सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-गुरूचा लाभयोग हा एकंदरीत यशकारक योग ठरेल. हाती घेतलेल्या कामांना गती मिळून अपेक्षित लाभ मिळतील. वरिष्ठांच्या मागण्या पूर्ण करताना दमणूक होईल. शांत डोक्याने निर्णय घ्यावेत. सहकारी वर्गाकडून विशेष साहाय्य मिळेल. त्यांच्यातील गुणवत्ता कामाच्या दृष्टीने हितकारक ठरेल. जोडीदाराला आर्थिक समस्या भेडसावतील. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीतील अडथळे दूर होतील. डोळ्यांवर अतिरिक्त ताण पडेल. विश्रांती घ्यावी.

वृषभ चंद्र-बुधाचा नवपंचम योग हा मनाचा तोल सांभाळणारा योग आहे. परिस्थितीला धीराने सामोरे जाल. वरिष्ठांचे पाठबळ मिळाल्याने हुरूप वाढेल. सहकारी वर्गाला मदतीचा हात द्याल. कष्टाचे चीज होईल. जोडीदाराच्या अपेक्षेप्रमाणे त्याच्या कार्यात नव्या संधी उपलब्ध होतील. मुलांचा कल समजून घ्याल. कौटुंबिक स्वास्थ्य चांगले राहील. नातेवाईक मदत करतील. आधार देतील. कफ, खोकला आणि उन्हाळी सर्दी यांनी जोर धरल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल. पथ्य पाळावे.

मिथुन चंद्र-नेपच्यूनचा लाभ योग हा भाग्यकारक योग आहे. अंत:स्फूर्तीने कामातील कल्पकता वाढवाल. नोकरी-व्यवसायात स्तुतीस पात्र ठराल. सहकारी वर्गाला अधिक सूचना देऊन, बारकावे स्पष्ट करून काम करून घ्याल. मानसिक ताण वाढेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्यांची कामगिरी उत्तम ठरेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मुलांच्या बौद्धिक गरजा पूर्ण कराल. उत्साही व्यक्तींची नव्याने ओळख होईल. पचनसंस्थेवर ताण येऊन पोट बिघडेल. औषध घेऊन पथ्य सांभाळावे.

कर्क रवी-शनीचा नवपंचम योग हा मेहनतीचे चांगले फळ देणारा योग आहे. अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची बाजू ऐकून घ्यावी लागेल. विनाकारण आपल्यावर बारीक लक्ष ठेवले जाईल. धीर सोडू नका. सहकारी वर्गाची साथ मिळेल. जोडीदाराच्या वाढत्या अपेक्षांना आळा घालाल. मुलांच्या कामातील यश त्यांच्या हातून निसटण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण स्थिरावेल. शारीरिक समस्या वाढण्यापूर्वीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक!

सिंह चंद्र-गुरूचा युतियोग हा ज्ञानवर्धक योग आहे. नव्या गोष्टींचे प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळवाल. त्यांच्या मार्गदर्शनाने आगेकूच कराल. सहकारी वर्ग मदत करेल, परंतु लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. आपला स्वाभिमान दुखवून घेऊ नका. जोडीदाराच्या साथीने कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पेलाल. नातेवाईकांचे संबंध दृढ होतील. मुलांना चांगली दिशा दाखवाल. बद्धकोष्ठतेचा त्रास वाढल्याने अस्वस्थता येईल.

कन्या बुध-शुक्राचा युतियोग हा कलात्मकतेला व्यावहारिकतेची जोड देणारा योग आहे. आर्थिक लाभ होतील. मदतीचा ओघ वाढेल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना अमलात आणाल. सहकारी वर्गाची कार्यशक्ती उपयोगी पडेल. जोडीदाराच्या कामातील अडथळ्यांची मालिका मंदावेल.  कामे धिम्या गतीने पुढे सरकतील. मुलांच्या मेहनतीला यश मिळेल. कुटुंब सदस्यांच्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. मधुमेह आणि रक्तदाबासारख्या विकारांवर ताबा ठेवावा लागेल. दुर्लक्ष नको.

