आजच्या काळातल्या गृहिणीचा उजवा हात म्हणजे मायक्रोवेव्ह. त्याचा वापर करून असंख्य रुचकर आणि तेलाचा कमीतकमी वापर असणाऱ्या आरोग्यदायी पाककृती तयार करता येतात. यंदाच्या दिवाळीसाठी अशाच काही पाककृती-

स्पाइस नट्स

ruchkar-72साहित्य : ५०० ग्रॅम सुकामेवा, ५० ग्रॅम सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया, २ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल, २ टेबलस्पून मध, २ टी स्पून सैंधव मीठ (सी सॉल्ट), २ टीस्पून अर्धवट वाटलेली जिरे पूड, दीड टीस्पून लाल तिखट पावडर, पाव टीस्पून काळी मिरी पावडर.

कृती : एक मोठा काचेचा बाऊल घ्यावा. त्यामध्ये सुकामेवा, भोपळा आणि सूर्यफुलाच्या बिया टाकाव्यात. त्यात ऑलिव्ह ऑइल आणि मध सगळ्यावर पसरेल अशा प्रकारे घालावे. यात मीठ आणि इतर मसाला घालणे. हे सर्व मिश्रण एकत्र करून चमच्याने हलवावे. मायक्रोवेव्ह १८० अंश सेंटिग्रेडवर कन्व्हेक्शन मोडवर प्री हीट करावा. प्री हीट झाल्यानंतर ते मिश्रण बेकिंग ट्रेवर पसरवून ते १५-२० मिनिटं बेक करावे. मिश्रणाचा रंग तपकिरी झाला की ते मायक्रोव्हेवमधून बाहेर काढावे. असे हे स्पाइस नट्स थोडे थंड झाल्यानंतर खाण्यास तयार होतात. फराळाच्या इतर पदार्थामध्ये हा पदार्थही पाहुण्यांना देऊ शकता.

ओट्स पेर क्रिस्प 

ruchkar-60साहित्य : पाऊण कप ओट्स, पाच पेरांचे दोन इंचाचे तुकडे, चवीनुसार साखर, पाव कप बदामाचे तुकडे, १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, पाव कप संत्र्याचा किंवा सफरचंदाचा ज्यूस, १ टेबलस्पून लिंबाचा रस.

कृती : मायक्रोवेव्ह १८० सेंटिग्रेडवर कन्व्हेक्शन मोडवर प्री हीट करून घ्यावा. एका बाऊलमध्ये पेराचे तुकडे घेऊन त्यात कॉर्नफ्लोअर आणि चवीनुसार साखर घ्यावी. त्यात लिंबाचा रस टाकावा. हे सगळं एकत्र करून नीट हलवावे. या मिश्रणात कॉर्नफ्लोअर सगळीकडे नीट लागला की नाही हे तपासून घ्यावे. त्यानंतर एका बेकिंग डिशमध्ये पेराचे मिश्रण घेऊन त्यात ओट्स घालावे. त्यावर दोन चमचे साखर टाकावी. त्यातच बदामाचे तुकडेही घालावेत. त्यात संत्र किंवा सफरचंदाचा ज्यूस ओतून सगळं एकत्रित करावं. हे मिश्रण ३० मिनिटं बेक करावं. ३० मिनिटांनंतर ज्यूस साधारण घट्ट झालेला दिसेल, मिश्रण चांगलं शिजलेलंही दिसेल. तयार झालेलं ओट्स पेर क्रिस्प गरम किंवा कोमटच सव्‍‌र्ह करावं.

टीप : या पदार्थासाठी तुम्ही साखरेऐवजी मधाचाही वापर करू शकता.

आंब्याचा मुरांबा
ruchkar-59२ वाटय़ा पिकलेल्या आंब्याच्या फोडी व २ वाटय़ा साखर एकत्र मिसळून २ तास ठेवा. मायक्रोवेव्हमध्ये हाय वर २-३ मिनिटे एक उकळी द्या. पाकातून फोडी काढून घ्या व पाक हाय वर ३-४ मिनिटे देऊन पक्का करा. काढलेल्या फोडी त्यात टाकून हाय वर एक मिनिटाची एक उकळी द्या.

टीप : याच पद्धतीने अननसाचे मुरांबे करावेत.

ओट्स स्टफ व्हेजिटेबल्स 

ruchkar-65साहित्य : अर्धा कप भाजलेल्या ओट्सची पावडर, ४ लहान सिमला मिरची, अर्धा कप शिजवून कुस्करलेला बटाटा, अर्धा कप कुस्करलेलं पनीर, अर्धा कप शिजवलेला हिरवा वाटाणा, १ लहान किंवा मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, २ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून भाजलेली जिरे पावडर, अर्धा टीस्पून चाट मसाला, अर्धा टीस्पून गरम मसाला, १ टीस्पून बारीक चिरलेला लसूण, १ टीस्पून धणे पावडर, १ टीस्पून लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर.

