12 July 2020

News Flash

वेगळं :ऑस्कर-रीवाच्या शोकांतिकेच्या निमित्तानं..

ऑस्कर पिस्टोरियसला त्याच्या मैत्रिणीच्या खुनासाठी पाच वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे. ऑस्करनं असं केलंच कसं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

| November 21, 2014 01:26 am

lp34ऑस्कर पिस्टोरियसला त्याच्या मैत्रिणीच्या खुनासाठी पाच वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे. ऑस्करनं असं केलंच कसं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण या घटनेच्या निमित्ताने अपंगांच्या प्रश्नंच्या विविध पैलूंकडे लक्ष वेधणारा लेख-

माणसाच्या मनाचं निबीड अरण्य खाचाखोचांसहित समजून घेणं मोठंच मुश्कील.

२३ ऑक्टोबरला ऑस्कर पिस्टोरियसच्या खटल्याचा निकाल न्यायाधीशांनी दिला आणि सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली त्याला पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दक्षिण आफ्रिकेतील कायद्याचा विचार करता समाजसेवा आणि चांगलं वर्तन मिळून जास्तीत जास्त वर्षभर तो गजाआड राहील, अशी चर्चाही त्यानंतर सुरू झाली. जिचा खून झाला त्या मॉडेल रीवा स्टीनकॅम्पची आई त्यानंतर प्रेसशी बोलताना म्हणाली, ‘‘कोर्टाच्या निर्णयावर आम्ही विश्वास ठेवतो, पण तरीही रीवा आणि ऑस्कर यांच्यामध्ये नेमकं काय घडलं हे केवळ ती जाणत होती नि ऑस्कर. अजूनही घटनेच्या काही कडय़ा उजेडात आल्या नाहीयेत असं आम्हाला वाटतं.. व्यक्तिश: ऑस्करविषयी प्रतिशोधाचा विचार मनात ठेवून जगणं चुकीचं आहे. तसं घडणार नाही. आम्ही त्याला माफ करतोय, पण रीवाबाबतीत जे काही घडलं त्याच्या पश्चात्तापाची झळ जगताना ऑस्करला सतत सोबत करणार आहे.’’

घटनेच्या अजून काही कडय़ा उजेडात आल्या नाहीयेत, असं जे रीवाची आई म्हणाली आहे त्याबाबत तिला अभिप्रेत असलेला अर्थ निराळा आहे. मला तीच कडी पकडून काही वेगळं सांगायचं आहे ..

१४ फेब्रुवारी २०१३ ची सकाळ उजाडता उजाडता बातमी येऊन ठेपली की, ऑस्कर पिस्टोरियसनं त्याची प्रेयसी रीवा स्टीनकॅम्पचा गोळ्या घालून खून केलाय.. नेटवर वाचल्यावर दोन मिनिटं काही सुचलंच नाही. इतकं नाटय़मय वळण आयुष्यात येऊ शकतं? खून? – आणि तोही पुन्हा जाणीवपूर्वक? की दक्षिण आफ्रिकेत डाकू-चोरांचा सुळसुळाट झालाय त्यामुळं घरात चोर घुसलेत असं समजून ऑस्करनं फायिरग केलं आणि त्याची बळी रीवा ठरली? मुळात रीवाला ऑस्करला सरप्राइज देण्यासाठी व्हॅलेनटाईन डेला पहाटे पहाटे येऊन यायचं असं कुठनं सुचलं? ऑलिम्पिकमधील ऑस्करच्या सहभागाचा आनंद अजूनही वाहतोय सगळीकडे आणि आता हे कुठलं विचित्र वळण?

या घटनेपूर्वी म्हणजे लंडन ऑलिम्पिक सुरू होता होता ऑस्कर पिस्टोरियसच्या ‘ड्रीमरनर’ या आत्मकथनाचा मी केलेला मराठी अनुवाद त्याच नावानं प्रकाशित झाला होता. त्याला प्रतिसादही चिक्कार मिळाला. पहिल्या आठवडय़ातच आवृत्ती संपली. आपण किती भारावून गेलोय, निर्थक जगतोय, ऑस्करच्या जिद्दीतून कशी प्रेरणा मिळाली वगरे सांगणारे मेल्स व फोन्स मला यायला लागले. मला स्वत:लाही स्वत:च्या शरीराशी संवाद साधण्याकरिता ‘ड्रीमरनर’मधून बरंच काही मिळालं होतं. मी खूश होते.

