एल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरी ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. पावसाचं प्रमाण कमीजास्त असतं तेव्हा तर उलट अधिक काटेकोरपणे नियोजन करण्याची गरज असते. पण आपण हा शहाणपणा अजूनही शिकलेलो नाही..

महाराष्ट्रासह मध्य आणि उत्तर भारतात पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. उन्हाळ्याचा ज्वर जसा चढत आहे, तशी सर्वाची नजर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांवर लागली आहे. आणखी तीसेक दिवसांत हे वारे आपल्यासोबत थंडगार बाष्पयुक्त वारे आणतील आणि जलधारांच्या वर्षांवाने उन्हाच्या झळा विझून जातील. मान्सून सक्रिय होईल आणि बघता बघता तमाम शेतकरी वर्ग कामात गढून जाईल, पाण्याची टंचाई कमी होईल, पाऊसपाणी चांगले झाले तर पुढील वर्षी नैसर्गिकपणे येऊ शकणाऱ्या अनेक संकटांना आधीच पायबंद बसेल.
मान्सूनचे हे चक्र गेली हजारो वर्षे अव्याहत सुरू असले, तरी त्यात दरवर्षी चढउतार येतच असतात. ‘मान्सून दरवर्षी येतो आणि कोणतेही दोन मान्सून समान नसतात,’ हीच मान्सूनची सर्वात मोठी ओळख मानली जाते. गेल्या दशकभरात २००२, २००४, २००९ आणि २०१२ मध्ये सरासरीपेक्षा कमी बरसलेल्या मान्सूनने २०१०, २०११ आणि २०१३ या वर्षांमध्ये सरासरीपेक्षा जास्त वर्षांव करून सर्वावर कृपाही केली. यंदा पुन्हा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचे संकेत जगभरातील विविध एजन्सींनी आपल्या दीर्घकालीन अंदाजांमधून वर्तवले आहेत. अर्थात ते दीर्घकालीन अंदाज आहेत आणि असे अंदाज अनेकदा चुकीचेही ठरले आहेत. तसे असले तरी यंदा प्रशांत महासागरामध्ये निर्माण होऊ घातलेली एल निनोची स्थिती मान्सूनच्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम करेल याची शक्यता जास्त असल्याचे बहुतेक हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काय आहे एल निनो?
मान्सून काळातील पावसाच्या प्रमाणात होणारे हे चढउतार हे पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घटकांमध्ये सातत्याने होणाऱ्या बदलांवर अवलंबून असतात. मान्सूनवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या या घटकांची आता शास्त्रज्ञांना व्यवस्थित ओळखही होऊ लागली आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा घटक आहे ‘एल निनो’.
सुमारे वीस वर्षांपासून एल निनो आणि मान्सूनच्या संबंधांवर बरीच चर्चा सुरू आहे. ऐंशीच्या दशकात भारतीय हवामानशास्त्रज्ञांनी एल निनो सक्रिय असताना त्याचा भारतीय मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे दाखवून दिले. विषुववृत्तीय पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा सतत पाच महिने ०.५ अंश किंवा त्यापेक्षा अधिक राहिले तर या स्थितीला एल निनो म्हटले जाते. (दक्षिण अमेरिकेजवळील प्रशांत महासागरात ही घटना ख्रिसमसच्या दरम्यान होत असल्यामुळे याचे स्पॅनिश भाषेत ‘एल निनो’ म्हणजेच लहान मूल किंवा ख्रिस्त बाळ असे नामकरण झाले.)
याच वेळी पश्चिम प्रशांत महासागरात आणि िहदी महासागरात जास्त दाबाचे क्षेत्र तयार होते. हवामानाच्या या स्थितीला हवामानशास्त्रीय भाषेत एल निनो सदर्न ऑस्सिलेशन (एन्सो) म्हटले जाते. एन्सोची उष्ण स्थिती असताना (एल निनो) बहुतेक वेळा त्याचा भारतीय मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होतो, तर एन्सोची थंड स्थिती असताना (ला निना) त्याचा भारतीय मान्सूनवर अनुकूल परिणाम होतो असे दिसून आले आहे.
यंदा विषुववृत्तीय पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान जूनच्या सुरुवातीपासून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एक अभ्यास असेही दाखवतो की, एल निनो विकसित होत असतानाही मान्सूनवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. १९१८, १९५१, १९६५, १९७२, १९८२, १९८७, २००२ या वर्षी आलेले दुष्काळ हे एल निनोच्या विकसित होण्याच्या प्रक्रियेदरम्यानचे होते. यंदाही तशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामानशास्त्रज्ञ वर्तवत आहेत. अशा स्थितीमध्ये कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होण्याचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पर्यायाने पावसाचे प्रमाणही कमी राहू शकते. अर्थात हा पूर्वअंदाज आहे. एल निनो नेमका कसा विकसित होतो आणि हवामानाचे इतर घटकही कसे सक्रिय राहतात यावरही बरेच काही अवलंबून असेल.
