खेळाच्या जगतातील सर्वात जास्त पसा असलेल्या आणि आता दिवसेंदिवस अधिकाधिक बदनामी होत असल्याने सर्वात वाईट प्रसिद्धी मिळालेल्या आयपीएल, अर्थात इंडियन प्रीमियर लीग, या क्रिकेट स्पध्रेचा सहावा खेळ, म्हणजे प्रयोग आता समाप्त झाला आहे. खेळ हा शब्द पूर्वी नाटक-सिनेमाच्या संदर्भात वापरला जात असे. त्याची योजना इथे मुद्दामच केली आहे. कारण आयपीएलचे प्रयोग पहिल्या वर्षांपासूनच गाजत आहेत.
म्हणजे आयपीएलची सुरुवात कशी झाली? तर आधीच्या खासगी टीव्ही चॅनेलच्या आयसीएलचे यश सर्वाचे डोळे दिपवून गेले. आपणही असे काही करावे असा विचार इतरही करू लागले आणि मुख्य म्हणजे त्यांची कमाई डोळ्यात सलू लागल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ती स्पर्धा अवैध ठरवली आणि स्वत:च त्या धर्तीची स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली, अगदी तेव्हापासून. त्यांनी आयसीएलमध्ये सामील झालेल्या खेळाडूंवर दीर्घकाळ डूख धरला होता व त्यांना हक्क म्हणून मिळणारे पसे रोखले होते. नको तेथे आपला अधिकार बेमुर्वतपणे वापरला.
खरे तर तेव्हाच भारतीय क्रिकेट मंडळाला क्रिकेट नाही, तर पशाचे मोल जास्त आहे आणि खेळाडूंना तर त्यांच्या लेखी काहीच किंमत नाही हे सिद्ध झाले. ती इंडियन प्रॉफिट लीग बनली, पण सत्तेप्रमाणेच पशाचे आहे. मनी करप्टस अॅन्ड करप्टस अॅबसोल्यूटली. तसेच घडले. पशाची हाव कधीच न संपणारी असते, असे पूर्वापार सांगितले जाते. त्याचाच प्रत्यय आला. मुळात कसोटी आणि एक दिवसीय सामन्यांनी (टी.व्ही. हक्कांसाठी मिळालेल्या भरपूर पशाने) मंडळाच्या तिजोरीत प्रचंड भर घातली होती. पण त्यांचे तेवढय़ाने समाधान झाले नाही. आयसीएलकडे जाणारा पसा त्यांना सलत होता, तो त्यांना स्वत:कडे वळवायचा होता. मग त्यांनी त्यातील सहभागी खेळाडूंवर कारवाई करून त्यांचे कमाईचे अन्य रस्ते बंद करून टाकले. त्यांच्यावर आपले संपूर्ण नियंत्रण राहील अशी व्यवस्था केली.
पसा कुणाला नको असतो? खेळाडूही त्यामुळेच निमूटपणे मंडळाचे ऐकू लागले. त्यामुळे मंडळाचा जोर आणखीच वाढला. आयपीएलवर त्यांचेच वर्चस्व राहिले आणि त्यामुळे खेळाडूंना ते जे सांगतील ते करावे लागले. कारण त्यांना पसा मिळायला हवाच होता. आणि तोही पुरेसा न वाटल्याने ते सट्टेबाजांच्या जाळ्यात अडकू लागले. ते संबंध उजेडात आले गेल्या स्पध्रेत. पण म्हणजे ते त्याआधी नसेलच असे कोणीही ठामपणे सांगू शकणार नाही. आणि आता तर त्यात थेट मोठे मासेही अडकल्याचे सिद्ध झाल्याने, सर्वाचाच विश्वास मंडळाने गमावला आहे. त्यातही अध्यक्षांचे निकटचे संबंधीय अडकले असले, तरी त्यांनी पदत्याग करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांनीच नेमणूक केलेली चौकशी समिती काय निर्णय देणार याचा अंदाज ज्याचा त्याने बांधावा.
