lp15
‘स्वाइन फ्लू’बाबत सध्या सगळीकडे धोक्याची घंटा वाजवली जात आहे. त्या पाश्र्वभूमीवर ‘स्वाइन फ्लू’ म्हणजे नेमके काय, त्याच्याबाबत नेमकी काय आणि कशी काळजी घ्यायची असते अशा मुद्दय़ांची चर्चा.

दि. २८ मार्च २००९ रोजी दक्षिण कॅलिफोर्नियातील व टेक्सास येथील सॅन एॅटोनिया भागातील मानवी आरोग्य जगतात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाइन नावाच्या वादळाने प्रवेश केला व ते स्वाइन नामक रोगाचे वादळ सर्वदूर पसरत गेले ते अजूनही शमले नाही. चार वर्षांच्या ‘ब्रेक’नंतर पुन्हा ते उग्ररूप धारण करू पाहत आहे.
बीबीसी या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने जागतिक आरोग्य संघटनेमार्फत सर्व देशांना ‘इन्फ्लूएंझा ए’ (एच १ एन १)च्या मानवी संसर्गाबाबत सर्वप्रथम वृत्तांत देऊन जागरूक केले व पब्लिक हेल्थ इमर्जन्सी जाहीर करण्यात आली. सेंटर फॉर डीसीज कंट्रोल या संकेतस्थळावरून या आजाराबद्दल सर्वाना माहिती देण्यात आली.
स्वाइन फ्लू या आजाराबाबत सर्वाच्याच मनात येणारे प्रश्न व त्यांचा खुलासा खालील प्रमाणे-
स्वाइन फ्लू म्हणजे काय?
स्वाइन फ्लूला मेक्सिकन फ्लू, स्पॅनिश फ्लू, एच १ एन १, इन्फ्लूएंझा ‘ए’ अशी समानार्थी नावे आहेत. या रोगाचा संबंध श्वसनवहन संस्थेशी येत असल्याने यास ‘श्वास रोग’ असेही म्हणतात. वस्तुत: या रोगाचे विषाणू हवेत वर्षभर असतात. परंतु हिवाळ्याच्या सुरुवातीस व उशिरा पावसाच्या काळात ते रोगनिर्मितीसाठी सज्ज होतात. हवेच्या झोतासोबत बाधित (इनफेक्टेड) माणसांमुळे ही साथ सर्वदूर झपाटय़ाने पसरते. त्यामुळे या साथीस ‘पांडेमीक’ (जनपदोध्वंस) म्हणतात. थोडक्यात साथीच्या रोगाची लाट थोडय़ाच कालावधीत आख्ख्या जगभर नेणाऱ्या विषाणूंच्या सुनामीला ‘पांडेमीक’ म्हणतात. ही साथ, रोगप्रणाली केवळ आपल्या शरीरावरच हल्ला करत नाही तर तिच्यामुळे संपूर्ण जगाच्याच अर्थव्यवस्थेवरही हल्ला होतो.
स्वाइन फ्लूच्या जंतू (विषाणू)ची थोडक्यात माहिती काय आहे?
