देवी विशेष : देवी-अथर्वशीर्षांचे अंतरंग

अथर्वशीर्ष म्हटले की आपल्याला आठवते ते ‘गणपती अथर्वशीर्ष’. मात्र त्या पलीकडे जाऊन, संस्कृत-स्तोत्रवाङ्मयाच्या परंपरेमध्ये अजूनही काही अथर्वशीर्ष आहेत हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊकच नसते.

devi
वैदिक उपासनापद्धतीमध्ये प्रामुख्याने गणपति- अथर्वशीर्ष, सूर्य-अथर्वशीर्ष, नारायण-अथर्वशीर्ष, शिव-अथर्वशीर्ष आणि देवी-अथर्वशीर्ष अशा पाच अथर्वशीर्षांंचा उल्लेख आढळतो.

प्रणव प्रदीप गोखले – response.lokprabha@expressindia.com
एका शाक्त उपनिषदाचे विहंगावलोकन
अथर्वशीर्ष म्हटले की आपल्याला आठवते ते ‘गणपती अथर्वशीर्ष’. मात्र त्या पलीकडे जाऊन, संस्कृत-स्तोत्रवाङ्मयाच्या परंपरेमध्ये अजूनही काही अथर्वशीर्ष आहेत हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊकच नसते. वैदिक उपासनापद्धतीमध्ये प्रामुख्याने गणपति- अथर्वशीर्ष, सूर्य-अथर्वशीर्ष, नारायण-अथर्वशीर्ष, शिव-अथर्वशीर्ष आणि देवी-अथर्वशीर्ष अशा पाच अथर्वशीर्षांंचा उल्लेख आढळतो. तसेच त्या त्या नामनिर्दिष्ट देवतांच्या उपासनामार्गामध्ये सदर अथर्वशीर्षांंचे अतिशय श्रद्धापूर्वक पठण केले जाते. या प्राचीन देवतांच्या उपलब्ध असणाऱ्या अथर्वशीर्षांंच्या प्रारूपाला अनुसरून उत्तरकाळांत अनेक विविध देवी-देवतांची अथर्वशीर्षे रचली गेली. अगदी आधुनिक काळांतही विविध तीर्थक्षेत्रांतील दैवतांना तसेच अवतारी महापुरुषांना अनुलक्षून अथर्वशीर्षांंची रचना केली जात आहे. उदा.- व्यंकटेश-अथर्वशीर्ष, दत्तात्रेयाथर्वशीर्ष, स्वामीसमर्थ-अथर्वशीर्ष, साई-अथर्वशीर्ष आदी. या रचनांतून ‘अथर्वशीर्ष’ या प्रारूपाची लोकप्रियता नक्कीच लक्षांत घेण्याजोगी आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला देवी उपासनेमध्ये महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या देवी-अथर्वशीर्षांचा थोडक्यात परिचय करून घ्यावयाचा आहे.

