चैतन्य प्रेम

अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र भक्तांना दिलासा देतो. प्रचंड स्वामीबळ तुमच्या पाठीशी आहे आणि स्वामी अशक्य ते शक्य करतात, अशी ग्वाही पहिल्याच कडव्यात देतो. या ‘अशक्यही शक्य करतील स्वामी,’चा गूढार्थ आपण या स्तोत्राच्या निरूपणाच्या अखेरीस पाहणार आहोत. आता दुसऱ्या कडव्याची पहिली ओळच एक प्रश्न विचारते. खरं तर हा प्रश्न नसून हीसुद्धा एक ग्वाहीच आहे. ही ओळच विचारते की, ‘जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय?’ ही दिसते तेवढी सरळ ओळ नाही बरं! जिथे स्वामींचे चरण स्थिर आहेत तिथे न्यून काही उरेल का, असा प्रश्न ही ओळ विचारते. म्हणजेच जर काही न्यून उरत असेल, तर स्वामींचे चरणच तिथे नाहीत, हेच बजावते! संकटानं तडफडून माणूस विचारतो, ‘स्वामी तुम्ही असताना असं का झालं?’ अरे! जेव्हा संकट नव्हतं तेव्हा हृदयात स्वामींना जागा दिलीस की जगाला? आसक्ती, मोह, लालसा यांनीच हृदय भरून ओसंडत होतं. स्वामींना पाय ठेवायलाही जागा नव्हती आणि आता संकटाचे ढग जमू लागताच स्वामींना जाब विचारावा आम्ही? ज्यांनी आपल्या अंतकरणात स्वामी समर्थाना दृढ धारण केलं आहे त्यांच्यावरही संकटं कोसळू शकतात. पण त्यांच्या मनातली उमेद संपत नाही. स्वामींवरचा विश्वास भंगत नाही. स्वामींच्या स्मरणानं संकट धीरानं सोसण्याची शक्ती त्यांना लाभत असते. संकटापेक्षा स्वामीच मोठे आहेत, हा भाव त्यांच्या मनात दृढ असतो.

Shahu Maharaj Asaduddin Owaisi
मोठी बातमी : कोल्हापुरात शाहू महाराजांची ताकद वाढली, एमआयएमचा पाठिंबा; इम्तियाज जलील म्हणाले, “मी ओवैसींना…”
virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