खूप लहान वयात मी चालणं व नसíगक विधींवरचं नियंत्रण गमावल्यामुळं एका वेगळ्या संघर्षांतून जगण्याचा सराव करत होते. विकलांग व्यक्ती म्हणून वाढत असताना जगण्याच्या प्रत्येक वळणावर कोणकोणती आव्हानं असतात याचा अनुभव मी घेत आले होते. आपल्या विकलांग असण्याचं भांडवल न करणारी, प्रसंगी त्यातलं ‘ब्लेसिंग इन डिसगाइज’ मान्य करणारी, स्वत:तल्या उत्तमतेचा शोध घेणारी आणि प्रांजळपणानं चुका मान्य करणारी व्यक्ती म्हणून मला ऑस्करचं प्रचंड आकर्षण वाटलं आणि त्याच lp35भावनिक ओढीतून मी त्याच्या गोष्टीचा अनुवाद केला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपंगत्वाकडे पाहण्याच्या त्याच्या मनोदृष्टीचं मला कौतुक वाटलं. स्वत:पलीकडे जाऊन भूसुरुंगांमुळं अपंगत्व आलेल्या माणसांसाठी तो ज्या भावनेनं झटत होता त्याचं कौतुक तर होतंच.

१४ फेब्रुवारीची घटना माध्यमांमधून सगळ्यांपर्यंत पोहोचली आणि चित्र झर्रकन पालटलं. कौतुकानं फोन करणारे आता मीच खुनी असल्यासारखे मला जाब विचारू लागले किंवा म्हणू लागले, ‘‘पहा, तुमच्या ऑस्करनं काय केलं? शेवटी आयडॉलचे पायही मातीचेच निघाले..’’ – त्यानंतर मग ऑस्करनं हॉटेलात कुठं, कधी, कसा गोळीबार केला होता, त्याच्या नावावर कसे वाद होते, त्यानं मद्यपान करून व महागडय़ा गाडय़ा उडवत कसा दंगा घातला होता वगरे बातम्या तपशीलवार छापून येऊ लागल्या. ‘बघा, बघा.. राक्षस!’ या जनसामान्यांच्या मनातल्या मताला पुन:पुन्हा पुष्टी मिळत होती. ‘हा माणूस आहे की कोण?’ असे प्रश्न विचारले जाऊ लागले. – हा प्रश्न खरं तर सगळ्यात योग्य! तो माणूसच, पण थोडय़ा वेगळ्या स्थितीतला हे काही कडय़ा समजावून घेता याव्यात यासाठी समोर आणणं भाग आहे.

‘गुजारिश’ नावाच्या सिनेमातला एक प्रसंग सांगावासा वाटतोय. क्वाड्राप्लेजिक असणाऱ्या एथनच्या ‘युथनेशिया’च्या अर्जावरची कोर्टाची सुनावणी एथनच्या घरी सुरू असते. जाबजबाब सुरू असतात. एथनकडं जादू शिकायला आलेला ओमर सिद्दीकी व्हीलचेअरला जखडलेल्या आपल्या गुरूच्या मिश्कीलपणाबद्दल, शिकवतानाच्या शिस्तीबद्दल सांगताना बोलून जातो की, ‘गुस्से में कभी कभी वह हमें प्लेटस् तोडने के लिए कहते है।’

एथन जेव्हा पहिल्यांदा ‘युथनेशिया’साठी कोर्टात अर्ज देतो तेव्हा त्याची मोठी बातमी होते. इच्छामृत्यू हा विषय तसा संवेदनशील, शिवाय एथन पूर्वाश्रमीचा जगप्रसिद्ध जादूगार. अपघातानंतर मानेखालचे शरीर पॅरालाइज झाल्यावरही उमेदीनं जगणारा, आपले दृष्टिकोन पुस्तकातून लिहिणारा, रेडिओवर सर्वासाठी प्रेरणादायी कार्यक्रम करणारा, त्याच्यासारख्या अनेक पॅराप्लेजिक व क्वाड्राप्लेजिक्सना ‘लिव विथ डिग्निटी’ असं आवाहन करणारा! एथननं इच्छामृत्यूचं अपील केलंय याची टीव्हीवर बातमी देताना निवेदक म्हणते, ‘हैरानी की बात तो ये है की जिस इन्सान को दुनिया एक रोल मॉडेल समझती आयी है शायद वो कोई हिरो नहीं बल्कि एक आम इन्सान है जो अपनी परेशानियों से भागना चाहता है।’

ही कथा सिनेमातली असली तरी तिचा संदर्भ ऑस्कर व अशा स्थितीतल्या माणसांसाठी घेणं आवश्यक आहे.

