सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष रवी-चंद्राच्या लाभ योगामुळे केलेल्या कष्टाचे चीज होईल.  चारचौघांत मानाचे स्थान मिळेल. नोकरी-व्यवसायात ज्येष्ठ वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. आपल्या हिमतीची व जिद्दीची दाद मिळवाल. सहकारी वर्गाचे साहाय्य लाभेल. जोडीदाराच्या साथीने काही कठीण प्रसंगांना सामोरे जाल. कौटुंबिक वातावरण हलकेफुलके ठेवण्यात मित्रमंडळी साहाय्य करतील. नव्या परिस्थितीशी लवकरच जुळवून घ्याल. सर्दी-खोकल्यापासून सावधान! घरगुती इलाज उपयोगी ठरेल.

वृषभ बुध-हर्षलच्या लाभ योगामुळे बुद्धिमत्तेचे नवे आव्हान स्वीकाराल. योग्य युक्तिवाद लढवाल. नोकरी-व्यवसायात जनसामान्यांचे हित लक्षात घेऊन पुढील पावले उचलाल. संशोधन कार्यात मोलाची कामगिरी बजावाल. सहकारी वर्गाच्या मदतीमुळे कामाला वेग येईल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याची कामगिरी मोलाची ठरेल. कुटुंबात वैचारिक देवाणघेवाण होईल. शाब्दिक चकमकी टाळा. ज्येष्ठ मंडळींच्या तब्येतीची काळजी घ्याल. ओटीपोटाचे दुखणे अंगावर काढू नका.

मिथुन चंद्र-मंगळाच्या समसप्तम योगामुळे हौशी चंद्र आणि उत्साही मंगळ कामाला वेग देतील. नव्या जोमाने जबाबदाऱ्या पार पाडाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या नियमांचा बडगा सहन करावा लागेल. सहकारी वर्गाची अरेरावी सहन न करता त्याविरुद्ध आवाज उठवाल. जोडीदाराला आपल्या दिलासादायक शब्दांचा आधार महत्त्वाचा वाटेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. पचन आणि उत्सर्जन संस्थेच्या तक्रारी वाढतील. आहारावर नियंत्रण आवश्यक!

कर्क चंद्र-गुरूच्या केंद्र योगामुळे अभ्यासात प्रगती कराल. नोकरी-व्यवसायात नवे नियम पाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाला मोठी मदत कराल. कामे धिम्या गतीने पुढे सरकतील. जोडीदाराच्या डोक्याचा ताप आणि व्याप वाढेल. त्याची चिडचिड होईल. कुटुंब सदस्यांकडून चांगली मदत मिळेल. परिस्थिती नियंत्रणात ठेवता येईल. हवेतील बदलांमुळे डोके जड होणे, जीव कासावीस होणे संभवते. प्राणायाम करा.

सिंह गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे मोठय़ांचा आधार मोलाचा ठरेल. ओळखीमुळे रखडलेल्या कामाला गती येईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारी वर्ग नाराजीचा सूर लावेल. त्यांच्या अडचणी समजून घ्याल. सरकारी कामे रेंगाळतील. घाई करून उपयोग नाही. जोडीदाराचे आरोग्य सांभाळा. अतिविचाराने त्याची दमणूक होईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. निर्धाराने पुढे जाल. सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या शनी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे शनीच्या संयमाचा चंद्राच्या चंचलतेवर रोख बसेल. मेहनतीने यशाचे शिखर सर कराल. नोकरी-व्यवसायात अनेक अडथळे दूर सारून ध्येय गाठाल. वरिष्ठांना आपले मत पटवून देण्याचा प्रयत्न कराल. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित लाभ मिळाला नाही तरी काम सुरक्षित राहील. कुटुंब सदस्यांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढाल. बद्धकोष्ठता, डोकेदुखी यावर इलाज करावा लागेल.