अक्कलकोटला येण्याआधी स्वामी समर्थ मंगळवेढय़ाला होते. तिथले दोन प्रसंग ‘जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय,’चा प्रत्यय देणारे आहेत. मंगळवेढय़ात कृष्णंभट नावाचा एक अत्यंत सात्त्विक प्रवृत्तीचा गृहस्थ राहात होता. त्याची पत्नीही आचार-विचारानं त्याला साजेशीच होती. दोघं गरिबीचं अभावग्रस्त जिणं जगत होते, पण मनाची भावश्रीमंती अपार होती. स्वामी उन्मुक्त आत्मदशेत अनेकदा उकिरडय़ावरही बसलेले असत. त्या उकिरडय़ातही त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि प्रसन्नता तसूभरही लोपत नसे. बाहेरच्या उकिरडय़ाची माणसाला मोठी घाण वाटते, पण मनातला आसक्तीचा, मोहाचा उकिरडा तो प्राणपणानं सांभाळत असतो. अशा उकिरडय़ात सद्गुरू पूर्ण आत्मतेजानं तळपू लागतात तीच खरी गुरूपौर्णिमा! कृष्णंभटाच्या जीवनात ती अवचित आली. गावातल्या लोकांना स्वामींचं खरं माहात्म्य उमगलं नव्हतं. त्यामुळे त्यांना लोक वेडसरच मानत. कृष्णंभटानं त्यांना प्रथम पाहिलं मात्र त्याचे अष्टसात्त्विक भावच जागृत झाले जणू. त्यानं प्रेमादरानं स्वामींना दंडवत घातला आणि आपल्या घरी यायची विनंती केली. त्याच्या सरळ निष्कपट स्वभावानं समर्थ प्रसन्न झाले होतेच. त्यांनी कृष्णंभटाला सांगितलं की तू पुढे हो मी येतोच! एक प्रकारे साक्षात सद्गुरूच सांगत आहेत की, मी तुझ्या पाठी पावलोपावली आहे. आता तू पुढचं पाऊल टाक! समर्थाच्या नजरेला तर गरीब-श्रीमंत भेद नव्हताच. सूर्याचा प्रकाश हवेलीत जसा पडतो तसाच झोपडीतही पडतो, नाही का? समर्थासारख्या योगीपुरुषाचे पाय आपल्या या फाटक्या झोपडीत पडणार, हे ऐकताच कृष्णंभटाच्या पत्नीलाही आनंदाचं भरतं आलं. दोघं डोळ्यांत प्राण साठवून समर्थाच्या वाटेकडे डोळे लावून बसले. समर्थ येणार म्हणून स्वागताची तयारी म्हणाल तर काहीच नव्हती! कारण स्वतवाचून समर्थाना अíपत करावं असं या दोघांकडे काही नव्हतंच! आणि जिथं काहीच नाही अशा ठिकाणी फकिराला पाऊल टाकायला मोठा आनंद होतो. कारण ज्याच्याकडे भौतिकातलं काही आहे त्याचं प्रदर्शनही मोठं असतं! भौतिकावरच त्याची मोठी भिस्त असते आणि या भौतिकातले तुकडे टाकून सत्पुरुषाला वश करता येईल, असा गैरसमजही असतो! शिल्पकाराला थेट दगडातून मनाजोगती मूर्ती घडविण्यात आनंद वाटतो. अर्धीमुर्धी मूर्ती असेल, तर तिला आकार देणं कठीण असतं. कृष्णंभट आणि त्याची पत्नी असे साधेसरळ होते. समर्थ येताच दोघांनी लोटांगण घातलं. मग उठून उभे राहिले. दोघांना भानावर आणत समर्थ म्हणाले, ‘अरे, नुसत्या नमस्कारावर का मला परत पाठवणार आहात? काही खायला-प्यायला घालाल की नाही?’ समर्थाच्या या उद्गारासरशी त्यांना आपल्या निर्धनतेची आठवण आली! दोघांनी मोठय़ा प्रेमानं समर्थाना बसवलं आणि अंगणात आले. कृष्णंभटानं कुणाकडूनही दूध आण, असं सांगून पत्नीला पिटाळलं आणि तो स्वामींपाशी येऊन बसला. पत्नीनंही चार घरी विनवण्या केल्या, पण दूध काही मिळालं नाही. आधीच दोघं जन्माचे गरीब आणि त्यात या वेडय़ा फकिराला झोपडीत बसवलंय. आज दूध मागताहेत उद्या गाय मागतील, असा व्यावहारिक जगाचा सुज्ञ विचार! ती हताश होऊन परतली. या ब्रह्माण्डनायकाला द्यायला वाटीभरही दूध घरात नसावं, हे शल्य अश्रू बनून पाझरू लागलं. आपल्या गरिबीचं त्यांना कधीच दुखं वाटलं नव्हतं. आज मात्र वाटलं! समर्थ मोठय़ा प्रेमानं म्हणाले, ‘अरे असं काय करता? घरात गाय असताना लोकांसमोर का हात पसरता?’ कृष्णंभट कळवळून म्हणाला, ‘महाराज ती गाय दूध देईनाशी झाली आहे. पण कशी असली तरी ती गोमाता आहे. तिच्या रूपानं या कुटीत थोडं तरी पावित्र्य नांदत आहे. म्हणून तिला सोडलेलं नाही. पण ती बिचारी दूध देऊ शकत नाही.’ समर्थ हसले आणि म्हणाले, ‘अरे दूध काढाल तेव्हा देईल ना ती!’ समर्थाच्या वाक्यातच अशी जादू होती की कृष्णंभटाच्या पत्नीनं पातेलं आणलं आणि दूध काढायला सुरुवात केली. गायीनं भरपूर दूध दिलं! त्या दिवसापासून कृष्णंभटाची गरिबी हळूहळू दूर झाली, पण मनाची श्रीमंती सदैव वाढतीच राहिली.

याच मंगळवेढय़ात बाबाजी भट्ट हा समर्थावर मनापासून प्रेम करणारा भाविकही राहात होता. त्याची पत्नीही सालस आणि समर्थावर निष्कपट प्रेम करणारी होती. या जोडप्याची परिस्थितीही गरिबीचीच होती. त्यांच्या घरी समर्थ एका दिवशी अचानक गेले. म्हणाले, ‘माई मला खूप तहान लागली आहे. प्यायला थंडगार पाणी दे!’ घरात पाणी होतं, पण ते मचूळ. ते देणं काही तिच्या मनाला पटेना. तिचा गोंधळात पडलेला चेहरा समर्थानी न्याहाळला आणि ‘काय झालं? घरात एवढी विहीर असताना पाणीसुद्धा नाही का?’ असं विचारत समर्थ स्वत अंगणात आले. या दोघांनी कित्येक दिवस खपून अंगणात एक विहीर खणली होती खरी. पण तिला पाण्याचा थेंबही लागला नव्हता. त्यामुळे त्या विहिरीवरून शेजारी-पाजारी या दोघांची चेष्टा करीत. आता समर्थाचा आवाज भारदस्त. त्यात त्यांनीही विहिरीचा विषय काढलेला. त्यामुळे शेजारीपाजारी मोठय़ा उत्सुकतेनं तिथं जमले. त्या खोल विहिरीकडे पाहात समर्थ उद्गारले, ‘जा बाई घरातल्या सगळ्या घागरी घेऊन ये!’ समर्थाच्या या उद्गारांसरशी कुत्सित हास्याची एक लकेर उमटली. त्या स्त्रीनं मात्र निमूटपणे घरातल्या घागरी विहिरीपाशी आणल्या. समर्थाच्या सांगण्यानुसार त्यांना दोर बांधले आणि पहिली घागर विहिरीत सोडायला सुरुवात केली. जशी ती रिकामी घागर खाली जाऊ लागली तसा त्या कोरडय़ा विहिरीला पाझर फुटला. वेगानं पाणी वर येऊ लागलं!

