‘‘सृष्टी मधे बहु लोक, परिभ्रमणे कळे कौतुक’’
या समर्थ वचनाला जागून एकदा का घराबाहेर पडले की या सृष्टीमधल्या अनेक सुंदर गोष्टी, ठिकाणे यांचा परिचय होतो. नेहमीच्या रुळलेल्या वाटेवरून चालण्यापेक्षा जरा वेगळी वाट, आडवाट धरली की कितीतरी आश्चय्रे, निसर्गनवल, सौंदर्यस्थळे सामोरी येतात. सृष्टीकर्त्यां परमात्म्याची ही सारी निर्मिती पाहून थक्क व्हायला होते. त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे लागते. अफाट ज्ञानाचा खजिना आपल्यासमोर त्याने उघडून ठेवलेला असतो. गरज असते ती फक्त आपण तिथे जाण्याची, त्याचा आस्वाद घेण्याची, त्याच्याशी एकरूप होण्याची. अशाच आडवाटेवरून फिरताना सुखकर्त्यां गणेशाची विविध स्थाने, त्याची विविध रूपे नजरेस पडली. कधी तो राजगडच्या सुवेळा माचीमध्ये भेटला, तर कधी हरिश्चंद्रगडावर भेटला. कधी भोरगिरीसारख्या शांत रमणीय गावी भेटला, तर कधी सागरकिनारी बुरोंडीला. ऐन समुद्रात कुलाबा किल्ल्यामध्ये पण तो आहे आणि एरंडोल-आजरा इथल्या रम्य प्रदेशी तो आहे. कधी तो टेकडीवर उभा आहे तर कधी चक्क झोपलेला आहे. पण तो सगळीकडे आहे, तो सर्वागसुंदर आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो आपली वाट पाहतो आहे. नेहमीचे प्रसिद्ध गणपती तर सगळ्यांनाच माहिती असतात. त्यातल्या अनेकांचे व्यावसायिकीकरणसुद्धा झालेले आहे. त्यांच्या दर्शनासाठी तासन्तास ताटकळत थांबावे लागते. परंतु हे आडवाटेवरचे गणेश अत्यंत शांत, रमणीय ठिकाणी वसले आहेत. गर्दी, गोंगाट काहीही नाही. देव आणि आपण यांच्यामध्ये कोणीही नाही. कितीही वेळ इथे थांबावे, त्याच्याशी संवाद साधावा, मन शांत करून घ्यावे आणि नवीन ऊर्जा घेऊन पुढे चालू लागावे. हे सगळे आडवाटेवरचे गणेश तुमच्यासमोर आणण्याचे प्रयोजन हेच आहे. मुद्दाम, आवर्जून त्यांना भेट द्यावी आणि मन:शांती अनुभवावी. काही वेगळे बघितल्याचा आनंद तर आहेच. पण या सर्व ठिकाणी देव भक्तांची वाट पाहात उभा आहे. गरज आहे आपण जरा वाट वाकडी करायची आणि त्या सुखकर्त्यांची भेट घेण्याची. रेटारेटी करून दर्शन घेण्यापेक्षा हे निसर्गाच्या सान्निध्यात असलेले आडवाटेवरचे गणपती तुम्हा सर्वाना निश्चितच भावतील. त्यासाठीच हा सारा खटाटोप. फार लांब जाण्याची गरज नाहीये. आपण नेहमी जातोच अशाच ठिकाणी फक्त थोडी वाट वाकडी करा. या आडवाटेवरच्या गणपतींच्या दर्शनासाठी चला निघू या..

एकचक्रा गणेश

रामायण आणि महाभारत हे प्रत्येक भारतीयाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. अनेक स्थाने, अनेक गावे यांचा संबंध रामायण आणि महाभारताशी जोडला गेलेला आढळतो. त्यातूनच तयार होतात अनेक कथा, उपकथा. दंतकथा; आणि मग त्या विशिष्ट स्थानाचे महत्त्व अजून उजळून निघते. एकचक्रा हे नावसुद्धा पांडवांशी संबंधित आहे. बकासुर नावाच्या राक्षसाचा भीमाने वध केला आणि याच एकचक्रा गावातील लोकांची त्या राक्षसाच्या तावडीतून सुटका केल्याची कथा सर्वपरिचित आहे. नागपूर-वर्धा रस्त्यावर वध्र्यापासून अंदाजे २५ कि.मी. अंतरावर केळझर किल्ला आहे. या केळझर किल्ल्यावरच हे प्राचीन गणेशाचे देवालय वसले आहे. स्थानिक लोक याला पांडवकालीन गणेशस्थान असेही म्हणतात. पांडवांनी बकासुरवधाची स्मृती म्हणून या गणपतीची स्थापना केली अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. प्राचीन काळी केळझर या गावालाच एकचक्रा नगरी म्हणून ओळखले जायचे. अर्थातच या गणेशालासुद्धा एकचक्रा गणेश असे म्हणतात. केळझरच्या किल्ल्यावर उंच जागेवर हे गणेशमंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला पुष्करणीसारखी एक विहीर आहे. ही विहीर चौकोनी असून दगडांनी भक्कम बांधलेली आहे. विहिरीतील पाण्यापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधून काढल्या आहेत. रस्त्याच्या दक्षिणेकडे एक तलाव आहे. या तलावात बाहुबलीची एक काळ्या दगडाची मूर्ती सापडली होती. गणेश मंदिरातील गणेशमूर्ती उजव्या सोंडेची व सुंदर असून, या गणेशाच्या दर्शनाला परगावाहून अनेक लोक येतात. भाद्रपद आणि माघी चतुर्थीला इथे मोठा उत्सव असतो. मंदिराजवळच धर्मशाळा बांधलेली आहे. एकचक्रा नावाचे अजून एक गाव पश्चिम बंगालमध्ये असून पांडवांनी बकासुराचा वध त्याच एकचक्रा नगरीमध्ये केला, असेही सांगितले जाते.

भोरगिरीचा गणपती

रुळलेल्या वाटा सोडून वेगळ्या वाटेने चालू लागलो की काही गमतीशीर गोष्टी आपल्यासमोर येतात. भोरगिरी-भीमाशंकर या पदभ्रमण मार्गावरचे सुरुवातीचे गाव आहे हे भोरगिरी. राजगुरुनगरवरून वाडा, टोकावडेमाग्रे जाणारा रस्ता भोरगिरी गावाशी संपतो. अगदी छोटं टुमदार गाव आहे हे. पुण्यापासून जेमतेम ८० किमी अंतरावर हे गाव आहे. गावामागे भोरगिरीचा किल्ला उभा आहे. किल्ल्याच्या पोटात गुहा खोदलेल्या आहेत. इथे भीमेच्या काठावर कोटेश्वर मंदिर आहे. या कोटेश्वर मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगतात की, देवांनी इथे असलेल्या पाण्याच्या डोहामध्ये स्नान केले होते. त्यामुळे तो डोह पवित्र झाला आहे. म्हणून आजही इथले स्थानिक उत्सवाच्या काळात इथे असलेल्या डोहात अंघोळ करतात. झंझराजाने जी बारा शिवालये बांधली त्यात या कोटेश्वरचाही समावेश आहे, असे मानले जाते. कोटेश्वर मंदिरात शिविपडी तर आहेच; पण गाभाऱ्याच्या बाहेर एक गणपतीचे वैशिष्टय़पूर्ण शिल्प आहे. जेमतेम दीड फूट उंची असलेल्या गणेशाची वेशभूषा आकर्षक आहे. मुली स्कर्ट नेसतात तशीच रचना त्याच्या वस्त्राची दिसते. ही वेशभूषा पाश्चात्त्य वाटते. तुंदिल तनू असलेला हा गणेश उभा आहे. तो चतुर्भुज असून त्याच्या वरच्या उजव्या हातामध्ये परशू दिसतो; तर वरच्या डाव्या हातामध्ये बहुधा एखादे फळ असावे, कारण गणपतीची सोंड त्या फळावर टेकलेली आहे. छोटेखानी असलेली ही गणेश मूर्ती त्याच्या वस्त्रामुळे निश्चितच वेगळी ठरलेली आहे. भोरगिरी किल्ला छोटेखानी असून, हिरवागार निसर्ग आणि प्रदूषणविरहित वातावरण अनुभवायचे असेल तर पावसाळ्यात भोरगिरीला अवश्य यावे. भोरगिरी ते भीमाशंकर हे फक्त सहा किमीचे अंतर. तो एक सुंदर ट्रेक आहे. डोंगरधारेजवळून रमतगमत करता येणारा. या संपूर्ण ट्रेक मार्गावर असंख्य धबधबे आणि अनेक रानफुले पाहायला मिळतात.