इंडियन ओशन डायपोल (IOD)
साधारणपणे एल निनोप्रमाणेच हा घटकही मान्सूनवर परिणाम करतो असे दिसून आले आहे. िहदी महासागरात भारताच्या पूर्व आणि पश्चिम भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा एकाआड एक असे कमीअधिक राहत असते. ज्या वेळी पश्चिम हिंदी महासागरातील समुद्रपृष्ठाचे तापमान सरासरीपेक्षा अधिक राहते (पॉझिटिव्ह आयओडी) त्या वेळी भारतात चांगला पाऊस पडतो, तर इंडोनेशिया ऑस्ट्रेलियात त्याच्याविरूद्ध स्थिती असते. १९९७ मध्ये जेव्हा शतकातील सर्वात तीव्र एल निनो सक्रिय होता, तेव्हा भारतात मान्सून चांगला झाला होता. त्याचे कारण त्या वर्षी आयओडीची स्थिती पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले जाते.

‘दुष्काळाला कारणीभूत ठरणारे एल निनो, इंडियन ओशन डायपोल, वेस्टर्न डिस्टर्बन्स, एअरोसोल आदी घटकांचे नेमके स्वरूप आणि त्यांचा मान्सूनशी संबंध आता स्पष्ट होऊ लागला आहे. त्यांच्या आधारे येत्या काळात दुष्काळ आधीच वर्तवणेही शक्य होऊ शकेल.’ 
— डॉ जीवनप्रकाश कुलकर्णी (वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ, आयआयटीएम)

दुसरीकडे ज्या वेळी पूर्व हिंदी महासागरातील समुद्रपृष्ठाचे तापमान सरासरीपेक्षा अधिक असते (निगेटिव्ह आयओडी), त्या वेळी भारतातील मान्सूनवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. यंदाचा आयओडी ‘न्यूट्रल’ स्थितीत राहण्याची शक्यता असलेल्याचे वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे एल निनो सक्रिय असताना ‘आयओडी’ची साथ मिळण्याची शक्यता कमी असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत.
मान्सूनवरील अवलंबित्व कमी करण्याचे आव्हान
निसर्गचक्राचे हे घटक मानवी आवाक्यातील नाहीत. त्यामुळे या निसर्गचक्राला स्वीकारून त्यानुसार आपल्या व्यवहारांमध्ये आवश्यक ते बदल करून घेणे क्रमप्राप्त आहे. पावसावर कमालीचे अवलंबित्व हा भारतीयांचा गुणधर्म विशेषत: दुष्काळी स्थितीत प्रकर्षांने जाणवतो. एक वर्ष पाऊस वेळेत आला नाही, त्याचे प्रमाण अपेक्षेइतके राहिले नाही, तर समाजाच्या तळागाळापर्यंत त्याची झळ कशी पोहोचू शकते याची उदाहरणे गेल्या काही वर्षांमध्ये आपण अनुभवली.
भारतावर मेहेरबान असणारा मान्सूनही त्याला काही प्रमाणात कारणीभूत आहे. तो दरवर्षी येणारच आणि दरवर्षी तो कमी-अधिक प्रमाणात सरासरी गाठणारच ही गोष्ट शेतकऱ्यांपासून धोरणकर्ते आणि प्रशासन यांना माहीत असल्यामुळे आपण काही केले नाही, तरी जून ते सप्टेंबर या काळात आपल्याला पाणी मिळणारच हे माहीत असल्यामुळे टंचाईच्या काळात काय करायचे याचे नियोजन अगदी व्यक्तिगत स्तरावर शेतकऱ्यापासून ते प्रशासनापर्यंत कोणीही केलेले नसते. आणि मग जेव्हा एखाद्या वर्षी मान्सून आपले दुसरे रूपही दाखवतो तेव्हा हाहाकार उडतो, पाण्याच्या नियोजनाच्या चर्चा सुरू होतात, दुष्काळासाठी पॅकेज मागितले जाते, राज्याच्या जलसंधारणाचा आढावा घेतला जातो. तहान लागली की विहीर खणायचा हा प्रकार मग पुन्हा पुढच्या पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जातो आणि परिस्थिती जैसे थे होते.
