हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळात असे कित्येक संगीतकार होऊन गेले, जे वरच्या श्रेणीत कधीच गणले गेले नाहीत, पण त्यांनीदेखील कित्येक अप्रतिम गाणी दिली. त्यांची नावं विस्मृतीत गेली असतीलही, पण खरा रसिक त्यांना कधीच विसरणार नाही..
काही गाणी बडे संगीतकार, बडे कलाकार, बडय़ा बॅनरचे चित्रपट अशी कुणाचीच नसतात. तरीही त्यांच्या अनोख्या सुरावटीमुळे मनात कायम मुक्कामाला असतात. बी किंवा सी ग्रेडचा तो चित्रपट बघितलेला नसतो, पण त्या गाण्याचं संगीत ‘ए’ ग्रेडचं असतं.
१९५५-६५च्या आसपास, जो हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ मानला जातो, त्या काळात, असे कित्येक संगीतकार होऊन गेले, जे वरच्या श्रेणीत कधीच गणले गेले नाहीत, पण त्यांनीदेखील कित्येक अप्रतिम गाणी दिली.
‘ढलती जाये रात, कहे ले दिल की बात, शम्मा परवाने का न होगा फिर साथ..’ हे रफी-आशाचं डय़ुएट देव आनंदच्या चित्रपटांत सहज खपून जाईल असं, बरोबर मधुबाला वा माला सिन्हा.. साहजिकच संगीतकार एसडी किंवा एसजे असणार! पण ‘रझिया सुलतान’ (१९६१) मधील आनंद बक्षीच्या या गाण्याचा संगीतकार होता ‘लच्छीराम’.. लच्छीराम तोमर. या गाण्यातील मेंडोलीनचे तुकडे अन् रफी-आशाची अंतऱ्यातील सहजसोपी हुंकारयुक्त आलापी वेगळी काढताच येणार नाही. चित्रपटाचे जयराज आणि निरुपा रॉय हे नायक-नायिका. त्यांची मनोवस्था दाखविण्यासाठी पडद्यावर गाणारे तिसरेच कुणी तरी होते. याच लच्छीरामनं असंच एक, कैफी आझमीचं शमा-परवान्याचं, रफी-आशाचं डय़ुएट ‘मैं सुहागन हूं’ (१९६४) मध्ये दिलं होतं.. ‘तू शोख कली, मैं मस्त पवन, तू शम्मे-वफा, मैं परवाना..’ या गाण्याचेदेखील दोन प्रकार होते. त्यातलं डय़ुएट हे अजित व माला सिन्हावर चित्रित झालं होतं, तर माला सिन्हाची दु:खी मनोवस्था दाखविणारं, निव्वळ रफीचं ‘सोलो’ मैफलीत गाणाऱ्या कुणा अनोळखी कलाकारावर चित्रित झालं होतं. या ‘सोलो’च्या सुरुवातीच्या रफीच्या दोन ओळी ‘हुए तुम मेहेरबां, फिर दिल के सारे तार थर्रराये..’ अन् अखेरीस टिपेला गेलेला आवाज यासाठी अन् त्यातील वाद्यांच्या तुकडय़ांसाठी हे रफीचं ‘सोलो’ आवर्जून ऐकावं. ‘जुल्फों की घटा लेकर, सावन की परी आयीं, बरसेगी तेरे दिल पर, हंस हंसके जो लहेरायी..’ हे मन्ना डे- आशाचं, विशिष्ट ‘एसडी’ ठेक्याचं (जाने क्या तूने कहीं.. ‘प्यासा’) डय़ुएट, ‘रेशमी रुमाल’ (१९६१) या चित्रपटासाठी राजा मेहदी अली खान यांनी लिहिलं. संगीतकार ‘बाबुल’, अर्थात बाबुल बोस. हा मदनमोहनचा साहाय्यक. नवखा मनोजकुमार व प्रस्थापित शकिला असलेल्या या चित्रपटात बाबुलने ‘जब छाए कभी सावन की घटा, रो रो के न करना याद मुझे..’ हे तलतचं अविस्मरणीय गाणंदेखील दिलं होतं. या गाण्यात मदन मोहनचा प्रभाव जाणवत असला तरी, या गाण्याच्या सुरुवातीचे अन् अंतऱ्याच्या मधले वाद्य संगीताचे तुकडे ऐकताना या संगीतकाराच्या स्वतंत्र प्रतिभेचा प्रत्यय येतो. तर याच सिनेमातलं सुरुवातीचं ‘गर्दिश में हो तारे, ना घबराना प्यारे..’ हे मुकेशच्या आवाजातील गाणं शंकर-जयकिशन, मुकेश टाइप गाण्यांच्या तोडीचं.. थोडंसं ‘जिना इसी का नाम है,’ टाइप चित्रीकरण असलेलं, त्यानं दिलं. मन्ना डे- तलत- मुकेश या तिघांचा आवाज मनोजकुमारसाठी वापरण्याचा प्रयोग वा गौडबंगाल म्हणा- बाबुलनं केला खरा, पण तलतचा आवाज काही मनोजकुमारला ‘सूट’ झाला नाही. (म्हणूनच कदाचित नंतरच्या दिलीपकुमारबरोबरच्या ‘आदमी’मधल्या ‘कैसी हंसीन आज बहारों की रात हैं..’ या रफीबरोबरच्या द्वंद्वगीतासाठी मनोजकुमारनं तलतऐवजी महेंद्र कपूरचा आग्रह नौशादजवळ धरला असावा.)