इंचनालचा गणेश

कोल्हापूर जिल्ह्यतला गडिहग्लज हा तालुका म्हणजे अनेक निसर्गरम्य ठिकाणे, किल्ले, मंदिरे यांची रेलचेल असलेला प्रदेश आहे. खरंतर हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने खूप समृद्ध असूनही या प्रदेशांबद्दल फारशी माहिती लोकांना नसते. भौगोलिक दृष्टय़ासुद्धा हा प्रदेश काहीसा वेगळा पडल्यासारखाच आहे. आंबोलीसारखे प्रसिद्ध गिरीस्थान इथून जवळ आहे. गर्द झाडी, सह्यद्रीच्या डोंगररांगा आणि चंदगड, आजरा यांसारखे निसर्गसंपन्न तालुके यांचा शेजार लाभलेला हा भाग. गडिहग्लजच्या पश्चिमेला फक्त सात कि.मी. अंतरावर इंचनाल नावाचे टुमदार गाव आहे. निसर्गाचे सान्निध्य लाभलेल्या या गावात हिरण्यकेशी नदीच्या काठावर एक जुनी गावची पांढर या ठिकाणी गणेशाचे एक सुंदर मंदिर उभे आहे. या मंदिराला मोठा इतिहास आहे. इ. स. १९०७-०८साली या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार गोपाळ आप्पाजी कुलकर्णी यांनी केल्याची नोंद आहे. त्यानंतर श्री गजानन ग्रामस्थ सेवा मंडळ, इंचनाल, मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी मिळून १९८७ ते १९९२ या काळात पुन्हा एकदा हे मंदिर नव्याने बांधून काढले. त्यासाठी गोकाकवरून आरभाव जातीचा दगड वापरला गेला आहे. करवीर पीठाच्या शंकराचार्याच्या हस्ते ४ मे १९९२ रोजी मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला. मोठा प्रशस्त सभामंडप, बाजूला बगिचा, महादेव मंदिर असा सर्व रम्य परिसर आहे हा. इंचनालच्या या मंदिरातील गणेशमूर्ती बठी असून तिची उंची अंदाजे सव्वा दोन फूट एवढी आहे. काळ्या पाषाणातली ही मूर्ती शांत आणि मोठी प्रसन्न दिसते. चतुर्भुज गणेशाच्या हातात पाश, अंकुश, पात्र असून एक हात वरद मुद्रेत आहे. या मंदिराची देखभाल देवस्थान समितीकडे आहे. देवाच्या नावानी जवळ जवळ नऊ एकर बागायती जमीन आहे. माघ महिन्यामध्ये येणाऱ्या गणेश जयंतीला इथे मोठा उत्सव करतात आणि महाप्रसादाचे आयोजन केलेले असते. कोल्हापूर, सावंतवाडी, गोवा, बेळगाव इथून भाविक यावेळी इथे दर्शनाला येतात. अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे अशी ख्याती असलेले हे देवस्थान आहे. महागावचे दंडगे (जोशी) घराण्याकडे गेल्या ३०० वर्षांपासून या गणपतीच्या पूजेची व्यवस्था दिलेली आहे. कोल्हापूर-गडिहग्लज येण्यासाठी बस सेवा विपुल आहे. मुद्दाम वाट वाकडी करून पर्यटकांनी हा सगळाच परिसर फिरून पाहण्याजोगा आहे.

पुण्याचा खिंडीतला गणपती

पुण्यात गणेशिखडीमधील पार्वतीनंदन गणपती किंवा िखडीतला गणपती मंदिर शिवकाळापूर्वीपासून अस्तित्वात असावे. असे म्हटले जाते की, राजमाता जिजाबाई एका श्रावणी सोमवारी पालखीमधून पाषाणच्या सोमेश्वराच्या दर्शनाला निघाल्या होत्या. त्या वेळी िखडीतल्या या मंदिरात एक ब्राह्मण अनुष्ठानात मग्न होता. त्यांनी या गजाननाचे दर्शन घेतले. ही पुरातन मूर्ती असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि त्यांनी इथे सुघड मंदिर बांधले. काळाच्या ओघात या मंदिराची पडझड झाली. नंतर शिवराम भट्ट चित्राव यांना या मंदिराचा जीर्णोद्धार करताना गुप्तधन सापडले. ते धन स्वीकारायला बाजीराव पेशव्यांनी नकार दिल्याने त्याचा वापर करून शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर आणि िखडीतल्या या पार्वतीनंदन गणेशाचे मंदिर उभारले गेले. या मंदिरात गणेशाची सिंदूरचíचत चार फूट उंचीची भव्य मूर्ती आहे. मूर्ती बठी असून सोंड डावीकडे वळलेली आहे. पुढील दोन हात मांडीवर असून मागील दोन हातात पारशी आणि अंकुश आहे. सभामंडपाच्या सुरुवातीला एका दगडावर लाडू हातात धरलेला मूषक आहे. सर्व पेशवे मोहिमेवर जाताना या िखडीतल्या गणपतीचे दर्शन घेत असत. दुसऱ्या किवळे इथल्या कॉन्ट्रॅक्टर रानडे घराण्यातील मंडळी कुटुंबात कुणाचे लग्न झाले की नवीन जोडप्याला घेऊन या गणेशाच्या दर्शनासाठी आजही येत असत. त्या विधीला ‘ओहर’ असे म्हणत. त्या वेळी मोठा जेवणावळीचा कार्यक्रम होत असे. एकदा हे सर्व कुटुंबीय या समारंभासाठी जमले असता त्यातल्या श्रेष्ठींना या गजाननाचा दृष्टांत झाला की या ठिकाणी दरोडेखोर येणार आहेत तेव्हा तुम्ही इथून लगेच निघावे. श्रेष्ठींनी सर्व मंडळींना लगेच किवळे इथे हलवले. दरोडेखोर आले, पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही, अशी दंतकथा आहे. आजही कॉन्ट्रॅक्टर रानडे मंडळी या गणेशाच्या दर्शनाला आवर्जून जातात. अजून एक महत्त्वाची घटना या गणेशाबाबत घडली ती १८९७ साली. रँडच्या खुनापूर्वी चाफेकर बंधूंची खलबते याच मंदिरात होत असत. निर्दयी रँडचा खून केल्यावर दामोदर हरी चाफेकरांनी ‘िखडीतला गणपती नवसाला पावला’ असा सांकेतिक निरोप खंडेराव साठे यांच्यामार्फत लोकमान्य टिळकांना पाठवला होता. सेनापती बापट भूमिगत असताना याच मंदिरात वास्तव्याला होते. अशा या अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या पार्वतीनंदन गणपतीचे दर्शन मुद्दाम घ्यायला हवे.