लहरीपणा हा मान्सूनचा खरा गुणधर्म. मान्सून दरवर्षी येणार आणि देशभरात शक्यतो तो सामान्य राहणार हे जरी खरे असले, तरी प्रादेशिक स्तरावर त्याचा लहरीपणा नियमितपणे अनुभवायला मिळत असतो. एखाद्या विभागामध्ये यंदा चांगला पाऊस झाला, तर तो पुढील वर्षीही चांगलाच असेल असे सांगता येत नाही. मान्सूनच्या पावसासाठी आवश्यक कमी दाबाची क्षेत्रे कधी निर्माण होतील, ती बंगालच्या उपसागरात आपल्याला अनुकूल भागांतच निर्माण होतील की नाही ही गोष्ट निश्चित नसते. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवाहांमध्येही बदल होत असतात. त्यातही एल निनोसारखी स्थिती सक्रिय असली की, त्याचाही परिणाम मान्सूनवर संभवतो. समुद्र आणि वातावरणातील देवाणघेवाणीची ही प्रक्रिया दरवर्षी अचूक एकसारखीच होत नसते. त्यामुळे मान्सूनचे रूपही दरवर्षी बदलत राहते.
अशा वेळी मान्सूनच्या या लहरी स्वभावावर आपण अवलंबून निश्चिंत राहणे आपल्याला परवडणार नाही. दुष्काळ पडल्यावर त्यानंतर कोटय़वधींच्या पॅकेजच्या रूपाने कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांऐवजी अशा टंचाईच्या संकटांची शक्यता ओळखून प्रतिबंधात्मक उपाय शोधणे हे प्रशासन आणि अगदी शेतकऱ्यांसाठीही आवश्यक ठरणार आहे. यंदा दुष्काळी स्थितीची शक्यता वर्तवली जात असताना सर्वानी आतापासूनच येणाऱ्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे याचे नियोजन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांपासून व्यापारी, प्रशासन या सर्वाचेच मान्सूनवरील अवलंबित्व कमी करणे हेच यापुढे शाश्वत विकासाचे सूत्र राहणार आहे. शास्त्रज्ञ आपल्या अभ्यासातून पावसाचे अंदाज व्यक्त करतात त्यातून असं आढळून आलं आहे की पाऊस नेहमी आपली सरासरी पाळतो. प्रश्न आहे तो नियोजन कर्त्यांचा. पाऊस सगळीकडे सारखा पडणार नाही, त्याचं प्रमाण वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळं असणार हे माहीत असतानाही सगळीकडे पाणी योग्य पद्धतीने उपलब्ध व्हावं यासाठी आपण काहीच करत नाही. म्हणूनच पाऊस आपली सरासरी पाळतो, आपलं काय हा प्रश्न उपस्थित करण्याची वेळ येते.
काय सांगतो यंदाचा अंदाज?
यंदा देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आपल्या दीर्घकालीन अंदाजात वर्तवली आहे. हा अंदाज आयएमडीतर्फे २००७ पासून देण्यात येणाऱ्या पाच घटकांवर आधारित स्टॅटिस्टिकल मॉडेलनुसार वर्तविण्यात आला आहे. दुसरीकडे प्रत्यक्ष हवामानाच्या निरीक्षणांवर आधारित दोन स्वतंत्र डायनॅमिक मॉडेलनुसार हंगामात ९६ टक्के आणि ८८ टक्के पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. यंदा पाऊस सरासरीच्या वर जाणार नसल्याचे अनुमान जगभरातील बहतेक सर्वच मॉडेल्सनी वर्तवले आहे.

‘मान्सून हा निसर्गचक्राचा एक भाग आहे. निसर्ग नेहमी आपली वेळ पाळतो आणि संतुलनही साधतो. त्यामुळे मान्सून दरवर्षी येणार, तो बरसणार आणि सर्व साधारणपणे दहा पैकी आठ वर्षांत तो सरासरी गाठणार.’ 
— डॉ रंजन केळकर (माजी महासंचालक, आयएमडी)

सरासरीच्या ९५ टक्के हा अंदाज खरा ठरला, तरी हे प्रमाण देशभरातील ३६ हवामानशास्त्रीय विभागांमध्ये एकसारखे राहणार नाही. कोकण आणि पश्चिम किनारपट्टी, तसेच ईशान्य भारतात जिथे पावसाचे प्रमाण मोठे असते, तिथे मोठा पाऊस झाला तर, देशातील पावसाची एकत्रित सरासरी काढताना आकडे सुधारू शकतात. या अंदाजाकडे दुसऱ्या प्रकारे पाहिल्यास देशातील अनेक हवामानशास्त्रीय विभागांमध्ये सरासरीपेक्षा बराच कमी पाऊसही पडण्याची शक्यता असते. अशा स्थितीत महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागांना त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे ९५ टक्केपावसाची शक्यता वर्तवली असताना त्यातील धोकेही वेळीच ओळखणे आवश्यक आहे.
