scorecardresearch

सत्यनारायणाची कथा

सध्या शुभमंगल कार्याचा हंगाम सुरू असल्याने महाराष्ट्रातील गावागावांतील ध्वनिक्षेपकांवरून ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ हे कथागीत ऐकू येत आहे. सत्यनारायण अशी खरोखरच देवता आहे का? काय आहे तिचे उगमस्थान?

सध्या शुभमंगल कार्याचा हंगाम सुरू असल्याने महाराष्ट्रातील गावागावांतील ध्वनिक्षेपकांवरून ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ हे कथागीत ऐकू येत आहे. सत्यनारायण अशी खरोखरच देवता आहे का? काय आहे तिचे उगमस्थान?

सत्यनारायणाची महापूजा हे मुळात काम्य व्रत. मनकामनापूर्ती हा त्या पूजेमागचा हेतू.
चौरंग, चार केळीचे खुंट, गहू, पाण्याचा कलश, नवग्रहांच्या आणि अष्टदिशांच्या सुपाऱ्या, शाळिग्राम वा बाळकृष्णाची मूर्ती, सव्वाच्या मापाने रवा, तूप, साखर घालून केलेला केळीयुक्त शिरा, पंचामृत, पोथी सांगणारा पुरोहित आणि लाऊडस्पीकर एवढी अल्प सामग्री पूजेसाठी असली तरी चालते. एकदा ही पूजा घातली की नंतर वर्षभर त्या सत्यनारायणाकडे ढुंकूनही पाहिले नाही तरी चालते. एकंदर या व्रतात अटी आणि शर्ती फारशा नाहीतच. प्रसादाचे मनोभावे सेवन हे महत्त्वाचे. तेव्हा असे सोपे व्रत लोकप्रिय होणे स्वाभाविकच.
प्रत्येक मंगलकार्यानंतर किंवा नवस फळला की ही पूजा घालण्याची पद्धत आहे. तशी ती कधीही, कोठेही, कोणीही घातली तरी चालते. म्हणजे घटनेने धर्मनिरपेक्ष असलेल्या आपल्या देशातील आणि पुरोगामी गणल्या गेलेल्या महाराष्ट्रातील विविध छोटी-मोठी सरकारी कार्यालये सोडाच, अगदी मंत्रालयातही ही महापूजा मोठय़ा श्रद्धेने व डामडौलाने घातली जाते. मुंबईतील उरल्या-सुरल्या चाळींमध्ये आणि मध्यमवर्गीयांच्या गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये साधारणत: प्रजासत्ताक दिन हा या पूजेचा मुहूर्त असतो. सध्या शुभमंगल कार्याचा हंगाम सुरू असल्याने महाराष्ट्रातील गावागावांतील ध्वनिक्षेपकांवरून ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ हे कथागीत ऐकू येत आहे. मोठय़ा श्रद्धेने आणि डामडौलाने गावोगावी सत्यनारायणाच्या महापूजा होत आहेत.
पण गेली साधारणत: दोन-अडीचशे वर्षे अत्यंत लोकप्रिय असलेली ही पूजा त्याआधीच्या धार्मिक जीवनाचा भाग नव्हती. ही पूजा शिवकालात नव्हती. छत्रपतींच्या कारकीर्दीत अनेक – विवाह समारंभापासून किल्ले उभारणीपर्यंत – मंगलकार्ये झाली. परंतु शिवाजी महाराजांनी कधी सत्यनारायण घातल्याचे उल्लेख नाहीत. अगदी पेशवाईतसुद्धा ही पूजा घातली जात नव्हती. यादवकाळात हेमाद्रीपंताच्या योगे महाराष्ट्रात जसा व्रतवैकल्यांचा आणि कर्मकांडाचा सुळसुळाट झाला होता, तसाच सुळसुळाट पेशवाईतही होता. त्या काळात येथे यज्ञ, अनुष्ठाने, गोप्रदान, ब्राह्मणांकरवी उपोषण, दाने अशी कृत्ये केली जातच. व्रतांनाही काही सुमार नव्हता. अदु:खनवमीव्रत, ऋषिपंचमीव्रत, शाकाव्रत, मौन्यव्रत, तेलव्रत, रांगोळीचे उद्यापन, प्रतिपदाव्रत, तृतीयव्रत, वातींचे उद्यापन, संकष्टी चतुर्थीव्रत, भोपळेव्रत, गोकुळअष्टमीव्रत, रथसप्तमीव्रत अशी तेव्हाच्या काही व्रतांची यादीच नारायण गोविंद चापेकरांनी त्यांच्या ‘पेशवाईच्या सावलींत’ (१९३७) या संशोधनग्रंथात दिली आहे. पण त्यात कुठेही कोणी सत्यनारायण घातल्याचे नमूद नाही. मग ही पूजा आली कोठून?
