-सुनिता कुलकर्णी

सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यामधली महापालिका शाळा क्रमांक तीनचं रुपांतर सध्या टीव्ही स्टुडिओमध्ये झालं आहे. १ जुलैपासून शिक्षक या शाळेत येतात. हातात खडू घेऊन फळ्याचा वापर करत शिकवतात, पण ते मुलांना नाही तर समोरच्या कॅमेऱ्याला आणि त्या धड्यांचे व्हिडिओ तयार करून ते दूरदूर आपल्या घरात, शेतात बसलेल्या मुलांपर्यंत स्थानिक केबल जाळ्याचा वापर करून पोहोचवले जातात. ही बातमी इंडियन एक्स्प्रेसच्या आभा गरोडिया यांनी दिली आहे.

घरात संगणक, टॅब, स्मार्टफोन नसलेल्या तसंच इंटरनेटची जोडणी नसलेल्या पाटण आणि कराडच्या गावांमधल्या मुलांना या माध्यमातून शिकणं सुकर झालं आहे. मुख्य म्हणजे हा उपक्रम सरकारतर्फे नाही तर सलीम मुजावर आणि विजय लगडे यांच्या प्रयत्नांमधून सुरू झाला आहे. सलीम मुजावर हे औषधांचं दुकान चालवतात तर विजय लगडे एका स्थानिक शिक्षण संस्थेचे संचालक आहेत. या दोघांनी या उपक्रमासाठी लागणारा महिना २ हजार रुपयांचा खर्च उचलल्यामुळे आता कराडच्या गावखेड्यांमधल्या मुलांचं शिक्षण स्मार्टफोन, संगणक किंवा इंटरनेट जोडणी नाही म्हणून थांबून राहिलेलं नाही.
या केबलवरच्या शाळेला चार तासांचा स्लॉट मिळाला आहे. त्यात सकाळी दोन तास शैक्षिक व्हिडिओ प्रदर्शित केले जातात आणि संध्याकाळी त्याच व्हिडिओंचं पुनप्रक्षेपण केलं जातं. सकाळी साडेदहाला तासांना सुरूवात झाली की तिसरीपासून सातवीपर्यंतच्या वर्गांसाठी अनुक्रमे प्रक्षेपण केलं जातं. ‘आज काही वर्गांसाठी प्रक्षेपण झालं की दुसऱ्या दिवशी ते वर्ग वगळून इतर वर्गांसाठी प्रक्षेपण केलं जातं. अशा पद्धतीने सगळ्या वर्गांचा समावेश केला जातो’ असं मुख्याध्यापक अर्जुन कोळी सांगतात.

एका महापालिका शाळेत अडीच हजार मुलांना शिकवलं जात असेल, तर या पद्धतीने ५० हजार मुलांना शिकवलं जात आहे. कराड तसंच पाटण तालुक्यातल्या मुलांचा थांबून राहिलेला अभ्यास आता या पद्धतीमुळे मार्गाला लागला आहे. या उपक्रमासाठी महापालिका शाळेतली मुलं डोळ्यासमोर ठेवली असली, तरी सगळी मुलं हे स्थानिक केबलवर हे व्हिडिओ बघू शकतात.

स्थानिक केबलच्या जाळ्याचा वापर करण्याआधी शाळेने पालकांचं एक सर्वेक्षण केलं. त्यात त्यांना असं आढळलं की ५९ टक्के पालकांकडे अँड्रॉइड फोन होते आणि ७२ टक्के पालकांकडे केबल टीव्ही होता, तर ९२ टक्के पालकांकडे हे दोन्ही पर्याय उपलब्ध होते. ज्यांच्याकडे हे दोन्ही पर्याय उपलब्ध नाहीत, ती मुलं आपल्या मित्रांच्या घरी जाऊन व्हिडिओ बघतात. ज्या मुलांना त्या विशिष्ट वेळेत टीव्हीवर हे शैक्षणिक व्हिडिओ बघता येत नाहीत, त्यांच्यासाठी ते व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात येतात. आजपर्यंत असे ३२ व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. पहिली आणि दुसरीच्या मुलांसाठी शिक्षक वेगवेगळी गाणी, अॅक्टिव्हिटीज, गोष्टी त्यांच्या पालकांच्या व्हॉट्स अॅपवर पाठवतात. गेल्या तीन महिन्यात शाळेने झूम, यूट्यूब आणि फेसबुक या तीन माध्यमांचा भरपूर वापर करत मुलांचं शिक्षण सुरू ठेवलं आहे.

हा सगळा पुढाकार शाळेने घेतला आणि त्यासाठी शाळेला तसंच शिक्षकांना शालेय आयुक्त विशाल सोळंकी यांनी प्रोत्साहन दिलं. अर्जुन कोळी सांगतात, ‘शाळेच्या नव्या शैक्षणिक वर्षाचं उद्घाटन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड तसंच शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झालं. सोळंकी यांनी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करून बघण्यासाठी उद्युक्त केलं.या सगळ्यांच्या प्रयत्नातून कराड आणि पाटण तालुक्यामधली मुलांचं शिक्षण टाळेबंदीच्या काळातही थांबून राहिलेलं नाही हे महत्वाचं.