एखादा पलंगावर खिळलेला किंवा व्हीलचेअरशी बांधला गेलेला माणूस आपल्या रागालोभाचं प्रदर्शन कसा करेल? रागाची वाफ बाहेर काढण्यासाठी एथनसारख्यांनी जर काचेच्या प्लेटस् तोडायला सांगितल्या तर अविवेक आणि धडधाकट माणसानं हात-पाय आपटले, रागानं कोणाच्या कानाखाली शिलगावली, घरातल्या वस्तूंची फेकाफेक केली किंवा दारू पिऊन िधगाणा केला तर ते नॉर्मल?

एकदा आपलं व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी म्हणून मान्य झालं, की लोकांनी बनवलेल्या चौकटीतच वागण्याचं बंधन अटळ व्हावं का? – खऱ्या माणसांच्या आयुष्यातल्या तुकडय़ांवर बेतलेली असली तरी एथनची गोष्ट एक वेळ मान्य करू, की ती सिनेमातली पडते. मी जगते तो सिनेमा नव्हे. मी जेव्हा इच्छामृत्यूविषयी लिहिलं तेव्हा लोक माझ्याशी समोरासमोर येऊन किंवा फोनवरून बोलले. त्यातल्या काही प्रतिक्रिया सांगायच्या तर.. ‘तुम्हाला मन:शांतीची गरज आहे. तुम्ही अमुक कोर्स करा.’, ‘ध्यान लावण्यानं दु:खांचा, वेदनांचा विसर पडतो. तुम्ही ते ट्राय करा.’, ‘प्रेमभंग झाला असेल तर ते काही जगातलं सगळ्यात मोठं दु:ख नव्हे. पुढं जायला हवं!’, ‘जीवन जगण्यासाठी आहे. नकारात्मक विचार करून ‘त्याच्या’ देणगीचा अव्हेर करू नका.’, ‘तुमच्यासारख्यांकडं पाहून आम्हाला प्रेरणा मिळते. तुम्हीच असं म्हणायला लागलात, तर आम्ही कुणाकडं पाहायचं?’ – नराश्येच्या भरात मी कदाचित लगेच आत्महत्या करेन तेव्हा सोबतीला राहायला येऊ का, असंही विचारणाऱ्यांची कमी नव्हती. मी अनेक शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी बोलायला जायचे, अजूनही जाते; पण आत्ता तपशीलवार सगळं आठवताना माझ्या लक्षात येतंय की, त्या काळात अचानक ही निमंत्रणं कमी झाली होती. इच्छामृत्यूबद्दलची माझी भूमिका नीट समजून न घेता आल्यामुळं त्यांनी मला तात्पुरतं का होईना, बाद केलं होतं.