भक्ताची अंतकरणरूपी विहीरही प्रेमरसानं तुडुंब भरावी, अशी स्वामींची इच्छा असते. पण अंतकरणातला प्रेमाचा झरा खुला करणं भक्ताला स्वबळावर काही शक्य नसतं. तो अनंत प्रयत्न करतो आणि अखेर आपल्यानं हे साधणार नाही, या विचारानं हताश होतो. त्याचे प्रयत्न, त्याची साधना ही तर लोकांच्या चेष्टेचाही विषय झाली असते. पण सद्गुरू जेव्हा त्याच कोरडय़ा भासत असलेल्या अंतकरणात स्वप्रेमाची स्मरणदोरी सोडतात तेव्हा तो सुप्त प्रेमाचा प्रवाह अचानक खुला होतो आणि पाहता पाहता हृदय प्रेमभावानं परिपूर्ण होतं. भक्तीत न्यून म्हणून काही उरतच नाही!

या तारकमंत्र स्तोत्रात म्हणूनच म्हटलं आहे की, ‘जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय!’ भौतिकापुरतं बोलायचं तर माणूस भौतिक जगण्यातलं न्यूनत्व दूर करण्याचा प्रयत्न अविरत करतच असतो. पण अपार प्रयत्न करूनही जेव्हा यश येत नाही तेव्हा तो म्हणतो, ‘माझ्या प्रारब्धातच नाही तर कितीही प्रयत्न करून काय उपयोग?’ अध्यात्मातही तो हाच प्रारब्धाचा नियम लावू पाहतो. म्हणतो, ‘मी इतका जप करतो, साधना करतो, पण काही उपयोग नाही. साधना होणं माझ्या प्रारब्धातच नसेल!’ प्रारब्धाच्या नावानं बोटं मोडत माणसानं प्रयत्न सोडावेत, हे सद्गुरूला मान्यच नसतं. बाबाजी भट्टाच्या घरी कोरडय़ा विहिरीला सद्गुरू कृपेनं पाणी आलं, हे खरं. पण ती विहीर त्यानं आणि त्याच्या पत्नीनं आधी अनेक महिने परिश्रमपूर्वक खोदली होती, हे विसरून चालणार नाही.

तेव्हा प्रारब्धाला तोंड देत माणसानं प्रयत्नांच्या वाटेनं अविरत चालावं, हीच सत्पुरुषाची इच्छा असते. कारण प्रारब्धभोग टाळल्यानं जन्म-मृत्यूच्या चक्राला अधिकच गती मिळते! त्यामुळे प्रारब्धात नाही म्हणून हताश होऊन माणसानं प्रयत्न सोडू नयेत यासाठी दिलासा देत हा तारक मंत्र उच्चरवानं सांगतो की, ‘जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय!’ अरे, ज्याच्या पाठीशी स्वामी उभे आहेत त्याच्या जीवनात न्यून ते काय उरणार? त्यानं स्वप्रयत्नांत मात्र काही न्यून राहू देऊ नये, आपल्या प्रारब्धातच यश नाही, असं मानून प्रयत्नांत कमी पडू नये. कारण भक्ताच्या प्रारब्धाकडे स्वामींचं पूर्ण लक्ष आहे. त्या प्रारब्ध भोगात ते भक्ताचं मनोबल टिकवतात, वाढवतात. ते भोग भोगण्याची, सोसण्याची शक्ती देतात आणि प्रसंगी प्रारब्धही बदलतात. भक्तानं उमेद मात्र सोडता कामा नये. सोडायचंच असेल तर निराशेचं बोट सोडावं. दोन्ही कृपाबाहू पसरून स्वामी उभे आहेत. आपण निराशेचं बोट सोडू तेव्हाच ना त्यांच्या कवेत सहज जाऊ?

खरं पाहता न्यून कशात असतं हो? न्यून हे मनात अधिक तीव्रपणे असतं. जे नाही त्याची सल सतत बोचत असते आणि कधी कधी त्यामुळे जे आहे त्याचं मोलही उमगत नाही आणि त्या असण्याचा आनंद फिका पडतो. सद्गुरू आपल्यापाशी आहेत, या गोष्टीचं मोल कळलं, तर मग भौतिकातलं जे न्यून आहे त्याचं दुखं त्यापुढे खुजं होईल. कारण मग ‘ते आहेत ना, मग मी प्रयत्न करीन चिंता नव्हे,’ असा भाव कायम राहील. हृदयात सदगुरु चरण दृढ असले की हृदयात न्यूनत्वाची सल उरणार नाही. ती सल भक्तीच्या आड तर येणार नाहीच नाही. उलट जो पूर्ण आहे, त्याच्या आधारानं पूर्णत्वाचीच तृप्ती हृदयात पूर्णपणे विलसू लागेल.

response.lokprabha@expressindia.com