चलनी नोटा छपाईचा कारखाना असलेल्या नाशिक जिल्ह्य़ात नोटबंदीच्या निर्णयाने नागरिकांची अभूतपूर्व आर्थिक कोंडी झाली. नोटबंदीचा निर्णय झाल्यापासून बँका आणि एटीएम (जे थोडेफार सुरू आहेत) समोर दररोज रांगा लागत असून शहरासह जिल्ह्य़ातील एटीएम सेवा पूर्णपणे सुरू होत नाही आणि ५००, १०० रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत तोपर्यंत परिस्थितीत कोणताही बदल होण्याचे चिन्ह सध्यातरी दिसत नाही. मोदींच्या एका निर्णयाने समाजातील काही घटकांचे बेगडी सामाजिक प्रेम उघड झाले, तर हातावर पोट असणाऱ्यांच्या जिवाचे मोल कळले.

व्यवहारात ५०, १०० रुपयांचे प्रमाण अधिक असते. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर बँकेतून नोट बदलून देताना सुटे पैसे देण्याऐवजी बँकांकडून दोन हजार रुपयांची नोट हातात पडू लागल्याने नागरिकांचा अधिक रोष ओढवला. जिल्ह्य़ातील बाजार समित्यांमध्ये व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद सुरू झाल्यावर समित्यांनी परिस्थितीत सुधार होईपर्यंत व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नाशिक जिल्ह्य़ातील १५ समित्यांपैकी काही समित्यांनी २३ नोव्हेंबरपासून त्यावर धनादेश स्वरूपातील तोडगा काढून व्यवहार पुन्हा सुरू केले. चलनतुटवडा आणि सुटय़ा पैशांची चणचण यामुळे मालास उठाव मिळत नसल्याने सर्वच भाजीपाल्यांचे दर घसरले. बाजार समितीत टोमॅटो अवघे दोन रुपये किलो, कोबीचे दोन नग १० रुपये याप्रमाणे दर खाली आले. ज्या ठिकाणी आदिवासी शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे, अशा बाजारात बंदी असलेल्या नोटा शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे प्रकार व्यापाऱ्यांकडून झाले. नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील पिंपळनारे बाजारात शेतकऱ्यांनी जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्यावर धनादेशाने रक्कम हवी असल्यास दोन महिन्यांनंतरची तारीख धनादेशावर टाकली जाईल, असे सुनावण्यात आले. दोन महिने थांबण्यापेक्षा शेतकऱ्यांनी जुन्या नोटा स्वीकारणे पसंत केल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांच्या या मुजोरीचा बभ्रा झाल्यानंतर त्यांनी नंतर धनादेशाव्दारे व्यवहार करणे सुरू केले. मोखाडा तालुक्यातून इगतपुरी तालुक्यातील घोटीत लग्नाचा बस्ता घेण्यासाठी आलेल्या एका आदिवासी महिलेचे उदाहरण त्यासाठी प्रातिनिधिक ठरावे. आपल्या नातीच्या लग्नासाठी अनेक वर्षांपासून पै पै जमा केल्यानंतर महिन्याभरापूर्वी लग्न जुळले. लग्नाची तारीखही निश्चित करण्यात आली. लग्नाचा बस्ता, दागिने खरेदीसाठी दोन्ही बाजूचे नातलग घोटीत आले. परंतु, एकाही कापड दुकानदाराने बंद झालेल्या नोटा न स्वीकारल्याने हे सर्व जण व्यथित झाले. लग्न पुढे ढकलण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय राहिलेला नाही.