lp36

खूप वर्षांपूर्वीची खरी गोष्ट. माझ्या पाठीची स्थिती तेव्हा थोडी बरी असल्यामुळं मी नुकतीच शाळेत जायला सुरुवात केली होती. सातवीत होते. शाळेतील शिपाई मला सायकलवरून नेत होते. रस्त्यात थोडी पळापळ जाणवली, पण एसटी स्टँडचा रस्ता, शिवाय शाळेकडेही जाणारा, त्यामुळं रहदारी जास्त असेलसं वाटलं. थोडं पुढं गेल्यावर विचित्रशी किंकाळी ऐकू आली. खड्डय़ात एक मुलगी पडली होती. सायकल दुसऱ्यांच्या हाती सोपवत शिपाई खाली खड्डय़ात उतरले आणि मुलीला त्यांनी आधार दिला. तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केल्यावर कळलं ती माझ्याच गल्लीत राहणारी माझी एक मोठी मत्रीण. एकतर्फी प्रेम प्रकरणातून तिच्यावर खुनी हल्ला झाला होता. मी जाम घाबरले. अंगात तापच भरू लागला. सगळीकडे तीच चर्चा चालू होती. त्या चच्रेत काही असंपण म्हणत होते, की बहुतेक सोनालीला नेणारा शिपाई आणि सोनाली स्वत: खुनाची साक्षीदार होऊ शकते. त्यांनी खून होताना पाहिलाय. खरं तर पाहिला नव्हता, पण चर्चा अशीच होती. पोलीसही चौकशीला येऊन गेले. मी खूप महिने घाबरलेली होते. एक तर कमरेखालचं अंग हलवता येत नाही. जमिनीवरून हातांनी सरकायचं तरी तो वेग काही फार नाही. शिवाय घरात सगळीकडे उंबरे आणि पायऱ्या. समजा खून करणाऱ्या माणसाच्या साथीदारांना वाटलं की, सोनालीनं खून पाहिलाय, तर तिला मारून टाकू व पुरावा नष्ट करू, तर मग मी काय करायचं? चालता येत नसल्यामुळं कोणी आलं तर मी सुटकाही नाही करून घेऊ शकणार! त्या काळात मी खूप घाबरलेली असायचे. जरा खुट्ट वाजलं, की सावध व्हायचे. दार वाजलं, की हातात मोठी काठी घेऊन कोण आहे विचारायचे व मगच दार उघडायचे. संशयास्पद कुणी असेल तर सरळ डोक्यात काठी घालायची हे मी मनाशी ठरवलेलं असायचं. – मी शाब्दिक िहसा करण्यात पटाईत, पण मारामारी तर मी स्वप्नातही केली नव्हती. अपघातापूर्वी जेव्हा मी शारीरिकदृष्टय़ा नॉर्मल होते तेव्हा लहानपणीच्या भांडणातही मी कुणाला दणकून काढलं नव्हतं. मग हातात काठी घेऊन दार उघडण्याची आक्रमकता माझ्यात कुठनं आली? – शारीरिक अस्थर्य कधी कधी मानसिक अस्थर्याचं कारण बनून जातं चांगल्या किंवा वाईट तऱ्हेनं! माझं शारीरिकदृष्टय़ा सक्षम नसणं आणि म्हणून अधिकचं असुरक्षित वाटणं यातून आलेली ती वेडी आक्रमक धिटाई होती. आपले काही अवयव काम करत नसले, की उरलेले अवयव कदाचित अधिक त्वेषानं काम करतात, स्वत:च्या बचावाची वेळ आली, की नकळत जास्तच आक्रमकपणे! ती एक प्रकारे प्रतिक्षिप्त क्रियाच असते.

जी माणसं जन्मांध असतात त्यांच्या हालचाली न्याहाळल्यात कधी? आपण समोरच्या माणसाच्या डोळ्यांत आणि आरशातही आपल्या हालचाली पाहत असतो म्हणून त्या नियंत्रित असतात असं मला वाटतं. मोठेमोठे नट आरशासमोर अभिनयाचा सराव करतात असं ऐकलंय मी. का बरं करतात? ज्या नेत्रहीन माणसांना मित्र-कुटुंबीय किंवा नॅबसाख्या संस्था हालचालींविषयी प्रशिक्षण देतात त्यांना हा मुद्दा बरोबर कळेल. ज्यांचे काही अवयव सुदृढ शरीरांच्या तुलनेत कमी कार्यक्षम असतात त्यांचा हालचालींचा, कधी बोलण्याचा, डोळे किंवा हात-पाय, गाल थरथरण्याचा आवेग जास्त असतो. समोरच्या माणसाच्या वेगाशी जुळवण्याच्या प्रयत्नात घडलेली ती प्रतिक्रिया असते.

एक अडचण आमच्यासारख्या माणसांना घरात एकटे राहत असू तर नेहमीच सतावते. दारावरची बेल आणि फोनची िरग. अनोळखी माणसांचं ठीकाय, पण ज्यांना माहिती आहे की अमुकतमुक घरात शारीरिक अडचणी असणारी माणसं किंवा वयोवृद्ध लोक राहताहेत तेही या गोष्टीबरोबरचं आवश्यक भान विसरतात. एकदा-दोनदा बेल वाजवून दार ताबडतोब उघडलं गेलं नाही की दाराबाहेरचे लोक उत्तेजित होऊन, शंकेची पाल चुकचुकून पुन्हा पुन्हा बेल वाजवायला सुरुवात करतात. हाका मारू लागतात. कुबडय़ा-वॉकर वापरणारे, व्हीलचेअर वापरणारे, जयपूर फूट वापरणारे बंद दाराआतील लोक आपल्या कृत्रिम साधनांशी जुळवून घेऊन दाराशी येईपर्यंत बाहेरच्यांना दम धरवत नाही. मागचं दार असेल तर तिथं जाऊन ते हाका मारू लागतात. या गडबडीत ताण येऊन अपंग व्यक्ती घाई करते व स्वत:चं नुकसान करून घेते. असंच फोनबाबतीत. अशा लोकांचा फोन लांब असेल तर तिथंवर येऊन त्यांनी फोन घेईपर्यंत तिकडचे कुणी फोन कट करतात. अपंग व्यक्ती फोनजवळ बसून राहते. फोन येत नाहीये असा

विचार करून ती उठली आणि आपल्या कामाला लागली की पुन्हा िरग. तिथंवर पोहोचण्याआधी फोन कट!

