कुणाला जंगल-डोंगरदऱ्या बघण्यासाठी फिरायला आवडतं तर कुणाला ऐतिहासिक ठिकाणं. पण त्याचबरोबर आपल्या देशात इतकी विविध प्रकारची तळी आहेत की ती बघण्यासाठी फिरणंही वेगळा आनंद देणारं आहे.

‘‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख..’’ हे गाणे लहानपणापासून फार आवडे, डोळ्यासमोर आजही लहानपणचे अलिबाग रामनाथ येथील आजोळच्या घराजवळचे शांत पहुडलेले तळे आठवते. दिवसाच्या कोणत्याही वेळी गेले तरी ते पाहून मला मनापासून आनंद मिळे. तासन् तास मी काठावर बसून तेथील निश्चलतेचा शांत अनुभव लुटत असे.
फार पुरातन काळापासून राजेलोकांनी अनेक तळी, तलाव प्रजेच्या पाण्याच्या सोयीकरता बांधली. निसर्गनिर्मित सरोवरे, धरणे बांधून तयार झालेले तलाव, समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या आत अडून त्यातून तयार झालेली सरोवरे, देवस्थानांच्या बाजूस पवित्र स्नानाकरिता असलेले तलाव या सर्व जागा मनाला वर्णनातीत आनंद देतात.
रामायण काळात पंपा सरोवराचा उल्लेख असून विजयनगर हंपी, होस्पेट येथे तुंगभद्रा नदीच्या काठावरील या सरोवराची प्रसिद्धी काळ्या कमळाकरिता आहे. कालिदासाने सरोवरांवर अनेक काव्ये लिहिल्याचा उल्लेख आहे. मध्य प्रदेशचा दक्षिण भाग व भंडारा जिल्हा, जेथे कालिदासाचे वास्तव्य होते त्या भागात ३६४८ लहान-मोठी सरोवरे आहेत. गावागावा गणिक प्रत्येक तळ्याला, त्या गावाची परंपरा व इतिहास जोडलेला आहे. कोल्हापूरचा रंकाळा, नागपूरचा शुक्रवार, हैदराबादचा हुसेनसागर, नैनितालचा नैनी या व अशा अनेक तलावांच्या सुंदर आठवणी मनाला आगळा वेगळा आनंद देतात.
काही सरोवरे मात्र माझ्या अंतर्मनाला विलक्षण आनंद देत गेली ती त्यांच्या निर्मितीचा छाती दडपून टाकणारा इतिहास, त्यांची अतिभव्यता व निसर्गाच्या वैविधतेमुळे! सरोवरांच्या भटकंतीची मजा औरच आहे.

लोणार सरोवर
पृथ्वीवर सतत उल्कापात होत असतो, परंतु काही वेळा अती अजस्र उल्का आदळतात, तेव्हा त्यांना अशनी (meteorites) म्हणतात. ते अती वेगाने येऊन जमिनीच्या आत खोल रुततात व तेथे विवर तयार होते. अशा तऱ्हेचे अजस्र सरोवर महाराष्ट्र राज्यात बुलढाणा भागात, जालनापासून ११० किमी अंतरावर आहे. याची सर्व माहिती न्यूयॉर्क येथील प्रसिद्ध वर्ल्डस् ग्रेटेस्ट क्रेटर्स अॅण्ड मेटोरिट्स म्युझियममध्ये अगदी संपूर्ण व्हिडीयोसहित मिळाली. तेव्हा माझी पावले लोणारकडे वळली. साधारण लाख वर्षांपूर्वी ही घटना घडली असावी. या विवराचा व्यास १८३० मीटर, १५० मीटर खोली, विवराची कड बाजूच्या जमिनीपासून सुमारे १५ मीटर उंच आहे. ईशान्य दिशेला प्रचंड मोठी घळ. जेथून अशनी प्रचंड वेगाने आदळला, त्याची अंदाजे लांबी ६० मीटर. २० लाख टनाचा हा आघात सहा मेगाटन अणुबॉम्ब स्फोटाएवढा. केवढी उष्णता निर्माण झाली असेल. ही घटना किती वेळ चालली असेल हे काळालाच ठाऊक. आपल्या कल्पनाशक्तीपलीकडचे आहे, परंतु हे कपोलकल्पित नाही हे विज्ञान शास्त्राने अनेक पुरावे देऊन दाखवून दिलेले आहे. (२००१ साली जागतिक विवर परिषदेत हा उत्पात मंगळ ग्रहावरील अशनीपासून झाला असे सिद्ध झाले होते.) हा इतिहास लोणार गावातील या विषयाचे अभ्यासक व शाळेचे मुख्याध्यापक बुगदाणे सर आम्हाला विवराच्या