‘अथर्वशीर्ष’ शब्दाचा अर्थ

सामान्यत: अथर्वशीर्ष हे त्या त्या देवतेचे स्तोत्र म्हणूनच पठण केले जात असले तरी मूलत: ते उपनिषद आहे. वैदिक वाङ्मयामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद प्रसिद्धच आहेत. यातील प्रत्येक वेदाच्या विविध शाखा-उपशाखा असतात. स्थूलमानाने पाहिले असता प्रचलित शाखेनुसार मूळ वेदांचे संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद अशा चार भागांमध्ये विभाजन केले जाते. यांपैकी चौथा वेदभाग जो उपनिषद, तो भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेचा मूलाधार मानला गेला आहे. उपनिषदे ही वेदांचा अंतिम भाग असल्यामुळे त्यांना ‘वेदान्त’ म्हणून ओळखले जाते. तसेच वेदांचा सर्वोत्तम वा सर्वोच्च भाग म्हणून त्यांना वेद-श्रुतींचे  शिरस्, शीर्ष अथवा शिखा म्हणूनही संबोधिले जाते. अथर्ववेदाचा शिरोभाग म्हणून प्रस्तुत उपनिषदाच्या प्रारूपाला ‘अथर्वशीर्ष’ असे नाव रूढ झाले. ईशावास्य, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडूक्य, तैत्तिरीय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्यक ही दहा अतिशय प्राचीन उपनिषदे मानली जातात. या मूळ उपनिषद-साहित्यातील शैलीचे अनुकरण करून उत्तरकाळामध्ये केल्या गेलेल्या अनेक रचनांनाही ‘उपनिषद’ म्हणूनच मान्यता मिळाली. चिकित्सक संशोधक त्यांचा निर्देश ‘नव्य उपनिषदे’ म्हणून करतात. या नव्य उपनिषदांमध्ये ब्रह्मविद्या, अध्यात्म या विषयांच्या बरोबरीने भक्ती, उपासना, योगसाधना, विशिष्ट धार्मिक वा सांप्रदायिक आचार यांबद्दलचेही सिद्धांत मांडले गेले. तत्कालीन समाजात अतिशय लोकप्रिय ठरलेल्या शैव, वैष्णव आणि शाक्त अशा काही तंत्रप्रधान उपासना-संप्रदायांचेही आचार-विचार तसेच तत्त्वज्ञान नव्य उपनिषदांच्या माध्यमातून मांडले गेले. या नव्य उपनिषदांच्या परंपरेतील एक अतिशय लोकप्रिय प्रारूप म्हणजेच ‘अथर्वशीर्ष’  होय.

ऋग्वेदामध्ये ‘दध्यङ्गाथर्वण’ या अथर्वा -गोत्रातील ऋषीची कथा येते. पुराणामध्ये याचाच उल्लेख दधिची या नावाने आढळतो. या ऋषीला इंद्राने अतिशय गूढ असे ज्ञान प्रदान केले, ते अन्य कोणालाही सांगावयाचे नाही असा कडक र्निबध घालून दिला आणि  र्निबधाचे उल्लंघन झाल्यास तात्काळ शिरच्छेद करण्यात येईल अशी तंबीही दिली. देवांचे वैद्य असणाऱ्या अश्विनीकुमारांनी दध्यङ्गाथर्वणाला त्या निगूढ ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी परोपरीने विनविले तेव्हा दध्यङ्गाथर्वणाला अश्विनीकुमारांसारख्या सुपात्र शिष्यांना इच्छित विद्या नाकारणे रुचेना व इंद्राने घालून दिलेला र्निबधही मोडवेना. म्हणून मग त्याने अश्विनीकुमारांना र्निबधाविषयी सांगितले. त्यावर अश्विनीकुमारांनी एक नामी युक्ती योजली. अश्विनीकुमारांनी आपल्या दिव्य शल्यतंत्राचा उपयोग करून दध्यङ्गाथर्वणाचे मूळ मस्तक कापून सुरक्षित ठेवले आणि  एका अश्वाचे मस्तक तात्पुरते दध्यङ्गाथर्वणाच्या शरीरावर जोडले. या अश्वमुखानेच दध्यङ्गाथर्वणाने अश्विनीकुमारांना निगूढ ब्रह्मविद्येचा उपदेश केला. आपण घालून दिलेल्या र्निबधाचे उल्लंघन झाल्याचे पाहून देवराज इंद्राने दध्यङ्गाथर्वणाचे उपदेश करणारे घोडय़ाचे मस्तक कापले. मात्र त्यानंतर पूर्वनिर्धारित योजनेनुसार अश्विनीकुमारांनी दध्यङ्गाथर्वणाचे मूळ मस्तक पुन्हा त्याच्या धडावर जोडून ऋषीला पुनरुज्जीवित केले. इंद्राद्वारे कापल्या गेलेल्या ज्या अश्वशीर्षांद्वारे निगूढ अशा ब्रह्मविद्येचा उच्चार केला गेला तेच पुढे अथव्र्याचे शीर्ष म्हणून पूज्य ठरले. देवांच्या रक्षणासाठी त्या शीर्षांतूनच अनेक मंत्रात्मक अस्त्रांची निर्मिती केली गेली. या पौराणिक कथेतून गूढ ब्रह्मविद्या, दिव्य मंत्र यांच्याशी ‘अथर्वशीर्ष’ या संकल्पनेचा असणारा अनुबंध ध्वनित झाला आहे. मंत्र आणि ब्रह्मविद्या अथवा तत्त्वज्ञान हे विषय सुरुवातीला उल्लेखिलेल्या पाचही अथर्वशीर्षांंमध्ये अपरिहार्यपणे येतात. किंबहुना त्यांच्याशिवाय अथर्वशीर्ष पूर्णच होत नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

