lp22आपला अट्टहास असतोच देवाला बाहेर, देऊळी-राऊळी शोधण्याचा. तो तसा नाही मिळाला की मग आपण मागं फिरतो. आपल्या घराकडे.. देवघराकडे. अन् अखेरीस स्वत:कडे.. मनाच्या गाभाऱ्याकडे!

जेजुरीचा ‘खंडोबा’ अन् त्याच्या अलीकडे सासवडजवळ भोर फाटय़ावर, पुरंदर पायथ्याशी असलेल्या नारायणपेठ वा नारायणपूरची ‘एकवीरादेवी’ ही आमची कुलदैवतं. या दोन्ही ठिकाणची माझी आठवण पंचावन्न-साठ वर्षे जुनी. लहानपणापासून ‘देवाला जाणं’ म्हणजे या दोन ठिकाणी जाणं. अर्थात जेजुरी-बारामती रस्त्यावरील ‘मोरगावच्या मोरया’पासून या ‘कौटुंबिक देवदर्शनाची’ सुरुवात व्हायची. निमित्त प्रासंगिक असायचं. कुटुंबात कुणाचा जन्म- जावळ, मुंज-विवाह अथवा अगदी मृत्यू.. अशा कुठल्याही प्रसंगी. हा प्रवास बरेचदा एसटीनं, कधी वाहन करून व्हायचा. मुंबईहून पुण्याला गेलं की एक दिवस ही ‘वारी’ घडायची. त्यात तसा नियमितपणादेखील नसायचा. नंतरच्या प्रापंचिक धकाधकीत तर या वारीच्या मध्ये वर्षे निघून जायची.
अलीकडे साताठ वर्षांपूर्वी अशाच काही प्रसंगानं ‘देवाला जाणं’ झालं, तेदेखील असंच काही वर्षांनंतर. या वेळेस मोरगाव- जेजुरी- नारायणपूर झाल्यावर जमल्यास तिथूनच सातारा रस्त्याला जोडणाऱ्या फाटय़ावर ‘केतकावळे’ येथे झालेल्या ‘प्रतिबालाजी’लादेखील जाण्याचं मनात होतं. या तिन्ही ठिकाणच्या जुन्या न झालेल्या आठवणींचं गाठोडं बरोबर होतंच. आजवर कधी तिरुपतीच्या बालाजीलाच काय, पंढरपूरच्या विठोबालादेखील जाणं झालं नाही. त्यामुळे ‘प्रतिबालाजी’च्या बाबतीत पाटी कोरी होती! साहजिकच मधल्या काळात या तीन ठिकाणी झालेले बदल, सध्याचं स्वरूप.. सारंच संभ्रमात पाडणारं, विचार करायला लावणारं होतं.
मोरगावच्या मोरयाचं निवांत दर्शन घ्यायचं असेल तर चतुर्थी टाळायची, एव्हढं पथ्य पूर्वीपासून पाळायचो. कारण चतुर्थीला दर्शन घ्यायचं तर तासन्तास रांगेत उभं राहायची तयारी.. अन् दर्शन क्षणिक अशी परिस्थिती. पण त्या दिवशी पंचमी असून चतुर्थीचं दर्शन दुसऱ्या दिवशी अकरा वाजेपर्यंत चालणार होतं. त्यामुळे रांगेत तास-सव्वा तास गेल्यावर मंडपापर्यंत प्रगती झाली. गाभाऱ्यात चामडय़ाच्या वस्तूंना मज्जाव, कमरेचा पट्टा-पैशाचं पाकीट बाहेर ठेवायचं, पुरुषांनी उघडंच जायचं, वगैरे अंगावरील कपडय़ांचे प्रथमच कळलेले नियम.. अन् दर्शनाचा तर आनंदच! यापूर्वी तिथे अशा गर्दीचा अन् बंधनांचा अनुभव कधीच आला नव्हता. अगदी थेट गाभाऱ्यात ‘मुक्त’ प्रवेश व्हायचा. मूर्तीवर दागिन्यांचं अवडंबर नसायचं, त्यामुळे ‘साजिऱ्या मोरयाचं’ दर्शन व्हायचं.. समोर बसून ‘संवाद’देखील