स्वाइन फ्लूचा विषाणू (व्हायरस) हा एक महाविचित्र असा अतिसूक्ष्मजीव प्रकार आहे. त्याच्यात अन्न पचवायची (मेटाबोलीझम) प्रक्रिया अजिबात होत नसून तो परोपजिवी असतो. हे जंतू इतके इतके सूक्ष्म असतात की त्यांचा आकार ५०० मायक्रॉन म्हणजे टाचणीच्या टोकावर १५० कोटी इतके स्वा. फ्लूचे विषाणू अगदी आरामात राहू शकतात. साध्या सूक्ष्मदर्शका खालीसुद्धा न दिसणारा असा एक अर्थ ‘व्हायरस’ या नावाने विसाव्या शतकाच्या सुरुवातीस प्रचलित झाला. ‘व्हायरस’ शब्दाचा लॅटीन भाषेतला अर्थ ‘विष’ असा आहे तो उगाचंच नाही! तर अशा या (खोड)गुणी बाळाचा आकार धोतऱ्याच्या फळासारखा (बोंडासारखा) असतो. त्याच्यावर काटे असतात. त्या काटय़ांचे दोन प्रकार असतात. पैकी एकास एच वन दुसऱ्यास एन वन म्हणतात. एका विषाणूत असे ७८०० काटे असतात. त्याचा वापर तो श्वासनलिका पोखरण्यासाठी करतो. फ्लूचा विषाणू हवेतून जाताना स्वत:भोवती एक सुरक्षाकवचासारखा कोट (चिलखत) वापरतो. वैद्यकीय भाषेत या कोटाला ‘कॅप्सिड’ म्हणतात. गरम वातावरणात ही चिलखत विरघळली जाते. त्यामुळे या रोगाचा प्रसार थंड वातावरणात होतो. स्वा. फ्लूचे विषाणू हवेत आठ तास जिवंत राहू शकतात. आपली जनुकीय वेशभूषा (जेनेटिक कोड) सतत बदलत राहणे व आपल्या अनेक आवृत्त्या काढत राहणं हेच विषाणूंचं एकमेवकाम असतं. एका दिवसात साडेचार हजार नवीन विषाणू तयार होतात. सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात वातावरणातील थंडी वाढते. परिणामी या महिन्यात ही साथ आपले उग्ररूप धारण करेल अशी शक्यता वाटते.
या आजाराची लक्षणे असतात तरी कोणती?
थंडी, ताप १०० अंश, जास्त सर्दी, खोकला, अंगदुखी, घसा सुजणे, खवखवणे, दुखणे, मळमळ, उलटी, जुलाब व पोटदुखी या लक्षणांचा समावेश या आजारात असतो.
याचा प्रसार कशा प्रकारे होतो?
याचा प्रसार बाधित माणसाकडून नॉर्मल माणसास होत असतो. स्वाइन फ्लू विषाणू बाधित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकण्यातून हवेत उडणाऱ्या तुषारातील विषाणू धूलिकणाच्या स्वरूपात जिवंत राहतात. नॉर्मल व्यक्ती जेव्हा अशा दूषित वातावरणात (कॅरिअर क्लायमेट) जाते तेव्हा श्वसन करताना नाका-तोंडावाटे संसर्ग होऊन मग ती व्यक्तीही आजारी पडते. हवेतून प्रसार होण्याच्या या आजार प्रकारास वैद्यकीय भाषेत ‘एअर बॉर्न डिसीज’ म्हणतात. बाधित व्यक्तीच्या नाकातोंडावाटे बाहेर पडणाऱ्या दूषित कफास नॉर्मल व्यक्तीने स्पर्श केला तरीही आजार होऊ शकतो. या रोगाचा प्रसार मुख्यत्वे वराह (डुक्कर) पाळणारे व त्यांचे मांस विक्री, भक्षण करणारे यांच्याद्वारे होण्याची शक्यता दाट असते. ज्यावेळी बाधित माणूस खोकतो-शिंकतो त्यावेळी विषाणू हवेतून नॉर्मल व्यक्तीच्या श्वसन संस्थेत प्रवेश करतो व आपल्या शरीरावरील कोट (चिलखत) विरघळवतो व पुढच्या कुकर्मासाठी सुरुवात करतो. बाधित रुग्णलक्षणे सुरू होण्याच्या एक दिवस आधीपासून पुढील सात दिवस इतरांना आजार पसरवू शकतो.
स्वाइन फ्लूचा प्रसार ‘पाच’ पातळ्यांतून होत असतो.
१) जनावरापासून जनावराला (एका डुकरापासून दुसऱ्या डुकराला)
२) डुकरापासून माणसाला
३) माणसापासून दुसऱ्या माणसाला
४) माणसांच्या घोळक्यातून इतरांना
५) इतरांपासून विस्तारित भागातील मोठय़ा समूहांना, समाजाला.
विषाणूने श्वसननलिकेत, अन्ननलिकेत प्रवेश केल्यानंतर तो तेथील पेशी पोखरतो व आपली ‘पिल्लावळ’ वाढवतो. तेथील पेशींना कुरतडल्याने तेथे सूज येते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊन दमायुक्त खोकला सुरू होतो. खोकल्यातून दूषित स्राव जिभेवर येऊन तो स्राव परत पोटात पसरला जाऊन उलटय़ा, पोटदुखी, जुलाब सुरू होतात आणि मग हे विष सर्व शरीरभर पसरले जाते.
