04 June 2020

News Flash

कथा : टार्गेट

काय पब्लिक मॅड आहे. पडद्यावरच्या खोटय़ा छप्पनवाल्याला पाहायला गर्दी करतेय, पण खराखुरा छप्पनवाला येथे, अगदी आपल्याला खेटून बसलाय याची कुणालाच, खुद्द टार्गेटलाही दाद नाही.

| December 5, 2014 01:13 am

काय पब्लिक मॅड आहे. पडद्यावरच्या खोटय़ा छप्पनवाल्याला पाहायला गर्दी करतेय, पण खराखुरा छप्पनवाला येथे, अगदी आपल्याला खेटून बसलाय याची कुणालाच, खुद्द टार्गेटलाही दाद नाही.

त्याने घडय़ाळाकडे पुन्हा एकदा पाहिले. सकाळीच टी.व्ही.वरून घडय़ाळ मिनिट-टू-मिनिट बरोबर असल्याची त्याने खात्री करून घेतलीच होती. आणखी पाच मिनिटांनी निघायला हवे. तयार झाल्यावर तिसऱ्यांदा त्याने आरशात पाहून सर्व मनासारखे आहे याची खातरजमा केली.

‘‘मी जरा बाहेर जातोय गं, यायला उशीर होईल’’- बेडरूममध्ये अजून लोळत पडलेल्या बायकोला उद्देशून त्याने आवाज दिला.

सरलाबाई धडपडत उठून घाईघाईने बाहेर आल्या. ‘‘कुठे जाताय? आणि श्शीऽऽ, हे काय चढवलंत अंगावर? मर्तिकाला जातानासुद्धा यापेक्षा बरी कापडं असतात लोकांची.’’ त्या फणकारल्या.

त्याने प्रत्युत्तराबद्दल फक्त एक चिडका, निर्थक ‘‘ह्य़ाँ ऽऽ’’ सारखा काही तरी स्वर काढीत हातवारे केले. त्याचा अर्थ ‘‘गप्प बस’’, ‘‘तुला कोणी पंचाईत सांगितली आहे?’’, ‘‘माझ्या भानगडीत पडू नकोस’’ असा काहीही घेता आला असता. जुनी ढगळ पँट आणि तसाच ढगळ बुशकोट त्याने विचारपूर्वक निवडला होता, पुन्हा पुन्हा आरशात पाहून हा ड्रेसच आज योग्य असल्याची त्याने खात्री करून घेतली होती. त्यात तो एखाद्या बुजगावण्यासारखा आता येथे दिसत असला तरी बाहेरच्या गर्दीत तो शंभरातला एक असा विनासायास मिसळून जाईल यात त्याला संदेह नव्हता.

आपल्या बोलण्याचा काहीच परिणाम न झालेला पाहून सरलाबाईंचा पारा आणखी वर चढला.

‘‘आताशा चालवलंय तरी काय नक्की तुम्ही? सारखं तंद्रीत असल्यासारखं वागायचं, जरा विचारलं की चिडायचं आणि खोलीत कोंडून नाही तर तरातरा बाहेर पडायचं. समजायचं काय आम्ही? काय मनात आहे ते स्पष्ट सांगून टाका म्हणजे तुम्हाला पण मोकळं वाटेल आणि आमचीपण काळजी कमी होईल.’’

आता तरी तो काही तरी बोलेल या अपेक्षेने त्या त्याच्याकडे पाहात राहिल्या. तरी त्यांची काहीही दखल न घेता त्याने स्पोर्टस् शूजच्या नाडय़ा बांधल्या. वरच्या अवताराशी ते जरा विसंगत होते खरे, पण आज सँडल किंवा चपला चालल्या नसत्या.

सरलाबाई पुन्हा करवादल्या- ‘‘आणि काय हो, नक्की कुठे तडमडायला जाताय? कुठे मसणात जाता ते खरं सांगून जात जा. परवा म्हणालात देसायांकडे जातो आणि दोन तासांनी देसाईच पत्ते कुटायला येथे हजर!’’

‘‘जातोय कुठे तरी. यायला उशीर होईल’’- चिडक्या आवाजात बायकोकडे न पाहता पुटपुटत तो तडक बाहेर पडला. झपझप पावले टाकीत बस टर्मिनलच्या जवळ आल्यानंतर मात्र त्याने वेग मंदावला व एका टपरीच्या आडोशाने तो टेहळू लागला. तीन नंबर प्लॅटफॉर्मला बस अजून लागली नव्हती. पंधरा-वीस जण क्यूमध्ये उभे होते, पण त्यात आजचे टार्गेट नव्हते.

