कोनैन शरीफ

भारतामध्ये १९१८-२० दरम्यान आलेल्या स्पॅनिश फ्लूप्रमाणेच आता आलेल्या कोविड १९च्या महासाथीमध्ये पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाटच अधिक विध्वंसक ठरली आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या लाटेपेक्षा आता आलेली दुसरी लाट अनेक अर्थानी वेगळी आणि काळजी तसंच चिंता वाढवणारी आहे. कोविड १९च्या दुसऱ्या लाटेसंदर्भात तुम्हाला माहीत असायलाच हव्यात अशा पाच ठळक गोष्टींची चर्चा पुढे केली आहे.

गेले वर्षभर मी आत्यंतिक काळजी घेतली. तरीही मला कोविड १९चा संसर्ग कसा झाला?

एखाद्या व्यक्तीमध्ये कोविड १९च्या संसर्गाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, पण तिच्या शरीरात कोविडच्या विषाणूने प्रवेश केला आहे असे असेल तर ती व्यक्ती या विषाणूचा वाहक होते आणि तिच्यामुळे या विषाणूच्या संसर्गाचा फैलाव होतो. तज्ज्ञांच्या मते भारतात ८० ते ८५ टक्के लोकसंख्येमध्ये कोरोनाच्या विषाणू संसर्गाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. पण तेच या विषाणूचे सगळ्यात मोठे वाहक आहेत. कोविड १९च्या संसर्गाची कोणतीही लक्षणं न दिसणारी ही माणसं बंदिस्त जागेत किंवा बंदिस्त घरात जागेत वावरताना बोलण्यासाठी तोंड उघडतात तेव्हादेखील त्यांच्यामार्फत विषाणूचा प्रसार होऊ शकतो. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणं दिसत नसल्यामुळे ते स्वत:चं घरामध्ये विलगीकरण करून घेत नाहीत.

कोविड १९च्या संसर्गाची कोणतीही लक्षणं दिसत नाही अशी मोठी लोकसंख्या आणि स्वत:मध्ये बदल करून घेतलेले कोविड १९चे वेगवेगळे उत्परिवर्तित (म्युटंट) विषाणू या दोन्ही गोष्टी दुसऱ्या लाटेमध्ये एकत्र आल्या. त्याचा परिणाम होऊन सप्टेंबर २०१९ मध्ये शिखर गाठलेल्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा आलेख खूप चढा राहिला. त्यामुळे घरात राहिलेल्या, अजिबात घराबाहेर न पडलेल्या व्यक्तींनादेखील कोविड १९च्या विषाणूचा संसर्ग झाला. उदाहरणार्थ सीडीसी म्हणजेच सेंटर्स फॉर डिसिजेस कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन या अमेरिकेतील संस्थेच्या अभ्यासानुसार दिल्ली तसंच पंजाबमध्ये केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये मोठय़ा प्रमाणात आढळलेल्या इंग्लंडमधील कोविड १९चा उत्परिवर्तित विषाणूने ५० टक्के अधिक प्रमाणात संसर्ग पसरवला. भारतात सर्वप्रथम आढळलेल्या L452R या उत्परिवर्तित विषाणूमधील B1.671 या म्युटेशननेदेखील कोविड १९चे संक्रमण वाढवले.

दुसरी गोष्ट म्हणजे कोविड १९च्या दुसऱ्या लाटेमध्ये कंटेनमेंट झोनच्या सीमारेषा पहिल्या लाटेइतक्या कठोर ठेवल्या गेलेल्या नाहीत. सरकारने शहरांमध्ये नागरी आस्थापनांना लहान लहान कंटेनमेंट झोन तयार करून त्यावर काम करायला सांगितलं. त्यामुळे एखादा मजला किंवा अगदी एखादं घरदेखील कंटेनमेंट झोन ठरवलं गेलं. या लहान लहान कंटेनमेंट झोनमध्ये प्रभावी देखरेख केली गेली नाही तर विषाणूवर नियंत्रण ठेवणं आव्हानात्मक ठरतं. पहिल्या लाटेदरम्यान संपूर्ण अपार्टमेंट किंवा संपूर्ण परिसरच कंटेनमेंट झोन ठरवला जात होता. त्यामुळे विषाणूच्या प्रसाराच्या शक्यता कमी होत गेल्या होत्या. महाराष्ट्राच्या संदर्भात सामाजिक, कौटुंबिक रचना तसंच कामाच्या ठिकाणी असणारा संसर्गाचा मोठा धोका या घटकांचा विचार केला गेला नाही आणि त्यातून दुसरी लाट उद्भवली या वास्तवावर आता केंद्रीय टीमने बोट ठेवले आहे. हे सगळ्या देशभरच घडते आहे.