मी कायम व्हीलचेअरवरून वावरते. त्यामुळं सगळ्या वस्तू व्हीलचेअरच्या उंचीवरून मला वापरता येतील अशा ठिकाणी ठेवलेल्या. घर मोकळं. अधेमधे सामान नाही. ऐकून एखाद्याला गंमत वाटेल, पण ज्या वस्तू जमिनीवरून उचलता येत नाहीत किंवा सरकवून ठेवता येत नाहीत अशा निर्जीव वस्तू आमच्यासारख्यांचा आत्मविश्वास खच्ची करतात. हो! जमिनीवर पसरून ठेवलेलं वर्तमानपत्रंही वावरण्यातला आत्मविश्वास वजा करू शकतं. चार वर्षांपूर्वीची घटना. माझ्या घरी पाहुणे आले होते. व्हीलचेअर फ्रेंडली असणाऱ्या माझ्या lp37टॉयलेटमधली नेहमीची शिस्त विस्कटली होती. बादल्यांच्या जागी टब, टबच्या जागी आणखी काही. बादलीला मग्ज वरच्यावर लटकवण्याऐवजी वाटेत जमिनीवर ठेवलेले. माझ्या हालचालींना बाधा आणेल अशी अस्ताव्यस्तता तिथं होती. ‘होतं असं कधीकधी’ म्हणत, तरीही बेचनीत मी कमोडवर शिफ्ट व्हायला गेले आणि तोल गेला, धाडकन आपटले. कमोडच्या बाजूला आधारासाठी असणाऱ्या लोखंडी बार्समुळं कंबर बचावली, पण निर्जीव पाय वाकडेतिकडे होत पडले. मी कशीबशी हातांच्या ताकदीनं पुन्हा कमोडवर बसले. काहीतरी बिघडलंय असं जाणवलं, पण काय ते कळलं नाही. कारण कमरेखालच्या भागात संवेदनाच नाही. डावा पाय भराभर सुजत गेला. दवाखान्यात पळावं लागलं. एक्सरे काढल्यावर कळलं, गुडघ्याखालच्या हाडाचे भाजी चिरावी तसे दोन तुकडे झालेत. ऑपरेशनशिवाय पर्याय नाही! मी थोडासा रेटा लावत घरातील वस्तू मला हव्या तशाच ठेवण्याचा आग्रह धरला असता तर अपघात टळला असता, पण ‘इतकंसुद्धा अ‍ॅडजस्ट करता येत नाही!’, ‘केवढं कौतुकबाई स्वत:च्या शिस्तीचं!’ असं मला ऐकून घ्यावं लागलं असतं. अशी चर्चा पुन्हा पुन्हा माझ्यापाठीमागे होत राहिली असती – हॉस्पिटलच्या विश्रांती काळात मी हाच विचार करत राहिले की माझ्याबद्दल गरसमज झाला असता तर तो हॉस्पिटलायजेशनपेक्षा स्वस्त पडला असता ना?

आमच्यासारख्या व्हीलचेअरबाऊन्ड माणसांच्या शारीरिक दौर्बल्यात आणखी एका गोष्टीची भर पडते. मान आणि खांदेदुखीची. आमच्यासारखे जे लोक मुख्य प्रवाहात वावरतात त्यांचं मित्रमंडळ मोठं असतं. कुणी ना कुणी इथंतिथं भेटतंच. ते उभ्या उभ्या आणि आम्ही बसलेले, अशा गप्पा रंगतात. डावीकडे-उजवीकडे-समोर-पाठीमागे उभ्या अशा सगळ्या ‘उभ्यां’कडे पाहून बोलताना मान आणि खांदे भरून येतात. आपल्या उंचीवर किंवा समपातळीवर एखादी गोष्ट नसण्यानं अशा विचित्रशा अडचणी सतावतात ज्या बोलून दाखवल्या तरी ताप, न दाखवल्या तरी ताप! – माझ्या घरी असणारे आरसे माझ्या व्हीलचेअरला सोयीच्या उंचीवर लावलेले, त्यामुळं उभ्या असणाऱ्या अनेक माणसांना प्रथमच जाणीव झालेली आहे की आरसे सोयीच्या उंचीवर नसतील तर कशी अडचण होते!

