News Flash

मी नाटकाची निवड कशी करतो?

अतुल पेठे लिखित ‘नाटकवाल्याचे प्रयोग’ या मनोविकास प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईत होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील काही अंश..

| March 1, 2015 01:54 am

अतुल पेठे लिखित ‘नाटकवाल्याचे प्रयोग’ या मनोविकास प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईत होत आहे. त्यानिमित्ताने
या पुस्तकातील काही अंश..
मी जेव्हा दिग्दर्शनाचा विचार करतो तेव्हा मी काय विचार करतो? या प्रश्नाचे ‘मला एखादे नाटक आवडते आणि मी ते नाटक दिग्दíशत करतो,’ असे खरे तर सरळ उत्तर देता येईल. ते तसे असतेही. पण ते तितक्याच मर्यादेत राहत नाही. नाटक दिग्दíशत करणे ही लेखनाइतकीच स्वतंत्र गोष्ट होऊन बसते. लेखकाइतकेच ते दिग्दर्शकालाही छळते. निदान मला तरी ते छळते. मानगुटीवर बसते. विचार-रण सुरू करते. जगणे उलटेपालटे करून टाकते. प्रत्येक नाटक जगणे शोषून घेते. मी ते नाटक का करतो आहे, या प्रश्नाच्या अनेक बाजू हळूहळू पुढे येऊ लागतात. आपल्याच आवडीच्या मुद्दय़ाला अनेक प्रश्नांचे पुंजके लटकतात. प्रत्येक प्रश्न आ वासून उभा राहतो. माझ्याबाबत नाटकाची निवडपद्धती पुढील प्रश्नांवर आधारलेली असते..
– नाटकाचा विषय काय?
– विषयातून आशय काय?
– विषयातील योग्य-अयोग्यता, खरे-खोटेपणाला आधार काय?
– आशयातून थेटपणे प्रकट होणारे आणि लपून वर येणारे राजकारण काय सांगते?
– ते राजकारण कोणाच्या बाजूने आहे? (मला माझे नाटक ‘राजकीयदृष्टय़ा योग्य आणि सौंदर्यशास्त्रीयदृष्टय़ा सुयोग्य’ असावे असे वाटते.)
– नाटकातील तत्त्वज्ञान कुठले तात्त्विक प्रश्न उभे करते?
– नाटक पुरोगामी विचार मांडते की प्रतिगामी? म्हणजे त्या नाटकातील आशयमूल्य समाजाला, विचारांना मागे तर खेचत नाही ना?
– आपण करीत असलेल्या नाटकाचे आजचे संदर्भ कोणते?
– नाटकाने नेमके कोणावर आणि कशावर आघात होत आहेत? त्या नाटकाचे नेमके लक्ष्य काय?
– आपले नाटक आपल्या आणि एकूण नाटक परंपरेच्या कुठल्या टप्प्यावरचे आहे?
– नाटक किती संवाद करते? त्या संवादाची भाषा काय? त्या भाषेतून कुठले राजकारण तयार होते?
– त्याकरिता मी निवडलेले नाटक आणि माझे जगणे यांचा काय संबंध काय?
– नाटकाची शैली काय आहे?
असे काहीसे प्रश्न माझ्यासमोर प्रकट होऊ लागतात.
नाटकाची निवड हा कळीचा मुद्दा असतो. अनेक पर्यायांमधून तो आपण जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने स्वीकारलेला भाग असतो. लेखकाला दिसलेल्या सृष्टीला भिडतानाच लेखकाला न दिसलेल्या सृष्टीला दिग्दर्शक पाहत असतो. लेखकाच्या लेखनाला उचित न्याय देतानाच त्या लेखनातील आशयाला नव्या रीतीने दाखवून तो मूळचे नाटक अधिक उंच आणि खोल करतो. अनेकदा स्वतंत्र सर्जनशील वृत्तीने तो ते नाटक स्वत:च्या मुशीतून घडवून लेखकाइतकीच नाममुद्रा त्या नाटकावर सोडतो. ‘तालीम मास्तर’ यापेक्षा हा पुढचा टप्पा भारतीय रंगभूमीने आणि मराठी रंगभूमीनेही गाठला आहे. रतन थिय्याम, हबीब तन्वीर, बी. व्ही. कारंथ, बादल सरकार, सत्यदेव दुबे, विजया मेहता, जब्बार पटेल, वीणापाणी चावला, सफदर हाश्मी ही काही स्वतंत्र नाममुद्रा असलेली नावे. या साऱ्या लोकांनी ‘दिग्दर्शक’ या उपाधीला फार उंची प्राप्त करून दिली. त्यांनी आमच्याकरिता वाटा मोकळ्या केल्या.