सत्यनारायणाची कथा स्कंदपुराणाच्या रेवाखंडात असल्याचे सांगण्यात येते. नैमिष्यारण्यात शौनक वगैरे मुनींनी सूताला विचारले की, मुनिश्रेष्ठा, मनातली सर्व फले कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हांला सांगा. त्यावर सूत म्हणाले, की पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्रीविष्णूला विचारला होता. तेव्हा श्रीविष्णू म्हणाले, की नारदा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. स्वर्गात किंवा मृत्युलोकात कोणालाही माहीत नसलेले असे पुण्यकारक व्रत मी तुम्हाला सांगतो. हे व्रत करणारा सर्वकाळ सुख भोगून शेवटी मोक्षपदास जातो. हे व्रत दु:खाचा नाश करणारे असून धनधान्य व सौभाग्य व संतती देणारे आहे. याला श्रीसत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात.
थोडक्यात प्रत्यक्ष विष्णूने नारदमुनींना सांगितलेले असे हे व्रत स्कंदपुराणातून आपल्यासमोर येते. हा स्कंद म्हणजे शिवाचा पुत्र. त्याच्या नावाने हे पुराण प्रसिद्ध आहे. पण ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या मते ‘हे जुने स्कंदपुराण बहुतकरून अजिबात नष्ट झालेले दिसते. कारण स्कंदपुराण असे नाव असलेली आज एकही रचना उपलब्ध नाही.’ मग आज जे स्कंदपुराण आहे ते काय आहे? केतकर सांगतात, माहात्म्ये, स्तोत्रे, कल्पे वगैरे मोठा ग्रंथसंग्रह स्कंदपुराण या नावाखाली मोडतो आणि एकंदरच एखाद्या स्थळाचे वा गोष्टीचे माहात्म्य वाढवायचे असल्यास त्यावर एक पुराण रचून ते स्कंदपुराणातील म्हणून दडपून सांगतात व अशा रीतीने स्कंदपुराण फुगलेले आहे. हे ज्ञानकोशकार केतकरांचे मत. आता सत्यनारायणाचे व्रत अगदी दोन-अडीचशे वर्षांपूर्वीपर्यंत नव्हते आणि स्कंदपुराणात कथा, माहात्म्ये घुसडली जातात या दोन गोष्टी एकत्र पाहिल्या की सत्यनारायण कथेवरील प्राचीनतेचे वलय गळून पडते. ही कथा आणि खरे तर देवताच नंतर कोणी तरी घुसडली असल्याचे दिसते. कारण या देवतेचा उल्लेख हिंदूंच्या अन्य कोणत्याही प्राचीन धार्मिक ग्रंथात नाही. तेव्हा प्रश्न असा येतो की या देवतेस कोणी जन्मास घातले? सत्यनारायणाची कथा मुळात आली कोठून?
तर त्याचे उत्तर आहे – बंगालमधून. तेथील एका मुस्लिम पीराच्या कथेमधून. तिचे नाव – सत्यपीरेर कथा.