मान्सूनचे विज्ञान
तो नेमेचि येतो. पण नेहमी तो वेगळाच असतो. कधी मुक्तपणे भरभरून देतो, तर कधी रुसून तसाच निघून जातो. कधी महिनाभर लपून बसतो, तर कधी अगदी आठवडाभर एकाच ठिकाणी मुक्काम ठोकतो. मुक्त स्वच्छंदी स्वभावाचा ‘मान्सून’ दर वेळी आपल्या वेगवेगळ्या पैलूंचे दर्शन घडवतो. हवामानाच्या अभ्यासकांसाठी त्याची ही विविध रूपे कुतूहलाची ठरत असली, तरी सर्वसामान्यांना मात्र त्याच्या विविध रूपांपेक्षा ‘नेमेचि येतो’ हा गुणधर्म महत्त्वाचा वाटतो. वैशाख वणव्यांनी भाजून निघाल्यावर चराचराला शांत करण्यासाठी तो त्यांना हवाहवासा वाटतो. जमिनीवर आणि खाली पाणी खोल जात असताना पातळी पुन्हा राखण्यासाठी तो त्यांना हवा असतो. शेतात पेरलेलं सोनं डुलून यायला तो त्यांना हवा असतो. पुढील वर्षीचा ताळेबंद व्यवस्थित राहावा यासाठी तो त्यांना हवा असतो. भारतातील ७० टक्के जनतेचे पोट ज्यावर अवलंबून आहे, अशा ‘मान्सून’ची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी प्रत्येक शेतकरी प्रार्थना करतो. तो मात्र आपला लहरीपणा जपत दर वर्षी नवेच दर्शन देतो.
गेल्या दहा वर्षांत ‘मान्सून’च्या या लहरीपणाचा प्रत्यय अवघ्या भारताने घेतला. २००२ मध्ये दुष्काळ पाहिल्यावर २००५ मध्ये मुंबईत महापुराने थैमान घातले, २०००९ मध्ये गेल्या ३० वर्षांतील सर्वात मोठय़ा दुष्काळाने सर्वाच्या डोळ्यांत पाणी आणले. तर, २०१३ मध्ये सरासरीच्या १०६ टक्के वर्षांव करून त्याने अर्थव्यवस्थेला आधारही दिला. अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीची घटना असणारा ‘मान्सून’ अजूनही जगभरातील हवामानतज्ज्ञांना पूर्णपणे उमजलेला नाही. मात्र, ही वार्षिक नैसर्गिक घटना घडण्यामागील महत्त्वाची कारणे ज्ञात आहेत. या घटनेचे ढोबळ स्वरूप समजून घेण्याचा हा प्रयत्न.
‘मान्सून’चा इतिहास
भारतात ‘मान्सून’ची घटना नेमकी कधी सुरू झाली, याबाबत अजूनही संशोधन सुरू आहे, मात्र भारतीय उपखंड आणि आशिया यांच्या धडकेतून तिबेटचे पठार निर्माण झाले आणि तेथूनच नैर्ऋत्य मोसमी पावसाला सुरुवात झाली असे मानले जाते. ही घटना पाच कोटी वर्षांपूर्वी घडली असावी. मोसमी वाऱ्यांनी आणलेले धूलिकण आणि काही पानांच्या जीवाश्मांचा चीनच्या समुद्राच्या तळाशी शोध घेतल्यावर शास्त्रज्ञांना त्याबद्दलचे पुरावे मिळाले. सध्याच्या सक्रिय मान्सूनचे चक्र साधारणपणे ५० लाख वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचेही पुरावे मिळतात. एवढे मात्र नक्की, भारताचा सध्याचा भूगोल विकसित होताना मान्सूनची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्यानंतरच्या काळात जमिनीवर आणि भूगर्भात घडणाऱ्या हालचालींवरही मान्सूनचे स्वरूप बदलत गेल्याचे दिसून येते.
पृथ्वीवर आलेल्या हिमयुगांचाही परिणाम वेळोवेळी मान्सूनवर झाला. अगदी अलीकडच्या काळातील मान्सूनमध्ये झालेल्या बदलांचे पुरावे पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेला मिळाले. काही पानांच्या जीवाश्मांचा त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार कोकणात ५० हजार वर्षांपूर्वीपर्यंत सदाहरित जंगलांचे अस्तित्व होते, जे आता नाही. याचा अर्थ त्या काळात कोकणात वार्षिक सुमारे पाच हजार मिलिमीटरहून अधिक पाऊस होत असावा. त्या काळी महाराष्ट्रातही केरळसारखा पाऊस होत असावा. त्यामुळे काळाच्या मोजपट्टीवर ‘मान्सून’ ही कायम बदलत राहणारी प्रक्रिया असल्याचे दिसून आले आहे. यापुढील काळातही ‘मान्सून’ बदलत राहील हे नक्की.