गेले दोन शुक्रवार त्याने रेकी केली होती आणि दर शुक्रवारी या वेळेला या बसने टार्गेट फ्लोराफाऊंटनपर्यंत प्रवास करते याबद्दल तो ठाम होता. दोन-चार मिनिटांतच हवा असलेला लाल बुशकोट क्यूच्या दिशेने जाताना त्याला दिसला. अजूनही बस लागली नव्हती. लाल बुशकोटाच्या मागे आणखी दहा-बारा जण क्यूत सामील झाल्यावर तोही टपरीचा आडोसा सोडून क्यूमध्ये उभा राहिला.

टार्गेटला अगदी क्लोज रेंजवर, भर गर्दीत टिपून निसटायचे होते. अभावितपणे त्याने त्याच्या ढगळ पँटीचा खिसा चाचपला. शॉर्ट बॅरलचे, सायलेन्सर फिट केलेल्या रिवॉल्व्हरला स्पर्श होताच तो पुन्हा सजग झाला.

डबल डेकर लागली आणि एकच झिम्मड उडाली. क्यूला असंख्य पाय फुटले, ‘‘घुसो मत, घुसो मत’’चा आरडाओरडा झाला आणि पाहता पाहता डबल डेकरने सारी गर्दी आपल्या पोटात रिचवली. तो लाल बुशकोटावर पक्की नजर ठेवून होता तरीही काही क्षण बुशकोट नजरेआड झालाच. चपळाईने त्याने लोअरडेकमध्ये मुसंडी मारली आणि तरीही त्याच्या नजरेच्या पट्टय़ांत लाल बुशकोट आला नाही.

गेल्या दोन्ही शुक्रवारी टार्गेटने लोअर डेकमधली उजवीकडची चौथ्या-पाचव्या रांगेतली सीट पकडली होती. आज मात्र खाली कुठेच लाल बुशकोट नव्हता.

त्याने धडपडत, मागून येणाऱ्या पब्लिकच्या शिव्या खात, गर्दीतून वाट काढीत जिना गाठला. वरती लाल बुशकोट पुढून पाचव्या रांगेतली उजवीकडची खिडकी पकडून बसला होता. घाईघाईने त्याने पाठीमागची डावीकडची सीट पकडली तेथून लाल बुशकोट विनासायास नजरेच्या टप्प्यात राहात होता.

कुठल्याशा सिग्नलला बस थांबली. कोपरावरच्या भल्या मोठय़ा पोस्टरमधून नाना पाटेकर ‘अब तक छप्पन’ असे बजावीत होता.

त्याला मनापासून हसू आले. काय पब्लिक मॅड आहे. पडद्यावरच्या खोटय़ा छप्पनवाल्याला पाहायला गर्दी करतेय, पण खराखुरा छप्पनवाला येथे, अगदी आपल्याला खेटून बसलाय याची कुणालाच, खुद्द टार्गेटलाही दाद नाही. आपल्या काही स्पेशल शिकारी त्याच्या मनश्चक्षूंसमोर नाचू लागल्या. तेवढय़ात सिद्धिविनायक चौकाच्या सिग्नलला बस थांबली.

‘‘वा! येथे तर सगळय़ा मास्टरपीसेसचा राजा आपण घडवून दाखवला आणि तेव्हापासून भलेभले आपल्याला सलाम करायला लागले. तो बिल्डर देवळासमोर त्याच्या मर्कमधून दर्शनासाठी उतरतो काय आणि समोरच्या टॉवरच्या गच्चीवरून चक्क तीन-साडेतीनशे फूट लांबून टेलिस्कोपिक गनने आपण त्याला त्या क्षणी अचूक टिपतो काय- कुठून बुलेट आली याचा कुणालाही पत्ता नाही लागला.’’ त्याच्या मुद्रेवर आलेला संतोषाचा भाव मात्र लगेच मावळला. आज त्याची खरी परीक्षा होती. टार्गेटला अगदी क्लोज रेंजवर, भर गर्दीत टिपून निसटायचे होते. अभावितपणे त्याने त्याच्या ढगळ पँटीचा खिसा चाचपला. शॉर्ट बॅरलचे, सायलेन्सर फिट केलेले, एकाच शॉटने किंगकाँगलापण भगदाड पाडण्याची क्षमता असलेल्या रिवॉल्व्हरला स्पर्श होताच तो पुन्हा सजग झाला. हा ‘हॉट रॉड’ तो प्रथमच वापरणार होता. केवळ त्याच्या स्पर्शाने त्याचा आत्मविश्वास परत आला.

धापा टाकीत, गर्दीतून बस वाट काढीत होती. मुंबई सेंट्रल मागे पडले. गिरगाव पार करून मेट्रो दिसू लागले. आता काही मिनिटांचा प्रश्न. लाल बुशकोटच्या पाठोपाठ उतरायचे आणि ‘‘ढिशाँव’’!