वेरूळचा लक्ष विनायक

वेरूळ म्हटले की डोळ्यासमोर येतात त्या नितांतसुंदर कोरीव लेणी आणि त्यातही कैलास लेणे हे तर लेणी स्थापत्यकलेचा सर्वोच्च आविष्कार आहे. या शिल्पकृतीला जगात तोड नाही. स्थापत्याचे असे शास्त्र आणि तंत्र याच भूमीवर विकसित झाले होते याचा निश्चितच आपल्याला अभिमान वाटतो. बारा ज्योतिìलगांपकी एक असलेले श्रीघृष्णेश्वर हेसुद्धा वेरूळलाच आहे. शिवरायांचे भोसले घराणे याच वेरूळचे पाटील होते आणि घृष्णेश्वराचे भक्त होते. हे सगळे वैभव वेरूळला आहेच, परंतु त्याचबरोबर एक सुंदर गणेशस्थानसुद्धा इथे आहे. त्याचे नाव आहे लक्ष विनायक. अर्थातच आडवाटेवरचे असल्यामुळे अनेक मंडळींना त्याची माहिती नसते. हे गणेश स्थान एकवीस गणेशस्थानांपकी एक आहे. श्रीगणेशाची मूर्ती भव्य असून डाव्या सोंडेची आणि उजवी मांडी वर करून बसलेल्या स्थितीतली आहे. या स्थानाशी साहजिकच एक सुंदर दंतकथा निगडित असणारच. त्यानुसार या गणेशाची स्थापना शिवपुत्र काíतकेयाने केल्याचे सांगितले जाते. त्याची पौराणिक कथा अशी की, जेव्हा तारकासुराचे व काíतकेयाचे युद्ध सुरू होते तेव्हा तारकासुराचा वध, पराक्रमाची शर्थ करूनदेखील काíतकेयाला होईना. तेव्हा भगवान शंकराच्या उपदेशावरून त्याने विघ्नराज गणपतीची या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली. गणेश प्रसन्न झाला आणि त्याच्या कृपेमुळे काíतकेयाला तारकासुराचा वध करणे शक्य झाले. काíतकेयाने म्हणजेच स्कंदाने स्थापन केलेला गणेश तो हाच लक्ष विनायक होय. या कथेवरूनच इथल्या स्थानाला प्राचीन काळी ‘स्कंदवरद एलापूर’ असे नाव पडले असावे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. औरंगाबादला गेल्यावर आता न चुकता अजिंठा वेरूळबरोबरच या लक्ष विनायकाचे दर्शन अगत्याने घ्यावे.

एरंडोल-आजऱ्याचा इच्छापूर्ती गणेश

कोल्हापूर जिल्ह्य़ात आजरा तालुक्यात एक गणेशस्थान आहे एरंडोल. इथली मूर्ती एरंडोल आजरा इथे पोखरकर महाराजांच्या आश्रमात असलेल्या अष्टकोनी मंदिरामध्ये स्थापित केलेली आहे. या मंदिरात अष्टविनायकांच्या प्रतिमा आठ दिशांना ठेवलेल्या आढळतात. गर्भगृहात सोळा हात असलेली, उजव्या सोंडेची, पंचधातूची ही मूर्ती उभ्या स्थितीतली आहे. मूर्तीचे सोवळे अत्यंत कडक असून पुजारी सोडून कोणालाही गर्भगृहात प्रवेश करता येत नाही. ही मूर्ती इथे कशी आली याबद्दल एक चमत्कारिक कथा प्रसिद्ध आहे. तांत्रिक साधना करणाऱ्या लोकांच्या वापरातली ही मूर्ती होती. चंबळ इथल्या एका ऋषींच्या जवळ असलेली ही मूर्ती चंबळ-उज्जन-तंजावर-गोकाक असा प्रवास करत शेवटी संकेश्वर इथल्या रघुनाथशास्त्रींकडे आली. आजारी पडल्यावर ही मूर्ती एरंडोल आजरा इथले संत तुळशीराम महाराज पोखरकर यांना द्यावी, असा त्यांना स्वप्नदृष्टान्त झाला. त्यायोगे ही मूर्ती त्यांच्याकडे पोहोचली. तिचे तेज आणि शक्ती सहन न झाल्याने तिचा सुरुवातीला त्यांना बराच त्रास झाला. परंतु त्यांचे काशी येथील गुरू आत्मप्रकाशानंद यांनी स्वामींना आश्वस्त केले आणि त्याचा त्रास बंद झाला. पुढे महाराजांच्या आश्रमातच मंदिर बांधून तिथे मूर्ती ठेवलेली आहे. या ठिकाणी प्रसाद म्हणून गूळखोबरे आणि शेंगदाण्याचे लाडू असतात. भाविकांची इच्छा पूर्ण करणारा म्हणून याला इच्छापूर्ती गणेश म्हणतात, तर साधकांना मदत करणारा म्हणून याला मोक्षदाता गणेश असेही नाव आहे. दर संकष्टीला कर्नाटक, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातले अनेक भाविक दर्शनासाठी इथे येतात. या आडवाटेवरच्या इच्छापूर्ती गणेशाला नक्कीच भेट द्यायला हवी.

लिंबागणेश

मराठवाडय़ातील ६७ गणेशस्थानांपकी एक असलेले स्थान म्हणजे िलबागणेश. प्रत्यक्ष चंद्रदेवतेने स्थापन केलेला गणपती म्हणून हा श्री भालचंद्र. नगर-बीड रस्त्यावरील मांजरसुंभा या गावापासून अवघे ११ कि.मी. वर हे देवस्थान आहे. जवळ जवळ दोन फूट उंचीची शेंदूरचíचत गणेशाची स्वयंभू मूर्ती मंदिरात स्थापन केलेली आहे. मोरया गोसावी या स्थानाचे वर्णन करताना म्हणतात की. ‘चंद्रपुष्करणी तीर्थ मारुती सन्निध.’ महानुभावपंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामींनी या स्थानाला भेट दिल्याचे उल्लेख आहेत.
असे सांगितले जाते की िलबासुर नावाचा एक दैत्य इथे राहत होता. त्याने इथल्या प्रजेला उच्छाद आणला होता. तेव्हा गणेशाने िलबासुराचा वध केला. मरते वेळी लिंबासूराने गणेशाची क्षमा मागितली आणि इथले स्थान त्याच्या व गणेशाच्या नावाने प्रसिद्ध व्हावे, अशी इच्छा प्रकट केली. गणेशाने तसा वर दिला आणि हे ठिकाण िलबागणेश या नावाने प्रसिद्ध झाले. प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य यांचे हे कुलदैवत असल्याचे सांगतात. पूर्वाभिमुख असलेल्या या देवस्थानाचा जीर्णोद्धार इ.स. १९३० मध्ये श्री भवानीदास भुसारी यांनी केल्याचा शिलालेख प्रवेशद्वारावर बसवलेला आहे. दगडी कासव, होमकुंड, प्रदक्षिणा मार्ग, मंडपाच्या मागे मोठी दीपमाळ, तसेच प्रवेशद्वारावर नगारखाना असे सर्व असलेला हा सुंदर परिसर आहे. मंदिराचा प्रकार फरसबंदी असून भक्कम तटबंदीने तो संरक्षित केलेला आहे. जवळच दगडी बांधणीची एक पुष्करणी असून तिला चंद्रपुष्करणी असे म्हणतात. पुष्करणीच्या जवळच एक समाधी असून ती िलबासुराची समाधी असल्याचे सांगितले जाते. परळी वैजनाथाचे दर्शन घेण्याआधी या गणेशाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. भाद्रपद प्रतिपदेपासून इथे गणेश उत्सवाला सुरुवात होते. ६६६.२ँ१ीुँं’ूँंल्ल१िं.ूे या वेबसाइटवर माहिती मिळते.

