ज्येष्ठा-कनिष्ठा यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक असला तरी त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकीची अनुपस्थिती दुसरीला अस्तित्वासाठी जागा मोकळी करून देते. पण महालक्ष्म्यांच्या रूपाने लोकधर्मात या दोघीही एकमेकींच्या हातात हात घालून एकत्र नांदताना आढळतात.
देशावर महालक्ष्म्या म्हणून पुजल्या जाणाऱ्या ज्येष्ठा-कनिष्ठा या जोडदेवता एकमेकींच्या बहिणी मानल्या जातात. एक मोठी तर दुसरी धाकली. महालक्ष्म्यांची मांडणी करताना अनेक घरांत एखादी फारच मुरडते, साडी नेसवून घ्यायला खूपच वेळ लावते तर दुसरी अगदी सहज आपल्या मोठेपणाचा ठसा उमटवून जाते. या व्रताच्या दरम्यान दोघी अगदी एकमेकींना साजेशा जरी असल्या तरी मुळात स्वभावाने मात्र त्या एकमेकींच्या अगदी विरुद्ध आहेत. दैवतशास्त्राचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की याच दोघी लक्ष्मी आणि अलक्ष्मी म्हणूनही ओळखल्या जातात. लक्ष्मी ही सौंदर्याची, समृद्धीची, सौभाग्याची देवता म्हणून प्रसिद्ध आहेच, तर अलक्ष्मी ही तिच्या अगदी विरुद्ध दारिद्रय़ाची, नाशाची आणि दुभाग्र्याची देवता म्हणून प्रसिद्ध आहे. लक्ष्मीची मोठी बहीण या नात्याने अलक्ष्मी ज्येष्ठा या नावाने प्रसिद्ध आहे. या अनुषंगाने साहजिकच लक्ष्मी कनिष्ठा म्हणून ओळखली जाते. एक सकारात्मक देवता आणि दुसरी नकाराकडून सकारात्मक रूपाकडे लक्ष वेधून घेणारी.
या दोन्ही देवतांचा प्रवास वैदिक काळापासून सुरू होऊन अगदी आत्ताच्या काळापर्यंत येऊन ठेपतो. ऋग्वेदात ज्येष्ठा-कनिष्ठा, अलक्ष्मी-लक्ष्मी असे उल्लेख येत नाहीत. ऋग्वेदात या दोन्ही देवतांचे स्वरूप अगदी वेगळे आहे. निर्ऋति, अरायि, अराति अशा प्रकारच्या विघ्नकारक देवता अलक्ष्मीच्या स्वरूपाशी मिळत्याजुळत्या आहेत तर वैदिक श्री ही देवता लक्ष्मीचे आद्यस्वरूप मानली जाते. तसेच श्रीसूक्तामध्ये एकाच वेळेला अलक्ष्मीचा नाश आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी प्रार्थना केलेली आढळते. बृहद्देवतेनेसुद्धा (५.९१-२२) श्रीसूक्ताचा वापर घरातून अलक्ष्मीला हाकलून लावण्यासाठी करावा असे सुचविले आहे.
क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम्।
अभूतिमसमृिद्ध च सर्वा निर्णुद मे गृहात्।
अथर्ववेदात पहिल्यांदाच लक्ष्मीचे दोन प्रकार सांगितलेले आढळतात. पापी लक्ष्मी आणि पुण्या लक्ष्मी. त्या अनुक्रमे अशुभ आणि शुभ लक्षणांनी युक्त असतात असे सांगितले आहे. महाभारताच्या वनपर्वात समुद्रमंथनाची कथा आलेली आहे. त्यात समुद्रमंथनातून बाहेर आलेली लक्ष्मी देवांकडे गेली आणि अलक्ष्मी असुरांकडे गेली असा उल्लेख सापडतो. रामायणात ३.६३.२०-२१ मध्ये राज्य नष्ट होणे, वनवास भोगायला लागणे, सीताहरण होणे यांसारख्या घटनांचे कारणही अलक्ष्मीची अवकृपाच आहे असे राम म्हणतो.
