scorecardresearch

हरिश्चंद्राचे रखवालदार

हरिश्चंद्रगड हा दुर्ग भटक्यांचा आवडता किल्ला. या उभ्या आडव्या पसरलेल्या गडावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत.

हरिश्चंद्राचे रखवालदार

हरिश्चंद्रगडाला डोंगरभटक्यांची पंढरी म्हटले जाते. पण त्याच डोंगररांगेतली कुंजर, भैरव, कलाड अशी दुर्गचौकडीदेखील तितकीच समृद्ध आहे.

हरिश्चंद्रगड हा दुर्ग भटक्यांचा आवडता किल्ला. या उभ्या आडव्या पसरलेल्या गडावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. दुर्ग भटक्यांनी या वाटा कधी ना कधी तरी तुडवलेल्या असतात. त्यामानाने हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत असलेल्या कुंजरगड (कोंबडगड), भरवगड (कोथळे), कलाडगड, भरवगड (शिरपुंजे) या किल्ल्यांवर फारच कमी दुर्ग भटके जातात. हरिश्चंद्रगडाकडे जाणाऱ्या विविध मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी प्राचीन काळी हे किल्ले बांधले गेले. हे किल्ले  पाहण्याचा बऱ्याच दिवसापासून मानस होता. दोन दिवसात चार किल्ले पाहायचे, त्यांचे जीपीएस मॅपिंग करायचे या उद्देशाने शुक्रवारी रात्री निघालो. नगर जिल्ह्य़ातल्या या भागात मुंबईहून जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. मुंबई-कल्याण-मुरबाड- माळशेज घाटमाग्रे ओतूर-बामणवाडा- कोतुळ किंवा मुंबई- इगतपुरी- घोटी – भंडारदरामाग्रे राजूर या दोनही मार्गाने अंतर जवळजवळ सारखेच होत.

पहिल्या दिवशी कुंजरगड आणि भरवगड (कोथळे) करून पाचनईत मुक्काम करायचा असल्यामुळे आम्ही माळशेज घाटमाग्रे विहीर हे कुंजर (कोंबड) गडाच्या पायथ्याचे गाव गाठले. कल्याण मुरबाडमाग्रे माळशेज घाट चढून आल्यावर अजून एक डोंगररांग आडवी येते, तिला बालाघाट रांग म्हणतात. हरिश्चंद्रगडाच्या मागच्या बाजूस येणाऱ्या या डोंगररांगेवर कलाड, कुंजर, भरवगड इत्यादी किल्ले आहेत. ‘कुंज’ या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती आहे. याचाच अपभ्रंश होऊन ‘कुंजरगड’ असे पडले असावे. हा किल्ला कोंबडगड या नावानेही ओळखला जातो. पावसाळ्यात या भागात तुफान पाऊस पडतो. कधी कधी अनेक दिवस सूर्याचे दर्शन होत नाही. पावसात मनसोक्त भिजत किल्ला पाहायचा असल्यास कुंजरगडासारखा किल्ला नाही. या भागात अनेक सुंदर धबधबे आहेत.

विहीर गाव म्हणजे २०-३० घरांची छोटी वस्ती आहे. गावाच्या बाजूने डोंगर उतारावर थोडीशी भातशेती दिसत होती. त्यामागे कुंजरगड एखाद्या महाकाय हत्तीसारखा पसरलेला दिसत होता. किल्ला चढण्यासाठी एक तास, किल्ला फिरायला एक तास व उतरायला एक तास असा तीन तासांचा अवधी मनात धरून किल्ला चढायला सुरुवात केली. विहीर गावातून कुंजरगडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. त्यातील गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्या मधून जाणाऱ्या वाटेने गडावर पोहोचण्यासाठी कमी वेळ लागतो आणि गडावरील सर्व अवशेष देखील पाहता येतात. या वाटेने गडावर चढतांना साधारणत: गडाच्या पाऊण उंचीवर एक वाट डावीकडे वळते. या वाटेने गडाला वळसा घालून जाताना वाटेत दाट झाडीत उघडय़ावर ठेवलेल्या दोन मूर्ती पाहायला मिळतात. त्यातील एक मूर्ती हनुमानाची असून दुसऱ्या मूर्तीला काळोबा म्हणतात. या मूर्ती येथून हलवून गावात नेऊन मंदिर बांधण्याचा गावकऱ्यांचा मानस होता, परंतु त्यांना हलवणे आजपर्यंत शक्य झाले नाही, अशी कथा गावकरी सांगतात. वाटेत भेटणाऱ्या गावकऱ्याशी गप्पा मारल्या तर अशा अनेक कथा ऐकायला मिळतात. त्या रंजक तर असतातच, पण त्यात माहितीही दडलेली असते.