तुरंब्याचा श्रीसिद्धिविनायक

आडवाटेवरचे गणपती शोधताना काही सामाजिक बांधीलकी जपणारी मंदिरे, देवस्थाने भेटतात. तुरंब्याचे देवस्थान हे याच प्रकारातले एक आहे. कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावर कोल्हापूरपासून ३५ किलोमीटर अंतरावर राधानगरी तालुक्यात तुरंबे नावाचे गाव आहे. गावातूनच वाहणाऱ्या दूधगंगा नदीमुळे गाव समृद्ध आहे. मुख्य रस्त्यावरच आता जीर्णोद्धार झालेले सिद्धिविनायकाचे मंदिर लागते. मंदिर पूर्वाभिमुख असून पुरातन आहे. नोव्हेंबर २००० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. ४० फूट रुंद आणि ८० फूट लांब असा प्रशस्त प्रकार असलेल्या या मंदिरात अंदाजे अडीच फूट उंचीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज गणेशाची मूर्ती आहे. मूर्ती संपूर्णपणे शेंदूरचíचत आहे. चारही हातांत विविध आयुधे आहेत. या ठिकाणाचे महत्त्व सांगताना लोक सांगतात की, अष्टविनायकातल्या एका गणपतीचे पुजारी अपत्यप्राप्ती व्हावी म्हणून या सिद्धिविनायकाला नवस बोलले आणि त्यांची मनीषा पूर्ण झाली. पंचक्रोशीतच नव्हे, तर अगदी दूरदूरच्या गावांहून इथे लोक मोठय़ा श्रद्धेने येतात. माघी गणेश उत्सव हा इथला खूप मोठा उत्सव असतो. गणेश सप्ताह इथे साजरा केला जातो आणि या सात दिवामध्ये देवस्थानतर्फे ख्यातनाम प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते यांचे कार्यक्रम ठेवले जातात. जलसुराज्यचे सचिव डॉ. इंद्रजित देशमुख यांचे सक्रिय योगदान या ठिकाणी असते. गायन, कीर्तनाबरोबरच गावातील दहावी-बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचे कौतुक आणि जे अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी समुपदेशन हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम देवस्थानतर्फे राबवला जातो. देवस्थान समितीचे सचिव बाळासाहेब वागवेकर आणि त्यांचे सहकारी यांचे मोठे योगदान या कार्यक्रमात असते. मार्गशीर्ष चतुर्थीला मंदिराचा वर्धापन दिन साजरा होतो तेव्हा महाप्रसादाचे आयोजन असते. इथे मुद्दाम जाऊन भेट द्यायलाच हवी.

श्रीक्षेत्र गणेशगुळे

नम: कालीमालापघ्नम्। भाक्तानामिष्टदम् प्रभुम्।
गव्हरं सुनिबद्ध तम्। शिलाविग्रहिणेनम:।
कलियुगातील सर्व दोषांचा संहार करणारा, आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा, विश्वव्यापी असणारा, पण गुळ्यातील डोंगरामध्ये गुहेत अत्यंत गुप्तपणे राहणारा व बाह्य़त: पाषाणाच्या रूपाने दृश्यमान होणारा असा गजानन त्याला आम्ही नमस्कार करतो.
रत्नागिरी जिल्ह्य़ातल्या गणेशगुळे इथल्या गणपतीबद्दल अगदी यथार्थ वर्णन या श्लोकात केलेले आढळते. खूप मोठय़ा स्थानापुढे इतर ठिकाणे झाकोळून जातात, असेच काहीसे इथे झाले आहे. सुप्रसिद्ध गणपतीपुळ्याच्या जवळच असलेले हे ठिकाण हे असेच काहीसे झाकोळले गेले आहे. या ठिकाणाचे आणि गणपतीपुळ्याचे संबंध काही दंतकथांमधून आपल्याला आढळतात. रत्नागिरीच्या दक्षिणेला श्री स्वरूपानंद स्वामींच्या पावस या गावापासून गणेशगुळे अवघे दोन कि.मी.वर आहे. गावात आदित्यनाथ, वाडेश्वर, लक्ष्मीनारायण ही मंदिरे तर आहेतच; परंतु इथे असेलेले श्री गणेश मंदिर अगदी वैशिष्टय़पूर्ण आहे. ते उंच डोंगरावर असून अगदी शहाजीराजांच्या काळापूर्वीही ते अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. त्या काळी विजापूर भागात असे घुमट असलेले बांधकाम करीत असत. त्याच प्रकारची या मंदिराची घुमटी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर मोठी शिळा असून त्यामुळे ते दार बंद केलेले दिसते. इथे या शिळेलाच गणेश मानून तिची पूजा करतात. त्या शिळेवरच एक गणेशाकृती प्रकट झालेली दिसते. या गुळ्याचा गणपती पुळ्यास गेला व तो पुन्हा इथे प्रगट झाला, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. नंतर रत्नागिरीमधील एक सधन व्यापारी थरवळशेट यांनी या मंदिराला एक मोठा सभामंडप बांधून दिला. माघी चतुर्थीला इथे तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जातो.
रत्नागिरीपासून फक्त २० कि.मी.वर आणि पावसपासून दोन कि.मी.वर असल्यामुळे या दोन्ही ठिकाणी राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध आहे.

पोखरबावचा गणेश

कोकणात भटकंतीला कुठेही जा, जागोजागी तुम्हाला निरनिराळी देवळे-राउळे निसर्गरम्य परिसरामध्ये निवांत असलेली दिसतील. इथे जवळजवळ प्रत्येक देवस्थानाला एकेक दंतकथा, गूढरम्य अशा गोष्टी चिकटलेल्या आहेत. काही देवळे मात्र खरोखरच आडवाटेवरची आहेत. चांगले रस्ते असल्याने तिथे जाणे जरी आता सोयीचे झाले असले तरीसुद्धा ही देवळे अशा अनगड जागी वसली आहेत की तिथे पर्यटकांची वर्दळ अजिबात नाही. अशा ठिकाणी गेले की खरंच मन:शांती लाभते. देव आणि आपण फक्त दोघेच आणि आपल्या साक्षीला असतो पाण्याचा झुळुझुळु वाहणारा प्रवाह आणि पक्ष्यांची अखंड साद. बाकी कोणीही नाही. पोखरबावला आल्यावर अगदी असेच वाटते. इथून हलूच नये असे वाटते. इथे डोंगराला एक खूप मोठे नसíगक छिद्र पडले आहे. त्याच्या खालून अव्याहत एक ओढा वाहत असतो. डोंगर पोखरला गेलाय म्हणून पोखर आणि खाली तळे, ओहोळ आहे म्हणून बाव. त्यामुळे हे स्थान झाले पोखरबाव. देवगड या आंब्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ठिकाणापासून पोखरबाव जेमतेम ११ कि.मी.वर आहे. देवगड-दाभोळे-दहिबाव रस्त्यावर दाभोळे गावापासून २ कि.मी.वर हे ठिकाण आहे. रस्त्याच्या बाजूला एक छान गणपती मंदिर बांधलेले दिसते. संगमरवरी चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील गणेशाची मूर्ती बघण्याजोगी आहे. चतुर्भुज गणेश एका आसनावर बसला असून त्याच्या पायाशी वाहन उंदीर आहे. मंदिर परिसर अत्यंत रमणीय आहे. मंदिराच्या उजव्या बाजूने खाली जायला पायऱ्यांचा रस्ता आहे. खाली शंकराची एक स्वयंभू िपड दिसते. याबद्दल एक कथा अशी सांगतात की ही िपडी हजारो वष्रे पाण्याखाली होती. १९९९ साली पुजारी श्रीधर राऊत यांना दृष्टान्त झाला. त्यानुसार त्यांनी ही मूर्ती पाण्यातून वर काढली आणि तिची प्राणप्रतिष्ठा केली. अत्यंत नितळ आणि स्वच्छ पाण्याचा प्रवाह इथे वाहत असतो. हे पाणी भक्त तीर्थ म्हणून वापरतात. अत्यंत जागृत देवस्थान म्हणून हा पोखरबावचा गणेश पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणकेश्वर, मालवण, विजयदुर्ग, देवगड यांपकी आता कुठेही गेलात तर या गणपतीचे दर्शन आणि इथल्या अनाहत निसर्गाचा अनुभव अवश्य घ्यावा.