देव्यथर्वशीर्षांचा परिचय

संस्कृतभाषेतील संधिनियमांनुसार देवी+ अथर्वशीर्ष याचे ‘देव्यथर्वशीर्ष’ असे रूप होते. देव्यथर्वशीर्ष हे ‘देव्युपनिषद’ या नावानेही ओळखले जाते. पूर्वी उल्लेखिल्याप्रमाणे नव्य उपनिषदांच्या शाक्त प्रधान परंपरेतील मुख्य उपनिषदांपैकी हे एक आहे. काही चिकित्सक विद्वानांच्या मते हे  उपनिषद, इसवी सनाच्या सातव्या- आठव्या शतकांच्या दरम्यान रचले गेले असावे. या उपनिषदावर उपनिषद्ह्मयोगी यांची संस्कृत टीका उपलब्ध आहे.  त्रिपुरोपनिषद, त्रिपुरा- पूर्वोत्तरतापिनीय, बहद्चोपनिषद, वनदुर्गोपनिषद, कालिकोपनिषद, गायत्र्युपनिषद, षोढोपनिषद, सौभाग्यलक्ष्म्युपनिषद, सरस्वतीरहस्योपनिषद ही शाक्तसंप्रदायाची काही प्रमुख उपनिषदे आहेत. मात्र या सर्वांहून अधिक परिचित उपनिषद हे देव्यथर्वशीर्ष हेच आहे. या उपनिषदामध्ये गद्य-पद्यात्मक मिश्र रचना असणारे एकूण २८ मंत्र आहेत. अन्य अथर्वशीर्षांंप्रमाणेच देव्यथर्वशीर्ष पठणाच्या पूर्वी आणि नंतर “ॐ भद्रं कर्णेभि:.” हा अथर्ववेदीय शांतिपाठ म्हटला जातो. प्रतिपादित विषयांच्या दृष्टीने विचार केला असता या अथर्वशीर्षांचे एकूण नऊ भाग दाखविता येतात- १) देवी आणि अन्य देवतांचा संवाद २) देवांनी केलेली देवीस्तुती ३) कादिविद्या मंत्र ४) कादिविद्येची अधिष्ठात्री असणाऱ्या देवीरूपाचे माहात्म्य ५) देवीचा एकाक्षरी मंत्र ६) देवीचा नवार्ण मंत्र ७) देवीचे रूपध्यान ८) देवीच्या विविध नामांची व्युत्पत्ती ९) अथर्वशीर्ष पठणाची विधाने आणि फलश्रुती.