मूलभूत सेवा देणाऱ्या व्यावसायिकांनी जुन्या चलनातील १००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश २४ नोव्हेंबपर्यंत होते. असे असतानाही नाशिक शहरासह जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात या नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात आला. त्यात गॅस वितरकांचाही समावेश राहिल्याने ग्राहकांची गैरसोय झाली. ग्रामीण भागात हा त्रास अधिक जाणवला. त्यातही इगतपुरीसारख्या ठिकाणी एका गॅस कंपनीकडून जुन्या नोटा स्वीकारण्यात येत असताना दुसऱ्या कंपनीकडून नकार देण्यात आला. त्यामुळे ग्राहक आणि वितरकांमध्ये वादावादीचे प्रकार घडले.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे सुटे पैसे मिळण्यात निर्माण होणाऱ्या अडचणी हा सर्वासमोरील विषय झाला. सुटे पैसे व चलन तुटवडय़ामुळे सर्वसामान्य गोंधळून गेले असताना काही महाभागांनी या परिस्थितीचाही आर्थिक लाभ कसा उठविता येईल हे पाहिले. काही जणांनी चक्क सुटे पैसे देण्याचा गोरखधंदा सुरू केला. एक हजार रुपयाचे सुटे देताना अशा मंडळींकडून १०० तर २०० तसेच ५०० रुपयांचे सुटे देताना १०० रुपये घेतले गेले. नवीन चलन अपेक्षेप्रमाणे बाजारात न आल्याने तसेच जुने चलन व्यापारी, किरकोळ दुकानदार स्वीकारत नसल्याचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण भागातील आठवडे बाजारांवर झाला. आठवडे बाजारात नेहमी कृषिमाल आणणाऱ्यांपैकी बहुतांश जणांनी या कालावधीत बाजाराकडे पाठ फिरविली. ज्यांनी माल आणला त्यांना सुटय़ा पैशांच्या तुटवडय़ावर आपआपल्या सोयीनुसार तोडगा काढावा लागला. नाशिकजवळील पिंप्री येथील भाऊसाहेब ढिकले हा शेतकरी पंचवटी परिसरातील चार ते पाच ठिकाणी होणाऱ्या आठवडे बाजारात माल विक्रीसाठी आणतो. नोटाबंदीच्या निर्णयानंतर उद्भवलेल्या सुटय़ा पैशांच्या समस्येवर त्यांनी वेगळ्या पद्धतीने मार्ग काढला. नेहमीच्या ग्राहकांना उधारीवर भाजीपाला देताना एकूण रकमेची पावती त्यांच्याकडून ग्राहकांना देण्यात आली. पुढील बाजारप्रसंगी पैसे देण्याची सवलत त्यांनी दिली. घोटी शहरातील बैलबाजार नाशिक जिल्ह्य़ात चांगलाच प्रसिद्ध आहे. चलन तुटवडय़ामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी या बाजाराकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. पतसंस्थांमध्ये जमा झालेले जुने चलन घेण्यास राष्ट्रीयीकृत बँका नकार देत असल्याने पतसंस्थांचे कामकाज ठप्प झाले. कर्ज काढून पिकविलेल्या भाताला घोटी शहरातील व्यापारी पैसे नसल्याचे कारण पुढे करीत खरेदी करण्यात नकार देत असल्याने इगतपुरी तालुक्यात हजारो क्विंटल भात शेतकऱ्यांच्या खळ्यावर पडून आहे. परिणामी भात व भगर मिलही बंद असल्याने भातापासून तांदूळ तयार करण्याची प्रक्रियाही ठप्प झाली आहे.

जिल्ह्य़ात काही ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये चोरटय़ांनी जुन्या नोटांना हात न लावता घरातील महागडे साहित्य चोरण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचे आढळून आले. चोरी करण्याचा आपला उद्योग थांबू न देता चोरटय़ांनी बंद झालेल्या नोटांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. घोटी येथील डॉ. आंबेडकर नगरातील अंजना रोकडे या मुंबई येथे गेल्या असता चोरटय़ाने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील दोन गॅस सिलिंडर, एक मोबाइल आणि १० हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. चोरटय़ाने केवळ १० आणि १०० रुपयांच्या नोटा चोरल्या. असेच प्रकार इतरत्रही घडले. प्रार्थना स्थळांमध्ये दररोज जमा होणाऱ्या निधीतही या कालावधीत घट झाली. त्र्यंबकेश्वर मंदिर, कपालेश्वर, काळाराम, मुक्तिधाम या ठिकाणी देशभरातून भाविकांचा ओघ सुरू असतो. देणगी स्वरूपात भाविकांकडून पैसे देण्यात येतात. या देणगीत कमालीची घट झाल्याचे मंदिरांच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. नांदुरी येथील सप्तशृंग गडावरील सप्तशृंग निवासिनी देवी विश्वस्त मंडळाने चलन तुटवडा लक्षात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी या कालावधीत एक चांगला निर्णय घेतला. सुटय़ा पैशांमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून न्यासाच्या प्रसादालयात चार दिवस महाप्रसाद (भोजन)मोफत देण्यात आला.