या मूर्ती पाहून मागे न जाता कडय़ाला लागून असलेल्या वाटेवरून कारवीच्या दाट झाडीतून किल्ल्यावर जाता येते किंवा परत मागे फिरून आलेल्या वाटेने दोन डोंगरामधील िखडीतून गडावर जाता येते. पहिल्या मार्गाने डोंगराला पूर्ण वळसा घालून आपण विहिर गावाच्या विरुद्ध बाजूस पोहोचतो. या बाजूला फोफसंडी गावातून एक वाट येऊन मिळते. किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. अध्र्या पायऱ्या चढल्यावर एक गुहा आहे, या गुहेचे वैशिष्टय़ म्हणजे ती डोंगराच्या आरपार खोदलेली आहे. त्यामुळे एकाच वेळी विहीर आणि फोफसंडी दोनही बाजूस लक्ष ठेवणे शक्य होत असे. पावसाळ्यात व कडाक्याच्या थंडीत / उन्हात या गुहेचा चांगला उपयोग होत असावा. आज या गुहेतून आरपार जाणे कठीण आहे. बेंडखळे सरांच्या ‘भुयार’ या पुस्तकात या गुहेतून त्यांनी केलेल्या प्रवासावर एक रोमहर्षक प्रकरण लिहिलेले आहे. गुहा पाहून पायऱ्यांच्या मार्गाने उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून आपला गडावर प्रवेश केल्यावर उद्ध्वस्त वास्तूचे अवशेष दिसतात. उजव्या बाजूला पाण्याची सुकलेली दोन टाकी दिसतात. या बाजूला किल्ल्याच्या माथ्यावरील पठार अरुंद होत जाते, टोकावरून दूरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. इथून पुन्हा प्रवेशद्वारापाशी येऊन विरुद्ध (डाव्या बाजूच्या) टोकाकडे जाताना वाटेत पाण्याची तीन सुकलेली टाकी दिसतात. पुढे एका मोठय़ा वाडय़ाचे अवशेष दिसतात. या वाडय़ामागे  दगडात कोरलेल्या टाक्यांचा समूह आहे. येथून प्रवेशद्वारापाशी परत आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.

गडावर चढून आलेल्या वाटेने परत न जाता गडाच्या उजव्या बाजूला लागून असणाऱ्या डोंगरावरून खाली उतरताना कपारीतल्या तीन नसíगक गुहा पाहायला मिळतात. गावकरी या गुहांचा उपयोग आपली गुरे बांधण्यासाठी करतात.