‘रेशमी रुमाल’च्या आधी ‘चालीस दिन’ (१९५९) मध्ये बाबुलनं आशा भोसलेचं कैफी आझमीनं लिहिलेलं, ‘बैठे हैं रहेगुजर पर दिल का दिया जलायें, शायद वो दर्द जाने, शायद वो लौट आएं’, हे एक अप्रतिम ‘सोलो’ दिलं होतं. आशाच्या उत्कृष्ट गाण्यांत गणना व्हावी असं हे गाणं. त्यातील संपूर्ण गाण्याला व्यापून राहिलेल्या बासरीच्या सुरांचा प्रवास संगीतकार बाबुलची प्रतिभा दाखविण्यास पुरेसा आहे. ‘अगर मैं पुछुं जवाब दोगे, दिल क्यूं मेरा तडप रहा है..?’ अथवा ‘चमन के फूल भी तुझ को गुलाब कहते हैं..’ रफी-लताची ही दोन्ही सदाबहार द्वंद्वगीतं ‘शिकारी’ (१९६३) या चित्रपटांतील फारुख कैसर यांची. संगीत ‘जी. एस. कोहली’चं. ‘बाज’ (१९५३) ते ‘किस्मत’ (१९६९) पर्यंत ओ. पी. नय्यरचा हा साहाय्यक. अजित, रागिणी अन् हेलन ही स्टार-कास्ट. ही गाणी नुसती ऐकावीत.. ऐकत राहावीत. त्यांतील सतार आणि गिटारवाद्यांचा उपयोग ओ.पी.ची आठवण करून देणारा, पण त्यांत ‘लता’ हा प्लस-पॉइंट! त्याच सिनेमांतील लता-उषाचं ‘तुम को पिया, दिल दिया बडे नाज से..’ हे द्वंद्वगीत तर त्या काळी, ‘बिनाका’त गाजलेलं. ‘बाजे घुंगरू छुन छुन..’ हे लताचं आणि ‘ये रंगीन मेहफील, गुलाबी गुलाबी..’ हे आशाचं सोलो, अन् लता-आशा-उषा या तिघींचं ‘मांगी हैं दुवांएं हमने सनम..’ ही गाणी याच चित्रपटात होती. त्या अर्थी ‘शिकारी’ हा जी.एस. कोहलीचा ‘मास्टरपीस’ होता! त्याचं ‘बहारों थाम लो..’ हे मुकेश-लताचं अंजाननी लिहिलेलं द्वंद्वगीत ‘नमस्तेजी’ (१९६५) या चित्रपटात होतं. आय.एस. जोहर, मेहमूद आणि अमिताचा हा चित्रपट. तर ‘माना मेरे हंसी सनम, तू रश्के माहताब है..’ हे रफीचं, योगेश गौडनं लिहिलेलं ‘सोलो’, ‘अॅड्व्हेन्चर्स ऑफ रॉबिनहूड’ (१९६५) या प्रशांत (व्ही. शांताराम यांच्या ‘सेहेरा’ चा नायक) आणि प्रवीणा चौधरी यांच्या सिनेमांतलं. दारासिंगच्या ‘फौलाद’ (१९६३) मधलं ‘ओ मतवाले साजना..’ हे आशाचं, घोडय़ाच्या टापांच्या ठेक्याचं गाणंदेखील, ओ. पी.च्या ठेक्याची आठवण करून देणारं!