काठावर तळपत्या उन्हात उभे राहून देत होते. विवराचा उतार १५ ते ३५ अंश इतका असून सरोवराचे पाणी प्रचंड खारट  Ph 10.0 अल्क धर्मीय. हिरव्या शेवाळ्यामुळे पाण्याचा रंग निळसर हिरवट आहे. water contains nacl.Hco3 fluorides copper, iron metals. काही लोक पाण्याचा औषध म्हणून उपयोग करतात. काठाला अनेक विविध आकाराचे रंगीबेरंगी दगड आढळतात, ज्यावर बरेच संशोधन झालेले आहे. लवण म्हणजे मीठ त्यावरून लोणार नाव पडले. या सरोवराच्या पाण्यापासून हैदराबादच्या निजामाने मीठ काढून त्यावर त्या काळात ४५ हजार रु. मिळविले होते. काठावर अनेक मोडकळीस आलेली मंदिरे असून, तेथे गोडय़ा पाण्याची सतत धार वाहात असते. तळापर्यंत उतरण्याचा रस्ता खडबडीत, त्यामुळे वर चढून येताना दमछाक होते. सरोवराच्या सर्व बाजूंनी जीप जाण्याचा रस्ता व चार कोपऱ्यांतून सरोवर न्याहाळण्यासाठी पक्के कठडे बांधलेले आहेत. सूर्यास्तामुळे आकाश भगवे सोनेरी झालेले, पाण्याचे रंग सतत बदलत होते, त्यामुळे हिरवट मातकट नदीसारखा प्रवाह सरोवराच्या मध्यात दिसत होता, पाण्याला वेगळीच चकाकी आलेली, कोठाजवळ काळ्या पाणकोंबडय़ा डुंबत होत्या, पांढऱ्या बगळ्यांची रांगच रांग काठावरील झाडांवर उतरत होती, आकाशात पक्ष्यांचे थवे सरोवराच्या काठी उतरताना दिसत होते. अंधार पडू लागला, सरोवर काळोखात विलीन झाले होते, भन्नाट सन्नाटा पसरला होता.
अशनीमुळे निर्माण झालेल्या घळीच्या उंचवटय़ावर अती प्राचीन पारंब्या असलेला वड जणू या घटनेचा साक्षीदार आहे असे वाटते. त्याच्या पारंब्यांमधून दिसणारे विवर डोळ्याचे पारणे फिटविते.
मुख्य विवरापासून २ ते ३ फर्लागावर एक अतिशय छोटे तळे आहे त्याला अंबरतळे म्हणतात, त्यात थोडे पाणी, पण ते गोडे आहे. जवळच लाल शेंदूर लावलेली मारुतीची आडवी मूर्ती. बहुदा अशनीच्या एका तुकडय़ाची असावी, त्यात चुंबकीय लोहाचे प्रमाण इतके आहे की, होकायंत्र मूर्तीजवळ ठेवले की चुंबकीय सूची अखंड फिरत राहाते.
गेली दोन एक हजार वर्षे अनेक राजवटींनी या विवराची नोंद घेत परिसराभोवती अनेक मंदिरे व उत्तम शिल्पे उभारली आहेत, सम्राट कृष्णदेवराय व चक्रधरस्वामी यांची येथे भेट झाली होती. असा आहे मनोरंजक इतिहास लोणारचा.
वाघांच्या प्रदेशात – ताडोबा
ताडोबा जंगल चंद्रपूरपासून ४० किमी, तर नागपूरपासून १६० किमी अंतरावर. वाघाकरिता प्रसिद्ध. त्या जंगलातील पाणथळी व तलाव या प्राणी बघण्याच्या हमखास जागा आहेत.
जंगलातील मध्यात असलेल्या तेलिया तलावाचे पाणी इतके संथ, नितळ व नि:स्तब्ध पाहून आपण अवाकच होतो. समोरच्या डोंगराचे त्यात पडलेले प्रतिबिंब. वर शुभ्र-निळे आकाश. दहा मिनिटे निस्सीम शांततेत जंगल न्याहाळण्याचा आनंद वर्णनातीत होता. ध्यान समाधीचा अनुभव वाटत होता. एका पक्ष्याच्या शिटीसारख्या आवाजाने शांतता भंग पावली होती. हळूहळू पाच हरणांचा कळप तलावाच्या काठावर आला. त्यांचे कान व डोळे वाघाच्या चाहुलीकडे लागलेले, पण भराभर पाणी पीत होते. हळूहळू एकेक पाडस काठाजवळ येत होते. मधेच पाण्याला तोंड लावत, क्षणात झाडाआड लपत. ओल्या मातीत वाघाच्या पायाचे ताजे ठसे दिसत होते, वाघाच्या दर्शनापेक्षा तलावाच्या वातावरणाने मिळालेला आनंद लाखमोलाचा होता.