देव्यथर्वशीर्षांतील तत्त्वज्ञान

उपासनामार्गाच्या दृष्टीने देव्यथर्वशीर्ष हे शाक्त सांप्रदायिक असले तरीही त्यांत आलेल्या तत्त्वज्ञान सिद्धांतांना मूळ वेदान्तदर्शनाची पक्की बैठक आहे. अतिशय अवघड अशी अध्यात्मशास्त्रातील प्रमेये संवादाच्या माध्यमातून सहजपणे उलगडून दाखविणे हे वेदान्तवाङ्मयाचे एक आगळेच वैशिष्टय़ आहे. या उपनिषदाचाही प्रारंभ अशाच एका संवाद प्रसंगाने होतो. एकदा सर्व देवगणांना देवीचे दर्शन झाले. त्या दर्शनाने अचंबित झालेल्या देवांनी त्या देवीजवळ जाऊन तिला नमस्कार केला आणि ‘हे महादेवी! आपण कोण आहात?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा देवी उत्तरली – मी साक्षात ब्रह्मच आहे. प्रकृति- पुरुषात्मक असे हे जग माझ्यापासूनच उत्पन्न झाले आहे. शून्य-अशून्य, आनंद-अनानंद, विज्ञान-अविज्ञान, ब्रह्म-अब्रह्म, वेद-अवेद, विद्या-अविद्या अशी जी काही द्वंद्वे कल्पिली गेली आहेत त्या सर्वांच्या रूपाने मीच एकटी विद्यमान आहे. मीच सर्वत्र व्याप्त झाले आहे. सर्व देवांना आधार देणारी मीच आहे. या विश्वाचे नियमन करणारी देखील मीच आहे. देवी हे विश्वातील सर्वोच्च तत्त्व आणि मूल्य आहे असे या पूर्ण संवादप्रसंगाचे तात्पर्य आहे. थोडक्यात प्राचीन उपनिषदांमध्ये वर्णिलेले आत्मतत्त्वाचे स्वरूप, जे पुढे भगवद्गीतेसारख्या पौराणेतिहासिक आणि अध्यात्मपर ग्रंथामध्येही विस्ताराने चर्चिले गेले आहे, त्या सगळ्या वर्णनाचा सारांश येथे देवीच्या शब्दा-शब्दांतून प्रकट झाला आहे. याच संवादामध्ये ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळातील (१२५ सूक्त) वागम्भृणी या ऋषिकेच्या सूक्तामधील काही मंत्र देवीने केलेल्या आत्मस्वरूपवर्णनाच्या ओघांत आलेले आहेत.

वैशिष्टय़पूर्ण देवीस्तुती

सर्व देवांनी मिळून देवीची केलेली स्तुती यांत येते. या स्तुतीची सुरुवात ‘नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम: । नम: प्रकृत्यै भद्रायै नियता: प्रणता स्म ताम् ॥’ या दुर्गासप्तशतीमधील मंत्राने होत असल्यामुळे या उपनिषदाची रचना दुर्गासप्तशतीच्या (मूळ मरकडेयमहापुराणाच्या) रचनेनंतरचीच असावी असा निष्कर्ष काही विद्वानांनी काढला आहे. एकूण सहा मंत्रांमध्ये ही संपूर्ण स्तुती आलेली आहे. यांत वैरोचनी, अग्निवर्णा, दुर्गा, वाग्देवी, कालरात्री, वैष्णवी, स्कंदमाता, सरस्वती, दक्षकन्या अदिती इ. विविध नामरूपांतून व्यक्त होणाऱ्या एकमेवाद्वितीय अशा आदिशक्तीचे स्तवन केलेले आहे. अथर्वशीर्षांच्या उत्तरार्धात देवीचे ध्यानस्वरूप वर्णिले आहे. देवी त्रिनेत्रा, आरक्तवर्णा आहे. तिच्या चार हातांपैकी दोन हातांत पाश आणि अंकुश ही आयुधे असून उरलेल्या दोन हातांनी ती भक्तांना वर आणि अभय प्रदान करते. प्रत्येक जीवाच्या हृदयकमलामध्ये चेतनेच्या रूपामध्ये ती देवीच वास करते. देवी मंत्रांच्या ठायी मातृका म्हणजेच मुळाक्षरे, शब्दांच्या ठायी ज्ञान, ज्ञानाच्या ठायी स्वसंवेद्यत्व आणि शून्यावस्थेमध्ये साक्षी होऊन राहते. अखेर भवभयाने व्याकुळ झालेल्या जीवांना दुस्तर अशा संसारसागरातून सोडविणाऱ्या दुर्गादेवीला वंदन करून स्तवनाचा समारोप केलेला आहे.