‘‘आखरी स्टॉप. सब लोग उतर जाव’’-

कंडक्टरचा पुकारा त्याच्या कानांपर्यंत पोचलात नसावा. आपण नक्की कोठे आहोत हेच त्याच्या प्रथम ध्यानात येईना. डोळय़ांवर लाल-निळे लाइट कोणी तरी मारतोय, आपण अधांतरी तरंगतोय असे काहीबाही त्याला वाटत होते. जेव्हा त्याने कसेबसे डोळे उघडले तेव्हा कंडक्टर पुन्हा वर येऊन, त्याला गदगदा हलवीत, चिडून खेकसत होता.-‘‘काय दुपारीच गोळी चढवली का? पाच मिन्टे बेल मारतोय पण हलायचं नाव नाही. उतरा पयलेछूट खाली.’’

तो आणखीनच गोंधळला. कंडक्टरने मारलेल्या हिसडय़ाने तो भेलकांडत जिना उतरला आणि बसमधून रस्त्यावर कसेबसे पाऊल ठेवताक्षणीच त्याला कुणी तरी जबरदस्त धक्का दिला.

.. त्याच्या घरात हीऽऽ गर्दी जमली होती. ज्या ज्या नातेवाईक व मित्रांना कळले ते धावत आले होते. शेजारी तर काल रात्रीपासूनच जणू काही पहारा देत होते. त्याला बंद बेडरूममध्ये झोपवले होते.

‘‘वहिनी, शरद आला गं!’’ त्याचा धाकटा भाऊ पुण्याहून आल्याची बातमी सरलाबाईंच्या कानावर पडल्याबरोबर त्यांच्या मनाचे बांध पुन्हा एकदा फुटले.

‘‘काय सांगू भावजी,’’ आवेग कमी झाल्यावर सरलाबाईंनी आतापर्यंत वीस-पंचवीस वेळा उगाळलेली हकिकत शरदला ऐकवली.

‘‘अहो, गेले काही महिने अगदी विचित्र वागायचे. वेळीअवेळी बाहेर जायचे, कुठे जातोय, केव्हा परत येणार, काही धड सांगायचे नाहीत. घरी असले तरी काही संभाषण नाही, स्वत:शीच काही पुटपुटत राहतील, बेडरूमचं दार बंद करून आत काही तरी खुडबुडत राहतील, असं अगोचर वागणं! काल दुपारी अगदी घाणेरडय़ा कपडय़ांत बाहेर पडले. फिश मार्केटला जाताना पण त्यापेक्षा बरा अवतार असतो यांचा. चारदा विचारूनदेखील कुठे जातोय सांगेनात. ‘‘उशीर होईल’’ एवढंच पुटपुटले आणि तरातरा निघाले. रात्री दहा वाजले तरी पत्ता नाही. सगळीकडे. चौकशा केल्यावर शेवटी शेजारच्या शंकररावांनी पोलिसांत वर्दी दिली. माझा तर धीरच सुटला होता. भर मध्यरात्री आझाद मैदान पोलीस स्टेशनहून फोन आला. रात्री संशयास्पद स्थितीत तिथे कुठे तरी उभे होते म्हणे. वायरलेस वॅनच्या गस्तीवाल्यांनी हटकले तर म्हणे इतके भेदरलेले होते की तोंडातून शब्द फुटत नव्हता. ओळख सांगेनात. खिसे तपासले तर रिकामे. बहुधा पाकीट कुणी तरी मारलं असावं. खिशात फक्त एक बसचं तिकीट आणि आक्रित म्हणजे दांडा मोडलेली लोखंडी पळी. ही कशासाठी म्हणून विचारल्यावर ‘‘नामुष्कीऽऽ, हॉट रॉडने दगा दिला’’ असे म्हणे काहीबाहीच बरळायला लागले.

‘‘पण हा आझाद मैदानावर अशा अवेळी कशाला गेला असेल?’’ शरदने तिला मध्येच अडवून विचारले- ‘‘नेहमी जायचा का असा?’’

‘‘काही कल्पनाच नाही हो! व्हीआरएस घेतल्यानंतर फोर्टसाइडला जायला खरं म्हणजे काही निमित्त नाही आणि तेही असे उशिरा. नशिबाने पोलीस खूप चांगले निघाले हो. आपण ऐकतो, संशयिताला मारहाणदेखील करतात म्हणून, पण यांना त्यांनीच गोडगोड बोलून शांत केलं, एवढय़ा भर रात्री खायलाप्यायला दिलं आणि बोलतंही केलं. नशीब, स्वत:चं नाव आणि फोन नंबर बरोबर सांगता आला. रातोरात आम्ही त्यांना घेऊन आलो, तर यांना हा ताप भरलेला आणि सारखे ‘‘नामुष्की, प्रथमच टार्गेट निसटलं’’ अशी काहीतरी बडबड.’’ सरलाबाईंनी पुन्हा डोळय़ांना पदर लावला.