 

नवेगावबांध व इटिया डोह
नवेगावबांध गोंदियापासून ५५ किमी. अंतरावर. नागपूर-गोंदिया हे अंतर १७० किमी. ही जागा भारतातील पक्षी व स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर आहे. नवेगावबांध म्हणजे ७५ फूट लांब मातीचा बंधारा, ज्यामुळे मोठा जलाशय सात डोंगरांच्या कुशीत पसरलेला आहे, चोहोबाजूंनी घनदाट झाडी. त्यामधून २ किमी. लांबीचा मोटर रस्ता जलाशयाच्या कडेने एका टेकडीवर जातो. या रस्त्याच्या कडेने राहण्याकरिता जंगल खात्याने छान बंगले बांधले आहेत, जलाशयाचा विस्तार ११ चौ.किमी. असून मध्यात खोली ७५ फूट आहे. या जलाशयाच्या इतिहासाशी कोलू पाटील यांचे खास नाते जोडलेले आहे. १३ व्या शतकापासून हा सर्व प्रदेश अनेक जलाशयांकरिता प्रसिद्ध होता. अनेक संस्कृत सुभाषिते यावर रचलेली आहेत. हजारोंनी स्थलांतरित पक्षी येत असत. त्यांची निर्घृण हत्या होत असे. हे सर्व थांबविले पाहिजे याची जाणीव तडफदार व्यक्तिमत्त्वाचे फॉरेस्ट ऑफिसर मारुती चितमपल्ली व जगप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांनी करून दिली. हा जंगलठेवा सोन्याची खाण आहे. यातूनच नवेगावबांध पक्षी निरीक्षण स्थान स्थापन झाले. जगभरातले अनेक पक्षीमित्र येथे डेरेदाखल होऊ लागले, जखमी प्राणी उपचार झाल्यावर विविध प्राणीसंग्रहालयांना भेट दिले गेले.
नवेगावबांध तलावावर मालकी हक्क पाटील कुटुंबीयांचा आहे. त्यांना सरकारने १८ लाख रु. देऊ केले होते, पण त्यांनी ते नाकारले. तळ्यात कोलुसुर नावाचे निर्मनुष्य बेट असून त्यावर कोलू पाटील यांची समाधी आहे. फार पूर्वी आदिवासी या ठिकाणी आपल्या मौल्यवान गोष्टी सुरक्षित जागा म्हणून ठेवीत. बेटाला लागून दोन पिवळसर दगड आहेत. त्यांना मामा-भाच्यांचे दगड म्हणतात. तलावात १६० ते १७० प्रकारचे मासे असून मच्छीमारीचा जोरात धंदा चालतो. त्यावर सरकारचे नियंत्रण आहे. कारण अनेक पक्ष्यांचे ते खाद्य आहे. एकदा ५० किलो वजनाचा भला मोठा मासा मिळाला होता. ५०-६० तऱ्हेच्या पाणवनस्पती तळ्याकाठी मिळतात, जे पक्ष्यांचे खाद्य आहे. काठावर संजयकुटी नावाचा एकमजली राहण्याचा बंगला आहे, जेथे रात्रीचे आपले जेवण न्यावे लागते. रात्रीचा मुक्काम व पहाटे पक्षीनिरीक्षण असा कार्यक्रम असतो. आम्ही गेलो असताना सूर्य अस्तास जाण्याची वेळ झालेली. तांबडय़ा गोळ्याचे स्थिर प्रतिबिंब, केशरी लाल रंगांनी उधळलेले आकाश, डोंगराआड हळुवारपणे लपत जाणारा सूर्याचा गोळा, घरटय़ाकडे जाणारे पक्षी, त्यांचा चाललेला किलबिलाट, संथपणे पाण्यातून जाणाऱ्या होडय़ा, हवेतील वाढत जाणारा गारठा, वातावरणातील नीरव शांतता, डोळ्याचे पारणे फिटले होते. दुसऱ्या दिवशी सकाळचे ६ वाजलेले. पक्ष्यांचा गोड किलबिलाट, तळ्याचे शांत पाणी, जवळच उत्तम बांधलेला सिमेंटचा रस्ता, दुतर्फा उंचच उंच झाडे, तळ्याला लागून उभे राहण्यास छान सज्जा. केसरी सोनेरी गोळा समोरील बाजूस हळूहळू वर येत होता व मध्येच डोंगररांगांत गडप होत होता. सोनेरी किरणांनी तळ्याचे पाणी नाहून निघत होते. दोन नावाडी छोटा मचवा वल्हवीत अगदी सूर्यबिंबावरून पुढे जात होते. पाणी एखाद्या छोटय़ा बाळासारखे गाढ झोपी गेलेले. अगदी औषधालासुद्धा एखादी लाट दिसत नव्हती. हा आनंदोत्सव अर्धा तास मुग्ध होऊन पाहत होतो. एके वर्षी काळ्याभोर रंगाच्या चांदी बदकांचा प्रचंड मोठा थवा अंदाजे ५० ते ६० हजार बदके, ५ किमी लांब, २० मीटर रुंद काळा लांबच लांब पट्टा पाण्यावर तरंगत होता. त्यांच्या पंखांचा आवाज ढगांच्या गडगडाटासारखा वाटत होता, काय अविस्मरणीय दृश्य असेल!