मंत्रशास्त्र

आदिशक्तीच्या उपासनासंप्रदायांमध्ये कालीकुल आणि श्रीकुल असे दोन मुख्य प्रवाह आहेत. त्यापैकी प्रस्तुत उपनिषदाच्या तत्त्वज्ञानावर श्रीकुलपरंपरेचा प्रभाव असल्याचे स्पष्ट दिसते. याच परंपरेचे अनुयायी प्राय: ‘श्रीविद्योपासक’ म्हणूनच ओळखले जातात. श्रीकुलपरंपरेमध्ये मुख्यत्वाने आदिशक्तीच्या ‘ललिता त्रिपूरसुंदरी’ या रूपाची उपासना केली जाते. ललितांबिकेच्या उपासनेसाठी संप्रदायामध्ये विशिष्ट बीजाक्षरांनी युक्त असा षोडशाक्षरी मंत्र जपला जातो त्यालाच षोडशीविद्या असे म्हणतात व त्या मंत्रस्वरूपावरूनच देवीला ‘षोडशी’ या नावानेही ओळखले जाते. या षोडशीविद्यामंत्राचे- ‘कादि’ अर्थात ‘क’ या बीजाक्षराने सुरू होणारा, ‘हादि’ म्हणजेच ‘ह’ या वर्णाने सुरू होणारा आणि ‘सादि’ म्हणजे ‘स’ या अक्षराने सुरू होणारा असे तीन प्रमुख भेद सांगितले जातात. प्रस्तुत उपनिषदामध्ये यापैकी ‘कादि’विद्या मंत्र आला आहे. या मंत्राच्याच बरोबरीने ‘शाक्त प्रणव’ म्हणून ओळखला जाणारा एकाक्षरी देवीमंत्र तसेच प्रसिद्ध नवार्ण (नवाक्षरी) चामुंडा-मंत्रा यांचा निर्देश आणि जपमाहात्म्यही या अथर्वशीर्षांमध्ये आले आहेत.

शाक्तपरंपरेमध्ये मंत्रविद्या अतिशय गोपनीय मानली गेली आहे, या विद्येचे ज्ञान गुरूमुखांतूनच होणे अत्यावश्यक असल्यामुळे सदर विद्येचा मंत्र हा अतिशय सांकेतिक पद्धतीने दिला गेला आहे. प्राचीन भारतीय तंत्रपरंपरेमध्ये प्रचलित असणारी ही संकेतीकरणाची पद्धत (एन्कोडिंग मेथड) अतिशय वैशिष्टय़पूर्ण आहे. मंत्रशास्त्रामध्ये प्रचलित असणाऱ्या विविध बीजमंत्रांना वा वर्णाक्षरांना प्रत्येकी विशिष्ट संज्ञा निर्धारित केली जाते. जेव्हा मंत्र सांगावयाचा असतो, तेव्हा मंत्रातील अक्षरांच्या क्रमानुसार त्या त्या अक्षरांच्या केवळ संज्ञाच सांगितल्या जातात. ज्या साधक शिष्याने गुरुमुखातून बीजाक्षरे व त्यांच्या संज्ञांचे ज्ञान प्राप्त केले असेल त्यालाच त्या संज्ञांच्या समूहाचे विसंकेतीकरण करता येते. या विसंकेतीकरणाच्या पद्धतीलाच (ऊीू्िरल्लॠ टी३ँ)ि क्रमाने वर्णोद्धार, बीजोद्धार व मंत्रोद्धार असे म्हणतात. तर अशा वैशिष्टय़पूर्ण सांकेतिक पद्धतीचा अवलंब प्रस्तुत अथर्वशीर्षांमध्ये देवीउपासनेचे तीन मंत्र सांगण्यासाठी झालेला आढळतो. सर्वसामान्य उपासकांच्या साधनेसाठी सहज कळेल असा एक देवीगायत्री-मंत्रही (प्रचलित देवीगायत्री मंत्रांपेक्षा काहीसा वेगळा) यांत आला आहे. तो पुढीलप्रमाणे ‘महालक्ष्म्यै च विद्महे सर्वशक्त्यै च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्॥’