कुंजर गावात उतरून बरोबर आणलेला तहानलाडू-भूकलाडू खाऊन १० किमीवरील कोथळे हे भरवगडाच्या पायथ्याचे गाव गाठले. हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी जे अनेक मार्ग आहेत त्यापकी मुख्य मार्ग हा टोलारिखडीतून जातो. पुणे जिल्ह्य़ातील खिरेश्वर आणि नगर जिल्ह्य़ातील कोथळे गावातून टोलारिखडीत जाण्याचा मार्ग आहे. या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भरवगडाची निर्मिती करण्यात आली होती. गडाचा आकार आणि रचना पाहता या किल्ल्याची निर्मिती हरिश्चंद्रगडाच्या काळातच झाली असावी. कोथळे या पायथ्याच्या गावाजवळ डोंगररांग सुरू होते. यात सर्वात प्रथम एक िपडीच्या आकाराचा डोंगर आहे. या डोंगराला ‘कोथळा’ नावाने ओळखतात. त्यापुढे अजून एक शिखर आहे. या शिखरापुढे  थोडी सपाटी असलेला ‘भरवगड’ आणि त्यापुढे उंच ‘गाढवाचा डोंगर’ अशी शिखरांची सुंदर माळ कोथळे गावातून दिसते. भरवगडावरील भरोबा हे स्थानिक लोकांचे दैवत आहे. स्थानिक लोक गडावर जाणाऱ्या दुसऱ्या शिडीखाली आपली पादत्राणे काढून अनवाणी पायाने गडमाथ्यावर जातात. दरवर्षी चत्रात भरोबाची यात्रा भरते.

कोतुळ किंवा विहीर गावातून कोळथे गावाकडे जाताना गावाच्या अर्धा किलोमीटर अलीकडे (राजूरच्या बाजूने येताना कोळथे गावाच्या पुढे) एक कच्चा रस्ता टोलार िखडीकडे जातो. इथे हरिश्चंद्रगड कळसूबाई अभयारण्य असा मोठा फलक लावलेला आहे. टोलार िखडीकडे असा बाण दाखवलेला फलकही आहे. या रस्त्याने दोन मिनिटे चालल्यावर डाव्या बाजूला एक पायवाट जाते. या वाटेवर एका झुडुपाखाली ‘गवळ देवाची’ मूर्ती आहे. ती पाहून मळलेल्या वाटेने शेतांमधून जात पुढे वाट जंगलात शिरते. आता खडा चढ लागतो. साधारण २० मिनिटांत आपण गडाच्या कातळकोरीव पायऱ्यांपाशी पोहोचतो. या पायऱ्यांच्या पुढे डाव्या बाजूला कातळकडय़ाखाली एक पाण्याची टाकी आहे. ते पाहून परत पायवाटेवर येऊन एक वळसा मारल्यावर वनखात्याने बसवलेली पहिली शिडी आहे. शिडी चढून वर गेल्यावर एक वळसा मारल्यावर पायवाटेच्या डाव्या बाजूला कातळाखाली खोदलेली पाण्याची टाकी आहे. याच पायवाटेवर पुढे  खांब टाकदेखील आहे. त्याच्या बाजूला एक बुजलेले टाके आहे. येथे एक अत्यंत विनोदी प्रकार दिसून येतो. वनखात्याने हे बुजलेली टाके साफ करण्याऐवजी त्यावरच दोन लोखंडी बाकडी ठेवलेली आहेत. ट्रेकरुटवर मस्त कातळावर बसकण मारण्याऐवजी कोणी या बाकडय़ांवर बसेल अशी वनखात्याची अपेक्षा असेल तर वनखात्याच्या सुशोभीकरणाला आणि क्रिएटिव्हिटीला दादच द्यावी लागेल.

याच टाक्याजवळच दुसरी मोठी शिडी आहे. ही चाळीस पायऱ्यांची शिडी चढून गेल्यावर एक छोटी आडवी शिडी आहे. त्यानंतर आपण गडमाथ्यावर पोहोचतो. वनखात्यांच्या या शिडय़ांमुळे आज आपण सहजपणे गडावर पोहोचू शकतो.

गडमाथ्याचा विस्तार छोटा आहे. गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला (उत्तरेला) भरवाचे ठाण आहे. त्याच्या बाजूला काही मूर्ती आणि वीरगळ ठेवलेल्या आहेत. समोरच्या बाजूला कातळात कोरलेली पाण्याची दोन टाकी त्यामागे दोन दीपमाळा आहेत. भरोबाच्या मागच्या बाजूला कडय़ावर रेिलग लावलेले आहे.  समोर पसरलेला हरिश्चंद्रगड, त्यावरील तारमती शिखर आणि हरिश्चंद्रगडाची ‘वेताळधार’ स्पष्टपणे दिसते.

