चैतन्य प्रेम – response.lokprabha@expressindia.com

स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांच्या ‘निर्भय हो निशंक हो मनात रे,’ या तारक मंत्र स्तोत्राचा मागोवा आपण घेत आहोत. गेले काही आठवडे या आपल्या चिंतनात खंड पडला होता. आता ते चिंतन पुन्हा सुरू करू.

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा
nagpur and bhandara,dhirendra shastri, bageshwar dham, controversial statement, jumdev maharaj, followers, Sparks Outrage, fir register, arrest demand, maharashtra, marathi news,
बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव

निशंक हो, निर्भय हो, मना रे

प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे

अतक्र्य अवधूत हे स्मर्तू गामी

अशक्यही शक्य करतील स्वामी ॥१॥

या पहिल्या कडव्याचं आपलं विवेचन पूर्ण झालं आहे. यात पाठीशी असलेल्या स्वामीबळानं मनाला येणाऱ्या नि:शंकतेचा आणि निर्भयतेचा आपण विचार केला. तसंच स्वामी समर्थ हे अतक्र्य, अवधूत आणि स्मरणसाध्य आहेत म्हणजे नेमके कसे आहेत, याचा विचार केला. ते भक्तांच्या जीवनात भक्ताला अशक्य वाटणाऱ्या, असंभवनीय वाटणाऱ्या गोष्टी कशा शक्य किंवा संभवनीय करतात, ते पाहिलं. जिथं स्वामींनी म्हणजेच सदगुरूंनी पाऊल ठेवलं तिथं न्यून म्हणून काही उरत नाही, असं नमूद करून ‘तारक मंत्र स्तोत्रा’चं दुसरं आणि तिसरं कडवं प्रारब्ध आणि मृत्यू या दोन विषयांना स्पर्श करतं, असं गेल्या भागात नमूद केलं होतं. या दोन कडव्यांमधील पहिले दोन चरण हे प्रारब्धभयाची तर उरलेले सहा चरण हे मरणभयाची निर्थकता मांडतात, असंही सांगितलं. त्यातील प्रारब्धाच्या दोन चरणांवर आपण चिंतन केलं. आता मरणभयाकडे वळण्याआधी ही कडवी पुन्हा पाहू. ती अशी आहेत..

जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय

आज्ञेविणा काळ ना नेई त्याला

परलोकीही ना भीती तयाला ॥२॥

उगाची भितोसी भय ते पळू दे

जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे

जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा

नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ॥३॥

विलक्षण योगायोग असा की आपल्या चिंतनात खंड पडला तेव्हा समाजाला अतक्र्य मरणभयानं ग्रासून टाकेल, अशी कोणतीही परिस्थिती नव्हती. त्या परिस्थितीत आपण आपल्याच नादात, तोऱ्यात, मस्तीत जगत होतो. त्यावेळी मरणभयाचं चिंतन हृदयापर्यंत पोहोचलंही नसतं. आज परिस्थिती मरणचिंतेनं इतकी अस्थिर झाली आहे की, हे चिंतन आपल्याही मनात सुरू आहे, आपण ते जगण्यात अनुभवत आहोत, असंही अनेकांना वाटेल. तर आता ‘तारक मंत्रा’कडे वळू. तारक मंत्रातील दुसऱ्या कडव्याचे अखेरचे दोन चरण सांगतात..