‘भूला नहीं देना जी, भूला नहीं देना, जमाना खराब हैं, दगा नहीं देना जी, दगा नहीं देना.’ हे रफी-लताचं द्वंद्वगीत ‘बारादरी’ (१९५५) या पोशाखी चित्रपटांतलं, खुमार बाराबंकी याचं. संगीतकार ‘नाशाद’ (नौशाद वेगळे).. शौकत देहेलवी नाशाद. अजित आणि गीता बाली यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं.. यातील मेंडोलीनचा वापर अन् ठेका सी. रामचंद्रच्या काही गाण्यांची आठवण करून देणारा. (तलतचं ‘बेचैन नजर बेताब जिगर.’) तर याच सिनेमांतील ‘तस्वीर बनता हूं, तस्वीर नहीं बनती.’ हे तलतचं मनाला भिडणारं गाणं, तलतच्या इतर कुठल्याही अप्रतिम गाण्यांच्या पंक्तींत बसणारं. चित्रपटांत हे गाणं चंद्रशेखरवर चित्रित झालंय.. पण तलतची गाणी ही ‘तलतची’ म्हणूनच स्वतंत्रपणे ऐकली जातात, पडद्यावरचा कलाकार दुय्यम ठरतो. ही तलतच्या मखमली आवाजाची जादू. ‘बडा भाई’ (१९५७) मधील ‘चोरी चोरी दिल का लगाना बुरी बात है..’ हे प्रेम सक्सेनाचं, तलत-आशाच्या आवाजातील द्वंद्वगीत, अजित (की अनंत मराठे?) आणि अमिता यांच्यावर सायकलरिक्षात चित्रित झालंय.
‘तुम जो आओ तो प्यार आ जाएं, जिंदगी में बहार आ जाएं..’ हे मन्ना डे- सुमन कल्याणपूर यांचं ‘क्लासिक’ द्वंद्वगीत ‘सखी रॉबिन’ (१९६२) या पोशाखी चित्रपटासाठी कवी योगेश यांनी लिहिलं, अन् संगीतकार होते ‘रॉबिन बॅनर्जी’.
‘मासूम’ (१९६०) मधलं राजा मेहदी आली खान याचं, ‘नानी तेरी मोरनी को मोर ले गये..’ हे रानो मुकर्जीच्या (हेमंतकुमारची मुलगी) आवाजातील रॉबिन बॅनर्जीचं बालगीत तर कालातीत आहे. याच सिनेमांतील ‘हमें उन राहों पर चलना हैं, जहां गिरना और संभलना हैं..’ हे सुबीर सेनच्या (हेमंतकुमारचा भास होणारं) आवाजातील मनमोहन कृष्णवर चित्रित झालेलं गाणंदेखील रेडिओवर ऐकूू येतं, तेव्हा नौशादच्या ‘इन्साफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के..’ या ‘गंगा-जमना’ (१९६३) मधील हेमंतकुमारच्या गाण्याची आठवण येते.
‘गझल’ हे कुठल्याही संगीतकारासाठी एक आव्हान असतं. ‘मुझे तुमसे मुहब्बत है, मगर मैं कहे नहीं सकता, मगर मैं क्या करूं बोले, बिना भी रहे नहीं सकता..’ ही रफीची गझल ‘बचपन’ (१९६३) साठी हसरत जयपुरीनं लिहिली. संगीतकार होते ‘सरदार मलिक’. ‘सलीम-जावेद’मधल्या सलीम खानवर हे गाणं चित्रित झालं होतं. याच सरदार मलिकनं दिलेली ‘सारंगा’ (१९६०) मधील भारत व्यास यांची.. ‘सारंगा, तेरी याद में, नैन हुए बेचैन..’ आणि ‘हां दिवाना हूं मैं, गम का मारा हुआ, इक बेगाना हूं मैं..’ ही मुकेशची अजरामर गाणी. यांतील ‘सारंगा तेरी याद में..’ चं रफीचं ‘व्हर्जन’देखील आहे, पण ते कधीच कानांवर येत नाही. ‘पिया कैसे मिलूं तुझ से, मेरे पांव पडी जंजीर..’ हे रफी-लताचं आणि ‘लागी तुमसे लगन, साथी छुटेना..’ हे मुकेश-लताचं द्वंद्वगीतदेखील याच ‘सारंगा’मधलं. ‘सारंगा’ हा सरदार मलिकचा ‘मास्टरपीस’. पण त्याही आधी ‘मेरा घर मेरे बच्चे’ (१९६०) साठी ‘बहारों से पूछो, मेरे प्यार को तुम..’ हे मुकेश-सुमन कल्याणपूरचं द्वंद्वगीत दिलं होतं. तर ‘आबे हयात’ (१९५५) साठी ‘मैं गरिबों का दिल हूं, वतनकी जुबां..’ हे हेमंतकुमारचं त्या काळी गाजलेलं गाणं दिलं होतं.