लक्ष्मीला कनिष्ठा आणि अलक्ष्मीला ज्येष्ठा म्हणून संबोधल्याचा पहिला उल्लेख पुराणवाङ्मयात सापडतो. पद्मपुराणानुसार अलक्ष्मी आणि लक्ष्मी एकापाठोपाठ एक समुद्रमंथनातून बाहेर आल्या. विष्णूने जेव्हा लक्ष्मीशी विवाह करण्याची इच्छा दर्शविली तेव्हा लक्ष्मीने मोठय़ा बहिणीचा विवाह झाल्याशिवाय लहान बहिणीचा विवाह होणे योग्य ठरेल का, असा सर्व देवांना उद्देशून प्रश्न विचारला आणि येथे लक्ष्मी-अलक्ष्मी यांना उद्देशून कनिष्ठा आणि ज्येष्ठा असा उल्लेख सर्वात प्रथम आढळतो.
असंस्कृत्य कथं ज्येष्ठां कनिष्ठा परिणीयते ।
तस्मान्ममाग्रजामेतामलक्ष्मीं मधुसूदन।
विवाह्य़ नय मां पश्चादेष धर्म: सनातन: । (पद्मपुराण ६.११८.४)
त्यानंतर पद्मपुराणानुसार अलक्ष्मीचा उद्दालक नावाच्या ऋषीसोबत विवाह लावण्यात आला. िलगपुराणानुसार अलक्ष्मीचा दु:सह नावाच्या ऋषीसोबत विवाह रचण्यात आला. मार्कण्डेय पुराणात अलक्ष्मीच्या नवऱ्याचं नाव मृत्यु असं दिलेलं आहे. तसेच निर्ऋति असं तिच्या सवतीचं नाव दिलेलं आहे. तर काही ठिकाणी तिला कलिवल्लभा, कलिनासह अशी विशेषणे वापरून तिचा कलिशी संबंध दर्शविलेला आहे.
समुद्रमंथनातून बाहेर येता क्षणी अलक्ष्मीने तिच्या निवासासाठी योग्य अशा जागेचे वर्णन स्वत: केलेले आढळते. जे घरी सतत भांडतात आणि अतिशय असभ्य भाषेत बोलतात, जे वाळू आणि कोळशाने दात घासतात, हात-पाय धुतल्याशिवाय अन्न भक्षण करतात, तसेच सायंकाळी अन्न भक्षण करतात; नारळाची करवंटी, कांदा, लसूण, अळंबी तसेच मृतांना अर्पण केलेले अन्न खातात, जे आपला धर्म पाळत नाही. गुरू, ब्राह्मण, विद्वान, वृद्ध, अतिथी यांना मानसन्मान देत नाहीत, दुसऱ्याचे धन चोरतात तसेच दुसऱ्याच्या पत्नीशी संग करतात अशा लोकांचे ठिकाण अलक्ष्मीच्या निवासासाठी योग्य मानलेले आहे. याचमुळे तिचा एकंदरित स्वभाव विचित्र, शुद्ध आणि प्रसन्न वातावरणाच्या विरुद्ध असल्याने तिचा विवाह काही फार काळ टिकला नाही. उद्दालकाच्या आश्रमातील होमाचा वास, धार्मिक वातावरण या सर्वामुळे ती अस्वस्थ झाली. शेवटी कंटाळलेल्या उद्दालकाने नदीच्या काठावर असलेल्या एका िपपळाच्या झाडापाशी तिला सोडून दिले आणि सांगितले, ‘‘मी तुझ्या निवासासाठी योग्य अशी जागा शोधून परत येतो. तोपर्यंत तू इथेच थांब.’’ मात्र त्यानंतर उद्दालक काही परत आला नाही असे आढळते. नवऱ्याची वाट पाहणाऱ्या अलक्ष्मीचा आक्रोश ऐकून तिचे सांत्वन करण्यासाठी विष्णु तिला वरदान देतात की, ‘‘दर शनिवारी िपपळाच्या झाडापाशी लक्ष्मी तुला भेटायला येईल आणि तसेच लक्ष्मी त्याच लोकांवर प्रसन्न होईल, जे त्यांच्या घरी तुझी पूजा करतील.