व्हायचा! रामदासस्वामींनी याच ‘साजिऱ्या मोरया’चं रूप पाहताच समोर बसून ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती लिहिली, त्याला तीनशेवर वर्षे उलटून गेली. या काळात तर किती बदल झाले असतील. मूर्तीवर वर्षांनुवर्षे होणारं- कालांतरानं गळून पडणारं- शेंदूरलेपन, त्यामुळे मोरयाचं मूळ रूपदेखील बदललं असेल, तिथे इतर बाह्य़ गोष्टी काळाच्या ओघात बदलणारच. आषाढीला ‘माउली’चं दर्शन न घेता दुरूनच कळसाचं दर्शन घेऊन वारकरी माघारी का फिरतात, ते समजलं! मनाची समजूत घातली, अन् माघारी फिरलो. आता जेजुरी. देवळाच्या ओवरींत असलेल्या ‘दीपमाळा’ हे महाराष्ट्रातल्या देवळांच्या बांधकामांचं वैशिष्टय़. जेजुरी गडावर तर चढून जाण्याच्या मार्गावरदेखील, दुतर्फा असलेल्या दगडी बांधकामांतील कित्येक प्रमाणबद्ध दीपमाळा, हे वैशिष्टय़. (‘आना है तो आ राह में, कुछ फेर नहीं है’ या ‘नया दौर’मधील गाण्याचं चित्रीकरण पंचावन्न-साठ वर्षांपूर्वी याच गडावर झालं होतं.) अशा देवस्थानांभोवती असतात तशी पूजासाहित्य, भंडारा-प्रसाद, मल्हारी-मरतडाच्या तसबिरी वगैरेची दुकानं पूर्वीदेखील होती, पण पूर्वी ती गडाच्या पायथ्याशीच असायची. आता त्या दगडी दीपमाळांमधून थेट वपर्यंत झालेलं अशा दुकानांचं आक्रमण.. त्यांत आरत्या-गाणी-लावण्यांच्या कॅसेट्सची, चढय़ा आवाजांत लाउड-स्पीकर्सवरून होणारी जाहिरात! हे कमी म्हणून की काय, पायरीपायरीवर खंडोबाच्या वा कुणा देवाच्या नावानं पैसे टाकण्यासाठी ‘याचना’ करणारे हात, त्यांचे जर्जर चेहरे..! पायऱ्या चढून गडावर पोहोचल्यावर, चोहोबाजूंच्या तटबंदीच्या- गडकोटाच्या- आत प्रशस्त प्रांगणात भक्तमंडळींची गर्दी. हळदीच्या ‘भंडाऱ्यानं’ कपडे रंगलेली, मळवट भरलेली. धोतर-पॅन्ट्स, साडय़ा-सलवार कमीज, जीन्सदेखील घातलेले सर्व थरांतील स्त्री-पुरुष-मुलं. साऱ्या प्रांगणांत पाहावं तिकडे हळद-भंडाऱ्याचा पिवळाजर्द रंग! मुख्य मंदिरासमोर काळ्या पत्थरातील चार रेखीव दीपमाळा.. फक्त आता त्यातच मध्ये तेलाचा व्यापार चाललेला. प्रवेशद्वारासमोर मोठं वर्तुळाकार पितळी कासव. तिथनं देवळाच्या डावीकडून वळसा घालून गाभाऱ्यापर्यंत जाणारी भक्तांची रांग. अन् गाभाऱ्याच्या उंबरठय़ावर चाललेला व्यापार! ‘ताई, एक्कावन्न दिले असते तर देवाच्या पायाजवळचा नारळ दिला असता, अकरात काय देणार?’ ‘भाऊ , एकशेएक द्या, चंपाषष्ठीला अभिषेक घडवू देवाला, बोला लवकर.. गोत्र बोला!’ गाभाऱ्यातील ‘मल्हारीमरतडा’समोर, पायाशी बसून हे चाललेलं पाहिलं.. अन् हे सर्व भेदक डोळ्यांनी पाहणाऱ्या खंडोबाचं ओझरतं दर्शन होऊन दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडलो. गाभाऱ्यात शांत दर्शन झालं नाही म्हणून, पुन्हा वळून प्रांगणातील पितळी कासवामागे उभं राहून गाभाऱ्याकडे क्षणभर पाहिलं. त्या भेदक नजरेतही आश्वासक दिलासा मिळाला! गडाच्या पायऱ्या उतरताना इतिहास आठवला. स्वराज्य स्थापन होऊन १२ वर्षे लोटली तरी शहाजीराजे कर्नाटकात असल्यामुळे ‘शहाजी-शिवाजी’ भेट होऊ शकली नव्हती, ती झाली या जेजुरी गडावर. खंडोबासमोर काशाच्या परातीतल्या तुपात पाहून प्रथम दोघांची नजरभेट झाली, अन् नंतर उराउरी भेट झाली! इ.स. १६९० मध्ये देऊळ नष्ट करण्यासाठी या गडावरच दुसऱ्यांदा आक्रमण करणाऱ्या, कट्टर धार्मिक असणाऱ्या औरंगझेबानं अखेर मधमाश्यांच्या आक्रमणामुळे माघार घेतली. अन् देवाचा कोप नको म्हणून एक लाख चांदीच्या मोहरा देवस्थानाला दान केल्या. गडावरील देवळासमोरील चार दीपमाळादेखील त्यानंच बांधून दिल्याचं सांगतात! काळ बदलला. आता कुठली भक्ती अन् कसली भीती.. व्यापार तर सगळीकडेच झालाय. तिथं देवाची- देवस्थानांचीदेखील सुटका नाही. सगळ्या महत्त्वाच्या देवस्थानांवर हल्ली सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असतात ‘वॉच’ ठेवण्यासाठी, पण ‘बंदे तेरे हर हाल पे मालिक की नजर है..’ याचा विसर पडला!
सासवडला डावीकडच्या भोर रस्त्यावर थोडय़ाच अंतरावर ‘कऱ्हा’ नदीला वळसा घालून काही अंतर गेल्यावर दूरवर ‘पुरंदर’ दिसू लागतो. नारायणपूर हे त्या अलीकडे पायथ्याशी वसलेलं गाव. तिथल्या जुन्या पण तशा अलीकडच्या काळातील दत्तमंदिराची गेल्या काही वर्षांत वेगानं भरभराट झाली. दत्तजयंतीला लाखांची यात्रा भरू लागली. गावाचं नाव दूरवर पसरलं. त्यामानानं त्याच गावाबाहेरील अतिप्राचीन, काळ्या पत्थरात सुरेख बांधकाम असलेलं, भव्य शंकराचं देवस्थान मात्र नेहमीच दुर्लक्षित राहिलं. एकूणच देवस्थान- मंदिराचंदेखील काही विधिलिखित असावं. तिथून काही अंतरावर असलेलं मजबूत दगडी तटबंदी असलेलं ‘एकवीरा मंदिर’देखील असंच उपेक्षितच राहिलेलं देवस्थान. आतून चौफेर ओवरी असलेल्या, कळस ढासळलेल्या या देवीच्या छोटेखानी मंदिरात मूर्ती नाही. म्हटलं तर पाषाणातील एक छोटा ‘तांदळा’ तेवढा आहे. ही एकवीरा म्हणजे माहूरच्या रेणुकादेवीचं येथील भक्तांसाठी घेतलेलं रूप असं मानतात. रेणुकादेवीच्या मस्तकाचं प्रतीक म्हणजे तांदळा. पण त्या भोवतालची उभी कमान पाहता, तिथे कधी काळी माहूरच्या रेणुकादेवीसारखा मोठा ‘तांदळा’वजा मूर्ती असावी. आता आहेत ते निव्वळ अवशेष, असं गाभाऱ्यात शिरल्यावर नेहमी वाटत राहतं. मोगलांच्या आक्रमणात तांदळा वा मूर्ती