News Flash

लक्तरे वेशीवर

एका बाजूला प्राणवायूची देशभरात जाणवणारी कमतरता आणि त्याच वेळेस प्राणवायूच्या टाकीतून झालेल्या गळतीमुळे प्राणवायूअभावी २४ रुग्णांना प्राण गमवावे लागणे हा मोठा दैवदुर्विलासच.

‘करोनाविरुद्धचे युद्ध’ असा केवळ शब्दप्रयोग करतोय; मात्र प्रत्यक्षात युद्धाची तयारीच केलेली नव्हती असे आता या दुसऱ्या लाटेने लक्तरे वेशीवर टांगल्यामुळे सिद्ध झाले आहे!

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

एका बाजूला प्राणवायूची देशभरात जाणवणारी कमतरता आणि त्याच वेळेस प्राणवायूच्या टाकीतून झालेल्या गळतीमुळे प्राणवायूअभावी २४ रुग्णांना प्राण गमवावे लागणे हा मोठा दैवदुर्विलासच. त्यातच आपला जवळचा नातेवाईक प्राणवायूअभावी प्राण कंठाशी येऊन प्राण सोडतो आहे, हे याचि डोळा पाहावे लागणे हे तर त्याहूनही वाईट. नाशिकमध्ये प्राणवायूअभावी गेलेले बळी ही बुधवारची घटना आणि त्यानंतर गुरुवारी देशभरात झालेला अभूतपूर्व असा रुग्णविस्फोट, एकाच दिवशी तब्बल ३ लाख १४ हजार ८३५ रुग्ण सापडणे हा जागतिक उच्चांक ही आपल्याला केवळ खजील करणारी नाही तर चिंताजनक वाटावी अशी बाब. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत कोविड सेंटरमध्ये लागलेल्या आगीमध्येच प्राण गमावण्याचीही वेळ अनेक रुग्णांवर आली. या  सर्व घटना आपल्या आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या आहेत.

करोनाच्या हाताळणीला आता वर्ष उलटून गेले. ती कदाचित शून्यापासून केलेली सुरुवात होती, कारण करोना काय, कसा, त्याचा प्रसार या संदर्भातील सर्वच गोष्टी संपूर्ण जगालाच नव्या होत्या. मात्र त्यानंतर वर्षभरात बरेच काही घडले, नवे लक्षात आले. त्याच वेळेस याचीही कल्पना विज्ञानामुळे आपल्याला होती की, गेल्या काही वर्षांत अशाच प्रकारचे विषाणू थैमान ज्या ज्या वेळेस झाले, त्या त्या वेळेस त्या ठिकाणी किमान चार ते पाच लाटा येऊन गेल्या. असे असतानाही यंत्रणा गाफील राहिली. यात राज्य किंवा केंद्र असा कोणताही भेद नाही. हे गाफील राहाणे दोन्ही पातळ्यांवर होते. गेल्या वर्षांच्या अनुभवानंतर आपण त्यातून शिकणे अपेक्षित होते. पण आपण कोणताच धडा घेतलेला दिसत नाही. गेल्या वर्षी आपण शून्य रेषेवरून सुरुवात केली, तर यंदाची सद्य:स्थिती पाहाता आपण शून्य रेषेखाली उणे अंकांमध्ये खालच्या दिशेनेच प्रवास करत आहोत. मग विषय सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा असो किंवा मग राज्य पातळीवर घ्यावयाच्या परीक्षांचा असो! पाटी दोन्ही बाबतीत कोरीच दिसते आहे. ऑक्सिजनची गरज या रुग्णांना मोठय़ा प्रमाणावर लागणार हे माहीत होते. दुसरी लाट मोठी अपेक्षित होती, त्याचे इशारे देण्याचे काम तज्ज्ञ मंडळी वेळोवेळी करतच होती. पण आपली पाटी कोरी ठेवण्यातच आपण धन्यता मानली. आणि आता चर्चा आहे ती दुसऱ्या टाळेबंदीची. सुरुवात महाराष्ट्रात कडक र्निबधांनी झालेली असली तरी येणाऱ्या काळात जवळपास देशातील प्रत्येक राज्याचा प्रवास याच दिशेने होणार असे सध्याचे चित्र आहे.

सध्या आणखी एक साथ वेगाने पसरते आहे ती प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याची. मग ते रेमडेसिविर असो किंवा मग ऑक्सिजनपुरवठा अथवा लसउपलब्धता. कोविडकाळातनंतर राजकारणाची खुमखुमी पूर्ण करून घेण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत, याचीही जाण ठेवणे गरजेचे आहे.

कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये बहुतांश शहरी भाग विळख्यात होता, मात्र आता दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागाला विळखा आणि त्याचा फटका अधिक बसलेला दिसतो आहे. एकाच चितेवर चार ते पाच मृतदेह ठेवून त्यांना अग्नी देण्याची नामुष्की यावी याशिवाय आपल्या व्यवस्थेचे िधडवडे ते आणखी काय असावेत? ग्रामीण भागात कोविडची भयाण लाट येऊ शकते, याची कल्पनाच आपण केलेली नव्हती असे व्यवस्थांमधल्या समोर येणाऱ्या त्रुटींमधून लक्षात येते आहे.

युद्ध नसणारा शांततेचा काळ किंवा युद्धबंदी अथवा शस्त्रसंधीचा काळ हा लष्करासाठी सज्जतेचा काळ मानला जातो. या कालखंडात जेवढा घाम गाळला जातो, तेवढे रक्त प्रत्यक्ष युद्धात कमी सांडते अशा आशयाची म्हणही रूढ आहे. आपण ‘करोनाविरुद्धचे युद्ध’ असा केवळ शब्दप्रयोग करतोय; मात्र प्रत्यक्षात युद्धाची तयारीच केलेली नव्हती असे आता या दुसऱ्या लाटेने लक्तरे वेशीवर टांगल्यामुळे सिद्ध झाले आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 3:25 pm

Web Title: oxygen leakage at nasik oxygen shortage coronavirus covid 19 mthitartha dd 70
Next Stories
1 विज्ञानच तारेल!
2 वर्धापनदिन विशेष : हे जीवन सुंदर आहे!
3 बदलती समीकरणे!
Just Now!
X