कृती : सिमला मिरचीच्या बिया बाहेर काढून ती आतून पोकळ करून घ्यावी. नॉन स्टीक पॅनमध्ये १ टेबलस्पून तेल घालून बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. उरलेलं साहित्य घालून ते दोन मिनिटं शिजवावे. थंड झाल्यानंतर कांदा आणि उरलेलं साहित्य असं  मिश्रण सिमला मिरचीत भरावं. मायक्रोवेव्ह २०० सेंटीग्रेडवर कन्वेक्शन प्री हीट करावा. त्यात बेकिंग ट्रेला थोडं तेल लावावे. सिमला मिरचीलाही बाहेरून थोडं तेल लावावे. १५ मिनिटं मिश्रण घातलेल्या सिमला मिरची बेक कराव्या. बेक केल्याने सिमला मिरची छान मऊ होतील.

हाच पदार्थ सिमला मिरचीसारखाच टोमॅटोमध्येही करता येतो.

ओट्स सीख कबाब
ruchkar-62साहित्य : अर्धा कप भाजलेल्या ओट्सची पावडर, १ कप शिजलेला राजमा, २ ते ३ ताज्या ब्राऊन ब्रेडचे मिक्सरमधून केलेले क्रम्प्स, बारीक चिरलेले २ कांदे, १ सिमला मिरची, २ शिजवून कुस्करलेले बटाटे, २ टेबल स्पून आलं-लसूण पेस्ट, १ चमचा आमचूर पावडर, १ चमचा गरम मसाला पावडर, १ चमचा जिरे पावडर, १चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ.

कृती : राजमा रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी उकडवून स्मॅश करून ठेवावा. सिमला मिरची गॅसवर भाजून घ्यावी. भाजलेल्या सिमला मिरचीमधला काळा भाग काढून घेऊन उरलेल्या मिरचीचे बारीक तुकडे करावे. बटाटा, राजमा, सगळ्या पावडर, सिमला मिरची आणि आलं-लसूण पेस्ट हे सगळं एकत्र करून त्याला कबाबचा आकार द्यावा. त्यावर थोडं तेल लावून ते दोन्ही बाजूंनी ५ ते ७ मिनिटं ग्रिल करावे. गरमागरम ओट्स सीख कबाब चटणीसोबत सव्‍‌र्ह करावे.

टीप : समजा हे मिश्रण पाणीदार वाटलं तर ते एका तासासाठी फ्रीजमध्ये ठेवावे आणि त्यानंतर ग्रिल करावे. फ्रीजमध्ये ठेवूनही त्यातलं पाणी कमी झालं नाही, तर त्यात ओट्सची पावडर घालावी.

ओट्सचे फलाफल
ruchkar-70साहित्य : अर्धा कप भाजलेल्या ओट्सची पावडर, अर्धा कप काबुली चणा, २ टेबलस्पून अख्खे हिरवे मूग, २ टेबलस्पून कणसाचे दाणे, १ बारीक चिरलेला कांदा, ३ ते ४ लसणाच्या बारीक पाकळ्या, १ टीस्पून जिरे पावडर, चार मोठे चमचे पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून तीळ, चिमूटभर बेकिंग पावडर, अर्धा कप ब्राऊन ब्रेडचे क्रम्प्स, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट.

कृती : काबुली चणे आणि मूग एकत्र भिजत टाकावे. सात ते आठ तासांनी मिक्सरमध्ये पुदिना, कोथिंबीर आणि लसूण यांसोबत मध्यम प्रमाणात चणे आणि मूग वाटून घ्यावे. हे वाटण फार बारीक करू नये. या वाटणात इतर साहित्य घालावे. याला छोटय़ा-छोटय़ा पेढय़ासारखा आकार द्यावा. दोन्ही बाजूंना तेल लावून आठ ते दहा मिनिटं ग्रिल करावे.

टीप : ग्रिल करायचे नसल्यास नॉन स्टिक तव्यावर श्ॉलो फ्राय करू शकता.

बीटरुट ऑरेंज वॉलनट सॅलड 

ruchkar-64साहित्य : १ टेबलस्पून तेल, १ टेबलस्पून व्हिनेगर, १ टीस्पून काळी मिरी पावडर, आवडीनुसार सॅलड लीव्ह्स, उकडलेल्या बिटाचे पातळ स्लाइस, २ संत्री, १ कप भाजलेले अक्रोड, १०० ग्रॅम प्रोसेस चीज.

