29 January 2020

News Flash

ट्रॅव्हलॉग : जंगलाचा दुर्मीळ अनुभव!

आपल्या देशात अनेक अभयारण्य आहेत. पण प्रचंड वनसंपदा, वेगवेगळ्या जातींचे दुर्मिळ प्राणी, पक्षी पाहायचे असतील तर आसाममध्या मानस व्याघ्र प्रकल्पासारखे दुसरे अभयारण्य नाही.

| February 6, 2015 01:06 am

lp69आपल्या देशात अनेक अभयारण्य आहेत. पण प्रचंड वनसंपदा, वेगवेगळ्या जातींचे दुर्मिळ प्राणी, पक्षी पाहायचे असतील तर आसाममध्या मानस व्याघ्र प्रकल्पासारखे दुसरे अभयारण्य नाही.

जंगलात शिरले की उंचउंच झाडे, रंगीबेरंगी फुलपाखरे, एकशिंगी गेंडा, भेकर, गवे, रानटी हत्ती, रानरेडा, चितळ, हरण किंवा रानडुक्करांचा कळप, चितळांच्या कळपामध्ये पळणारा मोर, मध्येच उडी मारणारे माकड किंवा शेकरू, झुळझुळ वाहणारे झरे, ओढे, नदीनाले, तलावाकडे पाणी पीत असलेले सांबर किंवा पाडा, नजर जाईल तिथपर्यंत असलेले निसर्गसौंदर्य व विविध पक्ष्यांचा सतत किलबिलाट असे दृश्य मनाला मोहित करते. हे वर्णन आहे आसाममधल्या मानस व्याघ्र प्रकल्पाचे!
मानसला जाण्यासाठी जवळचा विमानतळ म्हणजे आसामची राजधानी गुहावटी. मानसचे मुख्य कार्यालय बारपेटा रोडपासून १३० कि.मी. अंतरावर आहे. गुहावटी हे शहर मुंबई, दिल्ली व कोलकाता या मुख्य शहरांना विमान व रेल्वेमार्गाने जोडले आहे. मानसपासून जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे बारपेटा रोड. ते मानस जंगलाच्या मुख्यालयापासून एक कि.मी.वर आहे व तिथूनच पुढे दहा कि.मी. अंतरावर कोकलीबारी इथे मानस जंगलात शिरायचा दरवाजा आहे आणि त्याच्या बाहेरच मानस माओझीगोंद्री इको टुरिझमचे मुख्यालय आहे. तिथे पर्यटकासाठी राहाण्याची व खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. माओझीगोंद्री इको टुरिझमतर्फे जंगलात फिरण्यासाठी वाटाडय़ा, जीप, हत्ती व बोटीची सोय केली जाते. ही संस्था आदिवासींच्या संस्थेतर्फे चालवली जाते. याशिवाय बान्सबारी, भुयानपारा, कोकराजर व बारपेटारोड इथेपण अनेक हॉटेल्स व रिसॉर्ट आहेत. बान्सबारी येथील रिसॉर्ट जंगलात शिरण्याच्या गेटपासून जवळ असलेल्या चहाच्या मळ्यात आहे.
पण जंगलाच्या आत रहाणं एन्जॉय करायचं असेल तर सगळ्यात सुंदर म्हणजे माथानगुरी येथील जंगल खात्याचे निवासस्थान. ते भुतानच्या सीमेवरील मानस नदीच्या काठी आहे. इथे अंगणात बसल्या बसल्या वन्यपशूपक्षी आजूबाजूला फिरताना बघायला मिळतात. तिथे समोरच मानस नदीच्या पलीकडे भुतानचे रॉयल मानस अभयारण्य आहे. माओझीगोंद्रीचे इको टुरिझमचे पर्यटकांना राहाण्यासाठीचे कॉटेजही सुंदर आहे.
