाती घेतलेल्या कामांना वेग येईल. आपले अधिकार योग्य प्रकारे अमलात आणाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. ज्येष्ठ वरिष्ठांचे मार्गदर्शन हिताचे ठरेल. सहकारीवर्गाच्या अडचणी समजून घ्याल. मित्रमंडळींच्या ओळखीतून गरजूंना साहाय्य कराल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात समस्या उद्भवतील. कौटुंबिक वातावरणातील ताण दूर करण्याचा प्रयत्न कराल. पित्ताचे विकार बळावतील.

कर्क आत्माकारक रवी व राशी स्वामी चंद्र यांच्या लाभयोगामुळे घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. कौटुंबिक सौख्य चांगले मिळेल. नोकरी-व्यवसायात जरी अनिश्चितता असली तरी आपली कामगिरी चोख बजावाल. सहकारीवर्गातील विरोधकांना चांगला धडा शिकवाल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रातील कामांचा वेग मंदावेल. त्यामुळे त्याची घरात चिडचिड होण्याची संभावना आहे. जखमा चिखळतील. योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक!

सिंह मंगळ-शुक्राच्या केंद्रयोगामुळे कामाचा उत्साह वाढेल. इतरांनीही आपल्या वेगाने काम करावे ही अपेक्षा पूर्ण होणार नाही. नोकरी-व्यवसायात थोडे धीराने घेणेच इष्ट! वरिष्ठांचे म्हणणे पटवून घेणे कठीण जाईल. सहकारीवर्गाची उल्लेखनीय मदत होईल. जोडीदाराच्या भावना समजून घेऊन त्याला साजेसा प्रतिसाद द्याल. नातेवाईकांच्या समस्या त्रासदायक ठरतील. पाठीचे दुखणे व मणक्याचे आरोग्य सांभाळा.

कन्या गुरू-चंद्राच्या केंद्रयोगामुळे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल. अडीअडचणींवर मात कराल. नोकरी-व्यवसायात कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल. सहकारीवर्गाकडून जास्त अपेक्षा न ठेवणे बरे! कामानिमित्त प्रवास कराल. जोडीदार आपल्या अनुपस्थितीत कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडेल. घरातील वातावरण संमिश्र राहील. उत्सर्जन संस्थेची काळजी घ्यावी.

तूळ शुक्र-नेपच्यूनच्या युतीयोगामुळे बौद्धिक व भावनिक प्रगती कराल. काल्पनिक चिंता दूर कराल. नोकरी-व्यवसायात चालू घडामोडींचा नव्याने विचार करून इतरांपुढे मुद्दे मांडाल. सहकारीवर्ग तोंडदेखले ‘हो’ला हो करेल. जोडीदाराची कामाच्या व्यापामुळे चिडचिड होईल. एकमेकांसह चर्चा करून हलके वाटेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. पित्त व डोकेदुखीचा त्रास होईल. वेळेवर केलेले औषधोपचार उपयोगी पडतील.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे छोटय़ामोठय़ा गोष्टींमुळे रागराग कराल. अशा वेळी भावनांवर विचारांचा ताबा ठेवणे गरजेचे! नोकरी-व्यवसायात धरसोड वृत्तीमुळे कामे अधिकच गुंतगुंतीची होतील. सहकारीवर्ग आपला स्वार्थ बघेल. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवाल. जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. पित्ताशयाच्या तक्रारींकडे विशेष लक्ष द्यावे.

धनू चंद्र आणि शुक्र या दोन स्त्री ग्रहांच्या युतीयोगामुळे गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. नोकरी-व्यवसायात आर्थिक लाभ होतील. सहकारीवर्गातील समस्यांना वाचा फोडाल. जोडीदाराची त्याच्या कार्यक्षेत्रात पत वाढेल. परिवारातही त्याचा सल्ला उपयोगी ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. ओळखीच्या व्यक्तींकडून मन दुखावले जाण्याची शक्यता आहे.

मकर चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे जिद्दीने एखादा निर्णय घ्याल. तो पूर्ण करण्याचा निश्चय कराल. नोकरी-व्यवसायात कामाला गती मिळेल. आर्थिक स्थर्य लाभेल. सहकारीवर्गाची बाजू प्रभावी शब्दांत व्यवस्थापकांपुढे मांडाल. जोडीदाराची स्थिती समजून घ्याल. योग्य निर्णय घेण्यात त्याला साहाय्य कराल. कौटुंबिक ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. श्वसन मार्गाची काळजी घ्या. वैद्यकीय उपचार घ्यावा.

कुंभ चंद्र-नेपच्यूनच्या युतीयोगामुळे उत्स्फूर्त कलेला पोषक असे वातावरण निर्माण होईल. नवीन बौद्धिक आव्हाने स्वीकाराल. नोकरी-व्यवसायात आपल्या शब्दाला मान मिळेल. सहकारीवर्गाची मदत वाखाणण्याजोगी असेल. जोडीदारापुढील पेचप्रसंग बुद्धी व व्यवहारज्ञानाने सोडवाल. जोडीदाराला दिलासा द्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. कामातील ताणामुळे डोकेदुखी व रक्तदाबाचा त्रास जाणवेल.

मीन चंद्र-गुरुच्या केंद्रयोगामुळे हाती घेतलेल्या योजनांना मान्यता मिळेल. पशाने पसा वाढवाल. मानसन्मान मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपल्या कामाची कदर करतील. सहकारीवर्गातील विरोधकांच्या पोटात दुखेल. जोडीदाराची साथसोबत करून त्याला अडचणीतून बाहेर काढाल. हाडे व मणक्याचे जुने दुखणे बळावेल.