एकच झाले आहे, की मंडळाला ‘इंडियन एक्स्प्रेस’चे संपादक शेखर गुप्ता यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देणे भाग पडणार आहे. गुप्तांनी म्हटले आहे, की आयपीएल ही फुटबॉलमधील इंग्लिश प्रीमियर लीगचा-ईपीएलचा-भारतीय अवतार आहे, की डब्ल्यूडब्ल्यूएफ (कुस्त्या आयोजित करणारी यंत्रणा)चा, हे मंडळाला ठरवावे लागणार आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफच्या कुस्त्यांचे निकाल संघटनेनेच ठरवलेले असतात, हे उघड गुपित आहे. त्यामुळे केवळ मनोरंजन याच उद्देशाने लोक त्या पाहण्यास जातात. (आयपीएलचे बहुसंख्य प्रेक्षकही करमणुकीचा कार्यक्रम म्हणूनच सामना पाहायला जातात.) ऑलिम्पिक कुस्त्यांशी त्यांचा दूरान्वयानेही संबंध नसतो. सध्याची आयपीएलची अवस्था तशीच झाल्याचे दिसत असल्यानेच, एक्स्प्रेसच्या संपादकांनी मंडळाला एकदाचे काय ते ठरवा, असे सांगितले आहे. म्हणजे मग आपण क्रिकेटसाठी काहीतरी करत आहोत वगरे फसवी वक्तव्ये मंडळाला करावी लागणार नाहीत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ एकच करते. आयपीएलमधून मिळेल तेवढा पसा गोळा करते. बस्स. त्यांनी ईपीएलचे नाव काढूच नये. कारण व्यावसायिकांची साखळी आणि संघांना एक सामना घरच्या तर एक प्रतिस्पध्र्याच्या मदानावर खेळावा लागण्याशिवाय त्या दोन्हींत काही फारसे साम्य नाही. परकीय खेळाडूंची संख्या मर्यादा, खेळाडूंच्या या संघातून दुसऱ्या संघात जाण्यासंबंधीचे नियम यांतही फरक आहेच. पण स्थानिक खेळाडूंच्या अग्रक्रमाला आयपीएल विचारत नाही. मुख्य म्हणजे ईपीएलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर सर्व क्लब्जचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असतो आणि राष्ट्रीय फुटबॉल संघटनेचा एक प्रतिनिधी असतो आणि मुख्य म्हणजे त्याला नकाराधिकार असतो.
आयपीएलमध्ये स्वत: राष्ट्रीय संघटनाच सर्वेसर्वा असल्याने त्यांच्यावर वचक असण्याचा संबंधच नाही. त्यांचा आव आम्हाला कोण काय सांगणार, असाच असतो. बरे खेळाशी त्यांना देणे-घेणे नसते. (तसे ते एरवीही नसतेच.) मालक लोकांची यादी पाहिली, तर त्यांचा आणि क्रिकेटचा संबंध शोधण्यासाठी संशोधकच नेमावे लागतील. ईपीएलचे संघ हे क्लब्जचे संघ असतात आणि काही अपवाद सोडले, तर या क्लब्जना मोठा इतिहास आहे. त्यांचा आणि फुटबॉलचा दीर्घकाळचा संबंध आहे आणि खेळासाठी ते बरेच काही करतात. त्यात त्यांना फायदा होतो यात वादच नाही. उदा. नऊ वर्षांखालील, बारा वर्षांखालील, सोळा वर्षांखालील खेळाडूंचे त्यांचे संघ असतात. एक संभाव्य खेळाडूंचा ब संघही असतो. त्या खेळाडूंसाठी फुटबॉल प्रशिक्षणाची व्यवस्था तर असतेच, पण त्यांच्या शालेय, महाविद्यालयीन, विद्यापीठीय शिक्षणाची व्यवस्थाही करण्यात येते. त्यामुळे नंतरच्या काळात ते खेळू शकतात. परंतु ते तसे केवळ फुटबॉलवरच अवलंबून राहिले नाहीत, तरी उपयुक्त शिक्षणामुळे त्यांचे चांगले चालू शकते.
