‘विश्वभ्रमंती’चा दिवाळी अंक म्हणजे मराठी प्रवास वर्णन लेखकांची दिवाळीच म्हणावी लागेल. राज्यातील, देशातील आणि परदेशातील ३५ विविध पर्यटनस्थळांची मेजवानी या अंकात आहे. पूर्वाचलातील मंदिरे, वैभवशाली विजयनगर साम्राज्य, ओरिसा, बडोदा, दक्षिण भारत, सज्जनगड, अंदमान, माळशेज, कान्हा अभयारण्य, गंगोत्री जमनोत्री, नैमिषारण्यातील अतिप्राचीन तपोभूमी, अरुणाचल, दार्जिलिंग, आर्चिस नॅशनल पार्क, सॅनडिएगो, बहुरंगी कल्गरी, गालापगोची सफर, कंबोडिया, ताश्कंद आणि उजबेगस्थान, बडोद्यातील मराठी कूळ, युरोपची मनोहारी सफर, बर्लिन भिंतीवर आणि पोलंडमधील मृत्युछावणीत, स्वित्र्झलड, आर्चिस नॅशनल पार्क, कैलास मंदिर, पाचूंचे देखणेपण मांडणारा श्रीलंका, थायलंडमधील कांचनबुरी, तीन प्रपातींची कथा, कुवेतची रम्य रणरणता अशा विविध स्थळांच्या माहितीचा खजिनाच या अंकात दडला आहे. भटकंतीची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचावा असा हा अंक आहे.
विश्वभ्रमंती; संपादक : डॉ. सुनील कवठे, रु. १६०
‘डोंबिवलीकर’ हा यंदाचा दिवाळी अंक नवलाईला वाहिलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींची महती मांडणारा आहे. महत्त्वाचे म्हणजे ही नवलाई जगावेगळी आहे, नेहमीच्या पठडीतल्या वाटा चोखाळणारी नाही. वन्यजीव छायाचित्रकार नयन खानोलकर, अभियानातील मराठमोठी नवलाई रितेश देशमुख, श्रीकांत बोला यांची डोळस नवलाई, वित्त व्यवस्थापनातील लक्ष्मी अय्यर, भूपाल रामनाथकर, ऋजुता दिवेकर- डॉ. पीअर्स बर्सिस हॉल, चंद्रकांत कुलनकी, फार्मसीतील अतुल शिरगावकर, कबड्डी विश्वातील श्वासाची नवलाई असणारा नीलेश शिंदे, डबेवाल्यांची नवलाई, शिल्पकलेत प्रयोग करणारे भगवान रामपुरे, संजय सेलूकर, डॉ. संदेश मयेकर, मंजिरी घरत, छायाचित्रकार प्रसाद नाईक, प्रयोगलेखन दिग्दर्शनातील नवे प्रयोग करणारी अशी १८ वेगळी व्यक्तिमत्त्वे या अंकातून उलगडली आहेत. नवलाईच्या वाटेवरचा प्रवास हा कायमच अनेक काटय़ाकुटय़ांनी भरलेला असतो. या सर्वानीच हा प्रवास नेमका कसा केला हे वाचणे नक्कीच प्रेरणादायी आहे.
डोंबिवलीकर, कार्यकारी संपादक : प्रभू कापसे.
या छोटेखानी अंकात ‘रिक्षावाला’ ही प्रमोद रोहणकर यांची कथा, संतोष गाडेकर यांचा ‘शिवबाचा मावळा’ हा लेख, ‘रणरागिणी’ हा एजाजहुसेन मुजावर यांचा लेख, ‘बळी’ हा वर्षां किडे कुलकर्णी, वार -जगन अवचार यांच्यासह डॉ. विशाल इंगोले, अजीम नवाज राही, युवराज पाटील, नारायण भोलवणकर, अनुप शिंदे यांचे लिखाण आहे.
विदर्भ न्याय; कार्यकारी संपादक : संतोष गाडेकर, स्वागतमूल्य : रु. ३०
‘आई’ हा शब्द कोणाही संवेदनशील माणसाच्या गाभ्याला स्पर्श करतो. ‘महानगरी वार्ताहर’ने या वर्षी ‘आई’ ही थीम घेऊन दिवाळी अंक प्रसिद्ध केला आहे. त्यात आईसंदर्भातल्या कथा, आई या विषयावरचे लेख, कविता आणि मनोगतं आहेत. त्याशिवाय विविध मान्यवरांची आई या विषयावरची मनोगतं आहेत.
महानगरी वार्ताहर, संपादक : शरद मिस्त्री; मूल्य: रु. २००
सध्याचा जमाना स्टार्टअपचा बोलबाला असण्याचा आहे. त्यामुळे त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. साहजिकच उद्योजकांशी संबंधित अंकात ‘स्टार्टअप’ हा विषय येणं अगदीच स्वाभाविक. त्यामुळे या अंकात वेगवेगळ्या स्टार्टअपचा आढावा घेतला आहे.
स्मार्ट उद्योजक; कार्यकारी संपादक : प्रतिभा राजपूत, मूल्य : रु. २००.
प्रतिनिधी – गीतांजली कुलकर्णी