सत्यनारायणाच्या कथेचे हे उगमस्थान आतापावेतो अनेकांना ऐकून माहीत आहे. मराठी ज्ञानकोशातही त्याचे संकेत दिलेले आहेत. आणि यात विचित्र, धक्कादायक असे काहीही नाही. याचे कारण हिंदुस्थानचा इतिहास हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील राजकीय संघर्षांचा जेवढा आहे तेवढाच त्यांच्यातील सामाजिक सौहार्दाचादेखील आहे. आणि हे सौहार्द आध्यात्मिक क्षेत्रातीलसुद्धा आहे. एकमेकांशेजारी राहणारे दोन धर्म यांचा एकमेकांवर परिणाम होणे हे नैसर्गिकच होते. हिंदुस्थानात आल्यानंतर इस्लाम बऱ्याच प्रमाणात बदलला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अरबस्थानाच्या वाळवंटातील शुष्क, रेताड वातावरणात निर्माण झालेला हा धर्म पाच नद्यांच्या हिरव्या, पाणीदार परिसरात आल्यानंतर बदलणारच होता. हिंदुस्थानात प्रारंभी आलेले सुफी संत येथील ‘काफिर जनतेला खरा दिन आणि मजम्हब शिकविणे’ हे आपल्यासमोरील मोठे आव्हान मानत असत. तेच त्यांचे राजकारण होते. पण पुढे सुफी चळवळीचे स्वरूपही बदलले. येथील धर्माना समजावून घेतले पाहिजे, असे एक मत येथील मुस्लिमांमध्ये निर्माण होणे ही खरे तर इस्लामचे एकूण आक्रमक स्वरूप पाहता एक क्रांतीच मानावयास हवी. ही क्रांती अकबर, दारा शुकोह यांच्या रूपातून येथे पाहावयास मिळते. दुसरीकडे पैगंबराच्या मूळ शिकवणुकीशी विपरीत असलेल्या अनेक गोष्टींचा अंगीकार येथील मुस्लिमांनी केल्याचे दिसून येते. हीच गोष्ट उलट बाजूनेही घडत होती. इस्लाममधील एकेश्वरवाद, मूर्तिपूजेस विरोध अशा तत्त्वांचा खोल परिणाम येथील हिंदू धार्मिकांवरही होत होता. बंगालमधील भक्ती चळवळ, महाराष्ट्रातील भागवत चळवळ, झालेच तर नाथ संप्रदाय यांवरील सुफीवादाचा परिणाम सर्वज्ञात आहे. हे झाले अर्थातच तत्त्वज्ञानाच्या पातळीवर. प्रत्यक्ष व्यवहारातही हिंदू समाज मोठय़ा प्रमाणावर सुफी साधुसंत आणि पिरांच्या भजनी लागलेला होता. एवढा की समर्थ रामदासांनी त्याबद्दल ब्राह्मणांना ताडले आहे. ‘कित्येक दावलमलकास जाती, कित्येक पीरास भजती, कित्येक तुरूक होती, आपले इच्छेने’ अशी खंत त्यांनी दासबोधात व्यक्त केली आहे. अशीच गत बंगालमध्येही होती.