गंमत म्हणून, सरप्राईज म्हणून अचानक पाठीमागून येऊन कुणी ‘भॉक’ करतं किंवा मिठी मारतं तेव्हा सरप्राईजचा आनंद घेण्याआधी पाठीतले स्नायू विचित्र प्रतिक्रिया देऊन आखडतात.. अशा धक्क्यानं तोल ढासळतो. शारीरिक अपंगत्व असणाऱ्या माणसानं कौशल्यानं स्वत:च्या शरीराचा तोल सांभाळण्याची कला अवगत केलेली असते. यामुळंच स्वत:च्या अपंगत्वाशी एकदा ओळख झाली की डॉक्टरांनीही अंदाज करून ठेवलेल्या अडचणी कमी प्रमाणात भेडसावतात. जसं की – कायम बसून असणाऱ्या व्यक्तीला बेडसोअर-प्रेशर सोअर होण्याची शक्यता असते, पण पायांची कशी हालचाल करत राहिले नि हातांच्या आधारे शरीराला कसे झोके दिले की रक्ताभिसरण होतं याचं तंत्र ज्याचंत्यानं विकसित केलेलं असतं. जेव्हा आमच्यासारख्यांना बाळासारखं काखेत व गुडघ्यातून उचलून उंचावरच्या जागी किंवा गाडीमध्ये शिफ्ट करण्याची वेळ येते तेव्हाही शरीर कशा तऱ्हेनं दुसऱ्याच्या हाती सोपवलं तर शरीराचं ओझं कमी जाणवेल याचीही एक कला साध्य होते. उचलणाऱ्याला असं सहकार्य केलं तर त्याच्यावर अधिकचा भार येत नाही. या अनुभवाच्या गोष्टी. पण सरप्राईज महागात पडतात हेच खरं.

रीवाचा खून हा ऑस्करकडून घडलेला सदोष मनुष्यवध आहे म्हणजे ‘अनवधानानं’, ‘निष्काळजीपणानं’ झालेला खून आहे असा निवाडा दक्षिण आफ्रिकेतील कोर्टानं दिलाय. शिक्षा तर भोगावीच लागणार, त्याबद्दल कुणाची तक्रार असण्याचं काही कारण नाही. पण जर रीवा ऑस्करच्या प्रेमात होती तर ऑस्करसारख्या दोन्ही पाय नसणाऱ्या माणसाची जीवनशैली तिनं पाहिली, समजून घेतली नसेल का? ऑस्कर जरी दैनंदिन व्यवहारात कृत्रिम पाय वापरत असे तरी मध्यरात्रीनंतरच्या वेळी अचानक घरात कुणाचा तरी वावर जाणवला तेव्हा ऑस्कर त्याच्या कृत्रिम पायांविना असण्याचीच शक्यता अधिक हे लक्षात घेता त्यानं बाथरूमच्या बंद दारावर एक नव्हे तर चार गोळ्या झाडताना त्याची मन:स्थिती काय असेल हे समजून घ्यायला हवं. ऑस्कर आणि रीवा यांच्यातील संबंधांना जे शोकांतिकेचे स्वरूप प्राप्त झाले त्याबाबत सत्याजवळ जास्तीतजास्त जाण्याचा प्रयत्न करताना आपण स्वत:ला प्रश्न विचारायला हवा- रात्री पायांविना झोपलेल्या ऑस्करसारख्या माणसांना जाणवणारी असुरक्षितता आणि नॉर्मल माणसांना जाणवणारी असुरक्षितता यांच्यामध्ये काही फरक असू शकतो का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2014 1:26 am

Web Title: disability and its challenges
Next Stories
1 क्रीडा : मोटारस्पोर्ट्समध्ये मराठी झेंडा!
2 स्वास्थ्य : स्वास्थ्याकरिता ऋतुचर्या : डिसेंबर महिना
3 स्मरणरंजन : अर्धीच राहिलेली गोष्ट
Just Now!
X