भरवाचे दर्शन घेऊन विरुद्ध दिशेला (दक्षिणेला) चालायला सुरुवात केल्यावर समोर भरवगडापेक्षा उंच डोंगर दिसतो. त्याला ‘गाढवाचा डोंगर’ म्हणतात. भरवगड म्हणजे देवाचा रथ आणि त्याच्या पुढचा डोंगर म्हणजे रथ ओढणार गाढव, अशी कल्पना करून स्थानिक लोकांनी या डोंगराला गाढव नाव दिलेले आहे. या डोंगराच्या दिशेने जाताना पाच टाक्यांचा एक समूह पाहायला मिळतो. पुढे गाढवाचा डोंगर आणि भरवगड यांच्यामधील गडाच्या टोकावर तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. भरवगडावरून पश्चिमेला हरिश्चंद्रगड, उत्तरेला शिरपुंज्याचा भरवगड, पूर्वेला कुंजरगड दिसतात.

भरवगड पाहून खाली उतरल्यावर टोलारिखडी माग्रे हरिश्चंद्रगडावर चार ते पाच तासांत पोहोचता येते. आम्हाला दुसऱ्या दिवशी कलालगड आणि शिरपुंज्याचा भरवगड पाहायचा असल्याने आम्ही मुक्कामाला पाचनईत गेलो. जोडून सुट्टी असल्याने पाचनई गाव दुचाकी, चारचाकी गाडय़ांनी भरून गेले होते. त्यावरून हरिश्चंद्रगडावर किती हौशा नवशांची गर्दी असेल याचा अंदाज येत होता. गावात नेहमीच्या वाटाडय़ाकडे जेवणाची आणि झोपण्याची सोय केलेली होती, पण आमचा वाटाडय़ा घरी नव्हता, त्याने आम्ही येणार याचीही कल्पना घरी दिली नव्हती. फोनही लागत नव्हते. पण पर्यटकांच्या सततच्या वावरामुळे हल्ली ‘प्रोफेशनल’ झालेल्या या गावातल्या गृहिणींनी आमची जेवणाची आणि राहण्याची सोय करून दिली. भाकरी-पिठले, डाळ-भात खाऊन आदल्या रात्रीचे जागरण आणि आजच्या दोन किल्ल्यांच्या भेटीने थकलेले शरीर लगेच झोपेच्या अधीन झाले.

सकाळी लवकरच कलाडगडाच्या दिशेने कूच केले. पाचनई गावाच्या मागच्या बाजूला हरिशचंद्रगड, तर समोरच्या बाजूला मुख्य डोंगररांगेपासून सुटलेला डोंगर दिसतो. तोच कलाडगड. हा किल्ला एका बाजूला असल्यामुळे आणि त्यावर जाण्याचा मार्ग कठीण असल्यामुळे येथे फारसा वावर नाही. परंतु एकदा वाट वाकडी करून पाहावा, असा किल्ला आहे.

कलाडगडाच्या पायथ्याचे गाव पेठेवाडी हे गाव पाचनईपासून सात किलोमीटरवर आहे, पण पाचनईपासूनच पाच किलोमीटरवर किल्ल्यावर जाणारी वाट लागते. वनखात्याने इथे सिमेंटचा निवारा बांधल्याने ही जागा शोधणे सोपे झालेले आहे. पाचनईहून खासगी वाहनाने किंवा चालत या निवाऱ्यापर्यंत येऊन उत्तर – दक्षिण पसरलेल्या कलाडगडाच्या धारेवरून चढायला सुरुवात करून दहा मिनिटे दाट झाडीतून चालल्यावर आपण उघडय़ा जागी येतो. येथे काही दगडांना शेंदूर फासून ठेवलेला आहे. त्यामधूनच कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. येथून साधारण अध्र्या तासाचा खडा चढ चढल्यावर आपण कातळात खोदलेल्या खोबण्यांच्या टप्प्यापाशी येतो. या जेमतेम पाय मावतील, अशा खोबण्या कातळात तिरक्या कोरलेल्या आहेत. या खोबण्यात पाय रोवून आणि हाताची मजबूत पकड घेऊन सावधगिरीने हा टप्पा पार केल्यावर आपण भरोबाच्या गुहेपाशी येतो. जमिनीच्या पातळीच्या खाली कातळात खोदलेल्या गुहेत भरोबाचा शेंदूर फासलेला दगड आहे. बाहेरच्या मोकळ्या भागात झिजलेली दोन सर्प शिल्प ठेवलेली आहेत.