आज्ञेविणा काळ ना नेई त्याला

परलोकीही ना भीती तयाला ॥२॥

इथं ‘परलोकीही’ या शब्दातील ‘ही’ हा आणखी एका लोकाचं सूचन करतो. हा लोक आहे इहलोक. इह म्हणजे इथला आणि पर म्हणजे आता दिसत नसलेला, पलीकडचा. आता अनेकजण इहलोक-परलोक, स्वर्ग-नरक असं काही मानतही नसतील. पण जे मानतात त्यांना जाणवेल की जे पर आहे, या जन्मानंतरचं आहे, पलीकडलं आहे, दिसत नाही असं आहे, त्याची माणसाला भीती वाटते! कारण माणसाचं मन नकारात्मक विचारांमागेच अधिक खेचलं जात असतं. साधं उदाहरण घ्या. आज जगत असताना ‘उद्या’ अज्ञातच असतो आणि म्हणूनच ‘उद्या’ काय होईल, याचं चिंतन कधी, कोणत्या क्षणी चिंतेत परावíतत होतं ते आपल्याला कळतही नाही! तसंच ‘परलोका’चं आहे. मृत्यूची भीती आहेच, पण मृत्यूनंतर काय असेल, काय होईल, याचीही भीती अनेकांना वाटते. स्वर्ग आणि नरक संकल्पनाही सगळ्याच धर्ममतांत या-ना त्या स्वरूपात आहेत. त्यामुळे त्यांच्याशी निगडित भयमिश्रित सर्व सुख-दु:ख कल्पनाही सामान्यपणे सार्वत्रिक आहेत. त्या मरणभय आणि मरणोत्तर भय चिंतेत अडकलेल्या साधकाला हे स्तोत्र सांगतं, ‘आज्ञेविणा काळ ना नेई त्याला!’ जोवर सदगुरूस्वरूप परमतत्त्वाची अनुमती नाही, आज्ञा नाही, तोवर काळ त्या जीवाला नेत नाही, त्याचं आयुष्य खंडित होत नाही आणि जर सदगुरूंचीही अनुमती असल्यानं आयुष्याची सांगता झाली, तरी ‘परलोकीही ना भीती तयाला!’ अशा साधकाला परलोकाचीही भीती नसते. कारण ज्यांना मी ‘अखंड मण्डलाकारं’ म्हणतो त्या सद्गुरूची जी परमात्ममय परम शक्ती आणि सत्ता आहे ती सर्वत्र व्याप्त आहे! मग जर या जगातही तेच माझा खरा सांभाळ करीत आहेत, तर परलोकातही तेच सांभाळ करतील! मला भीतीचं ओझं शिरी वाहण्याची काय गरज आहे?

बरं, जगणं आणि मरण या द्वंद्वातही साधक अडकतो की! अनेकदा जगण्यातल्या संघर्षांला विटून लोक म्हणतात, ‘आम्हाला मरणाची नाही, तर जगण्याची चिंता आहे. यापेक्षा मरण परवडतं!’ पण मरण सोडाच, देहाची एखादी व्याधी जरी थोडी उफाळून आली तरी मन घाबरून जातं! तेव्हा आपण किती म्हणालो की, ‘देहाची आम्हाला चिंता नाही, मरणाची पर्वा नाही,’ तरी देहबुद्धीत जखडलेल्या आपल्या मनात मरणाची भीती आणि जगण्याची ओढ अगदी खोलवर असते. आपल्याला जगायचंच असतं, मरण कुणालाच नको असतं. पण आपण ज्या मोहजन्य, आसक्तीयुक्त भावनेनं जन्म-मृत्यूकडे पाहतो ना, ती दृष्टी सदगुरूंचीही नसते. म्हणून साधकाच्या भांबावलेल्या मनाला हा तारक मंत्र सांगतो :

