सिद्धार्थ खांडेकर

siddharth.khandekar@expressindia.com

पश्चिम आशियाई आखाती प्रदेशात असूनही उदारमतवादी.. मोठय़ा संख्येनं दक्षिण आशियाई वसलेले असूनही रहदारीच्या शिस्तीच्या बाबतीत कमालीची आग्रही.. अरबी संस्कृतीमध्ये उदय पावूनही आधुनिक पब संस्कृतीला जवळ करणारी.. वाळवंटातही आधुनिक अभियांत्रिकीची वास्तुशिल्पं उभी करणारी.. विविध संस्कृतींचा मिलाफ साधूनही संघर्षांला जराही थारा न देणारी.. दुबईची अशी अनेकविध वैशिष्टय़े सांगता येतील. आज दुबई ही जगातील एक प्रमुख व्यापारी पेठ आहे. दुबई शॉपिंग फेस्टिव्हल हा ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत, ब्राझीलपासून जपानपर्यंत आणि नॉर्वेपासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत बहुतेक सर्व देशांमध्ये चर्चेचा आणि कौतुकाचा विषय असतो. यंदा दुबई शॉपिंग फेस्टिव्हलचे (डीएसएफ) २५ वे वर्ष. दुबईत तिथल्या एमिरेट्स सरकारतर्फे साधंसुधं काही होत नाही. जे करायचं ते भव्यच. जगात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहील असं काहीतरी. शॉपिंग फेस्टिव्हलही याला अपवाद नव्हता. २६ डिसेंबर ते १ फेब्रुवारी या कालावधीत हा फेस्टिव्हल होतो. दुबईचे राजे आणि संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष आणि पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशीद अल् मक्तूम यांच्या प्रयत्नांतून १९९६ साली तो सुरू झाला. सुरुवातीला निव्वळ एक शॉपिंग महामेळा असं त्याचं स्वरूप होतं. कालांतराने डीएसएफची जबाबदारी दुबई पर्यटन विभागाकडे आली. दुबई म्हणजे बुर्ज खलिफासारख्या उंच, आलिशान इमारती, भलेमोठे मॉल्स अशी सर्वसाधारण प्रतिमा असते. परंतु पर्यटन विभागाने डीएसएफच्या कक्षेत अनेक पारंपरिक बाजारपेठाही आणल्या. काही अक्षरश: शून्यातून उभारल्या. ‘सूक’ किंवा बाजार हेही दुबईचे खास वैशिष्टय़. अल सीफ म्हणजे खाडी भागात जलाशयाच्या कडेनं जुन्या गोदीला आधुनिक बनविण्यात आलं. त्यासाठी येथील इमारती एकमजलीच ठेवण्यात आल्या असून, त्यांना मध्ययुगीन माती बांधकामाच्या पेठांचं रूप देण्यात आलंय. अल सीफच्या परिसरातच दुबईतील सुप्रसिद्ध सुवर्ण आणि मसाले बाजार आहेत. सुवर्ण बाजारात फिरताना डोळे विस्फारतात, तर मसाले बाजारात फिरताना अक्षरश: वासानेच आपण तल्लीन होऊन जातो. सुवर्ण बाजारात मोठय़ा प्रमाणावर घासाघीस करायला वाव आहे. मात्र, १८, २२ आणि २४ कॅरेटच्या सोन्याच्या दर्जाविषयी सजग राहावं लागतं.

अल सीफप्रमाणेच अल खवानीज, अल रीगा, सिटी वॉक, अल शिंदागा, फेस्टिव्हल सिटी, बुर्ज पार्क अशा अनेक बाजारपेठा पर्यटक आणि खरेदीदारांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. या बाजारपेठांचं वैशिष्टय़ म्हणजे दुबई आणि अमिरातीच्या परंपरा जपतानाच आधुनिकतेशी समरस होण्याचा विलक्षण समतोल येथे साधलेला दिसून येतो. एरवी शॉपिंग म्हटलं की लहान मुलं कंटाळतात. अल खवानीज किंवा इतरही पेठांमध्ये लहान मुलांसाठी खास उपक्रम राबवण्यात आले आहेत. उदा. अल खवानीज मार्केटमध्ये बर्फाशी संबंधित अनेक खेळ आहेत. येथे लहान मुलांना स्वतच एखादा आइसमॅन बनवण्याची हौसही भागवता येते. या ठिकाणी खुले सिनेमागृहही आहे. दुबईमध्ये अनेक उत्तमोत्तम रेस्तराँ आहेत. ‘ला मेर’ या आणखी एका खाडीकिनारी वसवण्यात आलेल्या बाजारपेठेत रात्री फिरतानाचा अनुभव अद्भुत असतो. दिव्यांची वैशिष्टय़पूर्ण रोषणाई, छोटे छोटे पाणवठे, त्यांच्या काठावर उभी असलेली टुमदार रेस्तराँ हा अनुभव थेट कॅलिफोर्निया किंवा पॅरिसची आठवण करून देणाराच. ला मेर किंवा अल खवानीजसारख्या ठिकाणी सर्वच रेस्तराँमध्ये खाद्यपदार्थ आणि सेवा अत्युच्च दर्जाची मिळते.