आयपीएलचे काय आहे? येथे संघ बनवण्यात आलेले आहेत. कोणीतरी उद्योजक वा अभिनेते त्यांच्याकडे पसा आहे म्हणून आणि अर्थातच प्रसिद्धीच्या ओढीने संघ बनवतात. बरे ईपीएल क्लब्जप्रमाणे या संघांकडे मुळात खेळाडू नसतातच. कारण आधी संघमालक भाग घेण्याचे ठरवतो आणि मग कोणते खेळाडू घ्यायचे याचा विचार करू लागतो. ते मग लिलावाद्वारे खरेदी केले जातात. अर्थातच त्यांची वये काही लहान नसतात. त्यांच्या प्रशिक्षणाचा वगरे संबंधच येत नाही. कारण त्यांनी तयार मालच खरेदी केलेला असतो. शिवाय त्या खेळाडूंना ते खेळाव्यतिरिक्त नाचगाणी, पाटर्य़ा, चर्चा इ. विविध कामे करायला लावतात. नाही म्हणायची खेळाडूंची इच्छा असेलही, तयारी मात्र नसते, कारण पसा गमावण्याची कल्पनाही ते करू शकत नाहीत.
ईपीएलच्या क्लब्जची स्वत:ची मदाने, स्टेडियम्स आणि प्रशिक्षण केंद्रे असतात. आणि एखाद्या मोठय़ा उद्योगाप्रमाणे त्यांचे व्यवस्थापन असते. आयपीएलची याबाबतची परिस्थिती काय आहे? मंडळच सर्वेसर्वा असल्याने त्यांना याबाबत फिकीर करण्याचे कारणच काय, अशीच त्यांची वृत्ती दिसते. मंडळ सदस्य राज्य संघटनांना वेठीला धरते. त्यांनाही पशाची गरज असतेच. अनेक योजना जाहीर केल्या जातात. त्यापकी किती कार्यान्वित होतात आणि त्यांची फलश्रुती काय हाही संशोधनाचाच विषय आहे. एक आहे. बहुतेक स्तरावरील खेळाडूंची आíथक स्थिती सुधारली आहे, त्यांचे भत्ते, प्रवासाची सुविधा यांच्यातही खूपच सुधारणा झाली आहे. मदानांची अवस्था अप्रतिम असल्याने क्षेत्ररक्षण खूपच सुधारले आहे. (पण प्रत्यक्षात सहा वर्षांत लहान वयाचे किती नवे खेळाडू तयार झाले? फुटबॉलमध्ये रोनाल्डो, मेस्सी यांच्यासारखे खेळाडू क्लब्जच्या प्रशिक्षणातूनच तयार झाले आहेत.)
मंडळाने २०० पेक्षा जास्त माजी प्रमुख खेळाडूंना, गौरवनिधी सामन्यांद्वारा मिळत असे, तसा निधी दिला गेला आहे. पण यामागे त्यांचा गौरव करण्यापेक्षा त्यांची तोंडे बंद करण्याचाच हेतू आहे की काय असा संशय येतो.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आयपीएल संघांशी जवळचे हितसंबंध ठेवू नयेत असेही आहे, पण प्रत्यक्षात चेन्नई सुपर किंग्जचा संघ हा मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या कंपनीचा संघ स्पध्रेत, म्हणजे ते मालक, त्यांचे नातेवाईक मय्यप्पन मुख्याधिकारी-सीईओ (आता ते भले कितीही इन्कार करोत) आणि मंडळाच्या निवड समितीचे पगारी अध्यक्ष श्रीकांत त्यांचे ब्रँड अॅम्बेसेडर (त्यांचा मुलगा अनिरुद्धही चेन्नई संघातच), असा सारा गोतावळा.
ईपीएलमध्ये क्लब म्हणजे एक कंपनीच असते आणि तिचे भागधारक, त्यांची वार्षकि सभा, हिशेब तपासणी वगरे सारे सोपस्कार असतात. त्यांचे डायरेक्टर सामना पाहण्यासाठी आले तरी आपले केबिन सोडत नाहीत, मदानावर नाचत नाहीत, मिठय़ा मारत नाहीत. खेळाडूंच्या सोबतही सतत राहत नाहीत. असभ्य वर्तन करून स्टेडियममध्ये प्रवेशबंदी ओढवून घेत नाहीत. केवळ ईपीएलचे नाव घेऊन आमची तशीच स्पर्धा आहे असे म्हटले म्हणजे सर्व काही तसे होत नाही.
दुसरा प्रश्न आहे सट्टेबाजीचा. तर तेथे ती कायदेशीर आहे, कर भरावा लागतो. सरकारला मोठी प्राप्ती होते. सरकारी सवलती उकळून वर करसवलती तेथे मिळत नाहीत, मागितल्याही जात नाहीत.