तूळ मंगळ-नेपच्यूनचा नवपंचम योग हा नावीन्यवर्धक योग आहे. नव्या संकल्पना अमलात आणताना तंत्रज्ञानाची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मागण्या वाढत जातील. सहकारी वर्गाकडून कामे करून घेताना अधिक ऊर्जा खर्ची पडेल. घरासंबंधित प्रश्न सुटतील. जोडीदाराला समजून घ्यावे. त्याच्या कामातील अडचणींवर मात करणे कठीण जाईल. धीर न सोडता एकमेकांना आधार द्याल. मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी छंद जोपासाल. उमेदीने मार्गक्रमण कराल.

वृश्चिक रवी-चंद्राचा केंद्र योग हा गुणवर्धक योग ठरेल. आपल्या शिस्तीचा, वक्तशीरपणाचा लाभ होईल.  नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे वागणे काहीसे जड जाईल. सहकारी वर्गाच्या वाढत्या समस्यांमुळे कामाची गती मंदावेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात नव्या वाटा मोकळ्या होतील. कठीण परिस्थितीतूनही संधी शोधाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मुलांना आपल्या जबाबदाऱ्या समजतील. छातीच्या विकारांची काळजी घ्यावी. व्यायाम आणि पथ्य महत्त्वाचे!

धनू चंद्र-मंगळाचा समसप्तम योग हा उत्साहवर्धक योग आहे. कामाचा आनंद घेत इतरांनाही मदत कराल. नोकरी-व्यवसायातील कामांना गती मिळेल. अपेक्षित लोकांशी संपर्क साधाल. सहकारी वर्गाकडून कामे करून घेणे म्हणजे एक कसोटीच असेल. नव्या अनुभवांची शिदोरी गाठीशी बांधाल. जोडीदाराच्या हिमतीची दाद द्याल. त्याचा आत्मविश्वास बळावेल. मुलांच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्याल. मूत्रविकार सतावतील. वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार घ्यावा लागेल.

मकर रवी-चंद्राचा नवपंचम योग हा संस्कारांची जपणूक करणारा योग आहे. आपण मानवतेचा सन्मान कराल. गरजवंतांना दिलदारपणे मदत कराल. मेहनतीचे फळ मिळणे अपेक्षित आहे. सहकारी वर्ग आपल्या नियमानेच काम करेल असे नाही. कामाची अडवणूक होईल. जोडीदाराच्या कामाचा उत्साह वाढेल. कामाच्या व्यापामुळे तो अधिक व्यस्त असेल. एकमेकांना सांभाळून घेण्याचा काळ आहे. मुलांना भविष्यातील गरजांची योग्य जाण करून द्याल. पित्त आणि कफ यांचे प्रमाण वाढेल.

कुंभ चंद्र-शुक्राचा नवपंचम योग हा कलात्मकतेला पुष्टी देणारा योग आहे. नित्यनेमाच्या गोष्टींमध्ये वैविध्य, आकर्षकता आणण्याचा प्रयत्न कराल. नोकरी-व्यवसायात नवे प्रकल्प मांडाल. त्यावर विचारविनिमय करून वरिष्ठांची संमती मिळवाल. समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हाल. जोडीदाराची कामे पुढे सरकतील. मुलांची मते जाणून घ्यावीत. कुटुंबाला आपला आधार वाटेल. छातीत कफ दाटेल. घरगुती उपाय आणि पथ्य उपयोगी पडेल. नियम कटाक्षाने पाळा.

मीन चंद्र-मंगळाचा नवपंचम योग हा आनंददायक योग आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून परिस्थितीकडे बघाल. नवे उपक्रम राबवाल. मेहनतीची तयारी ठेवावी लागेल. नोकरी-व्यवसायात पर्यायी मार्ग उपलब्ध असावा. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्ग कामामध्ये चिकाटी दाखवतील. जोडीदाराच्या कामाला यश मिळेल. लांबणीवर पडलेली कामे हातावेगळी कराल. घसा आणि डोळे यांचे आरोग्य जपावे. कामाच्या व्यापात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.