विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

करोनासंसर्ग हा केवळ भारत, चीन, इटली, स्पेन, अमेरिकेपुरता मर्यादित नाही, तर त्याचा विळखा संपूर्ण जगाला पडला आहे. आधीच मंदीच्या दिशेने प्रवास सुरू असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला त्याने वाटेतच गाठले आणि जगभरात त्याचे भीषण परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. असे म्हणतात की, माणसाचा, नेतृत्वाचा आणि देशाचाही कस ‘कठीण समयी’ लागत असतो. त्या कालखंडात अनेकांचे मुखवटे उघडे पडतात आणि केवळ बाता मारून चालत नाही, तर कल्पकतेने नेतृत्व सिद्ध करावे लागते. करोनाने या कालखंडात बाहेरून महासत्तेसमान भासणाऱ्या काहींचे पोकळ वासे उघडे पाडले आहेत. तर माणसे ती माणसेच मग ती विकसित देशातील असोत नाही तर विकसनशील देशातील; सर्वाचेच पाय मातीचे असतात; हेही लक्षात येते.

या खेपेस आणि दोन आठवडय़ांपूर्वी ‘लोकप्रभा’ने करोनाकहराच्या कालखंडामध्ये देशोदेशी तेथील स्थानिक प्रशासन कशा प्रकारे काम करते आहे याचबरोबर सत्ताधारी नेतृत्व आणि जनतेचे वागणे कसे आहे याचा आढावा घेतला. करोनाभय वाढलेले असताना जगभरातील स्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न याही खेपेस केला आहे. याचा विशेष असा की, ‘लोकप्रभा’च्या नियमित लेखकांपैकी प्राजक्ता पाडगावकर आणि इतर काही वाचकांना आम्ही त्या त्या ठिकाणांहून लिहिते केले आहे. अशा प्रकारे वाचक-लेखकांनीच कव्हरस्टोरी करण्याचा हा आगळा प्रयोग आहे. या दोन्ही कव्हरस्टोरींमध्ये प्रकर्षांने जाणवलेला मुद्दा म्हणजे ‘कठीण समयी’ देश कोणताही असला तरी माणूस साधारणपणे सारखाच व्यक्त होतो. अनेक दिवस टाळेबंदी, असे म्हटल्यानंतर ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत आणि कॅनडापासून ते आग्नेय आशियातील देशांपर्यंत सर्वाचाच कल साठवणुकीकडे होता. विशेष म्हणजे सर्व ठिकाणच्या सरकारांनी सांगितलेले होते की, जीवनावश्यक वस्तू शंभर टक्के मिळणार आहेत. तरीही टॉयलेट पेपर्स मिळविण्यापासून ते नारळ मिळवेपर्यंत अनेक गोष्टींसाठी जगभर मारामाऱ्या झाल्या. फक्त देशांची आणि मारामाऱ्या झालेल्या गोष्टींची नावे व उपयोगिता वेगवेगळी होती इतकेच. उत्क्रांत झालेल्या मानवी मनात भीती आजही थरकाप उडवते आणि काही क्षण का होईना विवेक विसरायला लावते हेच खरे!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जे माणसाच्या बाबतीत लागू आहे ते, तसेच देशांच्याही बाबतीत लागू आहे. ‘कठीण समयी कोण कामास येतो’ याहीपेक्षा ‘कठीण समयी कोण कसा वागतो?’ यामध्ये व्यक्ती, नेतृत्व करणारे आणि देश सर्वाचेच भवितव्य दडलेले असणार. एव्हाना हे पुरते स्पष्ट झाले आहे की, यापुढे इतिहासात करोनापूर्व आणि करोनोत्तर अशी जागतिक कालखंडाची विभागणी असेल. करोनोत्तर कालखंडात कोण प्रगती साधेल किंवा कोण पुढे असेल याचे उत्तर करोनाकहराच्या कालखंडातील त्या त्या देशांच्या मोर्चेबांधणीवर अवलंबून असणार आहे. सर्वच देशांमध्ये बेरोजगारीची समस्या मोठी असणार आहे. करोनोत्तर राजकारणातील हा सर्वात महत्त्वाचा राजकीय मुद्दा असेल. भारतालाही हे तेवढेच लागू आहे. फक्त भारतासाठी या करोना कालखंडात एक संधीही दडलेली आहे. जागतिक स्तरावर अनेक देशांच्या मनातील चीनविषयी असलेल्या संशयामुळे त्याचे रूपांतर अढी तयार होण्यामध्ये झाले आहे. करोनाच्या चाचणी संचांबाबतचा अनेक देशांचा वाईट अनुभव यामुळे चिनी उत्पादनांच्या दर्जाविषयी जागतिक चर्चेला सुरुवात झाली आहे. याचे पडसाद करोनोत्तर कालखंडात पाहायला मिळतील. चीनच्या प्रचंड मोठय़ा उत्पादन क्षमतेला पर्याय शोधले जातील. यात संधी दडलेली आहे. भारताकडे पर्याय म्हणून पाहिले जाईल, अशी शक्यता अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र या साऱ्याचे भान राखून कायद्यात व देशाच्या वर्तनातही काही महत्त्वपूर्ण बदल करावे लागतील. तर हा सर्वासाठी कठीण ठरलेला समय भारतासाठी मात्र कामी येईल!