‘‘आता कसा आहे तो?’’ शरद.

‘‘इंजेक्शन देऊन झोपून ठेवलंय. करणी केली कुणी तरी, भावजी, नक्की कुणी तरी वाईटावर आहे.’’

.. ‘‘हे पाहा, तुमच्या मिस्टरांना अजून काही दिवस हॉस्पिटलमध्येच ‘अंडर ऑब्झर्वेशन’ राहावे लागेल आणि नंतरदेखील बराच काळ ट्रीटमेंट घ्यावी लागले’’- बडे डॉक्टर समोर बसलेल्या सरलाबाई आणि शरदला समजावीत होते.

‘‘काय झालंय नक्की त्याला?’’-शरद

‘‘आजाराचं विचित्र नाव ऐकून बिचकू नका. त्यांना विशिष्ट प्रकारचा स्किझोफ्रेनिया नावाचा मानसिक विकार आहे. मध्येच ते नॉर्मल असतात तर अधेमधे त्यांना आपण अंडरवर्ल्डमधले कोणी तरी सराईत शार्पशूटर आहोत असा भास होतो.’’- डॉक्टर.

‘‘म्हणजे.. म्हणजे त्यांना वेड लागलंय, हो ना?’’ सरलाबाईंनी हुंदका आवरीत कसेबसे वाक्य पुरे केले.

‘‘अरे देवा, हाच प्रॉब्लेम आहे आपल्या विचारसरणीत. प्रत्येकाला काही ना काही मानसिक ताण असतो आणि त्यामुळे त्याच्या मनोवृत्तीत फरक पडू शकतो हे आपण ध्यानातच घेत नाही. मग जरा काही मानसिक आजार झाला की त्या व्यक्तीला आपण लगेच भरभरीत वेडा ठरवणार, तो अंगावरचे कपडे फाडत, बडबडत, लोकांना धोंडे मारणार इथपर्यंत आपली मजल जाणार आणि आम्हाला मानसोपचारतज्ज्ञ न म्हणता तुम्ही ‘वेडय़ाचे डॉक्टर’ म्हणणार. माझ्यावर विश्वास ठेवा, ते वेडे-बिडे अजिबात नाहीत. योग्य उपचारांनी आपण त्यांना नक्की बाहेर आणू शकू.’’

‘‘आता आम्ही काय करायचं?’’- शरद. ‘‘मुख्य म्हणजे त्यांच्याशी पूर्ण सहानुभूतीने वागा. ही लाँग-टर्म ट्रीटमेंट आहे. या काळात ते खूप चिडचिड करतील. कधी औषध घ्यायचे नाकारतील, कधी कुणावरही काही-बाही संशय घेतील. अगदी पळून जाण्याचा प्रयत्नपण करण्याची शक्यता आहे. सांगायचा मुद्दा, तुम्ही संयम सोडता नाही कामा.’’ डॉक्टर.

‘‘डॉक्टर, हे सगळं अविश्वसनीय वाटतंय हो! त्या रात्री त्यांना नक्की काय झालं, आणि ती मोडकी पळी कशासाठी?’’ शरदने धीर करून विचारले.

‘‘अहो, त्यांच्या मते त्या संध्याकाळी त्यांना अशीच कुणाला तरी शूट करण्याची सुपारी मिळाली होती. मोडकी पळी हाच त्यांचा ‘हॉट रॉड,’ म्हणजे रिवॉल्व्हर! सहसा अशा व्यक्ती खऱ्या शस्त्रासारखे दिसणारे, उदाहरणार्थ, खेळातले पिस्तूल, असे काही तरी बाळगतात, पण एका लोखंडी तुकडय़ाला रिवॉल्व्हर म्हणून स्वीकारणे ही खूपच वरची स्टेज झाली. भावनांचा उद्रेक सहन न झाल्यानेच ते भेदरलेल्या अवस्थेत गेले. पण काळजी नको, गाडी पुन्हा रुळावर येईलच’’- बडय़ा डॉक्टरांनी आश्वासनपूर्वक स्वरांत धीर दिला.

.. तो मात्र अजून हॉस्पिटलमधल्या बेडवर, अर्धवट गुंगीत, एकदा हातातून निसटलेले टार्गेट पुन्हा नक्की कसे टिपता येईल, याचा प्लॅन करीत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2014 1:13 am

Web Title: target
टॅग Story
Next Stories
1 ५ ते ११ डिसेंबर २०१४
2 तितली
3 मिल्या आणि दिल्या
Just Now!
X