कृती :  एका बाऊलमध्ये तेल, व्हिनेगर, काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ हे चमच्याने एकत्र करावे. एका मोठय़ा प्लेटवर सर्वप्रथम सॅलड लीव्ह्स पसरवाव्यात. त्यावर बीटरुट, संत्री, अक्रोड ठेवावे. सुरुवातीला व्हिनेगर, काळीमिरी पावडर इत्यादींचे तयार केलेले ड्रेसिंग सगळीकडे समप्रमाणात ओतावे. चमच्याने हलवून सॅलड सव्‍‌र्ह करावे.

ओट्स डेट ट्रफल
ruchkar-67
साहित्य : ४ ते ५ टेबलस्पून भाजलेल्या ओट्सची पावडर, अर्धा कप बिया काढलेला काळा खजूर, पाव कप बदाम आणि अक्रोडची पावडर, २ ते ३ टेबलस्पून बारीक तुकडे केलेले मनुका, अंजीर, बेदाणे, जर्दाळू यांचे तुकडे, २ ते ३ टेबलस्पून मिल्क पावडर, पाव कप डेझिकेटेड कोकोनट (किसलेलं सुकं खोबरं).

कृती : मिक्सरमध्ये खजूर वाटून घ्यावा. ओट्स, बदाम, अक्रोड, मिल्क या सगळ्याच्या पावडर आणि मनुका, अंजीर, बेदामे, जर्दाळू यांचे तुकडे हे सगळं एकत्र करावे. हे मिश्रण एकजीव करून त्याचे छोटे-छोटे लाडू तयार करावे. तयार झालेले लाडू डेझिकेटेड कोकोनटमध्ये रोल करावे.

टीप : हे लाडू फ्रिजमध्ये ठेवले तर ते सात-आठ दिवस चांगले राहतात.

मँगो अ‍ॅम्ब्रोसिया 

ruchkar-66साहित्य : २ कप बारीक चिरलेला आंबा, ८ ते ९ वेलचीचे दाणे, अर्धा कप रेडीमेड मँगो ज्यूस, अर्धा कप क्रीम (किंवा दुधावरची साय), २ टेबलस्पून पिठीसाखर, २ कप कापलेली फळं (सफरचंद, द्राक्षं, डाळिंब, केळी, अननस, चिकू), ४ ते ५ भिजलेल्या बदाम आणि पिस्त्याचे काप.

कृती : मिक्सरमध्ये आंब्याचे तुकडे, वेलची, रेडीमेड ज्यूस आणि क्रीम याची जाड पेस्ट करावी. एका पसरट डिशमध्ये सगळ्यात खाली कापलेली फळं ठेवावी. त्यावर तयार झालेली जाड पेस्ट ओतावी. त्यावर भिजलेल्या बदामाचे आणि पिस्त्याचे काप ठेवावे. थंडगार झालेलं मँगो अ‍ॅम्ब्रोसिया सव्‍‌र्ह करावे.

कॉफी सिरप केक  

ruchkar-63साहित्य : ३ अंडी, अर्धा कप तेल, १५० ग्रॅम पिठीसाखरं, १५० ग्रॅम मैदा, १ टीस्पून बेकिंग पावडर, पाव कप कोको पावडर, ३ टीस्पून कॉफी पावडर मिक्स विथ १ टेबलस्पून हॉट वॉटर, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स.

कॉफी सिरपसाठी : २ टीस्पून कॉफी पावडर, अर्धा कप ब्राऊन शुगर, अर्धा कप पाणी.

कृती : आठ इंचाच्या टीनला सर्व बाजूंनी आतून तेल लावणे. मैदा, बेकिंग पावडर आणि कोको पावडर एकत्र चाळून बाजूला ठेवावे. दुसऱ्या बाऊलमध्ये अंडी आणि पिठीसाखरं इलेक्ट्रिक बीटरने बीट करणे. त्यामध्ये ३ टीस्पून कॉफी आणि १ टेबलस्पून हॉट वॉटर टाकावे. कॉफी आणि पाण्याच्या मिश्रणात एका हाताने हळूहळू तेल ओतून त्याच वेळी इलेक्ट्रिक बीटरने बीट करत जावं. मग त्यामध्ये हळूहळू मैदा, बेकिंग आणि कोको पावडर यांचं मिश्रण घालावं. लाकडाच्या चमच्याने ते मिश्रण एकत्र करावे. मायक्रोवेव्ह १८० सेंटिग्रेटवर कन्व्हेक्शन मोडवर प्री हीट करावं. तसंच एकत्रित केलेलं मिश्रण ४० मिनिटं बेक करावं. केक पूर्णपणे तयार झाला की नाही हे बघण्यासाठी त्यात सुरी घालून तपासून घ्यावं. तयार झाला नसेल तर आणखी पाच मिनिटं ठेवावं. कॉफी सिरपसाठी असलेलं साहित्य एकत्र करून ते गॅसवर ठेवावं. साखर विरघळेपर्यंतच ते गरम करावं. या मिश्रणाला उकळी येऊ देऊ नये. हे सिरप गरम असतानाच केकवर ओतावं. थंड झाल्यावर केक सव्‍‌र्ह करावा.

