मेष : जे काम तुम्ही नशिबावर सोडाल त्यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात जुने काम बंद करून त्या जागी नवीन काम सुरू करावेसे वाटेल. त्या निमित्ताने नवीन व्यक्तींशी ओळखी होईल. जुने काम घाईने बंद करू नका. नोकरीमध्ये ज्या कामाकडे तुम्ही दुर्लक्ष केले ते काम काही कारणाने ताबडतोब हातात घ्यावे लागेल. वरिष्ठांकडून मिळणारे मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडेल. घरामध्ये सर्व काही चांगले असेल.

वृषभ : दोन वेगवेगळ्या आघाडय़ांवर वेगवेगळे अनुभव देणारे हे ग्रहमान आहे. करिअरमध्ये इतरांची मदत तुम्हाला मिळाली नाही तरी तुम्ही त्याचा विचार न करता बेधडकपणे पुढे जात राहाल. व्यापार-उद्योगात ज्यांच्याकडून तुम्हाला पैसे मिळणार होते त्यांनी शब्द फिरवल्यामुळे तुमची बरीच धावपळ होईल, पण तुम्ही पर्यायी मार्ग शोधून काढाल. नोकरीच्या ठिकाणी अडचण निघाल्यामुळे तुम्हाला एकटे पडल्यासारखे वाटेल. वरिष्ठ कामाचा पसारा वाढवतील. घरामध्ये नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या कलाने वागावे लागेल.

मिथुन : जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला याची या आठवडय़ात आठवण ठेवा. ज्या व्यक्तींवर तुम्ही अवलंबून होता त्यांची काही तरी अडचण निघाल्यामुळे तुम्हाला स्वयंसिद्ध बनावे लागेल. व्यापार-उद्योगात चार पैसे हाताशी असल्यामुळे एखादा नवीन प्रयोग करून बघावासा वाटेल. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या पसंतीचे काम मिळेल. त्यातून थोडाफार लाभ होईल. मात्र तुमचे सहकारी असूयेपोटी तुम्हाला मदत करणार नाहीत. घरातल्या व्यक्तींशी जपून बोला.

कर्क : माणसांची तुम्हाला खूप सवय असते. जरी तुम्ही एकटे कार्यक्षम असलात तरी ज्या वेळी तुमच्या आसपास आवडत्या व्यक्ती असतात त्या वेळी तुमचा वेळ छान जातो. व्यापार-उद्योगात स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या तत्त्वांशी तडजोड करावी लागेल. जे पैसे खर्च होतील त्याची परतफेड व्हायला तीन-चार आठवडे लागतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीत. घरामध्ये सर्व जण छान बेत ठरवतील. पण मदतीला कोणीच पुढे येणार नाही.

सिंह : ज्या व्यक्ती तुम्हाला आवडतात त्यांनी तुमच्या मनाप्रमाणे वागले-बोलले पाहिजे असा तुमचा आग्रह असतो, पण या आठवडय़ात असे झाले नाही तर निराश होऊ नका. व्यापार-उद्योगात काही तरी भव्यदिव्य करावेसे वाटेल. त्यासाठी पशाची जमवाजमव करावी लागेल. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांची एखादी कल्पना पसंत पडणार नाही. घरामध्ये कोणलाही नाराज करायचे नाही. या स्वभावामुळे तुम्हाला बरेच पैसे खर्च करावे लागतील.

कन्या : सर्व ग्रहमान उलटसुलट आहे. तुम्हाला शांत चित्ताने काम करण्याची इच्छा असेल. पण ज्या घटना घडतील त्या मात्र तुम्हाला थोडय़ाशा अस्थिर करतील. व्यापार-उद्योगात खर्च वाढल्यामुळे जे पैसे तुम्हाला मिळतील ते अपुरे वाटतील. खेळत्या भांडवलाची सोय करण्याकरिता थोडय़ा काळापुरते कर्ज घ्यावे लागेल. नोकरीमध्ये नेहमीपेक्षा जास्त काम करण्यासाठी संस्थेकडून विशेष सवलत मिळेल. घरामध्ये काटकसर करायचे ठरवाल, पण आवडत्या व्यक्तींना खूश ठेवण्यासाठी तुम्हाला तुमचे विचार बाजूला ठेवावे लागतील.