‘मान्सून’चा अभ्यास
उपलब्ध पुराव्यांनुसार अगदी वेदकाळापासून ‘मान्सून’चा अभ्यास सुरू असल्याचे दिसून येते. वेदांमधील अनेक रचनांमध्ये मोसमी पाऊस आणि वाऱ्यांचा उल्लेख आढळतो. ऋग्वेदातील मरुत सूक्तांमध्ये ‘हे पर्जन्यकारक आणि सुखदात्या मरुतांनो, शत्रुविनाशाचे आणि िनदक संहाराचे वरदान तुम्ही आम्हास द्या. आम्हास जल, दुग्ध, घृत, औषधी आणि समृद्धी प्रदान करा’ अशा आशयाचे आवाहन आढळते. वैदिक पावसाळ्याच्या नोंदींचे प्रवर्तक नोधा ऋषींना मानतात, तर नंतरच्या काळात वराहमिहिरांनीही हवामानाच्या नोंदी घेतल्याचे दिसून येते. पाऊस पाडण्यासाठी करण्यात येणारे यज्ञही कदाचित ढगांपर्यंत क्षार पाठवण्याचे मार्ग असावेत असा अंदाज बरेच जण व्यक्त करतात.
मात्र, मान्सूनला शास्त्रीय पद्धतीने अभ्यासण्याची प्रक्रिया ब्रिटिशांच्या काळात सुरू झाली. भारतात स्थिर होण्यासाठी ब्रिटिशांना येथील इतिहास, भूगोलाचा अभ्यास करावा लागला. येथील परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांना भारताच्या क्लिष्ट उष्णकटीबंधीय हवामानाच्या अभ्यासाची गरज भासू लागली. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी वेधशाळा सुरू करून हवामानाच्या नोंदी घेण्यास सुरुरवात केली, ज्यामध्ये तापमान, वाऱ्यांबरोबर पर्जन्यमानाच्या नोंदीही होत्या. त्यांच्या अभ्यासातून प्रथमच मान्सूनच्या वार्षिक घटनेचे नेमके स्वरूप समोर आले. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या या अभ्यासाचा पुढे स्वतंत्र भारतालाही उपयोग झाला. भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) देशात हजारो ठिकाणी हवामानाच्या नोंदी घेणारी उपकरणे बसवली गेली. रोजच्या रोज नोंदी घेतल्या जाऊ लागल्या आणि ‘मान्सून’विषयी विभागनिहाय स्थानिक प्रमाणावरही माहिती मिळणे शक्य झाले. १९९० च्या दशकानंतर भारतीय उपग्रह अवकाशात पृथ्वीभोवती फिरू लागले आणि हवामानाच्या अभ्यासाला अधिक गती मिळाली. अवकाशातून ढगांची आणि हवामानाची सद्य:स्थिती समजू लागल्याने हवामानाचे अंदाजही अधिक अचूक बनू लागले.
‘मान्सून’चे स्वरूप
एक शतकाहून अधिक काळ हवामानाच्या नोंदी घेतल्यानंतर ‘मान्सून’चे चित्र अधिक स्पष्ट झाले. मूळच्या अरबी ‘मौसम’ म्हणजे ऋतूनुसार बदलणारे वारे असा अर्थ असणाऱ्या शब्दाचेच ‘मान्सून’ हे रूप आहे. मोठा भूभाग आणि किमान तीन बाजूंनी समुद्राने वेढलेल्या उष्णकटिबंधीय प्रदेशांत (विषुववृत्ताजवळील) मान्सून ही घटना अनुभवण्यास मिळते. त्यामुळे फक्त भारतीय उपखंडच नाही, तर पश्चिम आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही मोसमी पाऊस अनुभवण्यास मिळतो. उन्हाळ्यात समुद्राकडून जमिनीवर बाष्पयुक्त वारे वाहणे आणि हिवाळ्यात त्याउलट जमिनीकडून समुद्राकडे कोरडे वारे वाहणे अशी ढोबळमानाने ‘मोसम’ या शब्दाची व्याख्या करता येईल.