ओट्स ग्रॅनोला (चिकी) पॅराफीट

ruchkar-61साहित्य : चिकीसाठी- ३ कप ओट्स, पाव कप भोपळा आणि सूर्यफुलाच्या बिया, अर्धा कप बदामाचे स्लाइस, पाव कप जवस, १ टेबलस्पून तेल, अर्धा कप मध, अर्धा कप पाणी, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, चवीनुसार मीठ.

पॅराफीटसाठी- १ कप चिकी, ४०० ग्रॅम थंडगार चक्का, १ टेबलस्पून मध किंवा आइसिंग शुगर, अर्धा कप चालू ऋतूतल्या फळांचे तुकडे.

कृती : मायक्रोवेव्ह १६० सेंटिग्रेटवर कन्व्हेक्शन मोडवर प्री हीट करून घ्यावा. एका भांडय़ामध्ये तेल, मध, पाणी, व्हॅनिला इसेन्स आणि मीठ हे थोडं गरम करावे. या मिश्रणाला उकळी येणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यात जवस, बदाम, सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया असे इतर साहित्य (सुकं साहित्य) घालून ते एकत्रित करावे. त्यानंतर बेकिंग ट्रेमध्ये हे मिश्रण पसरवून १६० सेंटिग्रेडवर ४५ मिनिटं बेक करावं. अधेमधे हे मिश्रण हलवत राहावे. ४५ मिनिटांनंतर हे मिश्रण बाहेर काढून थंड करावं.

पॅराफीट सजावट- चक्क्यांमध्ये मध किंवा साखर घालून चांगल्या प्रकारे हलवून ते एकजीव करावे. दोन उभे मोठे ग्लास घ्यावे. ग्लासमध्ये सगळ्यात खाली चक्क्याचा एक लेअर तयार करावा. या लेअरवर चिक्की आणि फळांचे तुकडे पसरवावेत. त्यावर पुन्हा एकदा चक्क्याचा लेअर करून त्यावर फळांचे तुकडे घालावे. हे जरा वेळ फ्रिजमध्ये ठेवून थंडगार झाल्यानंतर सव्‍‌र्ह करावं.

टीप : उरलेली चिक्की हवाबंद डब्यात ठेवावी. ती बराच काळ चांगली राहते.

खवा बर्फी

ruchkar-68२ वाटय़ा खवा, १ वाटी पिठीसाखर, वेलचीपूड, मिल्क पावडर

कृती : काचेच्या भांडय़ात खवा मोकळा करून त्यात साखर मिसळा. मायक्रोवेव्हमध्ये हाय वर २-३ मिनिटे शिजवा. १-१ मिनिटाने हलवा. मिश्रण खदखदायला लागले की थांबा. वेलची दाणे टाकून गार करा. गरजेप्रमाणे मिल्क पावडर मिसळा, मिश्रण थोडेसे आटले की तूप लावलेल्या थाळीत ओता. थाळी आपटून सगळीकडे सारखे पसरा. ८-१० तास सेट होण्यासाठी ठेवा, नंतर वडय़ा कापा.

मक्याचा उपमा

ruchkar-71२ वाटय़ा मक्याच्या दाण्याचा कीस, १ टेस्पून फोडणी, मीठ, साखर, हिरव्या मिरच्या तुकडे, खोबरे, कोथिंबीर, काचेच्या भांडय़ात एकत्र करा.

मायक्रोवेव्हमध्ये हाय वर ३-४ मिनिटे शिजवा. हलवून झाकून लो वर ३-४ मिनिटे द्या. ३-४ मिनिटांनी काढा.

खारे, स्वीट मसाला काजू-बदाम

काचेच्या ट्रेमध्ये एक वाटी काजू किंवा बदाम घ्या. १ चमचा पातळ तूप लावून मायक्रोवेव्हमध्ये हाय वर ३ – ४ मिनिटे ठेवून सोनेरी रंगावर भाजा. मध्ये दर एका मिनिटाने हलवा.

बाहेर काढून गरम असतानाच त्यावर मीठ टाकून खारे किवा पिठीसाखर टाकून स्वीट किंवा तिखट, मीठ जिरपूड टाकून मसाला काजू बदाम तयार करा.
सीमा नाईक – response.lokprabha@expressindia.com