उगाची भितोसी भय ते पळू दे

जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे

जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा

नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ॥३॥

आपण जन्म घेतला आहे, पण आपल्याला जन्म घेतावेळच्या अनुभवाचं स्मरण नाही. आपण जगत आहोत आणि त्या जगण्याचा अनुभवही आपल्याला आहे, पण प्रत्येक अनुभवाचं आपलं आकलन अचूक असतंच, असंही नाही. आपल्या आजूबाजूला आपण अनेक मृत्यू पाहतो आणि त्यामुळे आपणही मरणार, हे आपल्याला माहीत असलं तरी त्या अनुभवासाठी आपण तयार नसतोच! ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यूही अटळ आहे. मृत्यू हे जीवनातलं अटळ सत्य आहे, हे माहीत असलं तरीही मृत्यूची कल्पना माणसाला क्लेशकारक वाटते. पण तरीही मरणभयानं आपलं मन कधी कधी झाकोळलं जातं. अशा मनाला हा तारकमंत्र सांगतो की, अरे, उगाची भितोसी भय ते पळू दे! काय होईल, कसं होईल, अमुक झालं तर काय होईल, या सगळ्या  कल्पनाश्रित भयगंडानं पछाडण्याऐवजी, ‘जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे!’ तुझ्या पाठीशी जी समर्थाची शक्ती ठामपणे उभी आहे, ती जाणून घे! त्या सदगुरूबोधाच्या चिंतनात चित्त रंगू दे. चिंता+न हीच कृती तर चिंतन शब्द शिकवू इच्छितो! मनाला त्यांच्या लीलास्मरणाचा नाद लागून मनन वाढू दे. जिथं मन मावळतं तिथं मनन सुरू होतं. कारण मन+न म्हणजेच तर मनन. तेव्हा आपल्या पाठीशी अगाध शक्तीचं बळ असताना कशाला घाबरायचं? मग हा तारक मंत्र सांगतो की, अरे हा जन्म आणि मृत्यूचा खेळ या सृष्टीत सदैव सुरू आहे. ती कवितेतील ओळ आहे ना? ‘बीज नुरे डौलात तरुण झुले!’ बीज जमिनीत गाडलं जातं, पण त्यातूनच झाडाचा जन्म होतो. तसंच जे जे अस्तंगत होतं तेच नवनव्या रूपात परत जन्मत असतं. तेव्हा हा खेळ ज्यांचा आहे, त्या परम तत्त्वाशी एकरूप सदगुरूंचा तू बाळ आहेस! मग तू कशाला घाबरतोस?

जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा

नको घाबरु तू असे बाळ त्यांचा॥

बाळ म्हणजे अर्भक. लहान मुलाला आई जसं जपते,  सांभाळते तसं तुला ही गुरुमाय सांभाळत आहे. मग व्यर्थ भीती जोपासू नकोस.

आता इथे काहींच्या मनात प्रश्न निर्माण होईल की, याचा अर्थ सद्गुरू मृत्यू टाळतात, असं इथे सांगायचं आहे का? मग मोठमोठय़ा नसíगक आपत्तीतली जीवितहानी ते का रोखत नाहीत? युद्ध, यादवी, दहशतवादी हल्ले तसंच सार्वत्रिक रोगराईतील मृत्यू यांना ते अटकाव का करीत नाहीत?

तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मरणासन्न माणसाला बरं केल्याची उदाहरणं अनेक संतचरित्रांत आहेत. स्वामी समर्थाच्या चरित्रांतही असे काही प्रसंग आढळतात. पण याचा अर्थ मृत्यूलाच जगातून हद्दपार करता येतं किंवा आपण कुणाचा मृत्यू टाळू शकतो, असा दावा कुणी संत-सत्पुरुष करीत नाहीत. मरणाचा अंत होत नाही, पण मरणभयाचा अंत मात्र होऊ शकतो. मरणभयाचा हा मृत्यू केवळ त्यांच्याच आधारावर साधता येतो, हे निश्चित! हा तारक मंत्रही आपल्या मनातली मृत्यूची भीती काढून आपल्याला जगण्याची संधी किती मोलाची आहे, हेच शिकवतो. त्यासाठी सद्गुरू बोधावर श्रद्धापूर्वक विश्वास हवा आणि आचरणातून अनुभवानं तो पक्का व्हावा. त्यासाठीच यापुढच्या कडव्यात म्हटलं आहे की :

खरा होई जागा तू श्रद्धेसहित

कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त

कितीदा दिला बोल त्यांनीच हात

नको डगमगू स्वामी देतील साथ॥४॥

आजवरच्या जीवनाच्या वाटचालीवर नजर टाकली तरी, कित्येक कठीण प्रसंगातही आपण कसे सांभाळले गेलो, त्याचं सहज स्मरण होईल! मग आताच डगमगण्याची काय गरज आहे? स्वामी याक्षणीही साथ देत आहेत! ती पाहण्यासाठी अंतकरणात श्रद्धा मात्र हवी. ती श्रद्धाच नसली, तर तुला स्वामीभक्त तरी कसं म्हणावं? तेव्हा स्वामींवर खरी श्रद्धा असेल, तर जगण्यातलं मृत्यूचं भय काढून जगण्याचा आनंद मनात ठसवता आला पाहिजे.