साधारणत: चौदाव्या शतकापर्यंत बंगालमध्ये मुस्लीम सत्ता रुजली होती. सत्तेची, साम्राज्यवादाची धामधूम सुरू असतानाचा काळ हा नेहमीच संघर्षांचा असतो. तेथे शांततामय सहजीवन वगैरेंस वाव नसतो. मात्र एकदा सत्ता नीट रुजली की शासनकर्त्यां वर्गाला प्रजा म्हणजे आपली लेकरे वगैरे उच्च तत्त्वांचा आठव येतो. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात बंगालच्या गादीवर आलेल्या अलाउद्दीन हुसैनशाहच्या दरबारात वजीर, मुख्य चिकित्सक, टांकसाळीचा मुख्य अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर हिंदू येतात ते शासनकर्त्यां वर्गाच्या याच भूमिकेमुळे. ही राज्यकर्त्यां वर्गाने सत्तेच्या स्थैर्यासाठी घेतलेली शांततामय सहजीवनाची भूमिका असते. त्यात धर्म आडकाठी आणत असेल, तर त्याच्या निरपेक्ष काम करण्यासही त्यांची ना नसते. अलाउद्दीन हुसैनशाहच्या कारकीर्दीत हे पाहावयास मिळते. हा शासक चैतन्य महाप्रभूंचा समकालीन आहे. त्याला त्याची हिंदू प्रजा कृष्णाचा अवतार मानत असे. त्याच्याच काळात बंगालमध्ये सत्यपीर नामक आंदोलनाला प्रारंभ झाल्याचे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. मात्र त्याचे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत. मुळात सत्य पीर नावाचा कोणी पीर अस्तित्वात होता की नव्हता याबद्दलच शंका आहेत. काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सत्यपीराचा पंथ बंगालमध्ये लोकप्रिय असला, त्याचे काही दर्गे अस्तित्वात असले तरी सत्यपीर हे एक मिथक आहे. असे असले तर आपला मूळ प्रश्न अजून सुटलेला नाही, की ही सत्यपीरेर कथा आली कोठून? ते पाहण्यासाठी आपणास बंगालमधील एका अन्य पंथाकडे जावे लागेल. हा पंथ आहे शाक्तांचा.
शाक्त ईश्वराला पाहतात ते जगन्माता, जगज्जीवनी या स्वरूपात. बंगालमध्ये शाक्तपंथीयांचा मोठा जोर होता. त्यांच्यामुळे मनसादेवी, चंडीदेवी, गंगादेवी, शीतलादेवी अशा स्थानिक देवतांचे पूजासंप्रदाय वाढू लागले होते. यातील शीतलादेवी ही महाराष्ट्रातही पुजली जाते. ती गोवर, कांजण्या यांसारख्या संसर्गजन्य रोगांची देवता. मनसादेवी ही सर्पाची अधिष्ठात्री तर चंडी ही गरिबांची, पशूंची संरक्षक देवता. या प्रत्येक देवतेच्या निरनिराळ्या कथा, काव्ये होती. त्यातील मनसा मंगलकाव्य हे आपल्यासाठी महत्त्वाचे. या काव्यात एक चांद सौदागर आहे. तो चंपकनगरात राही. शिवाने असे भविष्य वर्तविले होते, की जोवर हा मनुष्य मनसादेवीची उपासना करणार नाही, तोवर मनुष्यलोकात कोणीही तिला पुजणार नाही. तेव्हा मनसादेवीने त्याला आपली पूजा करण्यास परोपरीने सांगितले. त्याने ऐकले नाही. तेव्हा तिने आपले सर्पसैन्य पाठवून चांद सौदागराची गुआबारी नामक नंदनवनासारखी बाग उद्ध्वस्त केली. चांदचा मित्र मारला. सहा मुले मारली. हे दु:ख विसरावे म्हणून चांद सौदागर समुद्रपर्यटनास निघाला. तर मनसादेवीने त्याची सहाही जहाजे बुडवली. असे बरेच काही झाले. पुढे चांद सौदागराच्या एका सुनेने आपल्या सासऱ्यास मनसादेवीची पूजा करायला लावली आणि मग देवीने चांदाची बुडविलेली जहाजे, गुआबारी वन, त्याचा मित्र, त्याची मुले असे सगळे परत दिले. या मनसादेवीवरचे अठराव्या शतकापूर्वी उपलब्ध झालेले सुमारे साठ ग्रंथ आहेत. त्यातील हरिदत्त हा एक ठळक ग्रंथकार असून, तो बाराव्या शतकातला आहे.