नवेगावबांधपासून १८ किमी. अंतरावर इटिया डोह धरणाचा भव्य प्रकल्प असून ७५ स्क्वे.किमी. परिसर असलेला अवाढव्य जलाशय सात डोंगरांच्या मध्ये पसरलेला आहे. धरणावरून चालण्यास उत्तम सोय. जलाशयाच्या काठापर्यंत जाण्यास पायऱ्या. धरणाचा एक दरवाजा उघडलेला, ज्यामधून जलस्रोत शेतीकरिता जात होता. या एका धरणामुळे ही भूमी सुजलाम सुफलाम झाली आहे. हा डोह आदिवासींचे दैवत होते. शे-दोनशे वर्षांच्या अनेक अद्भुत कथा या परिसराभोवतीच्या आहेत. यावरील चितमपल्लींनी लिहिलेले ‘चकवा चांदण’ हे पुस्तक वाचनीय आहे. इरिगेशन खात्याचा लालचुटुक रंगातील बंगला व त्यासमोरील बाग आपले लक्ष वेधून घेते.
४० ते ५० गावांना पाणीपुरवठा व शेकडो एकर शेतीला पाणी पुरवले जाते. आजूबाजूने घनदाट जंगल, प्राणी, पक्षी सर्व परिसरच मोहित करणारा आहे. जवळपास स्थलांतरित झालेल्या तिबेटी लोकांची वस्ती आहे.
डोहाजवळ एका पाणथळीच्या शेतावरील बांधावर उभे राहून आम्ही पक्षीनिरीक्षण करण्यास सुरुवात केली. दूर दलदलीत विदेशातून आलेले दोन सारस क्रेन नर-मादी, चांगले ५ ते ७ फूट उंच जोडीने फिरत होते. परदेशातून आलेले हे पक्षी गेली ७ ते ८ वर्षे येथेच स्थायिक झालेले आहेत. त्यांचे फिरणे एखाद्या आदर्श जोडप्यासारखे होते. या पक्ष्यांची मादी आयुष्यभरात फक्त दोनच अंडी घालते. त्यातून एक नर व दुसरी मादी तयार होतात. त्यात चूक होत नाही. ही जोडी जमिनीवर फिरत असताना दूरवरील आकाशातील स्थानावरून दुसरी एक सारस पक्ष्यांची जोडी खालील पक्ष्यांना येताना दिसली. एकमेकांना कॉल देत ओळख पटली. हळूहळू ते जमिनीवर उतरण्याच्या प्रक्रियेत सिद्ध झाले. एखादे विमान विमानतळावर उतरावे तसे ते दोघे अलगदपणे जमिनीवर उतरले. भेट होताच काहीतरी इशारा मिळाला. दोन्ही जोडय़ा आकाशात उडाल्या व नवीन जागेवर उतरत जोडीने फिरण्यास सुरुवात केली. या सारस पक्ष्यांना अतिशय मानाने ठेवले जाते. त्यांची शिकार होऊ नये म्हणून शेतकरी जिवापाड मेहनत घेतात. त्यांना जपतात. अळ्या औषधी फवाऱ्यांनी विषारी बनू नयेत म्हणून त्या भागात फवारे मारत नाहीत. रात्रंदिवस त्यांच्यावर पहारा ठेवतात. ही सर्व शिकवणूक माधवराव पाटील यांची आहे.
या पक्ष्यांचा लग्नसोहळा म्हणजे निसर्गातील एक अजब चमत्कार आहे. एका मादीसमोर अनेक उपवर नर आपल्यातील चांगले गुण व आपल्याला येणाऱ्या कला दाखवीत अखंड प्रयत्न करीत राहतात. मादी सहजपणे नराची पसंती करीत नाही. हा सर्व सोहळा दोन्ही बाजूंच्या सग्यासोयऱ्यांसमोर चालू असतो. मात्र एकदा मादीने नर पक्का केला की ते दोघे सर्वासमोर एकमेकांत माना अडकवितात आणि जन्मभर एकत्र संसार करणार याची हमी देतात. हे वचन जन्मभर कसोशीने पाळले जाते. हजारो मैल दूरच्या प्रदेशातून येऊन हे सारस पक्षी नवेगाव हेच आपले घर मानतात व तेथेच स्थायिक होतात. सगळी कथाच चक्रावून टाकणारी आहे.