देवी-नामांची व्युत्पत्ती

या अथर्वशीर्षांमध्ये देवीच्या काही नामांची व्युत्पत्ती दिलेली आढळते. उदा. – ‘अज्ञेया’ म्हणजे जिचे स्वरूप ब्रह्मादिक देवांनाही जाणता आले नाही ती, ‘अनंता’ अर्थात जिच्या स्वरूपाचा कधीही अंत होत नाही अशी, ‘अलक्ष्या’ म्हणजे जिचे ग्रहण इंद्रियांद्वारे करता येत नाही ती, जिचा जन्मकाळ हा कोणालाच माहिती नाही ती ‘अजा’, जिच्या पलीकडे दुसरे काहीच नाही व जिला ओलांडून जाणे हे दुर्घट (अशक्यच) आहे ती ‘दुर्गा’; अशा प्रकारे देवीच्या नामावलीत येणाऱ्या विविध नावांमागील धारणा आपल्याला या अथर्वशीर्षांंतून अधिक स्पष्ट होतात.

अथर्वशीर्ष पठणासंबंधी विधाने आणि फलश्रुती – देव्यथर्वशीर्षांचे पुरश्चरण करावयाचे झाल्यास १०८ आवर्तने केली जातात. देवतांच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करावयाची असल्यास तत्पूर्वी या अथर्वशीर्षांचे पुरश्चरण केले जाते, त्यामुळे ते आपसूकच प्रतिमेठायी देवतेचे नित्य वास्तव्य राहते असे या अथर्वशीर्षांत म्हटले आहे. केवळ देव्यथर्वशीर्षांच्या पठणाने पंच अथर्वशीर्ष पठणाचे फळ लाभते तसेच नित्य याची दहा आवर्तने केल्यास साधक पातके आणि संकटे यांपासून मुक्त होतो. मंगळवारी अश्विनी नक्षत्र असताना देवीच्या प्रतिमेजवळ बसून निष्ठेने जप केल्यास महामृत्यूचेही भय दूर होते- अशी विस्तृत फलश्रुती उत्तरार्धामध्ये वर्णिलेली आहे.

समारोप

ज्ञान आणि भक्ति-उपासनेच्या मार्गांची सांगड घालणारे असे हे देव्यथर्वशीर्ष आहे. प्राचीन वैदिक परंपरेच्या अखंड धारेतून कालौघामध्ये निघालेले विविध पौराणिक, दार्शनिक तसेच तांत्रिक विचारप्रवाह हे मूळ प्रवाहाशी जोडून ठेवण्याचे कार्य या ‘अथर्वशीर्ष’ रचनांतून निश्चितच साधले गेले. अशा या अथर्वशीर्ष-परंपरेचे केवळ वरवरून विहंगावलोकन करीत असतानाही, भारतीय धर्मसंस्कृतीच्या आकाशातील ही वाङ्मयीन क्षितिजे आपल्या कल्पनांच्याही पलीकडे किती अफाट पसरली आहेत हे क्षणोक्षणी जाणवत राहते.

श्रीदेव्यथर्वशीर्षम्

शान्तिपाठ –

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:।

स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिव्र्यशेम देवहितं यदायु:।

स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न: पूषा विश्ववेदा: ।

स्वस्ति नस्र्ताक्ष्यो अरिष्टनेमि: स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥

ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ।

ॐ सर्वे वै देवा देवीमुपतस्थु: कासि त्वं महादेवीति ॥ १॥

साऽब्रवीदहं ब्रह्मस्वरूपिणी। मत्त: प्रकृतिपुरुषात्मकं जगत्।

शून्यं चाशून्यं च ॥ २॥

अहमानन्दानानन्दौ। अहं विज्ञानाविज्ञाने।

अहं ब्रह्माब्रह्मणी। द्वे ब्रह्मणि वेदितव्ये।

इति चाथर्वणी श्रुति:। अहं पञ्च्भूतानि।

अहं पञ्चतन्मात्राणि। अहमखिलं जगत् ॥ ३॥

वेदोऽहमवेदोऽहम्। विद्याहमविद्याहम्।

अजाहमनजाहम्। अधश्चोर्ध्व च तिर्यक्चाहम् ॥ ४॥

अहं रुद्रेभिर्वसुभिश्चरामि। अहमादित्यरुत विश्वदेवै:।

अहं मित्रावरुणावुभौ बिभर्मि। अहमिन्द्राग्नी अहमश्विनावुभौ ॥ ५॥

अहं सोमं त्वष्टारं पूषणं भगं दधामि।

अहं विष्णुमुरुक्रमं ब्रह्माणमुत प्रजापित दधामि ॥ ६॥

अहं दधामि द्रविणं हविष्मते सुप्राव्ये यजमानाय सुन्वते।

अहं राष्ट्री सङ्गमनी वसूनां चिकितुषी प्रथमा यज्ञियानाम्।

अहं सुवे पितरमस्य मूर्धन्मम योनिरप्स्वन्त: समुद्रे।

य एवं वेद। स दैवीं सम्पदमाप्नोति ॥ ७॥

ते देवा अब्रुवन्।

नमो देव्य महादेव्य शिवाय सततं नम:।

नम: प्रकृत्य भद्राय नियता: प्रणता: स्म ताम् ॥ ८॥

तामग्निवर्णा तपसा ज्वलन्तीं वैरोचनीं कर्मफलेषु जुष्टाम्।

दुर्गा देवीं शरणं प्रपद्यामहेऽसुरान्नाशयिर्त्य ते नम: ॥ ९॥

देवीं वाचमजनयन्त देवास्तां विश्वरूपा: पशवो वदन्ति।

सा नो मन्द्रेषमरूज दुहाना धेनुर्वागस्मानुप सुष्टुततु ॥ १०॥

कालरात्रीं ब्रह्मस्तुतां वैष्णवीं स्कन्दमातरम्।

सरस्वतीमदिित दक्षदुहितरं नमाम: पावनां शिवाम् ॥ ११॥

महालक्ष्म्य च विद्महे सर्वशक्त्य च धीमहि।

तन्नो देवी प्रचोदयात् ॥ १२॥

अदिर्तिजनिष्ट दक्ष या दुहिता तव।

तां देवा अन्वजायन्त भद्रा अमृतबन्धव: ॥ १३॥

कामो योनि: कमला वज्रपाणिर्गुहा हसा मातरिश्वाभ्रमिन्द्र:।

पुनर्गुहा सकला मायया च पुरूच्यषा विश्वमातादिविद्योम् ॥ १४॥

एषाऽऽत्मशक्ति:। एषा विश्वमोहिनी। पाशाङ्कुशधनुर्बाणधरा।

एषा श्रीमहाविद्या। य एवं वेद स शोकं तरति ॥ १५॥

नमस्तेऽस्तु भगवति मातरस्मान्पाहि सर्वत: ॥ १६॥

सषाष्टौ वसव:। सषकादश रुद्रा:।

सषा द्वादशादित्या:। सषा विश्व्ोदेवा: सोमपा असोमपाश्च।

सषा यातुधाना असुरा रक्षांसि पिशाचा यक्षा सिद्धा:।

सषा सत्त्वरजस्तमांसि। सषा ब्रह्मविष्णुरुद्ररूपिणी।

सषा प्रजापतीन्द्रमनव:। सषा ग्रहनक्षत्रज्योतींषि कलाकाष्ठादि-कालरूपिणी।

तामहं प्रणौमि नित्यम् ॥ १७॥

पापापहारिणीं देवीं भुक्तिमुक्तिप्रदायिनीम्।