तूळ : तुमच्या मनामध्ये अनेक नवनवीन कल्पना रेंगाळत असतील. त्या सगळ्या साकार व्हाव्या असे तुम्हाला मनापासून वाटेल, पण आपुलकीच्या व्यक्तींच्या बाबतीत भरवशाच्या म्हशीला टोणगा असा अनुभव येण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात जितके काम कराल, तितके जास्त पैसे मिळतील. नोकरीच्या ठिकाणी छुपे शत्रू कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. घरामध्ये सगळ्यांची हौसमोज करायचे ठरवाल, पण  ती पूर्ण करेपर्यंत कोणालाही आश्वासन देऊ नका.

वृश्चिक : ग्रहमान चांगले आहे. जे काम तुम्ही करणार आहात त्याला महत्त्व येईल. उद्योगात तुमच्या आवडीचे काम मिळवून देईल. तुमच्या क्षेत्रातील संघटनेचे तुम्ही प्रतिनिधित्व कराल. नोकरीच्या ठिकाणी केलेले कष्ट कधीही वाया जात नाहीत याचा अनुभव येईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होऊन एखादे आश्वासन देतील. नवीन नोकरीच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. घरामधला माहोल उत्साहवर्धक असेल. तुमच्या आवडीनिवडी पूर्ण करायचे तुम्ही ठरवाल.

धनू : तुमच्या मनामध्ये अनेक कल्पना असतील. त्या साकार करण्याकरिता तुम्ही सर्वतोपरी सिद्ध असाल, पण ज्यांच्याकडून मदत पाहिजे आहे त्यांचीच काही तरी अडचण निघेल. अखेर तुम्हाला कंबर कसून सिद्ध व्हावे लागेल. व्यापार-उद्योगामध्ये गिऱ्हाईक चांगले असेल पण खेळत्या भांडवलाच्या टंचाईमुळे बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ जे काम तुमचे नाही ते कामही करायला लावतील.

मकर : करिअरमध्ये तुमची अनेक मनोरथे असतील. ती पूर्ण करण्याकरिता तुम्ही सर्वार्थाने सज्ज व्हाल. व्यक्तिगत जीवनात मात्र भरवशाच्या म्हशीला टोणगा असा प्रकार असेल. व्यापार-उद्योगात भरपूर पैसे मिळविण्याची तुमची तमन्ना असेल. त्यासाठी अविश्रांत मेहनत घ्याल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी सांगितलेले काम ताबडतोब कराल. वरिष्ठ खूश होऊन एखादी सवलत देतील. बेकार व्यक्तींना तात्पुरते काम मिळेल. घरामध्ये वातावरण चांगले असेल. आपल्या आवडीचा एखादा बेत ठरवाल त्यामुळे खर्च वाढेल.

कुंभ : प्रयत्नांती परमेश्वर यांची आठवण करून देणारे हे ग्रहमान आहे. ज्या कामामध्ये तुम्हाला निराशा आली होती त्या कामाला चांगली कलाटणी मिळेल. नव्या जोमाने तुम्ही कामाला लागाल. व्यापार-उद्योगात कायदे कानून आणि कोर्टव्यवहार यांना महत्त्व येईल. त्याकडे लक्ष द्यावे लागेल. व्यावसायिक जागेची डागडुजी कराल. नोकरीच्या ठिकाणी रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. महत्त्वाच्या कामात लक्ष घालता येईल. घरामध्ये काही छान बेत ठरतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन : खूप कामे तुमच्यासमोर पडलेली असतील, पण त्यामानाने हाताशी कमी वेळ असेल. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे हे तुम्हीच ठरवा. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांच्या अटी जाचक असतील. त्या पूर्ण करण्याकरिता तुम्हाला सतर्क राहावे लागेल. नोकरीमध्ये नेहमीच्या कामाव्यतिरिक्त एखादे वेगळे काम करावे लागेल. शेवटी तुम्ही त्यामध्ये शॉर्टकट शोधून काढाल. घरामध्ये रंगरंगोटी, सजावट वगरे करावे लागेल.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com