मानसच्या जंगलामध्ये काही ठरावीक भागात चालत जायची परवानगी मिळते. बोडोंच्या संस्थेमार्फत आदिवासी वाटाडय़ा संरक्षक म्हणून बरोबर घेऊन जावे लागतात. त्यांच्याजवळ बंदूक असते. चुकून रानटी हत्ती किंवा गेंडय़ासारखा प्राणी हल्ला करण्याच्या पवित्र्यात असेल तर ते हवेत गोळीबार करतात. मानसच्या जंगलात खूप आतपर्यंत जायला उघडय़ा जिप्सीची सोय आहे, ज्याच्यात बसून किंवा उभे राहून वन्यपशूपक्षी बघता येतात. याशिवाय हत्तीवरून फिरता येते. हत्ती फार दूपर्यंत जंगलात पर्यटकांना घेऊन जाऊ शकत नाही, पण हत्तीवर शांतपणे बसले तर वन्यप्राणीपक्षी अगदी जवळून बघता येतात कारण हे प्राणी-पक्षी हत्तीला आपल्यातला एक समजतात व न घाबरता अगदी जवळ येतात. पण चुकून थोडा जरी आवाज केला तरी धूम ठोकतात. हत्तीवरून गेंडा, रानटी हत्ती व वाघांसारखे वन्यप्राणी अगदी जवळून पाहाणे ही मजा औरच आहे. मानस जंगलात फिरण्याचे आणखीन एक साधन म्हणजे मोटरबोट. मानस नदीतून माथानगुरी ते बान्सबारी फिरता येते. बोटीतून जाताना नदीत किंवा काठावर बसलेल्या मगरी दिसतात तसेच विविध जातींचे पक्षी, पाणमांजरे व गंगाडॉल्फीन दिसू शकतात. शिवाय विविध जातींचे मासे, कासवे, वन्यपशू, साप, घोरपडी दिसतात. माथानगुरी ते बान्सबारी अशी मानस नदीतून राफ्टिंग करण्याची सोय आहे. शिवाय मानस नदीच्या पलीकडे असलेल्या भूतानच्या रॉयल मानस राष्ट्रीय उद्यानामध्येही परवानगी काढून राहावयास जाता येते व बोटीने फिरता येते. तिथही भारतातल्या व्याघ्र प्रकल्पासारखी फिरण्याची व राहण्याची उत्तम सोय आहे. जगाच्या पाठीवर फक्त मानसमध्ये दिसणारा अत्यंत दुर्मीळ गोल्डन लंगूर (वानरांची जात) इथे उल्टापानी व जामदुआर या भागात व भूतानच्या रॉयल मानस राष्ट्रीय उद्यानामध्ये दिसतो. भारतातील मानसच्या जामदुआर भागातच ब्रिटिश शास्त्रज्ञ ई.पी.गी (E.P.Gee) यांना १९५६ या वर्षी या वानराच्या दुर्मीळ जातीचा शोध लागला.
मानसच्या जंगलात जवळजवळ ७०० जातींची झाडे शोधून काढली गेली आहेत, त्यातील अनेक जाती औषधी व दुर्मीळ आहेत. शिवाय अनेक दुर्मीळ जातींच्या आळिंबीही या जंगलात आहेत. मानसचा ४० टक्के भाग हा नराई व सॅव्हाना गवताळ प्रदेशाचा आहे व उरलेला सदाहरित (evergreen), अर्धसदाहरित (Semi evergreen), पाणझडी (dry decidious) जंगलाचा आहे. मानसच्या जंगलाचा बराच भाग घनदाट असल्याने आजही तो पूर्णपणे पायाखाली घातला गेलेला नाही असे सांगितले जाते. जंगलात फिरताना पर्यटकांना पांढरी वस्त्रे नेसलेली बाई विशेषत: रानटी हत्तींच्या कळपाजवळ दिसते, अशी नोंद अनेक पर्यटकांनी केली आहे. स्थानिक आदिवासी तिला देवी समजतात आणि तिची पूजा करतात. जंगलात पर्यटकांना घेऊन जाण्यापूर्वी बोडो वाटाडे पर्यटकांचा जंगलाचा प्रवास सुखाचा व सुरक्षित व्हावा यासाठी तिची प्रार्थना करतात.