बँकांकडून टाकण्यात आलेल्या काही र्निबधाविषयी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बँकांमध्ये अडीच लाख रुपये भरण्यास मुभा देण्यात आली असली तरी त्यातही ज्यांनी अद्याप पॅनकार्ड काढलेले नाही, त्यांना एका वेळी अडीच लाख रुपये भरता येत नसल्याची तक्रार सिन्नर तालुक्यातील शहा येथील शेवगा उत्पादक बाळासाहेब मराळे यांनी केली आहे. बँक अधिकाऱ्यांकडून एका वेळी ५० हजार रुपये याप्रमाणे अडीच लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. म्हणजेच अडीच लाख रुपये भरण्यासाठी पाच वेळा बँकेच्या फेऱ्या माराव्या लागतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, नंदुरबार जिल्ह्य़ात वेगळेच कारण बँकांकडून पुढे करण्यात येत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने एका आठवडय़ात एका खात्यातून २४ हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची मुदत दिली असतानाही नंदुरबारमधील बँका मनमानी करत एका वेळेस फक्त पाच हजार रुपये देत आहेत. चलन तुटवडा असून जिल्हा अग्रणी बँकेकडून पत पुरवठाच होत नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात येत आहे. दोन हजारच्या पटीतच ग्राहकांना पैसे काढण्याचे बंधन घालत असल्याने तासंतास रांगेत उभे राहणाऱ्या आदिवासींना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नंदुरबारमधील आयडीबीआयसारख्या बँकेने एका वेळी खात्यातून फक्त पाच हजार रुपये काढण्याचे बंधन घातले आहे. मुळात रिझव्‍‌र्ह बँकेने एका वेळी २४ हजार रुपये काढण्याची मुभा दिली असतानाही या बँकेने खातेदारांना एका वेळेस फक्त पाच हजार रुपये काढण्याचे बंधन घातले आहे. याबाबत बँक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता अग्रणी बँकेतून पतपुरवठा होत नसल्याने चलन तुटवडा निर्माण झाला असल्याचे कारण पुढे करण्यात आले. प्रत्येक ग्राहकाला पैसे मिळावे म्हणूनच पाच हजापर्यंतच रक्कम दिली जात असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. त्यातही या बँकेमध्ये फक्त दोन हजारांच्याच नोटा असल्याने ग्राहकाने दोन हजारांच्या पटीतच पाच हजारांच्या आत रक्कम काढण्याचे बंधन बँकेने घातले आहे. मुळातच गरीब आदिवासींच्या खात्यात दोन हजारांपेक्षा अधिक रक्कम क्वचितच जमा होते. बँकांना पतपुरवठा का केला जात नाही, याबाबत अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी हात झटकत अशा बँकांना पतपुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित बँकेच्या साखळी बँक असलेल्या मुख्य शाखेची असल्याचे नमूद केले. मात्र रिझव्‍‌र्ह बँकेकडून दोन हजारांपेक्षा कमी किमतीच्या नोटांचा पुरवठा होत नसल्याने नंदुरबार जिल्ह्य़ात अडचण होत असल्याची कबुलीही या बँक अधिकाऱ्यांनी दिली. दुर्गम भागात दोन हजार रुपयांचे कोणीही सुटे देण्यास तयार नसल्याने या नोटांचा आदिवासींना कोणताही फायदा होताना दिसत नाही. स्टेट बँकेसह इतर काही बँकांचे एटीएमही अद्याप सुरू झाले नसल्याने लोकांचे हाल कमी होताना दिसत नाहीत.
अविनाश पाटील – response.lokprabha@expressindia.com