सुगरण पक्ष्याची घरटी बऱ्याच जागी दिसत होती. त्यात खालून आत शिरण्याची सोय असते. छोटे दार, खिडकी, मऊ गादीसारखी जागा. घरटे बांधण्याच्या जागा वाऱ्याच्या दिशेनुसार बदलतात. त्यामुळे ती पडत नाहीत. त्यांच्या जागांवरून पावसाचा व वादळाचा अंदाज करता येतो. घरटे बांधण्याचे काम नराचे. मादी कोणते घरटे चांगले आहे, याचा फिरून अंदाज घेते. नर घरटय़ावर एखादे सुशोभित पान नाहीतर फुलाचा गुच्छ बांधतो. मादीने पसंती दिली तरच मीलन होते. मादीचा मान सर्वात जास्त असतो. अत्राम नावाच्या गाइडने या सर्व पक्ष्यांचे जीवन डोळ्यासमोर उभे केले होते.
एका छोटय़ा तळ्यात पांढरी, केशरी, गुलाबी कमळे फुललेली. त्यामधून काळ्या पाणकोंबडय़ा पोहत होत्या.

चांगू लेक
निसर्गाचा वरदहस्त असलेले पूर्व उत्तरेकडील सर्वात लहान राज्य सिक्कीम. ७०९६ स्क्वे. किमी. विस्तार. ३ लाख लोकवस्ती. नेपाळ, भूतान, चीन देशांच्या सीमांना भिडलेले. सदाबहार हिरवाई. आकाशाला भिडणारी हिमशिखरे. त्तीतसा नदीचे विशाल पात्र, धबधबे, सरोवरे आणि थंडीत सरोवराचा होणारा बर्फाचा समुद्र. डोळ्याचे पारणे फिटविणारा प्रदेश. येथे जाण्यास गंगटोक हे राजधानीचे शहर गाठावे लागते. उत्तम टॅक्सीची सोय व छाती दडपून टाकणारे घाटाचे रस्ते. गंगटोक उंची ६००० फूट, तर नाथूला पास १४६०० फूट. ५५ किमीचा रस्ता. यावर वाटेत ३० किमीवर भव्य चांगू सरोवर. १२३१० फूट उंचीवर पांढऱ्या शुभ्र दगडासारख्या घट्ट बर्फाचा समुद्र पसरलेला होता. ३ ते ५ किमी व्यास असलेल्या सरोवरात पाणी म्हणून दिसत नव्हते. आकाश ढगाळलेले. सूर्य डोकावत होता आणि सरोवराचा काही बर्फ चकाकत होता. भर दुपारी दोन वाजता मी मी म्हणणारी थंडी, बर्फावरून चालण्याचा थोडा प्रयत्न केला, पण पावले उचलणे महाकर्मकठीण होते. सरोवराच्या मध्यात एक उंच बांबू दिसत होता. बाकी काही म्हणजे काही दिसत नव्हते. सर्व बाजूंनी बर्फ एके बर्फ. तासभर अवाक होऊन पाहात होतो. सर्व बाजूंनी बर्फाच्या पांघरुणाने लपेटलेले आकाशाला भिडलेले डोंगर व मध्यात अस्ताव्यस्त पसरलेला लेक. ना कुठे झाड ना कुठे पाण्याचा भाग, लांबी-रुंदीचा अंदाजच करता येत नव्हता. लेकच्या बाजूने चालण्याचा रस्ता. तेथे फिरण्यासाठी ७ ते ८ सजविलेले काळे याक. त्यावर बसून फिरणे म्हणजे एक कसरतच होती. लेकच्या खोलीचा अंदाज करणे अशक्यच. उन्हाळ्यात एकदम कायापालट. सरोवराचा परिसर हिरवागार, पाणी इतके नितळ आणि निळे, त्यात बाजूच्या निसर्गाचे रम्य प्रतिबिंब पडते. शेकडो वर्षांपूर्वी लामा गुरू पाण्याचा नितळपणा व आकाशातील विविध रंगछटांवरून पुढील काळाचे भविष्य सांगत.