तर नाटकाची निवड! नाटक वाचता अथवा ऐकताक्षणीच त्याने मला कशाने ‘एक्साइट’ (उत्तेजित) केले आहे याचा मी विचार करतो. आपण करीत असलेल्या नाटकाने उत्तेजित होणे मला अत्यंत गरजेचे वाटते. ही उत्तेजित अवस्था नाटकातील वैचारिक अथवा भावनिक बाजूने येते. भावनिकरीत्या आली असेल तर ती परत परत नाटक वाचताना आपोआप गळून पडते. वैचारिक उत्तेजना मात्र सर्वकाळ टिकते. अर्थात, ती टिकली तरच ते नाटक मला उत्तेजित करते. नाटक करायला मजा आली पाहिजे, हे सोपे सूत्र आहे. फक्त त्या मजेचा कुठला स्तर मला अभिप्रेत असतो, याचा शोध मी घेत असतो. मी केलेल्या नाटकांची काही उदाहरणे घेतली तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल.
श्याम मनोहरांची नाटके करताना त्यातल्या विलक्षण तिरपागडेपणाने आणि तत्त्वज्ञानाने मला आकर्षति केलेले होते. ‘शीतयुद्ध’ आणि ‘प्रेमाची गोष्ट?’ची रचना ही नेहमीच्या नाटकांहून निराळी तर होतीच; पण ती नवे प्रांत दाखविण्याचा प्रयत्न करीत होती. ‘शीतयुद्ध’ची गोष्टच नेहमीच्या पठडीतली नव्हती. बरे, ती गोष्ट म्हणजे अनेक विचारांना जागे करणारी, प्रसंगी हसवणारी आणि त्याच वेळेस अंतर्मुख करणारीही होती. ‘शीतयुद्ध’ला मी दोन वेळा भिडलो. पण दोन वेळा तेच नाटक वेगळ्या रीतीने करून पाहणे, ही त्या लेखनाची ताकद होती. श्याम मनोहरी व्यक्तिरेखा साकारणे आणि त्यांची भाषा बोलणे ही करून पाहण्यासारखीच खास गोष्ट आहे. या संवादाची लयच निराळी आहे. खरे तर प्रत्येक लेखकाची स्वत:ची लय असते, नाद असतो आणि स्वर असतो. तो दिग्दर्शकाने जाणून घ्यायचा असतो. जाणल्याशिवाय तोडमोड करणेही शक्य नसते. ‘शीतयुद्ध’च्या आशय आणि शैलीतून मला दरवेळी नवनवे अर्थ उमगत असत. नाटक हे नाटय़मय असावे आणि त्याने दृष्टिकोन द्यावा, या माझ्या मागणीला हे नाटक उतरलेले होते.
श्याम मनोहर, गो. पु. देशपांडे आणि मकरंद साठे यांची लेखनशैली एकमेकांहून अर्थातच कितीतरी निराळी आहे. विचारव्यूहही वेगळे आहेत. या तीनही नाटककारांबरोबरची चर्चा ही आनंद देणारी तर होतीच, पण आयुष्य समृद्ध करणारीही होती. हे तिघेही कमालीचे बुद्धिमान असल्याने त्यांच्याशी वैचारिक वगरे संघर्ष झाले म्हणणे फारसे योग्य नाही. मी जमेल त्या ताकदीने आणि खुबीने माझा मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचवत असे, इतकेच. माझे सारे प्रयोग हे लेखकांसोबतच झालेले आहेत. त्यांच्या लेखनाला केंद्रस्थानी मानूनच मी त्यात फेरफार केलेले आहेत. मला लेखक हा महत्त्वाचा वाटतो.
आता मी अधिक काळ काम केलेल्या मकरंद साठेच्या नाटकांकडे पाहायचा प्रयत्न करतो. मकरंदची नाटके ऐकताक्षणीच मला पूर्णपणे कळली असे मला ठामपणे म्हणता येणार नाही. त्यातील गाभा मला अस्वस्थ करीत असे, हे मात्र निश्चित. मकरंदची विचार करण्याची पद्धत आणि लेखनशैली सुरुवातीच्या काळात सर्वस्वी निराळी होती. ही शैली पुढे बदलली. ती अधिक संवादी झाली असे मला वाटते. त्याच्या ‘सापत्नेकराचे मूल’, ‘ठोंब्या’, ‘गोळायुग’ या नाटकांहून ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘चौक’, ‘दलपतसिंग येती गावा’ आणि ‘ते पुढे गेले’ या नाटकांतून हे आपल्याला स्पष्टपणे जाणवते. माझे नाटक जसे बदलत गेले, तसेच मकरंदचेही बदलले. तो मला आमच्या दोघांच्या एकत्रित काम करण्याचा प्रभाव वाटतो. अर्थातच लेखक-दिग्दर्शक अनेक वष्रे एकत्र काम करीत असतील तर ते होणेही अटळच असते.