या रोगाचे निदान कसे केले जाते?
बहुतांशी डॉक्टर लक्षणांवरून ‘रॅपीड डायग्नॉसीस’ पद्धतीने निदान करू शकतात. पण याचे निदान नकारात्मक (-ve) झाले तरीही आपणास हा आजार नाही अशी शंभर टक्के खात्री देता येत नाही. फक्त प्रयोगशाळेत (लॅब इन्व्हेस्टिगेशन) करूनच स्वा. फ्लू आहे किंवा नाही हे कळते. यासाठी घशातील, नाकातील स्रावाचे (स्पुटम) नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासता येतात. तपासणीचा अहवाल २४ तासानंतर मिळतो.
कोणत्या व्यक्तीस जास्त धोका (रिस्क) असतो?
१) ज्यांना फुप्फुसाचे जुनाट (क्रोनिक) आजार आहेत- उदा. टी.बी., न्यूमोनिया, दमा अशांना या आजाराचा धोका जास्त.
२) मूत्रपिंडाचे तीव्र आजार.
३) हृदयविकार.
४) यकृताचे तीव्र आजार.
५) मधुमेही व्यक्ती.
६) रोग प्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती.
७) मेंदूजन्य आजारांची तीव्रावस्था.
८) वृद्ध व्यक्ती व पाच वर्षांखालील मुले.
९) गर्भवती महिला.
१०) एड्स बाधित रुग्ण.

उपायोपचार काय आहेत?
स्वाइन फ्लू हा विषाणूजन्य आजार आहे. बहुतांशी विषाणू कोणत्याच औषधांना दाद देत नाहीत. परंतु सुदैवाने स्वाइन फ्लूचे विषाणू मारणारी औषधे उपलब्ध आहेत हे विशेषच म्हणावे लागेल. अशी औषधे दोनच आहेत. Oseltamivir (टॅमीफ्लू) व रिलेंझा (झानामीवीर) ही औषधे तोंडावाटे घ्यावी लागतात. ‘शीकिमिक’ नावाच्या आम्लावर रासायनिक प्रक्रिया करून टॅमीफ्लूची गोळी बनवली जाते. चीनमध्ये सापडणाऱ्या ‘स्टार अमाइन’ नावाच्या फळात हे आम्ल सापडते. महाराष्ट्रातील प. घाटावर अशा वनस्पती आहेत की, ज्यात हे आम्ल सापडते.
टॅमीफ्लुची कॅप्सूल सकाळ व संध्याकाळी याप्रमाणे पाच दिवस घ्यावी. दहा वर्षांखालील रुग्णांना टॅमीफ्लूचे पातळ औषध उपलब्ध आहे. स्वाइन फ्लूची लागण झाल्यापासून ४८ तासांच्या आत अशा गोळय़ा घ्याव्या लागतात. टॅमीफ्लू फक्त एक वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना देता येते. रिलेंझा हे औषध सात वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना देता येते, मात्र श्वसन संस्थेचा इतर आजार असणाऱ्या रुग्णास रिलेंझा देता येत नाही, कारण त्यामुळे श्वसनाचा पहिला आजार उद्भवू शकतो.
स्वाइन फ्लूवरील औषधाचे दुष्परिणाम (साइट इफेक्ट्स) म्हणून उदासीनता, छातीत धडधड वाटणे, भीती वाटणे, उलटय़ा होणे, पित्त वाढणे असे त्रास होऊ शकतात.
ताबडतोब वैद्यकीय मदत केव्हा घ्यावी?
१) श्वास घेण्यास जास्त त्रास होत असल्यास. तसेच छाती किंवा पोटात दाबल्यासारखे वाटत असल्यास.
२) त्वचेचा रंग निळसर (सायनोसिस) झाल्यास.
३) न बोलता, न हलता रुग्ण पडून राहिल्यास.
४) अचानक चक्कर यायला लागल्यास, संभ्रमावस्था आल्यास.