आव्हाणेचा निद्रिस्त गणेश

बहुधा महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर असावे. निद्रिस्त हनुमानाची मंदिरे आपल्याला खुलताबाद, लोणार इथे पाहायला मिळतात. पण निद्रिस्त गणेशाचे मंदिर हे एकमेवाद्वितीयच असेल. नगर जिल्ह्य़ातील तीसगावपासून अंदाजे १५ कि.मी. अंतरावर आहे आव्हाणे हे गाव. मुख्य रस्त्यावरून गावात जाणाऱ्या रस्त्यावर एक सुंदर कमान बांधली आहे. गावात पूर्वी कोणी दादोबा देव नावाचे गणेशभक्त राहत होते. ते दरवर्षी मोरगावची वारी करायचे. वयोमानाप्रमाणे त्यांना वारी करणे झेपेना. तेव्हा त्यांना मोरया गोसावींचा दृष्टान्त झाला की आता त्यांनी वारी करू नये. तरीसुद्धा निस्सीम गणेशभक्त दादोबांनी आपला हट्ट सोडला नाही आणि ते वारीला निघाले. वाटेत असलेल्या ओढय़ाला मोठा पूर आला होता. मोरयाचे नाव घेऊन दादोबा त्या ओढय़ात उतरले खरे, पण पाण्याच्या त्या प्रचंड प्रवाहाबरोबर लांब वाहत गेले. वाटेत असलेल्या एका बेटावर ते थांबले असता त्यांना गणपतीचा दृष्टान्त झाला की मीच तुझ्या गावी येतो. कालांतराने दादोबा देवांचे निधन झाले. असे सांगितले जाते की त्यानंतर आव्हाणे गावात एक शेतकरी शेत नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ कुठल्याशा वस्तूला लागून अडला. पाहतात तो काय, एक स्वयंभू गणेशाची मूर्ती जमिनीत होती. दादोबा देवांच्या मुलाला, गणोबा देव याला दृष्टान्त झाला की ती मूर्ती आहे तशीच असू दे, त्याच अवस्थेत तिची पूजा कर. ती मूर्ती म्हणजेच हा निद्रिस्त गणेश होय. मूर्तीच्या छातीवर नांगराच्या फाळाची खूण अजूनही दिसते. प्रशस्त बांधलेल्या मंदिरातील गाभाऱ्यात जमिनीखाली दोन फुटांवर स्वयंभू गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात एका कोनाडय़ात ज्या गणेशाच्या मूर्ती आहेत त्या दादोबा देव आणि त्यांचा मुलगा गणोबा देव यांच्याच आहेत, असे सांगितले जाते. पूजेतली मूर्ती मात्र फक्त हीच निद्रिस्त गणेशाची. संकष्टी, अंगारकी आणि माघी गणेश उत्सव इथे मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. मंदिराचे प्रांगण प्रशस्त फरसबंदी आहे. चारही बाजूंनी िभतीलगत मोठा ओटा बांधलेला आहे. सुंदर असा सभामंडप नुकताच बांधून घेतलेला आहे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी हे मंदिर बांधून दिले. तसेच दादोबा देवांच्या वंशजांना वतन म्हणून जमिनी दिल्या. त्यामुळे त्यांची नावे जहागीरदार भालेराव अशी पडली. मंदिराच्या बाजूला गणेशभक्तांच्या मुक्कामासाठी उत्तम असा भक्तनिवास बांधलेला आहे. निद्रिस्त गणेशाचे हे आगळेवेगळे आणि महाराष्ट्रातील बहुधा एकमेव मंदिर मुद्दाम जाऊन पाहण्याजोगे आहे.

बुरोंडीचा त्रिमुखी गणेश

देवाची इच्छा असली की देव स्वत: त्याला पाहिजे त्या ठिकाणी येतो आणि नंतर भक्तांच्या कल्याणाकरता मग तिथेच तो स्थानापन्न होतो. भक्तांचे भले करणारा हा सुखकर्ता आपल्याला अनेक पुराणकथांमधून सापडतो. पण अगदी आता आता म्हणजे जेमतेम ७-८ वर्षांपूर्वी अशी काही घटना घडली असे जर सांगितले तर ते खोटे वाटेल, थोतांड वाटेल. पण अशीच एक घटना घडली आहे इ.स. २००६ साली आपल्या कोकणात, दापोलीजवळ. आणि त्या प्रसंगाचा नायक आजही मोठय़ा दिमाखात तिथे उभा आहे, भक्तांची वाट पाहतो आहे.
बुरोंडी या दापोलीपासून फक्त १२ कि.मी. वर असलेल्या गावातली ही गोष्ट आहे. या गावात कोळी आणि खारबी समाजाचे लोक राहतात. अर्थातच मासेमारी हाच या लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. या गावातले नंदकुमार आणि दुर्वास साखरकर हे दोघे त्यांच्या एकवीरा नावाच्या होडीतून मासेमारी करण्यासाठी हण्रजवळ खोल समुद्रात गेले असताना त्यांच्या होडीपाशी काही एक लाकडी वस्तू तरंगताना त्यांना आढळली. उत्सुकतेने त्यांनी ती काय आहे म्हणून बघितले तर एक लाकडाची श्रीगणेशाची मूर्ती होती ती. कोणीतरी ती विसर्जति केली असावी असे समजून या दोघांनी तिची पूजा केली आणि परत समुद्रात सोडून दिली. काही वेळाने अजून आत समुद्रात गेल्यावर त्यांना तीच मूर्ती परत बोटीजवळ आलेली दिसली. त्यांनी परत ती सोडून दिली. बरेच अंतर समुद्रात गेल्यावर त्यांना पुन्हा ती मूर्ती त्यांच्या होडीच्या जवळ आलेली दिसली. आता मात्र ते चक्रावून गेले. हा काहीतरी चमत्कार असावा आणि गजाननाला आपल्याकडे यायचे असावे असे समजून त्यांनी ती मूर्ती परत किनाऱ्यावर आणली. सगळा प्रसंग गावातल्या मंडळींना सांगितला. सगळ्या ग्रामस्थांनी एकमताने असे ठरवले की या गणेशमूर्तीला आता आपल्या गावामध्येच स्थापित करायचे. गावात तर मूर्ती ठेवण्याजोगे मंदिर नव्हते, मग शेवटी या मंडळींनी गावातल्याच श्रीसावरदेवाच्या मंदिरात एका भागात माघी गणेश जयंतीच्या दिवशी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून त्या गावाला, साखरकर कुटुंबीयांना भरभराटीचे दिवस आले असे लोक सांगतात.
चार फूट उंचीची शिसवीच्या लाकडाची ही मूर्ती तीन तोंडांची आहे. मूर्तीला ६ हात असून पाश, दंत अशी आयुधे तिच्या हातात आहेत. तुंदिलतनु आणि विविध अलंकारांनी मढवलेली ही गणेश मूर्ती अतिशय देखणी आहे. मूर्तीच्या अलंकारांची कलाकुसर अतिशय अप्रतिम आहे. गणेशाच्या पायाशी त्याचे वाहन मूषक आणि बाजूला बीजपूरक दिसते. बीजपूरक हे फळ लाडवासारखे दिसते. सुफलता आणि नवनिर्मिती याचे ते प्रतीक आहे. ते कायम गणपतीजवळ दाखवलेले असते. दापोली दाभोळ या परिसरात कायम लोकांचे जाणे होते. परंतु या गणेशाचे दर्शन आता मुद्दाम जाऊन घेतले पाहिजे. जवळच असलेला रम्य सागरकिनारा या मंदिराला आणि परिसराला अजूनच शोभा देतो.