भारतीय नैऋत्य मोसमी पाऊस
२१ मार्चला सूर्य विषुववृत्त ओलांडून आकाशात उत्तरेकडे सरकताना जाणवतो याला आपण उत्तरायण म्हणतो. पुढील तीन महिन्यांत तो उत्तरेला त्याच्या सर्वाधिक ‘क्रांती’वर म्हणजे २३.५ अंशांपर्यंत पोचतो. २१ जून रोजी म्हणूनच उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो. या कालावधीत सूर्याची किरणे भारतीय उपखंडावर लंबरूप पडून उपखंड तापू लागतो. याच दरम्यान आपल्याला उन्हाळा अनुभवण्यास मिळतो. सूर्याच्या लंबरूप किरणांमुळे भारताच्या अंतर्गत भागातील तापमान कमालीचे वाढते. गुजरात, राजस्थानमध्ये ते ५० अंशांपर्यंत पोचते. उष्णतेमुळे जमीन तापून भारतीय उपखंडावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. याच दरम्यान दक्षिण गोलार्धात समुद्रावर मात्र तुलनेने जास्त दाब असतो. वातावरणीय दाबांच्या या असमतोलानंतर समुद्रातील जास्त दाबाकडून वारे जमिनीवरील कमी दाबाकडे वाहू लागतात. दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वाहणारे हे वारे जमिनीकडे सरकत असताना ज्या वेळी विषुववृत्त ओलांडतात, त्या वेळी पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांची दिशा बदलते व ते नैऋत्य दिशेने भारतीय उपखंडावर प्रवेश करतात. म्हणून त्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हटले जाते. हे वारे समुद्रावरून येताना मोठे बाष्प घेऊन जमिनीवर प्रवेश करतात. ज्यामुळे पुढील तीन-चार महिने भारतीय उपखंडाला पाऊस मिळतो.
नैऋत्य मोसमी वारे भारतात प्रवेश करताना त्यांच्या दोन शाखा तयार होतात. एक शाखा अरबी समुद्रातून भारतात पश्चिमेकडून प्रवेश करते, तर दुसरी शाखा बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडून प्रवेश करते. सर्वसाधारणपणे पश्चिमेकडून येणाऱ्या शाखेचे नैऋत्य मोसमी वारे १ जून रोजी भारताच्या दक्षिणेकडील केरळ राज्यात प्रवेश करतात. तेथून गुजरातच्या दक्षिण भागापर्यंत असणाऱ्या पश्चिम घाटाला धरून हे वारे उत्तर दिशेने आपला प्रवास सुरू करतात. या दरम्यान बाष्पयुक्त वारे पश्चिम घाटांतील पर्वतांमुळे उंचावर जाऊन घाटाच्या परिसरात आणि कोकणात मोठा पाऊस देतात. यामुळे या भागांत जंगले आढळतात. मात्र, पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागाला या प्रवासादरम्यान तुलनेने कमी पाऊस मिळतो. ७ जूनपर्यंत या वाऱ्यांचा प्रवास महाराष्ट्रापर्यंत येऊन पोचतो.

‘मान्सून ही अतिशय गुंतागुंतीची हवामानशास्त्रीय घटना असल्यामुळे त्यावर प्रभाव टाकणाऱ्या सर्व घटकांचा नेमका अंदाज आल्याशिवाय अचूक अंदाज वर्तवणे कठीण आहे. अधिकाधिक निरीक्षणे आणि अत्याधुनिक पद्धती वापरून येत्या काळात मान्सून अंदाज अधिक अचूक होऊ शकेल.’ 
डॉ मेधा खोले (उपमहासंचालक, आयएमडी)

त्याच वेळी बंगालच्या उपसागरातील मान्सूनची शाखा ओरिसा, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांतून हिमालयाच्या पायथ्याशी पोचते. तेथून मान्सून मैदानी भागात प्रवेश करून पंजाब, हरयाणा, जम्मू-काश्मीपर्यंत पोचतो. सर्वसाधारणपणे १५ जुलै रोजी राजस्थानच्या पश्चिम भागांपर्यंत नैऋत्य मोसमी वारे पोचून ‘मान्सून’ भारत व्यापतो. पुढील अडीच महिने तो या भागाला वर्षांतील एकूण पावसाच्या ८० टक्के पाऊस देतो.
पावसाळा
‘मान्सून’ने एकदा भारत व्यापल्यावर अंतर्गत भागांत आलेल्या बाष्पापासून पाऊस पडण्यासाठी वेळोवेळी कमी दाबाची क्षेत्रे तयार होणे आवश्यक असते. एखाद्या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यावर त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रांतून मोठय़ा प्रमाणावर बाष्प ओढले जाऊन ते वातावरणात उंच-उंच जाते. यातून पावसाच्या ढगांची निर्मिती होते. असे क्षेत्र वेळोवेळी तयार होण्यासाठी तापमानातील बदलांचीही आवश्यकता असते. त्यामुळे पाऊस पडण्यासाठी फक्त बाष्प असून चालत नाही तर त्याला अनुसरून हवामानाचे इतर घटकही अनुकूल व्हावे लागतात.
