ढोल-ताशा पथक म्हणजे गणेशोत्सवासकट सगळ्या सणांचा उत्साह! त्यातही पुण्याची ढोल पथकं म्हणजे नेत्रसुखद अनुभव. शिस्त, नियोजन, ऊर्जा यांमुळे पुण्याची पथकं कौतुकाचा विषय असतो. यात भर पडतेय ती कलावंतांच्या पथकाची. कलावंत पथक यंदा मिरवणुकांमध्ये दुमदुमणार हे नक्की..!
गणेशोत्सवाची नांदी होते ती दोनेक महिने आधीपासूनच. याचं मुख्य कारण म्हणजे ढोल-ताशा पथक. ठिकठिकाणी पथकांची तालीम होत असल्यामुळे गणपतीच्या आगमनाची चाहूल तेव्हापासूनच लागते. उत्साह वाढतो. सध्या ढोल पथकांचं प्रस्थ इतक्या वेगाने वाढतंय की गणेशोत्सवासह इतरही सणासुदीच्या दिवसांमध्ये ढोल-ताशांचा नाद सर्वत्र घुमत असतो. विविध ठिकाणची विविध ढोल पथकं त्यांच्या वैशिष्टय़ांमुळे लोकप्रिय आहेत. पण, लोकप्रियता, सादरीकरणातून मिळणारं मानधन, पथकाचा विस्तार यापलीकडे पथक सदस्यांना महत्त्वाचा वाटतो ढोल वाजवण्यातला आनंद. असाच आनंद कलाकारही घेत असतात. कलावंत फाउंडेशन या चॅरिटेबल ट्रस्टने कलावंतांचं पथक सुरू केलंय. यंदाचं या पथकाचं हे दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कलावंतांच्या संख्येत भर पडली आहे. त्यामुळे या वर्षी कलावंतांचं पथक आणखी काही नव्या चेहऱ्यांसह उत्साहाने बाप्पाचं आगमन करताना दिसेल.
कलावंत फाउंडेशनचे सचिव अजय पुरकर या पथकाच्या संकल्पनेबद्दल सांगतात, ‘अनेक पथकं किंवा मंडळांमध्ये कलाकारांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जातं. कलाकारही त्या त्या मंडळांचा मान ठेवून अशा ठिकाणी जातात. काही वेळा पथकांमध्ये वाजवतातही. पण, ते पाहुणे म्हणून गेल्यावर वाजवणं वेगळं असतं. यातूनच कल्पना सुचली की, असं करण्यापेक्षा कलाकारांचं स्वत:चंच एखादं पथक का काढू नये. ही कल्पना पुढे नेत आम्ही चार-पाच जण एकत्र आलो. कलावंत फाउंडेशन या नावाने चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. कोणताही आर्थिक फायदा करून न घेता आम्ही कलाकार या पथकात काम करतो. या वर्षी आम्हाला मिळणाऱ्या मानधनातून आम्ही विविध संस्थांना मदत करणार आहोत.’ निर्माते मोहन दामले हे ट्रस्टचे अध्यक्ष असून अमित रानडे खजिनदार आहेत. तसंच प्राजक्ता हणमघर आणि राजेंद्र सोवनी हे विश्वस्त आहेत. या फाउंडेशनसह कलावंत को.ऑप. सोसायटीही त्यांनी केली आहे. यामध्ये सात पदाधिकारी आहेत. ट्रस्टच्या प्रमुख पदावर असलेले पाच आणि अभिनेता आस्ताद काळे आणि साहाय्यक दिग्दर्शक तेजस कुलकर्णी हे दोघं असे सात जण समितीच्या मुख्य पदांवर आहेत.कलावंत सोसायटी करण्यामागचा हेतूही पुरकर स्पष्ट करतात. ते म्हणतात, ‘मालिका, नाटक, सिनेमा या तिन्ही माध्यमांच्या पडद्याआडच्या कलाकारांसाठी कलावंत को-ऑप. सोसायटीची स्थापना केली. पडद्याआडच्या लोकांचं उत्पन्न फारसं नसतं. अशांना सोसायटीत सदस्य करून त्यांचे पर्सनल अॅक्सिडंट इन्शुअरन्स काढायचे. कारण कोणत्याही कलाकृतीचं शूटिंग होत असताना अपघात झाला तर त्यांना तातडीने या इन्शुअरन्समधून मिळणाऱ्या पैशांची मदत होऊ शकेल. सोसायटीचा सदस्य होण्यासाठी किमान शुल्क आकारलं जाईल. यासाठी आम्हाला काही पक्षांच्या चित्रपट शाखाही मदत करू इच्छितात. सोसायटीप्रमाणेच पथकातही केवळ कलाकार न घेता इतर अनेक तांत्रिक विभागांतील लोक आम्ही सहभागी करुन घेतले आहेत.’ गेल्या वर्षी सुरू झालेलं हे कलावंत पथक सोशल साइट्सवरून लोकप्रिय झालं. या पथकाचा विस्तार अधिकाधिक वाढवून त्याचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करण्याचा पथकाचा मानस आहे.
