05 April 2020

News Flash

प्रारब्ध-योग

स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांसारखे सत्पुरुष भक्ताचं प्रारब्ध सुधारत अखंड त्याला घडवत असतात

स्वामी समर्थ

शब्दार्त
चैतन्यप्रेम – response.lokprabha@expressindia.com

स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांनी जिथं पाऊल ठेवलं तिथं न्यून म्हणून काही उरत नाही, असं नमूद करून ‘तारक मंत्र स्तोत्रा’ची पुढील दोन कडवी प्रारब्ध आणि मृत्यू या दोन विषयांना स्पर्श करतात. ही कडवी अशी आहेत..

जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय

आज्ञेविणा काळ ना नेई त्याला

परलोकही ना भीती तयाला ॥२॥

उगाची भितोसी भय पळू दे

जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे

जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा

नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ॥३॥

खरं तर यात, ‘स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय’ ही एक ओळ प्रारब्धाची भीती घालवू पाहते आणि उरलेल्या सहा ओळी मृत्यूची भीती घालवू पाहतात. आता प्रारब्ध म्हणजे काय? त्यासाठी कर्म आणि त्याच्या फळांविषयी सनातन तत्त्वज्ञान काय सांगतं, याचा संक्षेपानं विचार करू. कर्म तीन प्रकारचं असतं. क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध. आपण जे जे कर्म करतो ते क्रियमाण असतं. काही कर्माचं फळ तात्काळ मिळतं. जसं की, भूक लागली, आपण भोजन केलं आणि त्यानं भूक शमली. म्हणजेच अन्न ग्रहण करण्याचं, जेवण्याचं कर्म घडलं आणि भूक भागण्याचं फळ देऊन ते कर्म शांत झालं. म्हणजे त्या कर्माचं कोणतंही फळ शेष राहिलं नाही. काही कर्माचं फळ तात्काळ मिळत नाही. अशी क्रियमाण र्कम संचित कर्मात जमा होतात. या कर्माची फळं काही काळानं लाभतात. उदाहरणार्थ आज परीक्षा दिली, पण त्याचं फळ म्हणजे उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण होणं, हे काही महिन्यांनी निकाल जाहीर होताच लाभतं. नोकरीसाठी आज मुलाखत दिली, पण त्याचं फळ म्हणजे नोकरी मिळणं वा न मिळणं, हे काही कालावधीनंतर लाभलं. आज शेतात बी पेरलं, पण त्याचं फळ म्हणजे पीक येणं, हे काही महिन्यांनंतर लाभतं. तेव्हा या प्रकारे अनेक संचित कर्माचं फळ काही कालावधीनंतर, पण याच जन्मी लाभतं. मात्र बरीच संचित र्कम अशीही असतात, ज्यांचं फळ याच जन्मात मिळत नाही. अशी कर्मच ‘प्रारब्ध’ म्हणून जीवाच्या खात्यात जमा होत असतात. महाभारताच्या युद्धात शंभरच्या शंभर कौरव मारले गेले. त्यानंतर वानप्रस्थाश्रमात असलेल्या धृतराष्ट्रानं कृष्णाला एकदा न राहवून विचारलं होतं की, ‘माझे शंभर पुत्र मारले गेले, इतकं माझं प्रारब्ध वाईट का होतं?’ त्यावर कृष्णानं धृतराष्ट्राला अनेक जन्मांपूर्वी त्याच्याच हातून घडलेलं कृत्य दाखवलं! त्या जन्मात धृतराष्ट्र एक शिकारी होता. शिकार करताना त्यानं एक वृक्ष पेटवून दिला होता. त्या आगीत त्या झाडावरील एका पक्षिणीची शंभर पिल्लं भस्मसात झाली होती! पोटच्या शंभर पुत्रांचा मृत्यू सोसावा लागण्याचं ते कर्मफळ अनुकूल काळाची वाट पाहात जन्मोजन्मी प्रारब्ध स्वरूपात संक्रमित होत होतं. मग जेव्हा शंभर पुत्र जन्मावेत आणि त्यांच्याही प्रारब्धाचं पारडं मृत्यू येईल अशा कुकर्मानी जड झालेलं असावं असा सगळा जन्म-योग जुळून आला तेव्हाच त्या प्रारब्धाचं फळ धृतराष्ट्राच्या जीवनात भोगरूपानं आलं! तेव्हा प्रारब्ध आहेच. आता प्रारब्ध म्हणजे निव्वळ वाईटच असतं, दु:खभोग म्हणजेच प्रारब्ध, असं नव्हे. सत्कर्मानंही सुखभोगाचं प्रारब्ध वाटय़ाला येतंच.