अनन्तां विजयां शुद्धां शरण्यां शिवदां शिवाम् ॥ १८॥

वियदीकारसंयुक्तं वीतिहोत्रसमन्वितम्।

अध्रेन्दुलसितं देव्या बीजं सर्वार्थसाधकम् ॥ १९ ॥

एवमेकाक्षरं मन्त्रं यतय: शुद्धचेतस:।

ध्यायन्ति परमानन्दमया ज्ञानाम्बुराशय: ॥ १९॥

वाङ्माया ब्रह्मसूस्तस्मात् षष्ठं वक्त्रसमन्वितम्।

सूर्योऽवामश्रोत्रबिन्दुसंयुक्ताष्टात्तृतीयकम्।

नारायणेन संमिश्रो वायुश्चाधारयुक्तत:।

विच्चे नवार्णकोऽर्ण: स्यान्महदानन्ददायक: ॥ २०॥

हृत्पुण्डरीकमध्यस्थां प्रात:सूर्यसमप्रभाम्।

पाशाङ्कुशधरां सौम्यां वरदाभयहस्तकाम्।

त्रिनेत्रां रक्तवसनां भक्तकामदुघां भजे ॥ २१॥

नमामि त्वां महादेवीं महाभयविनाशिनिम्।

भजामि त्वां महादेवि महाभयविनाशिनि।

महादुर्गप्रशमनीं महाकारुण्यरूपिणीम् ॥ २२॥

यस्या: स्वरूपं ब्रह्मादयो न जानन्ति तस्मादुच्यते अज्ञेया।

यस्या अन्तो न लभ्यते तस्मादुच्यते अनन्ता।

यस्या लक्ष्यं नोपलक्ष्यते तस्मादुच्यते अलक्ष्या।

यस्या जननं नोपलक्ष्यते तस्मादुच्यते अजा।

एकैव सर्वत्र वर्तते तस्मादुच्यते एका।

एकैव विश्वरूपिणी तस्मादुच्यते नका।

अत एवोच्यते आज्ञेयानन्तालक्ष्याजैकानकेति ॥ २३ ॥

मन्त्राणां मातृका देवी शब्दानां ज्ञानरूपिणी।

ज्ञानानां चिन्मयातीता शून्यानां शून्यसाक्षिणी।

यस्या: परतरं नास्ति सषा दुर्गा प्रकीíतता ॥ २४॥

तां दुर्गा दुर्गमां देवीं दुराचारविघातिनीम्।

नमामि भवभीतोऽहं संसारार्णवतारिणीम् ॥ २५॥

इदमथर्वर्शीष योऽधीते स पञ्चथर्वशीर्षफलमाप्नोति।

इदमथर्वशीर्षमज्ञात्वा योऽर्चा स्थापयति।

शतलक्षं प्रजप्त्वाऽपि सोऽर्चासििद्ध न विन्दति।

शतमष्टोत्तरं चास्य पुरश्चर्याविधि: स्मृत:।

दशवारं पठेद्यस्तु सद्य: पाप: प्रमुच्यते।

महादुर्गाणि तरति महादेव्या: प्रसादत:॥ २६॥

सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति।

प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति।

सायं प्रात: प्रयुञ्जनोऽपापो भवति।

निशीथे तुरीयसंध्यायां जप्त्वा वाक्सिद्धिर्भवति।

नूतनायां प्रतिमायां जप्त्वा देवतासांनिध्यं भवति।

प्राणप्रतिष्ठायां जप्त्वा प्राणानां प्रतिष्ठा भवति।

भौमाश्विन्यां महादेवीसंनिधौ जप्त्वा महामृत्युं तरति स महामृत्युं तरति।

य एवं वेद ॥ इत्युपनिषत् ॥ २७॥

इति देव्यथर्वर्शीष सम्पूर्णम् ॥

ॐ भद्रं कर्णेभि:.. बृहस्पतिर्दधातु ॥ ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Navratri 2021 lokprabha special issue devi vishesh dd