सिरिकालकण्णिजातक या जातक कथेनुसार सिरि आणि कालकण्णि या दोघी धृतराष्ट्र आणि विरुपाक्ष या अष्टदिक्पालांच्या कन्या आहेत. एकदा त्यांच्यात अनोत्तत या सरोवरात सर्वात आधी कोण स्नान करणार असा वाद सुरू झाला. या वादाचा निवाडा करण्यासाठी त्या बोधिसत्त्वाकडे गेल्या. त्यावर बोधिसत्त्वाने त्यांना सांगितले की, तुमच्यापकी जी वाराणसीतील शुचिपर्व नावाच्या व्यापाऱ्याच्या घरातील पवित्र मंचकावर प्रथम स्थानापन्न होईल तिला अनोत्तत सरोवरात प्रथम स्नान करण्याचा मान मिळेल. शुचिपर्वाचे घर धार्मिक आणि मानसिक व्यापारांनी अतिशय पवित्र होते, त्यामुळे साहजिकच कालकण्णि त्या घरात साधा प्रवेशही करू शकली नाही. याउलट सिरि मात्र त्या मंचकावर विराजमान झाली. दुर्गा भागवतांनी या कथेच्या विश्लेषणात लक्ष्मी आणि अलक्ष्मीसाठी अनुक्रमे लख्खी आणि अलख्खी असे शब्द वापरलेले आढळतात.
वाचस्पत्यम्, मोनिअर विलियम्स्, आपटे यांसारख्या शब्दकोशांमध्ये ज्येष्ठा या शब्दांचे १) लक्ष्मीची मोठी बहीण, अलक्ष्मी २) गङ्गा, हिमालयाची कन्या ३) ज्येष्ठ पत्नी ४) ज्येष्ठ बहीण असे विविध अर्थ आढळतात. मात्र कनिष्ठा असा शब्द वाचस्पत्यम्मध्ये नाही. मोनियर विल्यम्स् तसेच आपटय़ांच्या शब्दकोशात कुठेही कनिष्ठा शब्दाचा अर्थ लक्ष्मी असा दिलेला नाही. लक्ष्मीचे दैवतशास्त्रातील उच्च स्थान राखण्यासाठी बहुधा तिचा कनिष्ठा असा उल्लेख टाळलेला आढळतो.
अशा या विघ्नकारक ज्येष्ठेची कृपा प्राप्त व्हावी म्हणून तिची प्रार्थना केलेली आढळते. तिचे आयुष्यातून झालेले निर्गमन हीच तिची कृपा मानली असल्याने तिची निघून जाण्याविषयी प्रार्थना केलेली आढळते. ऋग्वेदामध्ये अलक्ष्मीला ‘‘दुर्मुखि तेन गच्छ दूरम्। हे विकटे दुíभक्षादिदेवते गििर पर्वतं निर्जनदेशं गच्छ।’’ अशा प्रकारच्या वाक्यांचा वापर करुन हाकलून लावले आढळते. श्रीसूक्तामध्ये अलक्ष्मीच्या नाशासाठी प्रार्थना केलेली आढळते. त्याचा वापर बृहद् देवतेने सांगितला आहेच. बौधायन गृह्य़सूत्रातील ज्येष्ठाकल्पात अलक्ष्मीच्या पूजनाचा विधी सांगितला आहे. या व अशा प्रकारच्या नकारात्मक पूजनपद्धतीचा वापर अलक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी म्हणजेच ती आयुष्यातून निघून जाण्यासाठी केलेला आढळतो.