गुरुडोगमार लेक
उत्तर सिक्कीममधील भारत-चीन सीमेवरील एक लाख चाळीस हजार फुटावरील थांगू खेडय़ातील एका छोटय़ा हॉटेलमधील लाकडी गोलाकार फळीवर गरम पाव-मुरंबा, नुडल्स, कॉफी असा दमदार नाश्ता. मध्यात ऊब आणण्यासाठी शेकोटीची जागा. वातावरणातील निरागस शांतता. पुढचा टप्पा होता १७,८०० फूट उंचीवरील गुरडोगमार लेक. देवावर भरवसा ठेवत प्रवास सुरू झाला. खडबडीत पठार. त्यामधून गाडी ज्या मार्गे जाईल तो रस्ता. वाटेत भारतीय सेनेचे तेलाचे डेपो, ट्रक्स, चिलखती गाडय़ा, भुई सुरंग पेरलेले सपाट जमिनीचे विभाग, सर्व बाजूंनी भुरकट तांबट पठाराचा भाग व क्षितिजापर्यंत पसरलेल्या हिमाच्छादित डोंगररांगा. वाटेत चिखल व पाणथळी असा २० किमी प्रवास. एक विलक्षण अनुभव घेत गायगाव येथील सैन्य छावणीत पोहोचताच जवानांनी कुंकुमतिलक लावत आमचे स्वागत केले. गरम सूप, कॉफी तर दिलीच, शिवाय चीन सरहद्दीवरील या शेवटच्या छावणीला भेट दिल्याबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात आले. होळीचा दिवस, आम्ही बेसन लाडू दिल्याने ते खूश झाले. आम्हाला मानसिक धीर देत पुढे लेकपर्यंत आरामात जाण्याचा सल्ला दिला. पुढील २० किमी. प्रवास आमची सर्वाची अळीमिळी गुपचिळी. गाडीच्या काचा बंद. वर शुभ्र-निळे आकाश. दूरवर दिसणारा मिनी कैलास बर्फाचा डोंगर. पायथ्याशी खुरटे गवत चरणारे, काळे, कबऱ्या रंगाचे याक. प्रवासात आमची एकमेव गाडी. वातावरणातील भन्नाट सन्नाटा. १७८०० फूट उंचीचा दगड दिसला. गाडीने वळण घेतले आणि समोर बर्फाचा पसरलेला समुद्र व त्याच्या मध्यात चिंचोळा स्वच्छ निळ्या पाण्याचा ओहोळ, भर दुपारच्या १ वाजताच्या उन्हात चकाकत होता. त्या पाण्यापर्यंत पोहोचण्यास बर्फाच्या पायऱ्या. गाडीतून बाहेर उतरलो, मात्र प्रचंड घोंगावत येणारे गार वारे, हवेतील ऑक्सिजनची विरळता यामुळे हालचाली मंदावल्या होत्या. मुंगीच्या पावलाने लेकच्या काठावर येऊन ध्यानस्थपणे १० मिनिटे उभा होतो. मनाला मिळालेल्या अविस्मरणीय शांतीच्या वलयात पूर्णपणे डुंबून गेलो होतो. गोठलेल्या बर्फात हे पाणी कसे राहते, हा निसर्ग चमत्कारच. तिबेटियन गुरू पद्मसंभवांची ही कृपा आहे, असे मानले जाते. हे पाणी प्राशन केल्याने निपुत्रिकांना मुले होतात असा समज आहे. म्हणून अनेक भाविक भेट देतात. आमचा ड्रायव्हर उडय़ा मारत थेट पाण्यापर्यंत पोहोचलेला. बाटल्या पाण्याने भरत होता.

चीलिका लेक
ओदिशा वा ओरिसा राज्यातील ११०० स्क्वे. किमी. परिसर असलेले अति भव्य सरोवर चीलिका वा चिल्का हे पूर्व किनाऱ्यावरील तीन जिल्ह्यांत पसरलेले असून, जगातील स्थलांतरित पक्ष्यांचे दोन नंबरचे स्थान. थंडीच्या मोसमात १६० विविध तऱ्हेच्या हजारो पक्ष्यांचे थवेच्या थवे चीलिकात उतरतात. कॅप्सिकन सी, बेकल लेक, उरल सी (रशिया), मंगोलिया, लडाख, उत्तर हिमालय, अशा हजारो मैल दूर अंतरावरील हे पाहुणे लेकमध्ये तीन महिने मुक्काम करतात. या लेकमधील विशिष्ट तऱ्हेच्या पानवेली हे खाद्य. लेकचे पाणी व हवामान त्यांच्या जननक्षमतेस उपयुक्त आहे. परतण्याचे दिवसही ठरलेले. त्या दिवशी हजारो पक्ष्यांचे थवे मायदेशीच्या प्रवासास निघतात. हे चक्र नियमितपणे वर्षांनुवर्षे चालू आहे. जगभरातील हजारो पक्षीमित्र या जागेस भेट देतात. राहण्यास उत्तम जागा. लेक विहार करण्यास उत्तम बोटी, पडाव, अनुभवी गाईड, लेकचा प्रचंड विस्तार, कुठेही गर्दी नाही.
साधारणपणे लेकची चार विभागात विभागणी. प्रत्येक विभागाची खोली व खारटपणा वेगवेगळा, त्यामुळे मासे व पक्षी निरनिराळे असतात. लेकमध्ये अनेक लहान-मोठी बेटे. त्यावर वस्ती, जवळजवळ लाख एक लोकांचे उदरभरणाचे साधन चीलिका लेक आहे.