कनकेश्वरचा श्रीराम सिद्धिविनायक

समुद्रकाठी गिरीवर, नाणं जाती तरुवर,
पुष्पवाटिका अपार, मन निवे पाहता
स्थळ पाहता सबळ, नम साजिरे कनकेश्वर,
होती कामना सफल, जिथे ठायी राहता
मूळ स्थापना यथार्थ, सर्व भक्तांचा कृतार्थ,
गजानन तो समर्थ, स्वामी येथे नांदतो
श्रीहृदयी केवळ, ऐसे भासती सकळ,
निरुमेय महास्थळ शोक सर्व भंगतो
कनकेश्वर अलिबागपासून जवळ दोन हजार फूट उंचीवरील डोंगरावर आहे. हे शंकराचे स्वयंभू स्थान मानले जाते. इथे एक सुडौल, देखणी गणपतीची प्रतिमासुद्धा पाहण्याजोगी आहे. अलिबागपासून फक्त दहा कि.मी.वर मापगाव आहे. तिथून अंदाजे ८०० दगडी पायऱ्या चढून वर जावे लागते. इथे असलेल्या एका पुष्करणीच्या उत्तरेला सिद्धिविनायकाचे पश्चिमाभिमुख मंदिर वसले आहे. हे मंदिर कऱ्हाड येथील गणेशशास्त्री जोशी यांचे ज्येष्ठ चिरंजीव रामचंद्र याने ज्येष्ठ वद्य चतुर्थी शके १७९८ रोजी बांधले. या रामचंद्र संन्याशानेच पुढे स्वामी लंबोदरानंद असे नाव धारण केले. याच परशुरामभक्त श्री लंबोदरानंद स्वामी यांना भगवान परशुरामाने तपश्चय्रेसाठी श्रीलक्ष्मी गणेशाची लहान आणि देखणी मूर्ती दिली आणि त्यांना कनकेश्वर इथे जाऊन तपश्चर्या करावयास सांगितले. पुढे स्वामींनी समाधी घेतल्यावर त्यांचे एक स्न्ोही बापट यांनी स्वामींच्या समाधी शेजारीच हे गणेश मंदिर बांधले. परंतु या गणेशाची पूजा करू नये असा परशुरामाचा आदेश असल्यामुळे त्यांनी वडोदरा येथील श्री गोपाळराव मराळ यांच्याकडून गणेशाची मूर्ती आणून तिची या मंदिरात प्रतिष्ठापना केली. परशुरामाने लंबोदरस्वामींना दिलेली मूर्ती तांब्याच्या पेटीत बंद करून ठेवली आहे आणि तिची एक प्रतिकृती लोकांच्या दर्शनासाठी ठेवलेली आहे. पूजेची गणेशप्रतिमा जवळजवळ ३ फूट उंच असून संगमरवरी आहे. गणेशाच्या मूर्तीशेजारीच रिद्धी-सिद्धी यांच्या मूर्तीसुद्धा आहेत. वैशाख शुद्ध द्वादशी ते पौर्णिमा या दिवशी इथे मोठा वार्षकि जन्मोत्सव साजरा करतात. ज्येष्ठ वद्य सप्तमीला लाम्बीदार स्वामींची पुण्यतिथी साजरी होते.

मोरयाचा धोंडा

छत्रपती शिवाजीराजांचे स्वराज्य पश्चिमेला सिंधुसागरापर्यंत विस्तारले. कोकणचा कारभार करायचा तर समुद्रावर स्वामित्व हवंच. सुसज्ज आरमार आणि त्याच्या मदतीला तेवढेच बेलाग जलदुर्ग यांचे महत्त्व या राजाने केव्हाच ओळखले होते. मालवण इथे आले असता त्यांच्या मनात समुद्रातील एक बेट भरले. कुरटे बेट. शुद्ध खडक, स्थळ उत्तम, गोडय़ा पाण्याचाही ठाव आहे, ऐसे पाहून राजियांनी आज्ञा केली- ‘ह्य जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा. चौऱ्यांशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाही!’ महाराजांनी इथे सिंधुदुर्ग किल्ल्याचे काम सुरू करायचे ठरवले. स्थानिक प्रजेला अभय दिले, वेदमूर्तीना विश्वास दिला आणि महाराज पूजेला बसले. तो दिवस होता २५ नोव्हेंबर १६६४. कोणत्याही कार्याचा शुभारंभ हा अर्थातच गणपतीच्या पूजनानेच व्हायला हवा. मालवणच्या किनाऱ्यावर होता का गणपती? हो. होता ना. जिथे महाराज पूजेला बसले त्याच जागी आहे एक मोठा खडक. याला म्हणतात मोरयाचा धोंडा. मालवण किनाऱ्यावर वायरी भूतनाथाच्या हद्दीत फेरुजिनस क्वार्टझाईट बनलेला जांभळ्या रंगाचा हा खडक आहे. त्यावर विघ्नहर्ता गणेश, चंद्र, सूर्य, शिविलग, नंदी आणि पादुका कोरलेल्या आहेत. यावर कोरलेल्या गणेशमूर्तीमुळे याचे नाव झाले मोरयाचा धोंडा. या मोरयाची साग्रसंगीत पूजा करून महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यास सुरुवात केली. शिवरायांच्या स्पर्शाने पावन झालेले हे स्थळ सध्या मात्र उघडय़ावर निसर्गाच्या सर्व ऋतूंचा मारा सहन करत उभे आहे. मालवणला गेल्यावर किनाऱ्यावर जाऊन या मोरयाला नक्की वंदन करावे. इथून सिंधुदुर्ग किल्ला फार सुरेख दिसतो. मालवणला पोलीस ठाण्याजवळ राजकर्णक महाराजांची समाधी मुद्दाम पाहावी. कर्णक नावाची एक संन्यस्त व्यक्ती कुरटे बेटावर वास्तव्य करून होती. शिवरायांनी याच कुरटे बेटावर बलाढय़ किल्ला बांधायचे ठरवले. किल्ल्यामुळे कर्णक महाराजांच्या साधनेत व्यत्यय येईल म्हणून त्यांना कुरटे बेटाऐवजी मालवण गावाजवळ शांत परिसरात राहण्याची विनंती शिवरायांनी केली. तेव्हा राजांच्या कानात त्यांनी काही मोलाच्या गोष्टी सांगितल्या. तेव्हापासून त्यांना ‘राजकर्णक’ म्हणू लागले. मेढा या भागात त्यांचे वास्तव्य होते. तिथेच त्यांनी संजीवन समाधी घेतली. आता इथे एक छोटी घुमटी आणि आत एक शिविलग आहे.

नंदीग्रामचा सिद्धिविनायक

गणपती हे तर सर्वात लाडके दैवत. अग्रपूजेचा मान तर त्याला आहेच, पण त्याशिवाय ते तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवतसुद्धा आहे. गावोगावी गणेशाच्या निरनिराळ्या मूर्ती आणि त्यांची मंदिरे आढळतात. प्रत्येक ठिकाणामागे काही ना काही दंतकथा पण ऐकायला मिळतात. अत्यंत सुप्रसिद्ध अष्टविनायक तर आपल्याकडे आहेतच, पण त्याशिवाय काही वैशिष्टय़पूर्ण गणपती आपल्याला आढळतात. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा या ठिकाणापासून जेमतेम
८ कि.मी वर नंदीग्राम ऊर्फ नांदगाव आहे. या गावी आहे श्रीसिद्धिविनायकाचे देवस्थान. हे एक जागृत आणि नवसाला पावणारे दैवत आहे, अशी याची पंचक्रोशीत प्रसिद्धी आहे. मंदिर भव्य आणि प्रेक्षणीय आहे. मंदिराचा अंतर्भाग अत्यंत कलाकुसरीच्या नक्षीकामाने सुशोभित केलेला दिसतो. अतिशय शांत आणि रमणीय परिसरामध्ये हे मंदिर वसलेले आहे. ज्योतिषाचार्य गणेश दैवज्ञ यांनी या मंदिराची स्थापना केली. मंदिरातील मूर्ती अंदाजे ४ फूट उंचीची असून ती उजव्या सोंडेची आहे. या गणपतीभोवती प्रदक्षिणा घालताना सर्व बाजूंनी याचे दर्शन घेता येते. स्वयंभू मूर्ती असलेल्या या मंदिराला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भेट दिली होती. माघ चतुर्थीला या विनायकाची जन्मतिथी साजरी केली जाते. तसेच संकष्टी आणि विनायकी चतुर्थीला भक्तांची मोठी गर्दी दर्शनासाठी इथे जमते. अलिबागहून नागाव चौल रेवदंडा माग्रे आपण या नंदिग्रामी येऊन पोहोचतो. अखंड सागराची सोबत आणि नारळी-पोफळीच्या झाडांच्या सान्निध्यातून हा प्रवास अत्यंत रमणीय असा आहे. इथे येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी देवस्थानतर्फे धर्मशाळा बांधली आहे.