आता काही जण प्रारब्ध वगरे मानत नाहीत. माणसाला एकच जन्म आहे त्यात तो त्याच्या प्रयत्नांनीच जीवन घडवू शकतो, असं काही जण हिरिरीनं सांगतात. पण जन्म जर एकच असता, तर प्रत्येकाच्या जीवनात सुरुवातीपासूनच समान अनुकूलता का नसावी? प्रत्येक जण सुखी, निरोगी का नसावा? एखाद्याला कमी प्रयत्नांत यश का मिळतं आणि एखाद्याला अनंत काळ त्यापेक्षा उत्तम प्रयत्न करूनही यश हुलकावणी का देतं, हे प्रश्न अनुत्तरित राहतात. तेव्हा प्रारब्धाचा सिद्धांत मान्य करावाच लागतो.

पण हा सिद्धांत नकारात्मक विचारांना बळ देण्यासाठी, कर्तृत्वाला शून्य लेखण्यासाठी वा नाकारण्यासाठी निश्चितच नाही. उलट प्रारब्धात चांगलं फळ असतानाही त्यासाठी आवश्यक प्रयत्नरूपी कर्म केलं नाही, तर ते फळही हुकतं, असंच हा सिद्धांत सांगतो. समजा, परीक्षेत उत्तम यश मिळावं, यासाठी प्रारब्धही अनुकूल आहे; पण मी अभ्यासच नीट केला नाही, उत्तरपत्रिकाच नीट लिहिली नाही, तर प्रारब्धात असूनही मी उत्तीर्ण होणार नाही! म्हणजेच काळाची, परिस्थितीची, माणसांची आणि प्रारब्धाची अनुकूलता असली तरी या सगळ्याला प्रयत्नांची जोड नसेल, तर काहीही साध्य होत नाही.

स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांसारखे सत्पुरुष भक्ताचं प्रारब्ध सुधारत अखंड त्याला घडवत असतात; पण मीही त्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे. निदान त्या प्रयत्नांना विपरीत वर्तन टाळलं पाहिजे ना? त्यांच्या बोधानुरूप, सांगण्यानुरूप मी वागत नाही तोवर काळ, परिस्थिती, माणसं आणि मुख्य म्हणजे सद्गुरू कृपा या बाबतीत सगळं अनुकूल असूनही मी जर प्रयत्नांची जोड दिली नाही, तर काय उपयोग? तेव्हा प्रारब्ध खरं असलं तरी प्रयत्नांचं मोलही खरंच आहे.

‘मत्स्यपुराणा’च्या २२१व्या अध्यायातही मत्स्यदेवांनी दैव श्रेष्ठ आहे की पुरुषार्थ श्रेष्ठ आहे, अर्थात प्रारब्ध श्रेष्ठ की प्रयत्न श्रेष्ठ, या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. यात कर्माचं महत्त्व मांडताना मत्स्य भगवान म्हणतात :

स्वमेव कर्म दैवाख्यं विद्धि देहान्तरार्जतिम्?

तस्मात् पौरुषमेवेह श्रेष्ठमाहुर्मनीषिण:?

प्रतिकूलं तथा दैवं पौरुषेण विहन्यते?

मंगलाचारयुक्तानां नित्यमुत्थानशालिनाम्?

म्हणजे आधीच्या अनंत जन्मांत केलेलं कर्मच या जन्मी दैव बनून, प्रारब्ध बनून वाटय़ाला आलेलं असतं. त्यामुळे जसं कर्म तसं फळ, हे लक्षात घेता कर्मालाच अधिक महत्त्व आहे. त्यामुळे या जन्मी दैवाची साथ नसली, प्रारब्धभोग वाईट असले तरी माणसानं निराश न होता सत्कर्मेच केली पाहिजेत आणि कर्तव्यकम्रेही अचूकतेनं पार पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जो सदैव सत्कर्म करण्याबाबत तत्पर असतो आणि अभ्युदयशील म्हणजे भौतिक कर्तव्यकर्म पार पाडतानाच आध्यात्मिक साधनाही प्रामाणिक प्रयत्नांनी नेटानं करीत असतो, अशा माणसाचं प्रतिकूल असलेलं दैवही पालटू शकतं!

काही वेळा प्रयत्न करूनही जर प्रारब्ध पालटत नसेल, तर ते सकारात्मक वृत्तीनं स्वीकारायलाही समर्थानी शिकवलं आहे. प्रारब्धामुळे माणसानं हातपाय गाळून, निराश होऊन कुढत जगू नये. परिस्थितीचा स्वीकार करून साधनतत्पर मात्र राहावं, असंच स्वामी सुचवतात. त्या दृष्टीनं एक प्रसंग पाहण्यासारखा आहे.