बारकूल हे काठावरील राहण्याचे स्थान बाळूगाव रेल्वे स्टेशनपासून ७ किमी. विशाखापट्टणम ते भुवनेश्वर रेल्वेमार्गावरील अगदी लेकच्या बाजूने १५ मिनिटांच्या प्रवासातच लेकच्या भव्यतेची कल्पना येते.
राहण्याच्या बंगल्याच्या व्हरांडय़ातून समोर पसरलेला समुद्ररूपी लेक, शांत पाण्यावर केशरी, भगव्या, लाल रंगाच्या संध्याछाया पसरलेल्या, भन्नाट वाहणारा गार वारा आणि मनाला मोहून टाकणारी शांतता. रात्रीच्या भोजनात लेकमधील ताजे मत्स्याचे प्रकार. ४० तासांचा रेल्वे प्रवास सार्थकी लागला.
सर्व परिसर पूर्वाभिमुख, त्यामुळे सूर्योदय सोहळा अखंड चालू, सोनेरी किरणात चकाकणाऱ्या पाण्यात मासे पकडणाऱ्या अनेक होडय़ा हळुवारपणे डुलत मार्गस्थ होत होत्या. अनेक कोळी पाण्यात उभे राहून जाळी फेकत होते. लेकमध्ये दोन तास मोटरबोट प्रवास, एक अनोखा अनुभव. पाण्याची साधारण खोली २० ते ३० फूट. बोटीचा भन्नाट वेग. पाहता पाहता बाजूचे हिरवेगार डोंगर, घरे दूर पळत होती. काही मिनिटांत बोट भर समुद्रात आल्यासारखी वाटू लागली, पण समुद्राचे मुख आमच्या जागेपासून ४५ किमी दूर होते.
वाटेत कालीजाई बेटावरील देवीचे मंदिर परिसर मनाला शांती देणारा. फिरणारी हरणे, घुमणारा घंटानाद, वाहणारा थंडगार वारा, थेट क्षितिजापर्यंत पसरलेले पाणी, दूरवर पक्ष्यांच्या रांगा दिसू लागल्या. एक हलणारी काळी भिंत, आमच्या बोटीजवळ येत होती. काळ्या बदकांच्या साखळीने आम्हाला सर्व बाजूंनी वेढले होते. शेकडोंनी तरंगणारी बदके एका सुरात क्व्या क्व्या आवाज करत अगदी बोटीला येऊन भिडली. त्यांचा प्रवास चालू होता. पाठोपाठ कबऱ्या रंगाचे बगळ्यासारखे पक्ष्यांचे थवेच्या थवे आमच्या स्वागतास हजर. त्यांचे लांब काडीसारखे पाय. जाड पसरट चोचींनी चिखलातील पानवेली वेचून खाण्यात ते मग्न होते. ४ ते ५ हजार किमी प्रवास या एकमेव पानवेलींकरिता ते करतात हे कळते तेव्हा खरोखर निसर्ग अगाध आहे, हे जाणवते. या लेक परिसरात या वेलींचे जंगलच पाण्याखाली पसरलेले. पाण्याची खोली जेमतेम ५ फूट. नावाडी चक्क पाण्यात उतरून पडलेली लांब पिसे गोळा करून आम्हाला देताना पक्षी टक लावून सर्वाकडे पाहात होते. एक पक्ष्यांचा थवा आकाशात उडे, लगेच दुसरा थवा पाण्यात उतरे आणि खाण्यात मग्न होई. एकावेळी एवढे पक्षी प्रथमच पाहात होतो.
या लेकचे विभाग विशिष्ट गोष्टींकरिता प्रसिद्ध, सातपदा हा इरावती नावाच्या डॉल्फिन्स करता, तर बारूनकुडा बेटावर वरुणदेवाचे मंदिर, लागून एक मशीद, त्याचा मुख्य दरवाजा व्हेल माशाच्या जबडय़ाचा, एका बेटाचा आकार मोत्यासारखा, नाव सोमलो वा हनीमून बेटे, पाण्याची निळाई व निस्सीम शांतता, मधुचंद्राकरिता प्रसिद्ध जागा, तपापाणी बेटावर सल्फरयुक्त गरम पाण्याची कुंडे, अशा विविधतेने नटलेले चीलिका लेक पर्यटकांना प्रेमात पाडणारे आहे.

पेन्गौंग लेक
पृथ्वीवरील स्वर्गच उतरलेला आहे की काय अशी वाटणारी जागा म्हणजे १४२७० फूट उंचीवरील ११० किमी लांब व ५ किमी रुंद खाऱ्या पाण्याचे सरोवर, लेहपासून १५५ किमी. ६ तासांचा प्रवास १७८०० फुटावरील बर्फात गाडलेल्या चांगला पासमधून होतो.