त्याच सुमाराच्या ‘ठोकर’ (१९५५) मध्ये सरदार मलिकनं नवख्या शम्मी कपूरसाठी तलतचं ‘ऐ गमें दिल क्या करूं , ऐ वहेशते दिल क्या करूं ..’ हे मजाज लखनवीचं अजरामर गाणं दिलं होतं. आज ‘अन्नू मलिकचे वडील’ अशी सरदार मलिकची आठवण करून दिली जाते! ‘पास बैठो तबियत बहेल जायेगी, मौत भी आ गयी हो, तो टल जायेगी..’ महंमद रफीची ही ‘पुनर्मिलन’ (१९६४) मधली इंदिवरची गझल. संगीतकार होता ‘सी. अर्जुन’.. अर्थात अर्जुन परमानंद चंदनानी. संगीतकार बुलो सी. रानीचा साहाय्यक. पडद्यावर जगदीप (‘शोले’मधला सुरमा भोपाली!) अमितासाठी हे गाणं म्हणतो! ‘मैं अभी गैर हूं, मुझको अभी अपना ना कहो..’ हे मुकेश-आशाचं, सी. अर्जुनचं द्वंद्वगीत ‘मैं और मेरा भाई’ (१९६१) मधलं जां निसार अख्तरचं, पडद्यावर अजित-अमितावर चित्रित झालंय! ‘गमकी अंधेरी रात में, दिलको न बेकरार कर, सुबह जरूर आयेगी, सुबह का इंतजार कर..’ हे रफी-तलतचं, जां निसार अख्तरचं मनाला उभारी देणारं अप्रतिम द्वंद्वगीत, अन ‘बेमुरव्वत बेवफा, बेगाना-ए-दिल आप हैं..’ हे मुबारक बेगमचं अविस्मरणीय गाणं, दोन्ही ‘सुशीला’ (१९६६) या चित्रपटातली. पण हा चित्रपट अपूर्ण राहिला अन् कालांतरानं ‘सुबह जरूर आयेगी’ (१९७७) नावानं प्रदर्शित झाला.
‘कभी तनहाईयों में भी, हमारी याद आएगी, न फिर तू जी सकेगा और, न तुझको मौत आएगी..’ हे मुबारक बेगमचं भन्नाट गाणं, केदार शर्माच्या ‘हमारी याद आएगी’ (१९६१) या चित्रपटातलं, तनुजा अन् अशोक शर्मावर चित्रित झालेलं. या गीताचे संगीतकार होते स्नेहल भाटकर. यातील सुरुवातीची अन् अंतऱ्याच्या मधली बांसरी मनाला भिडतेच. हे गाणं क्वचित कधी तरी कानावर येतं, पण ‘हाल-ए-दिल उनको सुनाया ना गया..’ हे सुमन कल्याणपूर याचं ‘फरियाद’ (१९६४) मधलं केदार शर्माचं, झेब रेहेमानवर चित्रित झालेलं गाणं, अन् ‘लेहेरों पे लेहेर उल्फत हैं जवां, रातों की सेहेर, तनहां हैं यहां..’ हे हेमंतकुमार अन् नूतनच्या आवाजांतलं द्वंद्वगीत अथवा ‘ऐ मेरे हमसफर, देख अपनी नजर..’ हे नूतननं गायलेलं ‘सोलो’, दोन्ही ‘छबिली’ (१९६०) या चित्रपटांतली स्नेहल भाटकरांची गाणी, फारशी कानावर पडत नाहीत.
‘कुहू कुहू बोले कोयलिया..’ हे हिंदी चित्रपटसृष्टीतील शास्त्रोक्त संगीतावर आधारित सवरेत्कृष्ट गाण्यांपैकी एक महत्त्वाचं रफी-लतानं गायलेलं द्वंद्वगीत. ‘स्वर्णसुन्दरी’ (१९५८) या दक्षिणेकडच्या चित्रपटांतील भरत व्यास याच्या या गीताचे संगीतकार होते, दक्षिणेचेच ‘आदी नारायण राव’. त्याच सिनेमांतलं ‘मुझे ना बुला, मुझे ना बुला, छुप छुप छलीया रे, मुझे ना बुला..’ हे लता आणि कोरसचं शास्त्रोक्त गाणं, ही दोन्ही गाणी अविस्मरणीयच आहेत. आदी नारायणराव यांनी ‘फुलों की सेज’ (१९६४) हा मनोजकुमार-वैजयंतीमालाचा चित्रपटदेखील केला, तो फारसा चालला नाही. पण त्यांचं नांव ‘स्वर्णसुन्दरी’साठीच घेतलं जातं.