ग्लोबल व्हिलेजला भेट देणं हाही एक विलक्षण अनुभव आहे. या ठिकाणी जवळपास पन्नासेक देशांची व्यापार पॅव्हेलियन्स आहेत. या पॅव्हेलियन्समध्ये कपडय़ांपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत सारे काही मिळू शकते. ग्लोबल व्हिलेज संपूर्ण फिरायचं म्हटलं तर हाताशी किमान सहा-सात तास हवेतच. इराणी केशर, येमेनी मध, सौदी अरेबियाचे खजूर अशा पारंपरिक वस्तूंसाठी ग्लोबल व्हिलेजसारखी दुसरी जागा नाही. जवळपास प्रत्येक पॅव्हेलियनमध्ये उत्तम प्रकारचा पारंपरिक कापड बाजार आहे. हस्तकलेच्या वस्तूंचे हजारभर तरी नमुने येथे आढळतात. जोडीला अर्थातच खाद्यपदार्थाचे स्टॉल्स आहेतच. विश्रांतीची भरपूर ठिकाणं आहेत. त्यामुळे सहा तास ग्लोबल व्हिलेजमध्ये फिरणं फारसं अवघड नाही.

दुबईमध्ये जाऊन आलात की आजही बुर्ज खलिफा किंवा डेझर्ट सफारीपलीकडे फारसे प्रश्न विचारले जात नाहीत. जोडीला अर्थातच डय़ुटी फ्री शॉपिंग आलंच. पण दुबईला जायचं झाल्यास एक स्वतंत्र दिवस नियोजन हाटासाठी करायलाच हवं. हाटा माउंटन या दुबई-ओमान सीमेवरील पर्वतरांगा! दुबईतील खऱ्या अर्थानं थंड हवेचं ठिकाण. या डोंगरराजीच्या पायथ्याची जमीन सुपीक आहे. दुबईतील अल्पशी शेती आणि फळबागा याच भागात आहेत. येथील डोंगरमाथ्यावर सिमेंटचे कारखाने आहेत. पण हाटा भागात त्यापेक्षाही खूप काही आहे. सुरुवातीला उंचसखल डोंगराळ प्रदेशात माउंटन बायकिंगसारखे साहसी खेळ अनुभवता येतात. पठारावर हाटा रिसॉर्ट हे उत्कृष्ट हॉटेल आहे; जिथल्या खोल्यांची रचना बैठय़ा घरांसारखी केलेली आहे. तेथून आणखी पुढे गेल्यावर हाटा सरोवर लागतं. या सरोवराच्या किनाऱ्यावर अमेरिकन पद्धतीचे कॅरावान उपलब्ध करून दिले जातात. सरोवरात कायाकिंग, पेडल बोटिंगची उत्तम सोय आहे. आल्हाददायक हवेमुळे येथील मुक्काम अतिशय आनंददायी ठरतो. याच भागात हाटा मार्केट आणि हाटा हेरिटेज व्हिलेज आहे. दुबईमध्ये पूर्वी पारंपरिक गावं कशा प्रकारे वसलेली असत याचा उत्तम नमुना हेरिटेज व्हिलेजमध्ये पाहायला मिळतो. हाटा मार्केटमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमही वरचेवर होत असतात. बार्बेक्यू नाइट्स, माउंटन बायकिंग, फुड ट्रक, कॅरावान अशा काहीशा अमेरिकी संस्कृतीविषयी ओढ असणाऱ्यांसाठी हाटा माउंटन ही सुयोग्य जागा आहे.

दुबईमध्ये बहुतेक सर्व ठिकाणी शुल्कमुक्त किंवा डय़ुटी-फ्री मालासाठी चलन बनवून मिळते. मात्र, खरेदी किमान २५० दिरहॅमच्या वरची हवी. स्थानिक करांतून सवलत मिळण्यासाठी विमानतळावर कक्ष आहेत. वस्तू खरेदी करताना पासपोर्ट सादर करून त्यानुसार पावती बनवणं आवश्यक असतं. कार्डावर खरेदी केल्यास स्थानिक शुल्काची रक्कम परताव्याच्या (रिबेट) स्वरूपात तुमच्या खात्यात जमा होते. आज दुबईच्या एकूण उत्पन्नापैकी केवळ पाच टक्के उत्पन्न तेल उद्योगातून येतं. उर्वरित उत्पन्न व्यापार, पर्यटन, हवाई वाहतूक, वित्तीय सेवा यांतून दुबईला मिळतं. दुबई विमानतळावरून हॉटेलवर वाहनव्यवस्था उपलब्ध करून देणारा होता चक्क एक वसईकर. हाटा माउंटनमध्ये तिरंदाजीचे धडे देणारा होता ठाणेकर. दोघंही मराठी! दुबई शॉपिंग फेस्टिव्हलच्या निमित्तानं दुबईला जाण्याचा योग आला. एमिरेट्स विमान कंपनीच्या कप्तानाने उड्डाण करण्यापूर्वी घोषणा केली- ‘या विमानात १९ देशांचे कर्मचारी तुमच्या सेवेत हजर आहेत!’ असे सांस्कृतिक संमिश्रण हे दुबईच्या यशाचं गमक आहे. दुबईत आमच्या सेवेत असलेल्या मल्याळी टॅक्सीचालकानं कानमंत्र दिला, ‘व्हेन इन दुबई, डू बाय!’ दुबई अर्थातच एका व्यापारपेठेपलीकडे बरीच काही आहे याची प्रचीती तिथं जाऊनच येऊ शकते.