सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे नव्या कल्पना अमलात आणाल. धांदल, घाईगडबड टाळावी. नोकरी-व्यवसायात रखडलेल्या कामांना गतिमान कराल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळवाल. सहकारी वर्गाच्या अडचणी समजून घ्याल. जोडीदाराच्या बुद्धिकौशल्याची दाद द्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही ठेवाल. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीगाठींचा योग संभवतो. पचनाच्या तक्रारी डोकं वर काढतील. कामाच्या व्यापात पाठीचा मणका सांभाळा.

वृषभ उच्चीचा चंद्र व स्वराशीतील शनी यांच्या नवपंचम योगामुळे एखादे रखडलेले काम मेहनतीने व चिकाटीने साध्य करून दाखवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या न पटणाऱ्या गोष्टींकडे फारसे लक्ष देऊ नका. आपला मुद्दा त्यांना तर्कशुद्ध पद्धतीने समजावून द्याल. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. जोडीदाराला आपल्या भावनिक आधाराची त्याला गरज भासेल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे तरीही शिस्तबद्ध राहील. नियमांचे उल्लंघन करणे उचित नाही.

मिथुन चंद्र-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे नावीन्यपूर्ण विषयाचा सखोल अभ्यास कराल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना मांडाल. सहकारी वर्गाची नाराजी दूर करण्यासाठी अतिरिक्त शक्ती खर्च करावी लागेल. गैरसमज वेळेवर दूर करणे महत्त्वाचे. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. त्याच्या कार्यक्षेत्रात तो महत्त्वाची कामगिरी बजावेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. पित्तामुळे छातीत जळजळ होईल. तळपायाला खाज येईल.

कर्क बुध आणि हर्षल यांच्या समसप्तम योगामुळे सर्वसामान्यांपेक्षा वेगळ्या कल्पना मांडाल. काळाच्या पुढे जाऊन विचार कराल. नोकरी-व्यवसायात अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून मोठय़ा समस्यांतून सहीसलामत बाहेर पडाल. सहकारी वर्गाची मदत मिळेल. जोडीदाराच्या कामातील विलंबामुळे त्याची अधिक दमणूक होईल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मान आणि खांदे यातील शीर आखडल्याने अस्वस्थता वाढेल. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

सिंह चंद्र-मंगळाच्या युती योगामुळे चंद्राची कृतिशीलता आणि मंगळाची साहसी वृत्ती यांचा उत्तम मिलाफ दिसून येईल. अधिकाराचा योग्य उपयोग कराल. सहकारी वर्गासह असलेले विश्वासाचे संबंध दृढ होतील. जोडीदाराला त्याच्या कामातील नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कौटुंबिक वातावरण धावपळीचे असेल. मनस्ताप टाळा. आर्थिक गणिते नव्याने मांडाल. पोटरी वा मांडीमध्ये पेटके येण्याची शक्यता! कामासह व्यायाम व आरामाचीही  गरज भासेल.

कन्या रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. मोठय़ांचे मार्गदर्शन मिळेल. नोकरी-व्यवसायात मान, प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक स्थैर्य येईल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारी वर्गातील गैरसमज दूर कराल. जोडीदाराच्या प्रसंगावधानामुळे धोका टळेल. त्याच्या कार्यक्षेत्रातील कर्तबगारीचे कौतुक होईल. कौटुंबिक वातावरण वैचारिक देवाणघेवाणीचे राहील. त्यामुळे कामातील ताणतणाव कमी होण्यास मदत होईल. वातविकार सतावतील.

तूळ चंद्र-बुधाच्या समसप्तम योगामुळे चंद्राची भावनाशीलता आणि बुधाचा व्यावहारिक दृष्टिकोन यांच्यात समतोल साधाल. नोकरी-व्यवसायात व्यावसायिक संबंध जपाल. वरिष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल. सहकारी वर्गाची योग्य मदत मिळेल. जोडीदाराला कामाच्या ठिकाणी ताणतणावाला सामोरे जावे लागेल. त्याची स्थिती समजून घ्यावी. कुटुंबात शिस्तीसह प्रेमाचीही गरज आहे याची जाणीव होईल. आपले छंद जोपासताना सामाजिक ऋण फेडाल. पोटदुखीचा त्रास सतावेल.

वृश्चिक चंद्र व शुक्र या स्त्री ग्रहांच्या केंद्र योगामुळे एखाद्या गोष्टीसाठी अट्टहास धराल. परंतु अपेक्षा पूर्ण न झाल्यास दु:खी होऊ नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मन जिंकाल. सहकारी वर्गाच्या तक्रारी निकालात काढाल. येथे आपला स्पष्टवक्तेपणा उपयोगी पडेल. जोडीदाराची त्याच्या कार्यक्षेत्रात पत वाढेल. कौटुंबिक समस्या सामंजस्याने व सामोपचाराने सोडवाल. मुलांकडून शुभवार्ता समजतील. उष्णतेमुळे त्वचाविकार बळावतील. पित्ताचा त्रास वाढेल.

धनू  गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे कर्तृत्वाची भरारी घ्याल. अपेक्षित यशाच्या दिशेने वाटचाल कराल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचा वापर सुज्ञपणे कराल. वरिष्ठांच्या बडग्याला योग्य उत्तर द्याल. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. जोडीदाराच्या बौद्धिक पातळीचे त्याच्या कार्यक्षेत्रात कौतुक होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. ज्येष्ठ मंडळींचा आधार मिळेल. घशाची जळजळ होईल. कफ दाटेल. वेळेवर काळजी घ्यावी.

मकर शनी-चंद्राच्या केंद्र योगामुळे चंद्राच्या चंचलतेला शनीच्या चिकाटीचा लगाम बसेल. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेतले जातील. प्रयत्नांमधील सातत्य टिकून राहील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. सहकारी वर्गाला डोकं शांत ठेवण्याचा सल्ला द्याल. जोडीदाराच्या कलागुणांना वाव मिळेल. त्याच्या ज्ञानाचाही उपयोग होईल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची काळजी घ्या. मायेच्या दोन शब्दांचा त्यांना मोठा आधार वाटेल.

कुंभ चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे कामातील उत्साह वाढेल. आपले मुद्दे योग्य पद्धतीने मांडाल. अभ्यासपूर्वक सादरीकरण कराल. नोकरी-व्यवसायात नव्या योजना, नवे विचार अमलात आणण्याचा प्रस्ताव मांडाल. सहकारी वर्गाची पुष्टी मिळेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळवताना अधिक कष्ट घ्यावे लागतील. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. कुटुंबात आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल. वातविकार सतावतील.

मीन गुरू-चंद्राच्या केंद्र योगामुळे वातावरण उत्साहवर्धक असेल. मोठय़ांच्या मार्गदर्शनाने कामे गतिमान होतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांशी महत्त्वाच्या विषयांवर सर्वसमावेशक निर्णय घ्याल. सहकारी वर्गाची मेहनत फळास येईल. जोडीदार गरजवंतांना मदत करेल. सामाजिक उपक्रमात दोघे हिरीरीने सहभागी व्हाल. कुटुंब सदस्यांच्या अडचणींवर तोड काढाल. मूत्रविकार बळावतील.