अगदी अलीकडच्या काळातही महाराष्ट्रेतर भागात ज्येष्ठेचे प्रचलित असलेले काही विधी उपेंद्रनाथ ढाल यांनी संग्रहित केले आहेत. पंजाबमध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी घरातील ज्येष्ठ बाई सूप वाजवून ज्येष्ठेला घराबाहेर हाकलते. तर बंगालमध्ये तिची शेणाची मूर्ती बनवून तिची पूजा केली जाते आणि सूप वाजवत तिचे विसर्जन केले जाते. महाराष्ट्रात दसऱ्याला काही घरांमध्ये कचऱ्याची पूजा केली जाते. नवेद्य अर्पण करून सायंकाळी कचराकुंडीत या ज्येष्ठेचे विसर्जन केले जाते. दिव्याच्या अमावस्येच्या कहाणीमागचा उद्देशही हाच आढळतो.
ज्येष्ठेचे सर्वात प्रसिद्ध असलेले व्रत ज्येष्ठा व्रत हेमाद्रीच्या व्रतखण्डात (६३०-६४३) आले आहे. हे व्रत मूळत: िलग व स्कंद पुराणातील आहे. दीन, गरीब आणि असहाय लोकांना सुख कसे प्राप्त होईल असा प्रश्न विचारल्याने हे व्रत श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले आहे. भाद्रपद महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ातील ज्येष्ठा नक्षत्रावर रात्री जागे राहून ज्येष्ठेची खालील मंत्र म्हणून पूजा करावी.
एह्य़हि त्वं महाभागे सुरासुरनमस्कृते । ज्येष्ठे त्वं सर्व देवानां मत्समीपा सदा भव ।
यानंतर ज्येष्ठेचे पूजाविधान दिलेले आहे. शेवटी फलश्रुतीमध्ये असे व्रत केल्याने संकटे पाण्यातल्या मिठाप्रमाणे विरघळून जातात असेही सांगितले आहे.
ज्येष्ठा नाम परा देवी भुक्तिमुक्तिफलप्रदा।
यस्तु पूजयते राजंस्तस्म स्र्वग प्रयच्छति।
एवं कृते व्रते सम्यक् सर्वशान्ति: प्रजायते।
धनधान्यसमृद्धिश्चा आरोग्यञ्च्ौव जायते।
आज मात्र हेच व्रत महाराष्ट्रात ज्येष्ठा गौरी व्रत म्हणून प्रचलित आहे. कोकणात या व्रतादरम्यान खडय़ांची, तेरडय़ाची किंवा एका गौरीची पूजा केली जाते. मात्र देशावर हुबेहूब एकसारख्या अशा ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन देवतांची पूजा केली जाते. प्रचलित समजूतीनुसार त्या एकमेकींच्या बहिणीच मानल्या जातात. ज्येष्ठा मोठी तर कनिष्ठा लहान. मूळ ज्येष्ठा-कनिष्ठा यांच्यात जरी जमीन-अस्मानाचा फरक असला तरी लोकधर्माने मात्र हा फरक पूर्णपणे नाहीसा केलेला आढळतो. लोकधर्मात कनिष्ठा गौरीसोबत ज्येष्ठेचे स्थान आणि रूप उंचावलेले आढळते. मुळात दोन स्वतंत्र असलेल्या या देवता स्वभावाने मात्र एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकीची अनुपस्थिती दुसरीला अस्तित्वासाठी जागा मोकळी करून देते. पण महालक्ष्म्यांच्या रूपाने लोकधर्मात या दोघीही एकमेंकीच्या हातात हात घालून एकत्र नांदताना आढळतात. एका नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे असूनसुद्धा स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव करून देतात.
तनश्री रेडीज – response.lokprabha@expressindia.com