तूळ चंद्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे बौद्धिक प्रगल्भता वाढेल. समस्येकडे संधी म्हणून बघाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांसह चर्चा कराल. अपेक्षित यश मिळेल. सहकारी वर्गाकडून काही गोष्टींना विरोध होईल. जोडीदाराला आपल्या आधाराची गरज भासेल. त्याच्यासह वैचारिक चर्चा करा. आपल्या आत्मविश्वासामुळे कौटुंबिक वातावरण खंबीर राहील. ज्येष्ठ सदस्यांची मदत कराल. नव्या संकल्पना राबवाल. तळपाय व मांडय़ा भरून येतील.

वृश्चिक चंद्र व शुक्र या एकमेकांना पूरक आणि पोषक अशा ग्रहांच्या केंद्र योगामुळे माया, ममता व कौटुंबिक सुख मिळेल. नोकरी-व्यवसायात जिद्दीने पुढे जाल. नवे मतप्रवाह मांडाल. अडचणींना तोंड देण्याची तयारी ठेवाल. जोडीदार आपल्याला चांगले समजून घेईल. त्याच्या पािठब्यामुळे आपले मनोबल वाढेल. कौटुंबिक वातावरण उत्साहाचे राहील. शेजाऱ्यांना मदत कराल. समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हाल. ओटीपोटाचे दुखणे सांभाळा. घरगुती उपाय पुरेसे ठरतील.

धनू चंद्र-बुधाच्या केंद्र योगामुळे सर्वागीण साधकबाधक विचार कराल. विवेकबुद्धीचा योग्य उपयोग कराल. नोकरी-व्यवसायात आपल्या विरोधातील हालचालींचा मागोवा घ्याल. सहकारी वर्गाकडून कामे करून घ्यावी लागतील. जोडीदाराच्या जबाबदाऱ्या आणि अधिकार यात वाढ होईल. ही नवी आव्हाने तो खंबीरपणे पेलेल. घरातील वातावरण शांत ठेवा. ‘अरेला का रे’ने उत्तर नको. शब्दांवर नियंत्रण ठेवा. ताणतणावामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

मकर मंगळ-शनीच्या लाभ योगामुळे मंगळाच्या धाडसाला शनीच्या नियोजनाची, दूरदृष्टीची योग्य साथ मिळेल. नोकरी-व्यवसायात अभ्यासपूर्वक अहवाल सादर कराल. कुटुंबाची मोठी जबाबदारी स्वीकाराल आणि हिमतीने पार पाडाल. जोडीदाराचा सल्ला हिताचा ठरेल. शांत डोक्याने विचारपूर्वक निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून आनंदवार्ता समजतील. सर्दी, कफ यांचा त्रास होईल. मान, खांदा यांची शीर आखडल्यास औषधोपचार घ्यावा लागेल.

कुंभ चंद्र-बुधाच्या लाभ योगामुळे व्यवहारज्ञान वापरून बुद्धीला चालना द्याल. नोकरी-व्यवसायात आपल्या चांगल्या स्मरणशक्तीमुळे कामातील बारकावे लक्षात ठेवाल. योग्य वेळी, योग्य ठिकाणी त्याचा उपयोग कराल. वरिष्ठांचा पािठबा मिळेल. जोडीदार परीक्षेच्या घडीतून सहीसलामत बाहेर पडेल. त्याला सावधगिरी बाळगावी लागेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. पचनक्रियेत बिघाड झाल्यास पथ्य पाळावे व प्राणायाम करावा.

मीन चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे कामाचा उत्साह वाढेल. नोकरी-व्यवसायात कामाचे नियोजन चांगले कराल. वरिष्ठांपुढे आपले कल्पक विचार मांडाल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रातील कामाच्या व्यापामध्ये अधिक व्यस्त असेल. कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहील. कुटुंबाला दिलासा द्याल. पाठीचा मणका त्रास देईल. वैद्यकीय सल्ला घ्यावा.