भरोबाचे दर्शन घेऊन किल्ल्याच्यामधला डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजूला ठेवत अरुंद पायवाटेवरून दक्षिणेकडे चालत गेल्यावर कातळात खोदलेल्या दोन टाक्यांपाशी पोहोचतो. टाक्यांमध्ये दगड कोसळून टाकी बुजलेली आहेत. टाकी पाहून दक्षिण टोकाकडे चालत गेल्यावर उजव्या बाजूला दोन मोठे गोल दगड आणि एक देवळी आहे. याला वेताळाचा चाळा म्हणतात. हे ठिकाण पाहून आल्या वाटेने टाक्यापर्यंत जाऊन गडाच्या सर्वोच्च माथ्यावर  जाणाऱ्या वाटेने पाच मिनिटांत आपण माथ्यावर पोहोचतो. दक्षिणेकडे अरुंद असलेला गडमाथा उत्तरेकडे रुंद आहे. याच भागात काही घरांची जोती आहेत. किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी तीन तास लागतात. किल्ल्याच्या ज्या धारेवरून आपण चढाई करतो, ती पूर्वेला असल्याने सकाळी लवकर चढाई करावी. त्या वेळी दगड तापलेला नसल्यामुळे त्रास होत नाही.

कलालगड पाहून पाचनईमाग्रे भरवगड शिरपुंजेला जाताना सर्वत्र डोंगर कारवी मोठय़ा प्रमाणत फुललेली दिसत होती. सह्य़ाद्रीच्या डोंगरउतारावर येणाऱ्या कारवीला सात वर्षांतून एकदाच सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात फुले येतात. तेव्हा जंगल या फुलांच्या निळाईने न्हाऊन जाते. झाडे तर फुलांनी गच्च बहरलेली असतात, पण गळून गेलेल्या फुलांची निळी चादरी पायवाटांवर पसरलेली दिसते.

निळे आकाश, निळे जंगल.. निळ्या पायवाटा ..अवघी निळाई सर्वत्र भरून राहिल्याचा भास होतो. सह्य़ाद्रीत कारवीचे दोन प्रकार आढळतात- डोंगर कारवी (Hill Cone head) आणि टोपली कारवी. डोंगर कारवी ट्रेकर्स लोकांच्या खास परिचयाची. अवघड वाटा, उतार  पार करताना या कारवीचाच आधार असतो.
कोतुळ – राजूरला रस्त्यावर माणिकओझर गावातून आंबितला जाणाऱ्या रस्त्यावर शिरपुंजे खुर्द गाव लागते. पूल ओलांडल्यावर लगेच डाव्या बाजूचा रस्ता थेट भरवगडाच्या पायथ्यापर्यंत जातो. भरवगडावरील भरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात या भरोबाची यात्रा भरते. त्यामुळे भरवगडावर जायची वाट व्यवस्थित मळलेली आहे. या वाटेवर अनेक ठिकाणी कातळकोरीव पायऱ्या आणि काही ठिकाणी रेिलग्ज लावलेले आहेत. या वाटेने एक तासात आपण भरवगड आणि त्याच्या बाजूचा डोंगर यामधील िखडीत पोहोचतो. येथे वरच्या अंगाला एक टाक आहे. पुढे कातळात कोरलेल्या सुंदर पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून वर आल्यावर गडाची तटबंदी आणि उत्तराभिमुख उद्ध्वस्त प्रवेशद्वार दिसते. प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेली चार टाकी आहेत. गुहेकडे (दक्षिणेकडे) जाणाऱ्या पायवाटेने चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला मोठे खांब टाक आहे. टाक्यापर्यंत जाण्यासाठी असलेला मार्गही कातळ कोरून बनवलेला आहे. टाक्याच्या वरच्या बाजूला तीन रांजण खळगे खोदलेले आहेत. उतारावरून टाक्यात येणारे पाणी स्थिर करून त्यातील गाळ खाली बसवण्यासाठी या रांजण खळग्यांची योजना केलेली पाहायला मिळते. टाक्याच्या बाजूला कातळात कोरलेली १०x१०ची गुहा आहे. या गुहेला कमान असलेले प्रवेशद्वारही आहे.