आधाशाचा शमी विघ्नेश

नागपूर-िछदवाडा लोहमार्गावर पाटणसावंगी या स्थानकापासून १२ कि.मी. अंतरावर आधासा हे क्षेत्र आहे. तसेच कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडय़ापासून चार कि.मी. वर असलेल्या एका उंच टेकडीवर हे पुरातन गणेश मंदिर असून मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरात गणेशाची भव्य अशी दशभुज मूर्ती सिंहावर आरूढ झालेली आहे. ही गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे.
याबद्दल अशी कथा सांगितली जाते की, महापाप, संकष्ट आणि शत्रू या तीन दानवांनी जगाला त्राही त्राही करून सोडले होते. या दानवांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी सर्व देवांनी शंकर-पार्वतीरूपी असलेल्या शमीच्या वृक्षाखाली श्री गणेशाची आराधना केली. तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रकट झाला आणि त्याने त्या तीनही दानवांचा संहार केला. ज्या स्थळी ही कथा घडली त्या ठिकाणी मुदगल ऋषींनी गणेशमूर्तीची स्थापना केली. तेच हे अदोष क्षेत्र. या ठिकाणाची दुसरी कथा अशी की, बळीच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी विष्णूने वामनावतार घेतला होता. या कार्यात आपल्याला शक्ती प्राप्त व्हावी म्हणून श्री शमी विघ्नेशाची आराधना केली व त्याच्या कृपेने बळीच्या यज्ञाचा विध्वंस केला. या प्रसंगानंतर रात्री विघ्नेशाजावालाच वक्रतुंड नावाने गणेशाची मूर्ती वामनाने स्थापन केली. तेव्हापासून हे क्षेत्र वामनवरद वक्रतुंड क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले. गणेशाच्या २१ स्थानांपकी हे एक जागृत गणेश स्थान आहे. इथे माघ शुद्ध चतुर्थीला मोठा उत्सव असतो. अविवाहित लोकांचे विवाह या गणेशाच्या उपासनेने जमतात अशी या ठिकाणाची ख्याती आहे.

साधुमहाराजांचा गणपती

मराठवाडय़ातील नांदेड जिल्ह्यत असलेले कंधार हे गाव राष्ट्रकुटांच्या राजधानीचे शहर होते. कंधारचा किल्लादेखील प्रसिद्ध आहे. राष्ट्रकुट राजा कृष्ण तिसरा याच्या काळात कंधार नगर खूप जाणीवपूर्वक वसविले गेले होते. राष्ट्रकुट राजांनी मन्याड नदीच्या काठावर सर्व बाजूंनी निसर्गत: संरक्षण लाभलेल्या भूभागावर आपली राजधानी वसवली होती. याच कंधार गावाच्या पश्चिमेस सुमारे ३ कि.मी. अंतरावर हे गणेश मंदिर आहे. एकदा मराठवाडय़ातील प्रसिद्ध संत श्री साधुमहाराज आषाढी एकादशीला वारीसाठी पंढरपूरला जात असताना त्यांचा मुक्काम शेकापूर इथे पडला होता. अशी आख्यायिका आहे की तिथे गणेशाने स्वप्नात त्यांना दृष्टांत दिला की मन्याड नदीच्या उत्तर तीरावर जमिनीत मी अनेक वष्रे पडून आहे. तू तिथून मला बाहेर काढ. त्या दृष्टांतानुसार साधुमहाराजांनी कंधार गावच्या लोकांना ही गोष्ट सांगितली. गावकरी जमा झाले आणि त्यांनी महाराजांनी दाखवलेल्या जागेवर खोदायला सुरुवात केली. काही वेळातच खालची मूर्ती दिसू लागली. लोकांनी मूर्ती उभी करून ठेवण्यासाठी पार बांधला पण मूर्ती काही जागची हलेना. नंतर साधुमहाराजांनी हात लावताच मूर्ती त्या पारावर विराजमान झाली. याचमुळे या गणेशास साधुमहाराजांचा गणपती किंवा शिवेवरचा गणपती असे नाव पडले. हे एक अत्यंत प्रसन्न आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. जवळच मन्याड नदी वाहत असल्याने या ठिकाणाची शोभा अजूनच वाढली आहे. भारत-चीन युद्धाच्या वेळी भारताच्या विजयासाठी या गणेशाची आराधना केल्याचे सांगितले जाते. कंधार गावच्या सीमेवर अंदाजे सहा फूट उंचीची ही भव्य गणेशमूर्ती आहे. लंबोदर, महाकाय, गजकर्णक अशी असून ती दुरून शेंदराची रास असल्यासारखे भासते. मूर्तीपूजेसाठी पाच किलो शेंदूर, चार फूट यज्ञोपवीत आणि हार लागतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला इथे मोठा उत्सव असतो. मार्गशीर्ष महिन्यात साधुमहाराज संस्थानातर्फे गणपतीची महापूजा केली जाते. नांदेड ते कंधार हे अंतर ४५ किलोमीटर इतके आहे.

कडावचा सिद्धिविनायक

राजमार्ग सोडून आडवाटेवर चालायची सवय लागली की भगवंतसुद्धा तिथे आपल्याला दर्शन देतो. परिचित, त्याच त्याच ठिकाणी जाऊन गर्दीमध्ये रेटारेटी करून घेण्यापेक्षा जरा वेगळ्या वाटा धुंडाळल्या तर निश्चितच रम्य, निवांत स्थाने पाहता येतात. किल्ले भटकणाऱ्या मंडळींना या गोष्टीचा नक्कीच अनुभव येतो. कर्जत तालुक्यात पेठचा किल्ला किंवा कोथळीगड प्रसिद्ध आहेच. तिथेच पायथ्याला आंबिवली गावात डोंगरात खोदलेली लेणीसुद्धा आहेत. कोथळीगडाजवळून कौल्याच्या धारेने म्हणजेच घाटवाटेने भीमाशंकरला जाता येते. याच कोथळीगडाच्या परिसरात एक सुंदर गणेशस्थान आहे. कडाव गावचा दिगंबर सिद्धिविनायक. कर्जत रेल्वे स्टेशनपासून जेमतेम आठ कि.मी.वर आहे कडाव. इथली गणेशप्रतिमा खूप प्राचीन आहे असे संगितले जाते. कण्व ऋषींनी या गणेशाची स्थापना केली अशी इथली आख्यायिका आहे. अंदाजे ३०० वर्षांपूर्वी या गावचे पाटील धुळे यांना शेत नांगरत असताना ही मूर्ती सापडली. त्यामुळे धुळे परिवाराचे हे कुलदैवत मानले गेले आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार नाना फडणवीस यांनी केला, असे सांगतात. या मूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे ही खूप मोठी असून एकदंत शूर्पकर्ण या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे ही घडवलेली आहे. दिगंबर आणि यज्ञोपवीत परिधान केलेली अशी ही निश्चितच आगळीवेगळी मूर्ती आहे.

भुलेश्वरची वैनायकी प्रतिमा

पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या यवतपासून अंदाजे आठ किलोमीटर अंतरावर आहे सह्याद्रीची भुलेश्वर रांग. शिवकाळात इथे मुरार जगदेवांच्या काळात दौलतमंगळ नावाचा एक किल्ला उभारला होता. भुलेश्वर मंदिराच्या दक्षिणेला असलेल्या मंगळाई देवीच्या ठाण्यामुळे त्याला म्हणू लागले दौलतमंगळ. या किल्ल्याचे फारसे अवशेष आता शिल्लक नाहीत पण इथे असलेलं अप्रतिम शिवमंदिर मात्र आवर्जून जाऊन पाहण्याजोगं आहे. इथंपर्यंत येण्यासाठी उत्तम डांबरी रस्ता बांधलेला आहे. यादव काळात बांधले गेलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून शिल्पसमृद्ध आहे. वादक, नर्तकी, हत्ती, घोडे, सुरसुंदरी या शिल्पांसोबतच अनेक देवदेवतांच्या शिल्पांचेसुद्धा या मंदिरावर अंकन केलेले आढळते. या सर्व शिल्पाकृतींमध्ये स्त्रीरूपातील गणपतीची प्रतिमा आपल्याला खिळवून ठेवते. हा काय प्रकार आहे? गणपती असा स्त्रीरूपात का दाखवला असेल? शिल्पकाराची ही चूक तर नाही ना झाली, असे प्रश्न मनात येणं अगदी साहजिक आहे. पण ही चूक वगरे काही नाहीये. प्रत्येक देवतेची शक्ती ही जर मूर्तीरूपात दाखवायची असेल तर ती स्त्रीरूपात दाखवतात. सप्तमातृका हेही त्याचेच प्रतीक आहे. अंधकासुरवधाच्या वेळी शिवाने मदतीसाठी देवांना त्यांच्या शक्ती मागितल्या. देवांनी त्या शक्ती युद्धात मदत करण्यासाठी शिवाला दिल्या होत्या. त्यांचे शिल्पांकन करताना स्त्रीप्रतिमा दाखवून त्या त्या संबंधित देवाची वाहने त्या प्रतिमांच्या खाली दाखवतात. अन्वा या गावी तर विष्णूच्या चोवीस शक्तींच्या अप्रतिम स्त्रीप्रतिमा केदारेश्वर मंदिरावर कोरलेल्या आहेत. साहित्यामध्ये शक्ती हे स्त्रीिलगी रूप आपण वापरू शकतो; परंतु मूर्ती घडविताना शक्ती ही स्त्रीरूपात दाखवतात. विनायकाची शक्ती म्हणून ती विनायकी असे नामकरण केलेले आहे. वैनायकी-लंबोदरी-गणेशी अशा नावांनी ओळखली जाणारी ही गणपतीच्या शक्तीची प्रतिमा असते. इथे भुलेश्वरला प्रदक्षिणामार्गावर वरती वैनायकीची देखणी प्रतिमा आहे. त्याच्या खाली उंदीरसुद्धा दाखवला आहे. बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई देवीच्या मंदिरात कळसातील एका कोनाडय़ात अशीच एक गाणेशीची मूर्ती आहे. इथे चेहरा गणपतीचा आणि अंगावर साडीचे वस्त्र दाखवलेले आहे. तसेच कपाळावर स्त्रिया लावतात तसेच कुंकू लावलेले आहे. सोळा हातांची ही प्रतिमासुद्धा सुरेख दिसते. भुलेश्वरला ही आगळीवेगळी वैनायकी पाहण्यासाठी मुद्दाम गेले पाहिजे.