अक्कलकोटला असताना विसाजी नावाचा एक गृहस्थ समर्थाची सदैव िनदा करीत असे. समर्थ लोकांवर इतके कोपतातच कसे, असा त्याचा प्रश्न असे. जो इतका कोप करतो तो आध्यात्मिक वृत्तीचादेखील नाही, मग अवतारी असण्याची गोष्टच सोडा, असा पवित्रा घेत तो लोकांशी वाद घालत असे. एकदा एका कीर्तनकाराच्या कीर्तनाला अलोट गर्दी जमली होती. त्याचं खरं कारण होतं ते म्हणजे स्वत: स्वामी समर्थ कीर्तनाला हजर होते! त्या गर्दीतच विसाजीसुद्धा होता. मोक्षावर कीर्तन होतं आणि बुवा सांगू लागले की, ‘मोक्षासाठी सगळी ऋणं फिटलीच पाहिजेत. त्यात एक ऋण आहे ते पितृऋण. आपल्या पित्यानं आपल्याला जन्म दिला आहे. तसं जेव्हा आपण एका पुत्राला जन्म देऊ, तेव्हाच हे पितृऋण मिटेल. त्याशिवाय नाही! आणि जोवर पुत्रप्राप्ती होत नाही तोवर मोक्ष नाही!’ हे ऐकताच विसाजी अस्वस्थ झाला होता. कारण तो निपुत्रिक होता! त्याचं मन दु:खानं व्यापलं असतानाच स्वामी समर्थ जोरात कडाडले, ‘ही मोक्षाची शिकवण आहे की मोहाची? कशाला खोटं सांगतोस? अरे, माणूस त्याच्या कर्मानुसारच मोक्ष मिळवतो किंवा बंधनात पडतो! शेकडो पुत्र आहेत एवढय़ा बळावर एखाद्या कुकर्मी माणसाला मोक्ष मिळेल काय?’ त्यानंतर समर्थानी तिखट स्वरात विचारलं, ‘नारद, भीष्म, शुकाचार्य हेसुद्धा निपुत्रिकच होते. मग त्यांना मोक्ष मिळाला नाही काय?’

या प्रश्नावर बुवा निरुत्तर झालेच, पण विसाजीचे डोळेही उघडले. समाजाचं किंवा तो समाज ज्या माणसामुळे घडतो त्या माणसाचं पाऊल मोहामुळे वाकडं पडताच स्वामींसारखे सत्पुरुष कोप धारण करतात, हे तर त्याला उमगलंच, पण परिस्थितीला दोष देत न बसता सकारात्मक वृत्तीनं ती स्वीकारण्याचं बळही त्याला मिळालं. पुत्र होणं प्रारब्धात असो वा नसो, पण नारदांप्रमाणे भक्तिमान होण्याच्या आड येण्याची प्रारब्धाची िहमत नाही!

स्वामी समर्थाना एकदा बाळप्पा या भक्तानं प्रारब्धाबाबत काही प्रश्न केला होता. गुरुकृपेनं हे प्रारब्ध नष्ट होत नाही का, असं त्यानं विचारलं होतं. तेव्हा प्रारब्ध हे विपरीत प्रारब्धात परिवíतत झालं, तर ते भोगण्यावाचून गत्यंतर नसतं. तेव्हा प्रारब्ध हे विपरीत प्रारब्धात रूपांतरित होऊ नये, यासाठीच भक्तीचा मार्ग आहे, असं समर्थानी सांगितलं.

म्हणजे काय? तर माणूस जन्माला येतो तेव्हाच त्याचं बरं-वाईट प्रारब्धही त्याच्या पाठीशी असतं; पण जगताना तो नवं प्रारब्ध निर्माण करण्याचाही धोका असतोच! त्यामुळे वाटय़ाला आलेलं प्रारब्ध भोगत असतानाच सत्पुरुषाच्या कृपाछायेखाली निदान या जन्मात तरी त्यानं मोह, असूया, मत्सर, द्वेष, आसक्ती, भ्रम टाळण्याचा अभ्यास केला पाहिजे. तो अभ्यास प्रामाणिक असला पाहिजे. असं झालं तरच जुनं प्रारब्ध भोगून संपत असतानाच नव्या दु:खभोगयुक्त प्रारब्धाची बीजं पेरली जाणार नाहीत. मग सद्गुरू बोधानुरूप जीवन घडवू लागलो तरच, आहे त्या प्रारब्धालाही सद्गुरू कसं वळण लावतात, ते प्रारब्ध भोगताना त्या भोगात अनपेक्षित मदतीचे आधार कसे उभे करतात आणि दु:ख भोगण्याचं बळही कसं देतात; याचा प्रत्यय यायला लागतो! ‘जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय’ या वचनाचा हा प्रत्यय मनाची उमेद वाढविणाराच असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2020 1:02 am

Web Title: swami samartha akkalkot
Next Stories
1 राशिभविष्य : दि. ६ ते १२ मार्च २०२०
2 तारेवरची कसरत
3 वाहन उद्योगाला ई-चार्जिग
Just Now!
X