गुहा पाहून परत पायवाटेवर येऊन एक साडेचार फूट उंच वीरगळ आहे. या वीरगळीच्या चारही बाजू कोरलेल्या आहेत. वीरगळीजवळ गणपतीच्या झिजलेल्या मूर्ती शेंदूर फासून ठेवलेल्या आहेत. त्या पाहून कातळात खोदलेल्या पायऱ्या उतरून कडय़ाच्या टोकावर कोरलेल्या भरोबाच्या गुहेत जाताना बाहेरच्या बाजूला एक वीरगळ ठेवलेली आहे. गुहेत भरोबाची अश्वारूढ मूर्ती आहे. भरोबाच्या गुहेच्या बाजूला इंग्रजी एल आकाराची गुहा आहे. या गुहेत १० जण राहू शकतात. गुहेच्या कडय़ाजवळील रेलिंगवरुन आसमंताचे विहंगम दृश्य दिसते. या रेिलगच्या एका बाजूला फाटक बसवलेले आहे. तेथून खाली उतरण्याचा मार्ग आहे. खालच्या बाजूस एक गुहा आहे. तिचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा. या गुहा पाहून गुहेच्या वरच्या बाजूला येऊन डाव्या बाजूला वर चढायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेले एक टाक पाहायला मिळते. हे टाक पाहून गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेल्या दोन गुहा आहेत. दोन खांबावर तोललेल्या या गुहेत आता मात्र पाणी साठल्यामुळे ती एखाद्या टाक्यासारखी दिसते. मोठय़ा गुहेच्या उजव्या बाजूला छोटी गुहा आहे. तीसुद्धा पाण्याने भरलेली आहे. गुहा पाहून किल्ल्याच्या माथ्यावर जाणाऱ्या पायवाटेने पाच मिनिटांत आपण गडमाथ्यावर पोहोचतो. गडमाथ्यावरून दक्षिणेला हरिश्चंद्रगड, पाबरगड हे किल्ले दिसतात. गडमाथ्यावरून गुहेच्या दिशेने न उतरता प्रवेशद्वाराच्या दिशेने उतरायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला दोन लांबलचक पाण्याची टाकी पाहायला मिळतात. ती पाहून प्रवेशद्वाराजवळ आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. गडफेरीस एक तास लागतो. ठरल्याप्रमाणे दोन दिवसांत चार किल्ले बघून झाले होते. आता परतीच्या प्रवासाची ओढ लागली होती. राजूर-इगतपुरीमाग्रे परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

सहसा भेट न दिले जाणारे आडबाजूचे किल्ले पाहायला जाताना फार काही पाहायला मिळेल अशी अपेक्षा नव्हती. जीपीएस मॅपिंग करायचे, नकाशे बनवायचे किल्ल्यावरील अवशेषांची नोंद करायची, माहिती जमा करायची या उद्देशाने गेलेल्या आम्हाला या गडांनी समृद्ध करून टाकले.

अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व ट्रेकर ब्लॉगर ( Trackerblogger ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या