अनेकदा लेखक हा सतत बरोबर असेल तर आपण ऐकत असलेले त्याचे नाटक इतरांपेक्षा आपल्याला वेगळेच ऐकू येऊ लागते. सतीश आळेकरांचे नाटक थिएटर अकादमीतल्या लोकांना अगदीच वेगळे ऐकू यायचे. त्यातल्या खाचाखोचा त्यांना आतून-बाहेरून उलगडलेल्या असायच्या. हा एकत्र राहण्याचा परिणाम! तर मकरंदच्या बाबतीतही माझा हा प्रकार झालेला आहे. त्याचे ‘www.गोळायुग.com’ हे नाटक मी पुढे नुसत्या ‘गोळायुग’ या नावाने दिग्दíशत केले. ते नाटक मला विलक्षण आवडले होते. मी जेव्हा या नाटकाचे दिग्दर्शन केले तेव्हा आम्ही दोघेही या संहितेला परत भिडलो. आधीच्या प्रयोगात राहिलेले न्यूनत्व आम्हाला जाणवत होतेच; शिवाय नवे विचारही त्यात दिसू लागलेले होते. त्यावर सतत चर्चा झाल्या. त्यातून मकरंदने ते नाटक पुन्हा लिहिले. वस्तुत: हे नाटक धाडसी होते. त्या नाटकाची मर्यादा चारच प्रयोगांची असल्याने ते नाटक थांबले. मकरंदबरोबर केलेली ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘चौक’ आणि ‘दलपतसिंग येती गावा’ ही अशीच विचारांना खाद्य पुरवणारी नाटके होती. ‘सूर्य’तील सॉक्रेटिस आणि आजचे प्रश्न, ‘चौक’मधील तुंबलेली वैचारिक-राजकीय-सामाजिक-मानसिक अवस्था, ‘दलपत’ची माहिती अधिकाराची ताकद आणि त्याचे भारतीय परिप्रेक्ष्यातील महत्त्व या गोष्टींनी मला उत्तेजित केलेले होते. थोडक्यात, नाटक करायला अशा गोष्टी मला उद्युक्त करतात. त्याकरिता विचारशील लेखक ही माझी गरज असते.
लेखक आणि दिग्दर्शक यांच्यातील नातेसंबंध माझ्याबाबत तरी कायमच त्रासदायक, तणावाचे, तरीही अखेर आनंदाचे राहिलेले आहेत. आशय आणि अभिव्यक्तीबाबत दोघांच्यात चिक्कार ओढाताण होते. अर्थात माझ्या मते, सर्जनाकरिता ही लढाई आवश्यकच आहे. माझ्या लेखकांबरोबरचे माझे संबंध आदरयुक्त आहेत; पण ते गोड गोड निश्चितच नाहीत. मी ज्या इतर लेखकांच्या लेखनाला नाटक, माहितीपट अथवा आकाशवाणीद्वारे जाणीवपूर्वक भिडलो ते म्हणजे सॅम्युअल बेकेट, सतीश आळेकर, दिवाकर, भालचंद्र नेमाडे, अरुण कोलटकर, बहिणाबाई चौधरी, दि. बा. मोकाशी, विजय तेंडुलकर, डॉ. सदानंद मोरे आणि मोहन राकेश हे होत. या साऱ्याच लेखकांचे लेखन पुरोगामी, प्रायोगिक आणि आधुनिक संवेदनशील आहे. माझ्याकरिता अशा लेखकांच्या वैचारिक आणि प्रयोगशील लेखनाला भिडणे ही जीवघेणी ओढाताण होती. लेखक जसे त्याचे आयुष्य घेऊन उभा असतो तसाच मीही दुसऱ्या बाजूला आयुष्यासकट उभा असतो. जगण्याविषयी तीव्र संवेदना मांडताना काय योग्य-अयोग्य, असा झगडा चालू असतो. नाटकाबाबत तर हे भांडण ज्वालाग्राही असते. मी करीत असलेले नाटक हा त्या- त्या वेळचा जीवन-मरणाचा प्रश्न बनलेला असतो. एकेक मुद्दय़ांमुळे झोप लागत नाही. प्रचंड अस्वस्थता येत राहते.          

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2015 1:54 am

Web Title: atul pethe theater experiments
टॅग : Atul Pethe
Next Stories
1 दृढ संकल्प जीवी धरावा..
2 प्रभातारा
3 ‘निर्मल ग्राम’ (?)
Just Now!
X