कुलाबा किल्ल्यातील गणेश

स्वराज्याच्या पश्चिम सीमेच्या रक्षणासाठी सुसज्ज आरमार आणि बलदंड जलदुर्गाची गरज आहे हे ओळखणारा पहिला राजा म्हणून शिवाजीमहाराजांची नोंद घेतली गेली आहे. अलिबागजवळच्या नवघर या खडकाळ बेटावर जलदुर्ग बांधायचा संकल्प शिवरायांनी केला. कुल म्हणजे सर्व आणि आप म्हणजे पाणी. ज्या बेटावरील किल्ल्याला सर्व बाजूंनी पाण्याचा वेढा आहे, तो कुलाबा! शिवरायांनंतर पुढे प्रचंड मेहनत आणि अत्यंत बेरकी पण आणि बेधडक वृत्ती या गुणांमुळे कान्होजी आंग्रे पश्चिम किनाऱ्यावरचे सर्वेसर्वा बनले. त्यांनी याच कुलाबा किल्ल्याच्या साथीने मराठय़ांच्या आरमाराची (आर्माडा म्हणजे नौदल या इंग्लिश शब्दाचा हा अपभ्रंश आहे) ताकद सिंधुसागरावर निर्माण केली. किल्ल्यावरचे गणेश किंवा किल्ल्याचा दरवाजावर गणेशपट्टी असणे हे काही नवीन नाही, पण या किल्ल्यामध्ये चक्क गणेश पंचायतन आहे. या पंचायतनाचे आवार चांगले प्रशस्त आहे. आवारात पूर्वाभिमुख तीन मंदिरे आहेत. या मंदिरसमूहासमोर गोडय़ा पाण्याचा एक मोठा तलाव दिसतो. सन १७५९ मध्ये राघोजी आंग्रे यांनी ४५ से.मी. उंचीची संगमरवराची उजव्या सोंडेची सिद्धिविनायकाची मूर्ती या मंदिरात स्थापित केली. गणेशाच्या उजव्या बाजूला एक चतुर्भुज शिवमूर्तीसुद्धा आहे. तर मागच्या बाजूला चतुर्भुज सूर्याची प्रतिमा दिसते. गणेशाच्या डाव्या बाजूला मागे महिषासुरमर्दनिी आहे. तर पुढे त्रिविक्रम विष्णूची मूर्ती आहे. सिद्धिविनायकाच्या हातात अक्षमाला, कमल, परळ आणि मोदक दिसतात. गणेश मंदिराच्या पायऱ्या उतरून बाहेर आले की उजव्या हातास सुंदर असे तुळशी वृंदावन आहे.
अलिबाग/श्रीबागला गेल्यावर हा किल्ला तर पाहण्याजोगा आहेच, पण त्याबरोबर आतील गणेशाचेसुद्धा दर्शन जरूर घ्यावे. इथे जाण्यासाठी भरती-ओहोटीच्या वेळा पाळून मगच किल्ल्यात जाता येते. ज्या दिवशी आपण जाणार त्या दिवसाच्या तिथीची पाऊणपट म्हणजे त्या दिवशीची पूर्ण भरतीची वेळ असते. त्यात सहा मिळवले किंवा वजा केले की पूर्ण ओहोटीची वेळ येते. मग या वेळी किल्ल्यात आपल्याला जाता येते. भरती येऊ लागली की हा जाण्या-येण्याचा मार्ग पाण्याखाली जातो. तरीसुद्धा स्थानिकांना विचारूनच किल्ल्यात जावे. इथेच नव्हे तर कोणत्याही समुद्रकिनारी तिथल्या स्थानिक मंडळींशी चर्चा करूनच पाण्याजवळ जावे, म्हणजे आपली भटकंती निर्धोक होते.

नांदेडचा त्रिकूट गणेश 

प्राचीन शहर नांदेड, शिखांचे पवित्रस्थळ नांदेड अशी ख्याती असलेल्या नांदेडमध्ये एक अल्पपरिचित गणेशस्थान आहे. त्रिकूट गणेश हे त्याचे नाव. नांदेडच्या पूर्वेला अंदाजे ८ कि.मी. अंतरावर गोदावरी आणि आसना या नद्यांचा संगम होतो. या संगमस्थानी गोदावरीच्या पात्रात हे दगडी बांधणीचे मंदिर आहे. हे गणेश मंदिर नागपूरकर राजे रघुजी भोसले यांनी बांधले. आसना नदीच्या पलतीरावर त्रिकूट हे एक छोटे गाव वसलेले आहे. नांदेड-हैदराबाद राजमार्गावर गोदावरी नदीवरचा जुना पूल ओलांडून पुढे मुदखेडकडे जाताना या त्रिकूट गणेशाच्या स्थानी पोहोचता येते. स्वत:चे वाहन असेल तर उत्तमच, अन्यथा नांदेडमधून ऑटोरिक्षासुद्धा इथे येण्यासाठी मिळू शकतात. साक्षात भगवान शंकरांनी गणेशाला गणाध्यक्षपद मिळविण्यासाठी इथे अनुष्ठान करण्यास सांगितले. त्याप्रमाणे गणेशाने अनुष्ठान केले. त्या तपसिद्धीनंतर शंकरांनी गणेशाला मांडीवर बसवून इथे गणेशतीर्थाची स्थापना केली. त्याचे द्योतक म्हणून येथे शिविलग आणि त्यावर गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. हे गणेशस्थान स्वयंभू आणि सिद्ध असे मानले जाते.
त्रिकूट राजाने व्यासांच्या सांगण्यावरून या ठिकाणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे गणेशकृपेने त्याला राज्यलाभ झाला, अशी कथा या स्थानाबद्दल सांगितली जाते. भगवान शंकरांनी स्थापन केलेल्या या गणेशतीर्थात स्नान केल्यास मनुष्याला विद्या-धन-ऐश्वर्य आदी प्राप्त होऊन तो शिवलोकास जातो असे इथले माहात्म्य सांगितले जाते. थोर गणेशभक्त रामकृष्ण बापू सोमयाजी यांच्या काव्यात या स्थानाचा उल्लेख आहे. माघ शुद्ध चतुर्थीला इथे मोठा उत्सव असतो. इथला प्रसाद खूपच आगळावेगळा आहे. भक्तांना त्या वेळी लाह्य़ाचे पीठ आणि फोडणी दिलेले हरभरे प्रसाद म्हणून वाटले जातात. खूपच आगळ्यावेगळ्या असलेल्या या स्थानाला वाट वाकडी करून भेट द्यावी. नांदेडच्या सहलीमध्ये या स्थानाचा जरूर समावेश करावा.