५) गंभीर किंवा सतत उलटय़ा सुरू झाल्यास.
६) साध्या फ्लूसारखी लक्षणे आढळली व त्यावरही ताप व भयंकर खोकला सतत येत असल्यास, पुरळ येऊन ताप येत असल्यास.

सरकारी, खासगी दवाखान्यात लस आली आहे पण घ्यावी की नाही?
खरे तर लसीकरण हा आजार होण्यापूर्वीच करण्यात येणारा तरणोपाय आहे. कोणतीही लस खात्रीशीर असेल तर ती घेण्यात कोणताच तोटा नसतो. स्वाइन फ्लूच्या लसीचे क्लिनिकल डाटाज (रुग्णावरील माहिती) सकारात्मक आली आहे. त्यामुळे लस अवश्य घ्यावी.
स्वाइन फ्लूच्या बाबतीत बोलायचे झाले तर या आजाराच्या बाबतीत गोची काय होते की स्वाइन फ्लूचे विषाणू प्रत्येक वेळी आपली जनुकीय रचना (जेनेटिक कोड) सतत बदलत असल्याने लशीवर सातत्याने संशोधन करून त्यात वेळोवेळी मूलभूत बदल करत बसावे लागते. प्रतिबंधक औषधे स्वाइन फ्लूवर उपचार म्हणून किंवा त्यांचा संसर्ग होऊच नये म्हणून दिली जातात. ही औषधे (टॅमीफ्लू किंवा रिलेंझा) विषाणूंचे पुनरुत्पादन थांबवतात. लक्षणे दिसण्याच्या अगोदर ४८ तासांच्या आत पाच ते सात दिवस ती घ्यावी लागतात. स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस घेतली तरीही फक्त एक वर्षांपर्यतच तिचा उपयोग होतो. कारण प्रत्येक वेळी होणारा स्वाइन फ्लू एच वन एन वन या कोडमुळेच होईल असे नाही. कदाचित एच टू एन टू किंवा एच थ्री एन थ्री यामुळेही होईल. त्यामुळे त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी लस नाही.

हा रोग झाल्यावर धडपड तर करावीच लागते. पण तो होऊच नये यासाठी काय हालचाल करावी, खबरदारी घ्यावी?
१) ठ-९५ मास्क किंवा नाका-तोंडासमोर सतत रुमाल धरून संसर्ग रोखता येतो. मास्कचा वापर आठ तासांपेक्षा जास्त वेळ केल्यास तो योग्य तऱ्हेने र्निजतुक करून पुन्हा वापरावा.
२) सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या नळाच्या, गाडीच्या दरवाजा सायबर कॅफेतील माऊस किंवा कीबोर्डचा वापर केल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
३) गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. डोळे, नाक व तोंड यांना स्पर्श करणे टाळावे. अशानेच जंतूंचा प्रसार होतो.
४) आपली रोगप्रतिकारशक्ती कायम टिकून राहील यासाठी उपाययोजना कराव्यात. यासाठी आसन-प्राणायाम-व्यायामांची मदत घ्यावी. लिंबू, आवळा, मोसंबी, हिरव्या पालेभाज्या ज्यातून ‘व्हिटॅमिन-सी’ मिळते असा आहार घ्यावा. पुरेशी झोप घ्यावी. पाणी भरपूर प्यावे.
५) इतरांशी हस्तांदोलन, आलिंगन टाळावे.
६) स्वाइन फ्लूचा रुग्णच जर घरात शेजारी असेल तर त्याच्यापासून चार ते पाच फूट लांब राहावे.
७) सकाळी घराबाहेर पडताना नाष्टा करूनच जावे, कारण उपाशीपोटी संसर्गाचा धोका जास्त असतो.
८) शाळा, हायस्कूल यांना आठ दिवस सुट्टी द्यावी. सुट्टीनंतरही मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नये.
९) थंड वातावरणात हा विषाणू जास्त फैलावत असल्याने पंखा, ए.सी., कुलर यांचा जास्त वापर करू नये.
१०) आरोग्य शासनामार्फत वेळोवेळी होणाऱ्या सूचना, मार्गदर्शनांचा अवलंब करणे.
डॉ. सचिन गुरव