मानसच्या जंगलात अनेक जातीचे दुर्मीळ पशुपक्षी आहेत. वन्यपशूंमध्ये गोल्डन लंगूर व केप्ड लंगूर या दोन वानरांच्या जाती, माकडांमध्ये आसामीज माकड, स्लो लॉरीस, मांजर कुटुंबातले ढाण्या किंवा पट्टेरा वाघ, काळा बिबळ्या वाघ (Black Panthar), ढगाळ बिबळ्या clonded leopard), संगमरवरी रानमांजर (Marble Cat), सोनेरी रानमांजर (Golden Cat), मासे खाणारे रानमांजर (Fishing cat), ठिपकेवाले रानमांजर (Leopard cat), उदमांजरमध्ये अस्वलमांजर (binturong or bearcat) अस्वलांमध्ये हिमालयातले काळी अस्वल (himalayan black bear), लाल पांडा, सशांमध्ये अत्यंत दुर्मीळ हिसपिड ससा. तो जगातून कायमचा नष्ट झाला असे मानले गेले होते. पण तो १९८४ मध्ये उत्तरप्रदेशातल्या दुधवा व्याघ्र प्रकल्पामध्ये दिसला व नंतर या व पश्चिम बंगालच्या जलदापरा व्याघ्र प्रकल्पात मिळाला. याशिवाय हरणांमध्ये बारहसिंगा (याला हे नाव नराच्या शिंगाला बारा टोके असल्याने पडले.) त्याला दलदलीचे हरण (swamp deer) असंही म्हणतात. कारण हे हरण दलदलीच्या गवताळ प्रदेशात राहाते. छोटं रानडुक्कर (pygmy hog) जगातून नष्ट झालं असं मानलं गेलं होतं ते या जंगलात १९८० साली सापडलं. त्यानंतर तो आसाममध्ये वेगवेगळ्या जंगलांमध्ये सापडलं. lp69
याशिवाय या जंगलामध्ये रिसस माकड, बिबळ्या वाघ, रानमांजर, अनेक प्रकारची उदमांजरे, मुंगूस, रानटी कुत्रा (Dhole), कोल्हा (Jackal), खोकड (Fox), स्लोथ बेअर जातीचे अस्वल अनेक जातीची पाणमांजरे (Otters) व व्हिसल ज्यात प्रामुख्याने यलो थ्रोटेड मार्टीन व चायनीज फॅरेट बॅगर, चायनीज मुंगी खाणारे रानमांजर (Chinese Pangolin)) अनेक जातींची वटवाघळे, खारी, चायनीज साळिंदर, रूपस टेल्ड हेअर, रानटी हत्ती, भारतीय एकशिंगी गेंडा, गवा, रानरेडा (Wild Buffallow) हरणांमध्ये सांबर, पांडा (Hos Deer), भेकर (Barking Deer), चितळ, रानडुक्कर व गंगाडॉल्फीन इत्यादी ५७ जातींचे वन्यप्राणी आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये ४२ प्रकार मिळतात. यामध्ये मुख्य म्हणजे राजनाग (King Cobra), पट्टेरी मण्यार (Banded Krait), साधी व पाण्यातील घोरपड (Monitor lizard and Water Monitor lizard), मगर (Crocodile), अजगरांमध्ये Python Molurus, बर्मिज पायथॉन व रेटीक्युलेटेड पायथॉन हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा अजगर आहे. दक्षिण अमेरिकेतील अ‍ॅनाकोंडा या अजगरानंतर याचा क्रमांक लागतो. याशिवाय ५४ जातींचे मासे, अनेक जातीची बेडके व कासवे व भारतातल्या एकूण १४०० जातींच्या पक्ष्यांपैकी ४९७ जातीचे पक्षी इथे मिळतात. यातील काही स्थलांतरित आहेत. ते सैबेरिया व युरोपमधून हिवाळ्यात येथे येतात व हिवाळा संपला की परत जातात. शिवाय हजारो जातींची फुलपाखरे व कीटक या जंगलात आहेत. दुर्मीळ पक्ष्यांमध्ये बंगाल फ्लोरिकान, भारतीय काळा पांढरा जटायू (Oriental or Indian Pied Hornbill), मोठा काळा पांढरा जटायू (Great Pied Hornbill), रेथेड हॉर्नबिल पालास फिशिंग ईगल, ग्रेट व्हाइट बेलीड हॅरॉन, स्पॉटेड रेन बाबलर, ब्लू हेडेड रॉकथ्रश, इमराड ककू, ब्लॅक क्रेस्टेड बाझा, लॅगर व शाइन फॅलकॉन आणि पिकॉक फिजंट इथे आहेत.