मागील लाटेदरम्यान एखाद्या व्यक्तीला संसर्ग व्हायचा, तर आता संपूर्ण कुटुंबच बाधित होते आहे. संसर्गाच्या प्रकारात काही बदल झाला आहे का?

घरांमध्ये होणाऱ्या पाटर्य़ा, लग्न आणि तत्सम जिथे मोठी गर्दी जमते असे कार्यक्रम हे बंदिस्त जागेमध्ये साजरे केले गेले आणि त्या दरम्यान कोविड १९च्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीचे आवश्यक ते नियम पाळले नाहीत तर ते सुपर स्प्रेडर ठरू शकतात. कारण कोविड १९च्या विषाणूचे काही उत्परिवर्तित प्रकार अधिक प्रमाणात संसर्ग पसरवणारे आहेत. आताच्या काळातल्या लहान लहान कंटेनमेंट झोनवर मागच्या वर्षी ठेवली गेली होती तशी प्रभावी देखरेख ठेवली जात नसल्यामुळे कुटुंबच्या कुटुंब कोविड १९च्या संसर्गाने बाधित होताना दिसत आहेत. पहिल्या लाटेदरम्यान एखादी बाधित व्यक्ती कोणाकोणाच्या संपर्कात आली असेल याचा माग ज्या पद्धतीने ठेवला जात होता, त्याची मार्गदर्शक तत्त्वं ज्या पद्धतीने, कडकपणे पाळली जात होती, तसं या वेळी होताना दिसत नाही. संसर्गित रुग्णाच्या संपर्कात आलेले पण संसर्गाची कोणतीही लक्षणं न आढळणारे लोक आणि संसर्ग होण्याचा जास्त धोका असलेले वृद्ध, आजार असलेले लोक यांना पाचव्या तसंच दहाव्या दिवशी कोविड १९चा संसर्ग झाला आहे का, याची पाहणी केली जाते. पण त्या दरम्यान त्यांच्या चाचणीचा अहवाल चुकून नकारात्मक (फॉल्स निगेटिव्ह) आला तर ते इतरांना संसर्ग देत राहू शकतात.

याबरोबरच या दुसऱ्या लाटेदरम्यान कोविड १९चा संसर्ग झाला आहे का याच्या प्रयोगशाळेतील तपासणीसाठी खूप वेळ लागत होता. तपासणीचा अहवाल हातात येईपर्यंतच्या काळात संसर्गाची कोणतीही लक्षणं न आढळणाऱ्या व्यक्तींनी विलगीकरणाची मार्गदर्शक तत्त्वं पायदळी तुडवली आणि संसर्ग पसरवला.

गेल्या वर्षी आलेल्या पहिल्या लाटेदरम्यान तरुणांना कोविड १९ चा संसर्ग होत नव्हता. या वेळी मात्र अनेक तरुणांना संसर्ग होताना दिसतो आहे. तरुणांकडे चांगली प्रतिकारशक्ती नाही असा याचा अर्थ आहे का?

या दुसऱ्या लाटेदरम्यान कोविड १९च्या विषाणूचा संसर्ग प्रत्येक वयोगटात तितक्याच वेगाने पसरतो आहे. तरुण पिढीची प्रतिकारशक्ती कशी आहे याबाबतची फार थोडी माहिती आत्ता या घडीला आपल्या हातात आहे. ज्यांना तरुण वयातच काही आजार आहेत ते अर्थातच अधिक धोका असलेल्या गटात आहेत.

केंद्र सरकारने प्रसारित केलेल्या माहितीनुसार असे दिसते की, ७० वर्षांपर्यंतच्या सात वेगवेगळ्या वयोगटांमध्ये पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेदरम्यान मृत्यूचे प्राबल्य आहे. ७० ते ८० आणि ८०च्या वरील वयोगटात दुसऱ्या लाटेदरम्यान मृत्युदर अधिक आहे. वृद्ध लोकांनाच धोका अधिक आहे आणि त्यांचं या विषाणू संसर्गापासून संरक्षण होणं गरजेचं आहे. असं असलं तरी सगळ्या वयोगटांमध्ये मृत्यूचं प्रमाण अधिक आहे, कारण एकूण संसर्गाचं प्रमाणच अधिक आहे. कोविड १९चा विषाणू अधिक संसर्गजन्य होतो आहे आणि त्याचे काही उत्परिवर्तित विषाणू प्रतिकारशक्तीला चकवा देण्यात यशस्वी ठरत आहेत. त्यामुळे तरुणांनी कोविड १९चा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणं आवश्यक आहे.

वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता नसणं ही आपत्ती कशी ओढवली?

रुग्णालयांकडून उपलब्ध होणाऱ्या दुसऱ्या लाटेदरम्यानच्या गंभीर रुग्णांसंदर्भातील माहितीचा सरकार माग ठेवत आहे. त्यातून असं दिसतं आहे की, दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णालयात दाखल होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ५४.५ टक्के रुग्णांना उपचारादरम्यान ऑक्सिजन द्यावा लागत आहे. देशभरातल्या ४० केंद्रांमधून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान शिखर गाठलेल्या पहिल्या लाटेच्या तुलनेत या प्रमाणात दुसऱ्या लाटेत १३.४ टक्के वाढ झालेली आहे. त्याचबरोबर श्वास घ्यायला त्रास होणं हे दुसऱ्या लाटेमध्ये कोविड-१९ ची लक्षणं आढळणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक कॉमन लक्षण आहे.

भारतातील उपचार व्यवस्थापन नियमांनुसार काही प्रकरणांमध्ये प्राथमिक उपचार म्हणून ऑक्सिजन थेरपीची शिफारस केली आहे. ऑक्सिजन सॅच्युरेशनच्या रुग्णांमध्ये (SpO2) ९२ ते ९६ टक्के आणि सीओपीडी म्हणजे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (फुप्फुसांचे आजार) असलेल्या रुग्णांमध्ये ८८ ते ९२ टक्क्यांपर्यंत साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकारांमध्ये रुग्णाला ऑक्सिजन बेडची गरज असते. अशा रुग्णांची संख्या अजूनही १० टक्क्यांच्या आसपास आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्येने २६ लाखांचा आकडा ओलांडला असल्याने त्या तुलनेत १० टक्के ही संख्या प्रचंड ठरली आहे.

एप्रिल २४ रोजीच्या अधिकृत नोंदीनुसार दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात आणि हरियाणा या राज्यांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन बेड्सची प्रचंड प्रमाणात कमतरता निर्माण झाली. गेल्या सहा दिवसांत १२ राज्यांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी १८ टक्क्यांनी वाढली. ही टक्केवारी देशातल्या ८३ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत आहे.

सरकारने लसीकरणासाठी जी वयोमर्यादा ठरवली आहे, तिच्यात बसत असल्यामुळे मी ताबडतोब लशीचा पहिला डोस घेतला. तरीही मला कोविड-१९ चा संसर्ग कसा झाला?

भारतात आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये दोन लशींच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही लशींमुळे करोनाचा संसर्ग होणं टाळलं जाऊ शकत नाही. या घडीला या लसीकरणामुळे कोविड-१९ च्या संसर्गामुळे होऊ शकणाऱ्या आजारांची तीव्रता किंवा रुग्णालयात दाखल करण्याची गरज टाळली जाऊ शकते. सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार लस घेतल्यानंतर दहा हजारांमध्ये दोन ते चार रुग्णांना कोविड-१९ चा संसर्ग झाला आहे. कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या १०.०३ कोटी नागरिकांमध्ये ०.०२ टक्के (१७ हजार १४५ ) लोकांना कोविड-१९ च्या विषाणूचा संसर्ग झाला, तर लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या १.५७ कोटी लोकांमध्ये ०.०३ टक्के ( पाच हजार १४) लोकांना कोविड-१९ चा संसर्ग झाला. कोव्ॉक्सिनच्या बाबतीत पहिला डोस घेतलेल्या ९३.५६ लाख लोकांपैकी ०.०४ टक्के (चार हजार २०८) लोक कोविड-१९ बाधित झाले, तर दोन्ही डोस घेतलेल्या १७.३७ लाख लोकांपैकी ०.०४ टक्के (६९५) लोक कोविडबाधित झाले. याचा अर्थ लसीकरण झालेल्या लोकांनीही कोविड-१९ च्या विषाणूचा अटकाव करण्यासाठी घालून दिलेले नियम पाळणं अत्यावश्यक आहे.

‘दी इंडियन एक्स्प्रेस’मधून