scorecardresearch

Premium

वर्धापन दिन विशेष : आंबा

आंबा नावातच गोडवा आहे. केळी, सफरचंद, पपई आणि अनेक फळं वर्षभरच हजर असतात, पण आंबा दोन महिन्यांसाठीच येतो आणि सगळ्यांची विकेट काढतो.

mango
आंबा

तरंग वैद्य – response.lokprabha@expressindia.com
आंबा नावातच गोडवा आहे. केळी, सफरचंद, पपई आणि अनेक फळं वर्षभरच हजर असतात, पण आंबा दोन महिन्यांसाठीच येतो आणि सगळ्यांची विकेट काढतो. हिंदी भाषेत याला ‘आम’ म्हणतात, पण खऱ्या अर्थाने हा ‘खास’ आहे.

आंब्याचे वनस्पतीशास्त्रातले नाव आहे ‘मँगीफेरा’ आणि भारतीय जातीचे नाव ‘मँगीफेरा इंडिका’. याच्या अनेक प्रजाती आहेत. हापूस, लंगडा, बदामी, दशेरी, केसर, नीलम आणि हो तो पोपटनाक्या तोतापुरी.. मराठी माणसासाठी हापूस म्हणजे जीव की प्राण. काहींसाठी तर आंबा म्हणजे फक्त हापूस. हापूस म्हणजे सुवासिक, पिवळा धमक, काहीशी केशरी झाक असलेला, विचार केला तरी तोंडाला पाणी सुटतं, बघा ना..

thailand tourists came to see ganesh visarjan, mumbai ganesh visarjan, thailand tourists in mumbai, ganesh visarjan mumbai
Mumbai Ganpati Visarjan 2023 Live : गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी थायलंडच्या पर्यटकांची हजेरी
nashik ganeshotsav 2023, nashik crowd to see ganesh mandal scenes, nashik ganesh mandals
देखावे पाहण्यासाठी जळगावात जनसागर; गणेशोत्सवादरम्यान व्यावसायिकांनाही लाभ
amchya papani ganpati anala song craze in bhajans in Konkan Buwa gundu sawant bhajan video viral on social media
‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्याची कोकणामध्ये भजनातही क्रेझ; बुवांच्या भजनाचा Video व्हायरल
a boy drew shiv parwati and ganpati bappa picture
VIDEO : कलेला तोड नाही! तरुणाने चक्क गुळापासून रेखाटलं शिव-पार्वती आणि गणपती बाप्पाचं चित्र, व्हिडीओ एकदा पाहाच

तर हा हापूस, साधारणपणे एप्रिल मे महिन्यात बाजार व्यापून टाकतो. रत्नागिरी हापूस, देवगड, पावस, मंडणगड ही नावं तो फळवाला आपल्याला सांगतो आणि मग घासाघीस आणि चर्चेला विषयच राहत नाही ‘नक्की रत्नागिरी ना’ असे जुजबी विचारत आपण या फळांच्या राजाला आपल्या पिशवीत मानाचे स्थान देतो. क्रिकेटमध्ये सचिन, अभिनयात अमिताभ, गायनात लतादीदी तसेच आंब्यात हापूस..विषय संपला. महाराष्ट्रात हापूसनंतर लोक वळतात पायरीकडे. पायरी कापून खाण्यापेक्षा रस काढून पोळी किंवा पुरीबरोबर खायला प्राधान्य दिले जाते. रसात थोडीशी मिरेपूड घातली की जेवणानंतर शांत झोप लागणारच.

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये ‘लंगडा’ला महत्त्व जास्त. याला लंगडा नाव कसे पडले हे कोडेच आहे, पण नाव लंगडा असूनही विक्री आणि रसनेच्या शर्यतीत हा पहिला नंबर पटकावणारा, आंब्यांच्या इतर जाती जशा पिकल्यावर किंवा तयार झाल्यावर आपला रंग बदलतात तसे लंगडाच्या बाबतीत होत नाही, तो कच्चा असताना हिरवा आणि पिकल्यावरही हिरवाच.

बाजारात पहिला नंबर मात्र बदामीचा, कर्नाटकचे हे फळ साधारणपणे मार्चपासून दिसू लागते. पाठोपाठ दशेरी, केसर हजेरी लावतात. दशेरीचे फळ पाकिस्तान, नेपाळ आणि उत्तर भारतातले. केसर किंवा गीर केसर आंबा म्हणजे स्वाद आणि सुवासाचे अप्रतिम मिश्रण.