२००९ मध्ये अशी कमी दाबाची क्षेत्रेच तुलनेने कमी निर्माण झाल्याने पाऊस कमी झाल्याचे दिसून आले. काहीवेळा समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन चक्रीवादळांची निर्मिती होते. त्यामुळे समुद्रातून अधिकाधिक बाष्प ओढले जाते. ते चक्रीवादळ जमिनीच्या जवळ आले अथवा त्याने किनारपट्टी ओलांडली की, समुद्रातून प्रचंड प्रमाणात आणलेल्या बाष्पापासून कमी कालावधीत मोठा पाऊस पडतो. त्यामुळे अतिवृष्टी होते. कमी दाबाचे क्षेत्र जितके अधिक काळ सक्रिय राहतील तेवढा काळ अंतर्गत भागांत पाऊस चांगला पडतो. मान्सूनच्या कालावधीत पश्चिम किनारपट्टीवर कोकण ते केरळपर्यंत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे (ट्रफ) किनारपट्टीच्या भागात पाऊस पडतो. याचे प्रमाण अंतर्गत भागातील पावसापेक्षा खूप जास्त असते.
महाराष्ट्राच्या अंतर्गत भागाचा विचार केल्यास, अरबी समुद्र जवळ असला, तरी पश्चिम घाटामुळे अरबी समुद्राकडून येणारे वारे अंतर्गत भागांत पोचत नाहीत. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात राज्याला मिळणारा पाऊस बंगालच्या उपसागरावर अवलंबून राहतो. बंगालच्या उपसागरात एखादे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आणि ते आंध्र प्रदेश, ओरिसाच्या दरम्यान किनारपट्टीजवळ असले, तर महाराष्ट्राला चांगला पाऊस मिळतो. एका हंगामातील चांगल्या पावसासाठी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांची संख्या, तीव्रता, त्यांची समुद्रातील स्थिती आणि कालावधी या गोष्टी अवलंबून असतात. हे सर्व घटक जुळून येणाऱ्या कालावधीत मोठा पाऊस पडतो.
‘मान्सून’ स्थिरस्थावर झाल्यावर राजस्थानपासून पश्चिम बंगालपर्यंत आडवा ‘मान्सून’चा कमी दाबाचा पट्टा तयार होतो (मान्सून ट्रफ). हा पट्टा त्याच्या सामान्य स्थितीपेक्षा उत्तरेला किंवा दक्षिणेलाही सरकतो. तो ज्या दिशेला सरकेल त्या भागांत त्या कालावधीत पावसाचा जोर वाढत असल्याचे दिसून येते.
अनेकदा कमी दाबाच्या क्षेत्रांच्या आणि बाष्पाच्या अभावामुळे ‘मान्सून’मध्ये खंड पडतो. हा खंड मोठा असल्यास कमाल, किमान तापमानात वाढ सुरू होते. अशा वेळेस स्थानिक हवामानात बदल होऊन दुपारनंतर विजांसह ‘थंडरशॉवर्स’ होऊ शकतात. तांत्रिकदृष्टय़ा हा पाऊस ‘मान्सून’चा नसला, तरी हंगामातील पावसामध्ये त्याची नोंद करण्यात येते.
सर्वसाधारणपणे ‘मान्सून’च्या पावसाची काही वैशिष्टय़े –
– हा पाऊस विजांच्या कडकडाटासह पडत नाही.
– ‘मान्सून’चा पाऊस एकाच गावात, जिल्ह्य़ात पडत नाही, तर तो राज्यात, विभागात सर्वदूर पडतो.
– आगमनादरम्यान वेगाने बदल न होता एकाच गतीने सतत पडणारा पाऊस ‘मान्सून’चा असतो, अन्यथा तो पूर्वमोसमी असू शकतो.