या मनसा मंगलकाव्य आणि अशाच प्रकारचे चंडिकाव्य यांचे कलम सत्यपीराच्या कथेवर करण्यात आल्याचे स्पष्टच दिसते. मराठी विश्वकोश याबद्दल सांगतो, की ‘हिंदू व मुसलमान या दोन प्रमुख धर्ममतांच्या अनुयायांच्या सहजीवनातून धर्मकथांच्या मिलाफाची प्रक्रिया आकारास आली आणि सत्यपीर व सत्यनारायण या व्रतकथांचा जन्म झाला. १५५० मध्ये रचलेल्या शेखशुभोदय या ग्रंथापासून ही प्रवृत्ती दृष्टीस पडते व अठराव्या शतकातील घनराम कविरत्न, रामेश्वर भट्टाचार्य व भारतचंद्र राय यांच्या सत्यनारायण पांचाली या काव्यात ती प्रकर्षांस पोचलेली दिसते.’ गोष्ट सरळ आहे. मुस्लिमांतील पीराच्या मिथकाला शाक्तपंथीय देवतांच्या कथेचा साज चढविण्यात आला आणि त्याची सत्यपीरेर कथा तयार करण्यात आली. पीराचा संप्रदाय सर्वसामान्यांत लोकप्रिय होता. असिम रॉय त्यांच्या ‘द इस्लामिक सिन्क्रेटिस्टिक ट्रॅडिशन ऑफ बंगाल’ या ग्रंथात अशी मांडणी करतात, की पीर आणि पीर संप्रदायाची ही लोकप्रियता हे तत्कालीन ब्राह्मणी पुरोहितशाहीसमोरील एक आव्हानही होते आणि संधीही. त्यावर त्यांनी आपल्या पारंपरिक रीतीनुसार उत्तर शोधले. ते म्हणजे सत्यपीराचे सम्मिलीकरण करण्याचे. रॉय म्हणतात, सत्यपीराच्या परंपरेवर लिहिणारांत मुसलमानांहून अधिक हिंदू आहेत यात म्हणूनच काहीही आश्चर्य नाही. तर यातीलच कोणा चलाख गृहस्थाने सत्यनारायणाच्या या कथेला प्राचीनतेची आभा चढावी म्हणून ती स्कंदपुराणाच्या रेवाखंडात घुसडून दिली. बहुसंख्य हिंदू धार्मिक बाबतीत अडाणीच असतात. त्यामुळे त्याचे व त्याच्यासारख्या अनेकांचे व्यवस्थित फावले इतकेच.
सत्यपीरातून उत्क्रांत झालेली सत्यनारायणाची ही कथा अठराव्या शतकापासून महाराष्ट्रात गायली जाऊ लागली होती. तशा व्रतकथा महाराष्ट्रात काही कमी झाल्या नाहीत. एक चित्रपट येतो आणि आपल्याकडे संतोषीमातेच्या पूजेची लाट येते. एखादा ध्वनिफितींचा बडा व्यावसायिक येतो आणि शनिपूजेला मानाचे स्थान देऊन जातो. पण अशा पूजा शतकानुशतके टिकत नसतात. सत्यनारायणाची टिकली याचा अर्थ त्यात सर्वसामान्यांना आकर्षित करून घेणारी मूलद्रव्ये ठासून भरलेली आहेत. या कथेत नेहमी पुराणकथांमध्ये आढळणारा दरिद्री ब्राह्मण आहे. मोळीविक्या म्हणजेच शूद्र आहे. उल्कामुख नावाचा राजा आहे. तो अर्थातच क्षत्रिय आणि साधू नावाचा वाणी म्हणजे वैश्य आहे. एकंदर सत्यनारायण ही देवता चारही वर्णाचे भले करणारी आहे. केवळ कधी तरी पूजा करणे, त्याचा गोड प्रसाद सेवन करणे यायोगे बुडालेली जहाजेही वर आणून देणारी अशी ही देवता आहे. हे तिच्या लोकप्रियतेचे गमक आहे. एका इस्लामी मिथकापासून तयार झालेली ही कथा आज हिंदूंची महत्त्वाची धार्मिक खूण बनली आहे. एकंदर सत्यनारायणाच्या कथेइतकीच तिच्या मागची ही कथा मोठीच रंजक आहे.
रवि आमले

मराठीतील सर्व टाचणी आणि टोचणी ( Taachanianitochani ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Satyanarayana story

ताज्या बातम्या