मानस व्याघ्र प्रकल्पांचा विस्तार २,८३७ चौ.कि.मी.चा आहे. त्यामध्ये ५१९.७७ चौ. कि.मी. मानस राष्ट्रीय उद्यान असून तो व्याघ्र प्रकल्पाचा मुख्य परिसर आहे. उरलेला सुमारे २३१८ चौ. कि.मी.चा भाग बफर भाग म्हणतात. मुख्य परिसरात माणसांना राहायला, जनावरांना चरायला बंदी आहे. तर बफर भागात थोडय़ाफार प्रमाणात मूळच्या आदिवासी लोकांना राहायला जागा दिली आहे व ठरावीक भागात जनावरे चरायला परवानगी दिली आहे. पण वन्य पशुपक्ष्यांची शिकार करायला, जंगलात पडलेली कुठलीही गोष्ट घेऊन जायला व झाडे तोडायला संपूर्ण बंदी आहे. मानस नदीच्या पलीकडल्या भूतानमधील रॉयल मानस राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार १०३२ चौ. कि.मी.चा आहे. वन्य पशूपक्षी भूतान व भारतामध्ये मानस नदी ओलांडून नेहमी ये-जा करत असतात.
मानसच्या जंगलाला ब्रिटिश काळात १९०५ मध्ये राखीव जंगलाचा दर्जा दिला गेला. १९२८ मध्ये त्याला गेम सेंचुरी म्हणजे वन्य प्राण्याला संरक्षण असलेल्या जंगलाचा दर्जा दिला गेला. देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५० मध्ये हे अभयारण्य जाहीर केले गेले. १९७३ मध्ये त्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. १९८५ मध्ये त्याला जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून जाहीर केले गेले. १९८९ मध्ये मानसला जैविक अभयारण्य (Biosphere Reserve) म्हणून जाहीर केले. १९९० मध्ये ५१९.७७ चौ. कि.मी.चा भाग राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर झाला. तो मुख्य परिसरात मोडतो. मानसच्या जंगलात रानटी हत्ती पुष्कळ प्रमाणात मिळतात. कधी कधी एका कळपात २०० रानटी हत्तीही असतात. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात वाघांबरोबरच रानटी हत्तींना संरक्षण देण्यासाठी २००३ साली मानसच्या जंगलाला ‘रानटी हत्तीचे संरक्षित जंगल’ (Elephant Reserve) हा दर्जा देण्यात आला. व्याघ्र प्रकल्प (Tiger Reserve) हत्तींसाठी संरक्षित जंगल (Elephant Reserve), राष्ट्रीय उद्यान (National Park), जागतिक प्राचीन स्थळ (World Heritage site) व जैविक अभयारण्य (Biosphere Reserve) अशी पाच वेगवेगळी वैशिष्टय़ं असलेले मानस हे जगातील एकमेव जंगल आहे.
lp70१९९० ते २००० पर्यंतचा सुमारे दहा वर्षांचा काळ मानससाठी घातक ठरला. बोडोंच्या आंदोलनामुळे सर्व जंगलाला संरक्षण देणे कठीण झाले. या काळात देशाबाहेरच्या चोरटय़ा शिकाऱ्यांनी वन्यप्राणीपक्ष्यांची मोठय़ा प्रमाणात शिकार केली. झाडे तोडून नेली. त्यांना काही बोडोंनी पैशासाठी मदत केली होती, पण मुळात बोडोंना मानस जंगलाचे प्रेम असल्याने त्यांना त्यांची चूक कळून चुकली. आता तेच लोक जंगल संरक्षणाचे काम करतात.