परतीचा मान्सून
याआधी पाहिल्याप्रमाणे सूर्याच्या उत्तरायणामुळे उत्तर गोलार्धातील जमीन तापून जमिनीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. त्याचप्रमाणे २२ सप्टेंबरला सूर्य पुन्हा विषुववृत्त ओलांडून दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो. या कालावधीत विषुववृत्तादरम्यान समुद्र तापायला सुरुवात होते. समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होत असल्याने जमिनीवर जास्त दाबाचे, तर समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते व जमिनीवरून समुद्राकडे उलट दिशेने वारे वाहू लागतात. याला परतीचा ‘मान्सून’ म्हणतात. या वाऱ्यांची दिशा ईशान्येकडून असल्याने त्याला ईशान्य मोसमी पाऊसही म्हणतात. या वाऱ्यांमध्ये बाष्प अतिशय कमी असल्याने वार्षिक पर्जन्यमानाच्या फक्त २० टक्के पाऊस या वाऱ्यांमुळे मिळतो. देशाच्या पूर्व किनाऱ्याला मुख्यत: आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये परतीच्या ‘मान्सून’कडून मोठा पाऊस मिळतो. सर्वसाधारणपणे ऑक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवडय़ात ‘मान्सून’चे वारे भारतीय उपखंडाला सोडून पुन्हा समुद्रात जातात. मात्र, तामिळनाडूमध्ये नोव्हेंबर-डिसेंबपर्यंत पाऊस पडतो. आयएमडीच्या नोंदींसाठी कागदावर मान्सून १ जून ते ३० सप्टेंबर कालावधीसाठी मोजला जात असला, तरी केरळमध्ये त्याची दाखल होण्याची तारीख आणि तामिळनाडूमधून तो बाहेर पडण्याची तारीख दर वर्षी बदलत असते.
चक्रीवादळे
‘मान्सून’ कालावधीत अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यावर समुद्रात चक्रीवादळांची निर्मिती होते. चक्रीवादळांचा समुद्रावरील प्रवास जेवढा अधिक तेवढी वादळाला ऊर्जा आणि बाष्प अधिक मिळते. सर्वसाधारणपणे उत्तर उष्णकटीबंधीय प्रदेशात जून ते डिसेंबर हा चक्रीवादळ तयार होण्याचा कालावधी असतो. त्यामुळे ‘मान्सून’ परतला तरी नोव्हेंबर-डिसेंबरमध्येही चक्रीवादळांचा फटका बसू शकतो. २००९ मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘फियान’ या चक्रीवादळाने नोव्हेंबरच्या मध्यात कोकणाला झोडपले होते.
भारतीय मोसमी पावसाची सरासरी
भारतातील सर्व राज्यांचा विचार केल्यास, विषुववृत्तापासूनचे त्यांचे स्थान, समुद्रापासूनचे अंतर, पर्वतरांगा, वाळवंट अशा भौगोलिक घटकांमुळे तेथे पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणातही फरक दिसून येतो. पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी, दक्षिण भारत, तसेच पर्वतरांगांचा भाग असणाऱ्या ईशान्य भारतात पावसाचे प्रमाण प्रचंड असताना वाळवंट आणि कोरडय़ा असणाऱ्या राजस्थान, तसेच गुजरातचा पूर्व भाग, मराठवाडा या भागांत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या प्रमाणाचा तेथील भौगोलिक रचनेवर, तसेच पिकांच्या पद्धतीतही परिणाम झाला आहे.
मान्सून जागतिक घटना
भारतीय उपखंडावर नैर्ऋत्य मोसमी पाऊस पडत असला, तरी मान्सून ही फक्त भारतीय उपखंड आणि लगतच्या महासागरांशी संबंधित घटना नाही. विषुववृत्तादरम्यानच्या उष्णकटिबंधीय प्रदेशात सूर्याच्या लंबरूप किरणांमुळे असणाऱ्या अधिक तापमानाचा या घटनेवर सर्वाधिक परिणाम होतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे उष्णकटिबंधीय प्रदेशातील हवामान स्थानिक राहत नाही, तर त्यावर संपूर्ण पृथ्वीवर घडणाऱ्या असंख्य नैसर्गिक, भौगोलिक घटनांचा परिणाम होत असतो. म्हणूनच प्रशांत महासागरात गरम पाण्याचे प्रवाह (एल निनो) निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम ‘मान्सून’वर होतो. १९९७ मध्ये ज्या वेळी ‘एल निनो’ सर्वात तीव्र होता, मात्र भारतात सरासरीएवढा पाऊस झाला होता, त्या वेळी जगभरात मात्र, या ‘एल निनो’मुळे अनेक ठिकाणी चक्रीवादळे, कोरडा दुष्काळासारखी विरुद्ध स्थिती निर्माण होऊन लाखोंना आपले प्राण गमवावे लागले होते. अशाच प्रकारे पृथ्वीवर सतत होणाऱ्या विविध नैसर्गिक क्रियांचा थेट परिणाम नैर्ऋत्य मोसमी पावसावर होत असतो. या सर्व घटनांचा आणि त्यांच्या मान्सूनशी असणाऱ्या संबंधांचा उलगडा जोपर्यंत हवामानशास्त्रज्ञांना होणार नाही, तोपर्यंत लहरी ‘मान्सून’चे गूढ कायमच राहणार आणि अधूनमधून त्यांचे अंदाज पूर्णपणे चुकणार.