४० ढोल आणि १० ताशे इतकी सामग्री असलेलं हे पथक यंदा गणपतीच्या दहाही दिवस पुण्यात दुमदुमणार आहे. मधल्या दिवसांमध्ये मंडई, गणपती चौक, गणेश पेठ अशा काही ठिकाणी स्थिर वादन करताना तर काही ठिकाणी मिरवणुकांमध्ये कलावंत पथकाचा नाद घुमेल. ‘गणपतीचं आगमन आणि विसर्जन अशा दोन्ही दिवशी आम्ही मिरवणुकांमध्ये सहभागी होतो. शेवटच्या म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी दोन महत्त्वाच्या ठिकाणी वादन करायचं आहे. मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी आणि आम्ही तालीम करतो त्या लक्ष्मी नगरमधील एका मंडळासाठी वादन करणार आहोत.’ खरं तर कलाकार शूटिंगमध्ये अतिशय व्यग्र असतात. नाटकांचे दौरे, मालिकेचं रोजचं शूट आणि सिनेमांचं शहराबाहेर असलेलं शूट अशा अनेक कारणांमुळे कलाकारांना इतर उपक्रमांमध्ये सहभाग घेणं अनेकदा कठीण होतं. पण, तरीही पथकासाठी अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ एकत्र आले आहेत. यातून कोणताही आर्थिक फायदा होणार नाही हे माहीत असूनही कलावंत पथकात सामील झाले आहेत. ठिकठिकाणी वादन केल्यानंतर पथकाला मिळणाऱ्या मानधनातून सामाजिक कार्य केलं जाणार असल्याचं सांगतात. ‘गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन महिने आधीपासून आम्ही तालीम करायला सुरुवात करतो. एकदा तालीम सुरू झाली की, कलावंत एकमेकांना भेटले की तालीम सुरू झाल्याबद्दल बोललं जातं. तालमीत लवकरात लवकर सामील होण्याचा विचार त्यांच्या मनात सुरू राहतो. सिनेइंडस्ट्रीत असल्यामुळे ठरवून विशिष्ट दिवसांमध्ये तालीम करू शकत नाही. त्यामुळे आम्ही कलाकारांना सांगितलं आहे की, जसं जमेल तसं या. शनिवार-रविवार आवर्जून या. रोज संध्याकाळी साडेपाच ते साडेआठ अशी तालीम केली जाते. तालमीसाठी एका वेळी वीस ढोल वाजवण्याची परवानगी आहे. हा कायदा आम्ही पाळतो. आम्ही दोन बॅच करतो. याला आम्ही दोन आवर्तनं असं म्हणतो. एका आवर्तनाला वीस अशी दोन आवर्तनांमध्ये तालीम सुरू असते. आमच्यात काहींना ढोल-ताशा वाजवण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे असे अनुभवी कलावंत नव्या लोकांना शिकवतात. नव्यांची पक्की तालीम झाल्यानंतरच त्यांना प्रत्यक्ष मिरवणुकीत वाजवण्याची संधी दिली जाते. ढोलवादन समूहाने होत असल्याने त्यात एक जण जरी चुकला तरी गोंधळ होऊ शकतो. हे होऊ नये म्हणून प्रत्येकाची तालीम पक्की होण्याकडे आमचा कल असतो’, असं अजय सांगतात.