हलविली असावी, कळस ढासळला असावा! अशा सगळ्या देवस्थानांनी इतिहासात काय काय पाहिलं असेल.. देवच जाणे! हल्लीच केतकावळे येथे ‘प्रतिबालाजी’ बांधलं गेलं तेव्हा पंचक्रोशीतल्या देवळांचा थोडाफार जीर्णोद्धार झाला. त्यात या मंदिराच्या कळसाची डागडुजी झाली. गाभाऱ्यात दगडी हेमाडपंती बांधकामाशी विशोभित ग्लेज्ड टाइल्स लागल्या, विजोड रंगरंगोटी झाली. गावात आलेली वीज या देवळापर्यंत काही पोहोचली नाही. या मंदिराला कधीच ऊर्जितावस्था आली नाही. ते कायमच एकलकोंडं, उदासवाणं राहिलं! तिथं पोहोचल्यावर देवळाचा गुरव आठवडय़ाच्या बाजाराला अन् त्याची बायको शेतावर कामाला गेल्याचं कळलं. चिटपाखरू नसलेल्या अंधाऱ्या गाभाऱ्यात तेलाचा दिवा लावून पूजा-आरती झाली. देवीची खणानारळानं ओटी भरली. देवीजवळ मन मोकळं झालं. तेवढय़ात एक शाळकरी मुलगी धावतच ओवरीत शिरली. दोन वेण्या, टपोरे डोळे. ‘मावशी, आयेनं धाडलंय..’ हसऱ्या चेहऱ्यानं बायकोला म्हणाली. ‘बरं झालं आलीस. ही ओटी अन् प्रसाद घेऊन जा. पण नाव काय तुझं.. अन् कितवीत आहेस गं?’
‘माझं नाव श्रद्धा.. तिसरीत हाय मी. आज लवकर सुटली शाळा..’ असं म्हणत पुन्हा शाळा सुटल्याच्या आनंदात सगळं घेऊन धूम पळाली! थोडा वेळ बाहेरच्या पायऱ्यांवर बसून आम्ही उठलो. सूर्य माथ्यावर आला होता. अध्र्या तासात केतकावळ्याच्या ‘प्रतिबालाजी’ला पोहोचलो. बाहेरची तटबंदी, आतील मंदिरं-गोपुरं, सारं मूळ स्थानासारखंच असावं. फक्त मूळ स्थान साडेआठशे मीटर्स उंचीवर, हे स्थान सपाटीवर एवढंच. ठिकठिकाणाहून येणाऱ्या टुरिस्ट-बसेस, एसटी बसेस, खासगी गाडय़ांसाठी वेगवेगळी भरपूर पार्किंगची सोय. पाय धुण्याची वेगळी व्यवस्था. वाहनांची चाकं धुण्याची- एका सखल भागातील पाण्यातून जाण्याची सोय केल्यामुळे- वेगळी व्यवस्था. कुठेही अस्वच्छता नाही, याचनेसाठी पसरलेले हात नाहीत. स्त्री-पुरुष- वृद्ध- अपंगांसाठी दर्शनाच्या वेगळ्या रांगा. देवळांत शिरण्यापूर्वी एअरपोर्टसारखी माणसांची- सामानाची सुरक्षा तपासणी. दान-दक्षिणेसाठी कोपऱ्यांवर मोठाल्या ‘हुंडी’- अर्थात हंडे. संपूर्ण मंदिरात जमिनी-भिंती-खांब मार्बल-ग्रॅनाइटनं मढविलेले. दर्शनाची उत्सुकता ताणली गेली.. अन् नंतर वीरस झाला. गाभाऱ्यातील वीस-पंचवीस फुटांवरच्या मूर्तीचं ‘अंधाऱ्या’ प्रकाशात अर्धा क्षणच होणारं दर्शन.. ‘चलो, चलो, पीछे लाइन है..’