माणसांच्या नावांसारखी नावं असलेल्या काही प्रजाती आहेत. कॅरेबियन बेटातील ‘जुली’, त्रिनिदादचा ‘ग्रॅहम’, अमेरिकेतील ‘रुबी’ आणि ‘फोर्ड’, भारतात ‘मनोहर’, ‘नीलम’, ‘मल्लिका’ यात जुलीचे वैशिष्टय़ म्हणजे याचा आकार अंडाकृती किंवा गोलाकार असतो. कॅरेबियन क्रिकेटर्स हा कच्चा असताना चेंडू म्हणून याचा वापर करत असतील. तसं बघायला गेलात तर नीलमचा आकारही काहीसा काजूसारखा असतो. या फळात रेषे नसल्यामुळे लोकांना तो जास्त आवडतो. बरं, नीलम खूप उशिरा म्हणजे हापूस संपत आल्यावर बाजारात येत असल्यामुळे आंबाप्रेमी त्याच्यावर (का तिच्यावर?) तुटून पडतात. ‘मनोहर’ आपल्या देशात पंजाब प्रांतातील फळ. चिनी आंबा ‘आयव्हरी’चा आकार हत्तीच्या सोंडेसारखा असतो, तर अमेरिकन ‘गॅरी’ला नारळाचा वास असतो. लखनौचा ‘सफेत’ आंबा आतून पांढरा असतो. निसर्गाचे चमत्कार आणखीन काय. एका आंब्याचे नाव आहे ‘सिंधरी’ याला सिंधी आंबाही म्हटलं जातं. त्याचं उत्पादन सिंध (पाकिस्तान)च्या मीरपूर खास जिल्ह्यतच होतं.

‘रासपुरी’ नाव ऐकलेलं वाटत नाही ना.. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्र किंवा उत्तर भारतात याची तितकीशी ओळख नाही, पण दक्षिण भारतात हा खूपच प्रसिद्ध, अगदी रजनीकांतसारखा. हे फळ चवीला अप्रतिम आहेच, पण नावाप्रमाणे यात भरपूर रस असतो म्हणूनच यांचे नामकरण रासपुरी झाले असावे. बरेच मराठी भाषक आंबा म्हणजे हापूस हे डोक्यात ठेवून असतात त्याचप्रमाणे बंगळूरुच्या मंडईत फक्त आणि फक्त रासपुरी विकत घेणारे आम्र शौकीन आहेत. असाच ‘बंगनपल्ले’ हा आंध्र प्रदेशात आपल्या हापूसप्रमाणे प्रसिद्ध. बंगनपल्ले राजवट हे याचे मूळ असल्यामुळे हा आंबा त्याच नावाने ओळखला जातो. याशिवाय जंगलात असणारा जंगली, कलम करून तयार झालेला कलमी, देशी, रायवळ. चौसा जो फक्त चोखूनच खाल्ला जातो, तोता म्हणजेच पोपटाच्या नाकासारखा दिसणारा तोतापुरी, जो फक्त चिरून किंवा कापूनच खाल्ला जातो. जगभरात आंब्याच्या ४०० च्या वर प्रजाती आहेत.

आंबा हा फक्त जिव्हेचे चोचले पुरवत नसून शरीरासाठीही अत्यंत गुणकारी आहे. मुख्य म्हणजे बलवर्धक आहे आणि पोटाच्या अनेक विकारांवर उपायकारक आहे. आंबा खाल्ल्यामुळे शरीराला व्हिटॅमिन अ, इ, उ, ए आणि ङ मिळतं. आंब्यात मँगीफेरीन नावाचे अँटिऑक्सिडंट असतं, तसंच पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे हृदयसंबधी रोग होण्याची शक्यता कमी असते. आणि हो, हे सर्व गुण असल्यामुळे आंब्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढते. आयुर्वेदानेही आंबा श्वास, त्वचा आणि आमाशयासाठी उपयुक्त मानला आहे. युनानी वैद्यकशास्त्रानुसार क्षयरोगाच्या उपचारासाठी पिकलेले आंबे अतिशय उपयुक्त असतात.

तर आंबाप्रेमींनो, वेळ दवडू नका आणि जिव्हा, पोटोबा आणि आत्मा तृप्त होईपर्यंत आंबा खाऊन घ्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Alphonso mango fruit konkan dd

First published on: 04-04-2022 at 11:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×