पथकाला मिळणारं मानधन हे सामाजिक कार्यासाठी वापरायचं असं कलावंत फाउंडेशनने ठरवलं आहे. यंदाच्या मिरवणुकांमध्ये वादन केल्यानंतर त्यातून मिळणारा संपूर्ण पैसा काही सामाजिक उपक्रम करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. फार मोठं नाव नसलेल्या एखाद्या सेवाभावी संस्थेला पैसे देणे, नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्यांना मदत करणं, रक्तदान शिबीर भरवणं, आरोग्यविषय काही उपक्रम राबवणं, पर्यावरणसंबंधित काही प्रयोग करणं अशी कामं फाउंडेशनअंतर्गत होतील. यासाठी पथकाने मानधनाचं विशिष्ट स्वरूप आखलंय. याबाबत अजय सांगतात, ‘मागच्या वेळी आम्ही नवीन असल्यामुळे मानधनाबाबत विशिष्ट रक्कम निश्चित केली नव्हती. लोकांना पथकाविषयी कळावं इतकंच आम्हाला वाटत होतं. पथकाचा विस्तार बऱ्यापैकी झाल्यामुळे आता मात्र मानधनाबाबत आम्ही बोलू शकतो. साधारण ५० हजार ते एक लाख इतकं मानधन आम्ही ठरवलं आहे. यात बदल होऊ शकतात. कारण प्रत्येक मंडळाचं विशिष्ट बजेट असतं. त्यानुसार आमच्या मानधनात कमी-जास्त होऊ शकतं. पण, सामाजिक कार्यासाठी आम्ही हा उपक्रम करत असल्यामुळे जास्तीतजास्त रक्कम आम्हाला मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. पुण्यात इतरत्र वाजवताना मानधन सांगितलं जात असलं तरी तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दुसऱ्या गणपतीसमोर ढोलवादनाचं मानधन घेतलं जात नाही. मानाच्या गणपतीपुढे वाजवणं ही परंपरा आहे. एक वर्ष वाजवलं दुसऱ्या वर्षी नाही असं चालत नाही. तसंच या गणपतीसमोर वाजवणं हा आमचा मान आहे.’
इतरत्र ठिकाणी वाजवण्याची कोणत्याही पथकाची तयारी असली तरी इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी जमून येणं गरजेचं असतं. कलावंत ठरलेल्या ठिकाणी जाऊन ढोलवादन करतात; असा इतका सोपा प्रकार नसतो. ढोल आणि ताशा बांधणं, फेटे योग्य पद्धतीने बांधणं, ते रीतसर सोडणं, पुन्हा सुस्थितीत ठेवणं ही सगळी मोठी जबाबदारी असते. या सगळ्यासाठी आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ असणं आवश्यक आहे. कलावंत पथकाच्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ‘आमच्याकडे ४० ढोल १० ताशे आहेत. त्याची ने-आण करण्याची जबाबदारी, कसे न्यायचे, कलाकारांची सोय अशा अनेक गोष्टींचं नियोजन करणं आवश्यक असतं. या सगळ्या गोष्टी शंभर टक्के चोख जमून आल्या की आम्ही पुणेव्यतिरिक्तही वाजवायला सुरुवात करणार आहोत’, अजय सांगतात.
अजय पुरकर यांच्यासह आस्ताद काळे, सौरभ गोखले, श्रुती मराठे, शाश्वती पिंपळकर, प्राजक्ता हणमघर, माधवी सोमण, ज्योती मालशे, तेजस्विनी पंडित, हृषीकेश जोशी, प्रसाद ओक, ऋजुता देशमुख, पीयूष रानडे, मयूरी वाघ, अनुजा साठे, परी तेलंग, केतन क्षीरसागर, श्रीकार पित्रे, प्रसाद जवादे, राधिका देशपांडे, मधुरा देशपांडे, नूपुर दैठणकर, तेजश्री वालावलकर, अश्विनी कुलकर्णी, बिपीन सुर्वे ही कलाकार मंडळी पथकात आहेत. अनेक लोकप्रिय नावं यात दिसत असली तरी कोणाचंही ‘सेलिब्रेटी स्टेटस’ आड येत नाही. स्टोअरेजमधून स्वत: ढोल बाहेर काढण्यासाठी उचलणं, बांधणं, इतरांना मदत करणं, पुन्हा स्टोअरेजमध्ये जाऊन ठेवणं, आवाराआवर करणं अशी सगळी कामं कलावंत करतात. मागच्या वर्षी हे पथक नवीन असल्यामुळे खर्च, उत्पन्न, नफा बघता सामाजिक कार्यामध्ये फारशी उडी मारता आली नाही. पण, यंदा पथकाचा झालेला विस्तार, कलावंतांची वाढती संख्या, ढोलवादनाच्या ऑफर्स बघता या वर्षी सामाजिक कार्यामध्येही हे पथक चांगलीच उडी मारेल असं दिसून येत आहे.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com