चा पिच्छा. फुलं-हार-नारळ, हळद-कुंकू, भंडारा-बुक्का काही नाही. सारं कसं ‘स्पीक-एन-स्पेन’! एका बाजूला ‘मुंडण’ आणि केश-अर्पणाची सोय. दुसरीकडे ‘लाडू’प्रसादाची सोय अन् बाजूच्या डायनिंग हॉलमध्ये प्रसादाच्या मोफत जेवणाची सोय. दुकानं नाहीत, बाजार नाही. कुठेही गडबड-गोंधळ नाही, अव्यवस्था नाही. त्यासाठी भरपूर कर्मचारी वर्ग, त्यांच्यावर देखरेख ठेवणारे सुपरवायझर्स, सिक्युरिटी गार्ड्स. ठिकठिकाणी लावलेले क्लोज-सर्किट कॅमेरे. इतिहासात परकीय आक्रमणांची भीती होती, वर्तमानांत दहशतवादाचा बंदोबस्त! दुपारी दीड-दोनचा सुमार, म्हणजे साऱ्या स्टाफची ‘शिफ्ट’ बदलण्याची वेळ, त्यामुळे बाजूच्या मोकळ्या जागेत त्यांना एकत्रित करून चाललेलं सूचना-सत्र, फिटनेस-परेड.. सारी ‘कॉपरेरेट मॅनेजमेंट’. सगळंच उत्तम. फक्त गाभाऱ्यापर्यंत जाऊन ‘व्यंकटेश्वर-बालाजी’ काही भेटला नाही.. ही रुखरुख राहिलीच!
परतीच्या प्रवासात, मनात विचारांचा गोंधळ.. म्हटलं तर देवदर्शन झालं, पण मन बेचैन झालं. हे ‘तारांकित’ देवस्थान अन् सकाळी पाहिलेली देवस्थानं. कसा अन् कुठं घालायचा मेळ? चिटपाखरू नसलेल्या देवीच्या देवळात भेटलेली ‘श्रद्धा’ एवढाच दिलासा! तशीही अशा ठिकाणी ‘श्रद्धा’च महत्त्वाची. तिलाच तडा गेला तर? लहानपणापासून झालेले परंपरागत संस्कार सहसा सुटत नाहीत. पूर्वीच्या कित्येक पिढय़ा इथं सुखद- दु:खद प्रसंगांनी येऊन गेल्या असतील. या साखळीतला आपण नाममात्र दुवा. पुढच्या पिढय़ांसाठी. तसं त्याचंदेखील कुठलंच बंधन नसतं. संस्कार ओढून आणतात, म्हणून अशा ठिकाणी जायचं. अन् प्रश्नाचं उत्तर शोधायचं..!
विश्वास असणाऱ्यांचा देव नक्की कुठं असतो?
‘मोको कहां ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में..’ असं कबीर म्हणतो.
‘देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर..’ अर्थात देव आपल्यातच असतो, हे उत्तर. वरवर सोपं, पण समजायला अवघड. ‘तुका म्हणे होई मनाशी संवादु, आपुलाची वादू आपणासी’ ही फार पुढची अवस्था. आपल्याला संवादासाठी आपल्याहून देव वेगळा लागतो. म्हणून तसा तो आपण आपल्या बाहेर वा इतरांतही शोधत असतो. आधारासाठी. आश्वासकतेसाठी. पूजाअर्चा, उपासतापास, कर्मकांडं, कुळधर्म-कुळाचार, प्रथा-परंपरा वगैरे सारं नंतरचं अवडंबर.
‘तुळशीमाळ घालूनी गळा,
कधी नाही कुटले टाळ,
पंढरीला नाही गेले,
चुकुनिया एक वेळ,
देव्हाऱ्यात माझे देव,
ज्यांनी केला प्रतिपाळ,
चरणांची त्यांच्या धूळ,
रोज लावी कपाळाला..’
घरी दिवेलागणीला देवाजवळ समई लावताना या साध्या ओळी कानावर पडल्या की त्यात किती अर्थ आहे हे कळतं. तरीही आपला अट्टहास असतोच देवाला बाहेर, देऊळी-राऊळी शोधण्याचा. तो तसा नाही मिळाला की मग आपण मागं फिरतो. आपल्या घराकडे.. देवघराकडे. अन् अखेरीस स्वत:कडे.. मनाच्या गाभाऱ्याकडे!
प्रभाकर बोकील