‘ये रात ये फिजाएं, फिर आए या न आए, आओ शमा बुझा दें, हम आज दिल जलाएं..’ हेदेखील रफी-आशाचं डय़ुएट कुठच्याही एसडी वा एसजेंच्या ‘ए’ ग्रेड सिनेमात असल्याचा दावा करता येईल असं. पण ‘बटवारा’ (१९६१) मधील मजरूह सुलतानपुरींचं हे गाणं संगीतकार ‘एस. मदन’ याचं होतं. प्रदीपकुमार व निरुपा रॉय नायक-नायिका होते, पण हे डय़ुएट जवाहर कौल आणि जबीनवर चित्रित झालं होतं! ‘मैं तो तेरे हसीन खयालों मे खो गया, दुनिया ये कहे रही के मै.. दिवाना हो गया’ ही रफीची गझल ‘संग्राम’ (१९६५) साठी ऐश कंवल यांनी लिहिली. संगीतकार होते ‘लाला असर सत्तार’. ही गझल चित्रित झाली होती नायक रंधवावर (दारासिंगचा भाऊ!) नायिका होती कुणी स्वर्णकुमारी. ‘मुझको तुम जो मिले, ये जहांन मिल गया..’ हे हेमंतकुमार- गीता दत्तचं ‘डिटेक्टिव्ह’ (१९५८) मधलं द्वंद्वगीत, शैलेंद्रनं लिहिलं होतं. संगीतकार होते ‘मुकुल रॉय’.. हा गीता दत्तचा भाऊ. प्रदीपकुमार अन् माला सिन्हाच्या या चित्रपटातील ‘तुमसे दूर चले, हा हा हा..’ हे हेमंत-लताचं द्वंद्वगीतदेखील मुद्दामहून ऐकावं असं आहे. या दोन्ही गाण्यांतील हेमंतदांच्या आवाजातील रेंज लक्षात येते.
‘दो रोज में वो प्यार का आलम गुजर गया.. ‘ या मुकेशच्या ‘प्यार की राहें’ (१९५९) मधल्या अप्रतिम सोलो गीताचे संगीतकार होते ‘कानू घोष’. कुठच्याही राज कपूर-मुकेशच्या गाण्यांच्या तोडीचं हे गाणं. या चित्रपटाचे नायक-नायिका होते प्रदीपकुमार अन् अनिता गुहा.
‘साथ हो तुम और रात जवां, नींद किसे, अब चैन कहां..’ या मुकेश-आशाच्या ‘कांच की गुडिया’ (१९६१) मधील शैलेंद्रनं लिहिलेल्या द्वंद्वगीताचे संगीतकार होते, ‘सुर्हीद कार’. मुकेशचा खर्जातला वेगळा ढंग मुद्दाम ऐकण्यासारखा. नवखा मनोजकुमार अन् सईदा खान जोडीचा हा चित्रपट फारसा चालला नाही.
‘गुजरा हुवा जमाना, आता नहीं दोबारा, हाफिज खुदा तुम्हारा..’ हे लताचं अविस्मरणीय गाणं, ‘शिरीं फरहाद’ (१९५६) या चित्रपटातलं तन्वीर नक्वीनं लिहिलेलं अन् ‘एस. मोहिंदर’नं संगीतबद्ध केलेलं गाणं, वाळवंटात उंटावरच्या अंबारीतून जाणाऱ्या मधुबालावर चित्रित झालं होतं. एरवी नौशाद वा मदनमोहनच्या नावावर सहज खपून जाईल असं हे गाणं ऐकण्यासारखं तसंच पाहण्यासारखंदेखील आहे. रूक्ष वाळवंटात तहान भागवणाऱ्या जलाशयासारखी सारी गाणी अन् हा गाण्यांचा प्रवासदेखील.. न संपणारा. म्हणूनच या साऱ्या उल्लेख झालेल्या.. अन् न झालेल्या संगीतकारांना म्हणायचं,
‘गुजरा हुवा जमाना, आता नहीं दोबारा, हाफिज खुदा तुम्हारा..’
– प्रभाकर बोकील