वन्य प्राण्यांमध्ये बोडो आंदोलनाचा जास्त फटका एकशिंगी गेंडा, रानटी हत्ती व वाघाला बसला. कत्तलीमुळे त्यांची संख्या कमी झाली होती. गेंडय़ाच्या बाबतीत आसामच्या इतर भागांतून गेंडे आणून त्यांची संख्या आता वाढवली गेली आहे. दुसऱ्या जंगलातून मानसमध्ये गेंडे सोडण्याचा यशस्वी प्रयोग २००६ साली करण्यात आला.
मानस जंगलाच्या प्रत्येक भागाचे वेगवेगळे वैशिष्टय़ आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला ‘काला माती’ हा भाग नावाप्रमाणेच काळ्या मातीची जमीन असलेला जंगलाचा भाग आहे. इथल्या जमिनीची काळी माती क्षारयुक्त आहे. त्यामुळे रानटी हत्ती, गवे व सांबर इथे मोठय़ा संख्येने खारट माती चाटताना दिसतात. तसेच दुर्मीळ हिसपिड ससा इथे सहजच बघायला मिळतो. या भागात अनेक वेळा रानटी कुत्रे (Dhole) सांबराची शिकार करताना बघायला मिळतात. ‘उल्टापाणी’ या भागाला नदीचे पाणी उलटय़ा दिशेने जात असल्यामुळे हे नाव पडले. हा भाग विविध प्रकारची दुर्मीळ फुलपाखरे, फर्न आणि आळंबी (Orchid) साठी प्रसिद्ध आहे. शिवाय दुर्मीळ पशुपक्ष्यांमध्ये इथे काळा पांढरा जटायू (Pied Hornbill), मोठा काळा पांढरा जटायू ( ॅGreat Pied Hornbill), सोनेरी वानर (Golden Langur), केप्ड लंगूर, ढगाळ बिबळ्या, सोनेरी रानमांजर, मासे खाणारे रानमांजर तसेच काळा बिबळ्या वाघ, ढाण्या किंवा पट्टेरी वाघ व सांबर सहजपणे दिसतात. ‘काचूगाव’ हा भाग मोठय़ा मोठय़ा सालाच्या झाडांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातील काही झाडे तर खूप प्राचीन असल्याचे सांगितले जाते. ब्रिटिश काळातील कोळशांच्या इंजिनचे व रेल्वे लाइनचे अवशेष इथे जपून ठेवले आहेत. इथे रानटी हत्ती, सोनेरी वानर, चितळ, हरण, रानटी कुत्रा, यलो थ्रोटेड मार्टिन हा हिमालयातला प्राणी व लाल पांडा आणि मोर बघायला मिळतात. ‘पामदुआर’ हा भाग म्हणजे भूतान, आसाम व पश्चिम बंगालच्या सीमांच्या मीलनांचे स्थान आहे. इथे संतोष नावाची नदी आहे व हिमालयाच्या पायथ्याचे हे अर्धसदाहरित (Semi Evergreen) जंगल व पाणझडी वृक्षांचे जंगल (Dry Decidious Forest) आहे. तसंच तराईचा व सवानाचा गवताळ भाग आहे. त्यामुळे मानसच्या जंगलातील बहुतेक सगळय़ा प्रकारचे वन्यपशुपक्षी येथे बघायला मिळतात. याच ठिकाणी ब्रिटिश शास्त्रज्ञ ई.पी.गी (E.P.Gee) यांनी १९५६ साली सोनेरी वानराचा शोध लावला होता.
भारतातलेच नव्हे तर जगातले मानस हे वन्यपशुपक्ष्यांचे दुर्मीळ असे एकमेव नंदनवन म्हणायला हरकत नाही. कारण जे वन्यपशुपक्षी इतर ठिकाणी दुर्मीळ दिसत नाहीत ते मानसमध्ये सहज दिसतात.
डॉ. महेश संझगिरी

First Published on February 6, 2015 1:06 am

Web Title: forest experience 2
टॅग Tour
Next Stories
1 पुरातत्त्व : अंभेरीचे कार्तिकेय मंदिर
2 कलाजाणीव
3 कलाजाणीव
Just Now!
X