लक्षावधी वर्षांपूर्वी हा प्रदेश विशाल समुद्र होता. प्रचंड उलथापालथ झाल्याने वालुकामय प्रदेश, पिवळट मातीचे डोंगर व खारे पाणी असलेले सरोवर, पण थंडीत पूर्ण गोठणारे. विस्तार पश्चिम बाजूंनी लडाखपासून थेट पूर्वेला तिबेटपर्यंत, लेकच्या ३० टक्के भागावर भारताचा हक्क तर ७० टक्के चीनच्या ताब्यात. १९६२ च्या तुंबळ युद्धात हे सरोवर रक्तरंजित झालेले. तेव्हापासून अतिसंवेदनशील विभाग, परमिटची गरज. बोटिंगची परवानगी नाही, काठाने फक्त ३ किमी जाण्यास परवानगी.
दुपारचे १२ वाजलेले, ६ तासांचा प्रवास संपत येत होता. गाडीने एक वळण घेतले आणि समोर संथ निळ्या पाण्याचा समुद्रच पसरलेला. तिन्ही बाजूंनी मातकट, पिवळसर काळपट अशा विविध छटांच्या डोंगररांगा, काहींच्या माथ्यावर बर्फाचे चढलेले मुकुट, आकाशाची स्वच्छ निळाई, त्याला शोभा आणणारे पांढरे ढगांचे आरामात पसरलेले पुंजके, मधेच डोकावणारा सूर्य, वाहणारे थंडगार वारे, पाण्याचे सतत बदलणारे रंग, निळ्या, हिरव्या काळपट पांढऱ्या सर्व रंगांची उधळण चालू होती. डोंगरांवर सावल्यांचा खेळ. तासभर मंत्रमुग्ध झालो होतो. शब्द अपुरे होते, फोटो काढून तृप्त झालो होतो, काठावर पांढरी कबरी रंगाची मुलायम पसरलेली वाळू, त्यातील एक पट्टा फर्लागभर सरोवराच्या आत गेलेला होता. पाण्याची खारट चव घेत, वाळूतून फिरण्याचा अनोखा अनुभव आणि समोर पाण्याचे फिरते रंग पाहून डोळ्यांचे पारणे फिटले होते. आकाशात वा पाण्यात एकही पक्षी दिसत नव्हता. कुठूनही कसलाच आवाज येत नव्हता, खरोखर स्वर्गातील नंदनवन आमच्यासमोर अवतरले होते.
लेक पाहताना अरुणाचल प्रदेश डोळ्यांसमोर आला. येथून २५०० किमी दूर तवांग येथील सेला पासजवळचे पॅरेडाइज लेक, त्याचे संपूर्ण निळे पाणी आणि सर्व बाजूंनी पसरलेले बर्फ. दोन लेकची विविधता मनाला सारखाच आनंद देऊन गेले.

मणिपूरचे लुकवाक लेक
मणिपूरच्या हिरव्यागार डोंगररांगा कापत इम्फाळ या राजधानीच्या शहरापासून लुकवाक लेककडे प्रयाण केले. ३० ते ४० किमी परिघाचे गोडय़ा पाण्याचे सरोवर थेट क्षितिजापर्यंत पसरलेले, यात विविध आकाराची अनेक बेटे तरंगत होती. काही बेटे एखादा माणूस उभा राहील इतकी लहान तर काही बेटावर बांबूच्या झोपडय़ा, त्यांच्या बाजूंनी उगवलेले हिरवेगार गवत, ते चरणारी बकरी, गाय, छोटय़ा झुडपात पक्ष्यांची घरटी, दोन बेटांतून वाहणारे संथ पाणी, छोटय़ा होडीतून जाणारा नावाडी, जाळ्यात पकडलेले मासे टोपलीत भरतानाही दिसत होता. रात्रभरात ही बेटे तरंगत जात आपली जागा बदलतात, दुसऱ्या दिवशी वेगळ्याच भागात दिसतात. पानवेलींच्या जाळ्यामुळे ती उभी राहतात. प्रवाहाबरोबर ती वाहत जातात. प्रवाह फसवे असल्याने या लेकमधील प्रवास जाणकार नावाडय़ाबरोबर करावा लागतो. रात्री या बेटावर अतिरेकी लपण्याकरिता येतात. त्यामुळे जवानांचा मोठा तळ सरोवराला लागूनच होता. दिवसा शांत दिसणारे हे निसर्गाचे अनोखे लेणे रात्री युद्धभूमी ठरते.
छोटे तळे असो नाही तर विशाल सागरासारखे वा बर्फाचे सरोवर असो ही निसर्गाची अनमोल लेणी आहेत.