– आणि इतके असून फििक्सग काही नष्ट झालेले नाही. कारण अलीकडेच फुटबॉलमध्ये शेकडो सामन्यांत कसे फििक्सग झाले होते, याची बातमी आली होती. तेथे जास्त करून पंच, लाइन्समन आणि गोलरक्षक यांना यासाठी वापरले जाते. त्या खेळाचा वेग ध्यानात घेतला तर बाकी खेळाडूंचा उपयोग करून घेणे अवघडच. फार तर फाऊल करणे वा जखमी म्हणून बाहेर पडणे असे प्रकार होऊ शकतात.
पण क्रिकेटची गती आणि खूपच वेगळे स्वरूप ध्यानात घेतले, तर येथे पंचांपासून कोणाचाही वापर फििक्सगसाठी करता येऊ शकतो. अर्थात स्पॉट फििक्सग. म्हणजे एखाद्या चेंडूचे भवितव्य. त्यातही किती धावा देणार वगरे शंभर टक्के हमीचे नाही. कारण फलंदाज त्यात यशस्वी होईल याची हमी काय? मग फििक्सग कसले होते तर षटकातला चौथा चेंडू नो बॉल असेल वा पुढच्या षटकातला तिसरा चेंडू वाइड असेल, यावर. कारण ते शंभर टक्के गोलंदाजाच्या हातात असते. कधीही नोबॉल न करणारा खेळाडू सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पध्र्याला एकच धाव हवी असताना, नो बॉल टाकतो आणि त्याच्या संघाला सामना गमवावा लागतो, हे आपण यंदा पाहिलेच आहे. तीच गोष्ट गोलंदाजी कोण करणार याची. या षटकानंतर गोलंदाजी अमका खेळाडू टाकेल असे फििक्सग केले जाते. त्यामुळेच असेल की काय कोण जाणे, पण प्रमुख गोलंदाजाने आधीच्या तीन षटकांत जेमतेम नऊ धावा दिल्या असताना त्याचे षटक बाकी राखून भलत्याच खेळाडूकडे चेंडू सोपवला जातो आणि तो प्रतिस्पध्र्यावर धावांची खैरात करतो, फलंदाजीचा क्रम केव्हा आणि कसाही का बदलला जातो, हे सारे संशयास्पद का वाटू नये?
आणि केवळ वीस षटकांच्या डावात अडीच मिनिटांचा टाइमआउट हा जाहिरातींच्या प्रक्षेपणासाठी तर आहेच, पण त्याच काळात सट्टेबाजांना चांगली संधी देण्यात आली आहे, हे कसे विसरता येईल? आपल्याकडे मोठय़ा नावांचा दबदबा अजूनही आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत संशय घेण्याचे धाडस कोणी करत नाही, याचा अर्थ ते संशयापलीकडे आहेत, असा धरणे कितपत योग्य आहे, याचाही विचार व्हायला हवा. कारण सामना हरल्यानंतर धोनी आवश्यकतेनुसार मीडियासमोर येण्यास नकार कसा देऊ शकतो? ईपीएलमध्ये अशा प्रकारच्या वागण्याला मोठी शिक्षा दिली जाते. टेनिसमध्येही असा दंड होतो. पण हे क्रिकेट आयपीएल आहे. येथे मंडळ जे सांगेल ते चूक आणि ते सांगतील त्याला सारे माफ, हाच कायदा आहे.
सांगायचे एकच, की फुटबॉल आणि क्रिकेट हे दोन्ही वेगवेगळे खेळ आहेत आणि त्यांच्या आयोजकांच्या वृत्तीतही मोठा फरक आहे. त्यामुळे ईपीएल व आयपीएल ही दोन नावे बरोबरीने घेऊ नका.
फुटबॉल हा जगन्मान्य खेळांचा राजा आहे, क्रिकेटप्रमाणे स्वयंघोषित खेळांचा राजा नाही आणि क्रिकेट हाही काही आता पूर्वी गौरव केला जाई, त्याप्रमाणे सभ्य गृहस्थांचा खेळ राहिलेला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jun 2013 रोजी प्रकाशित
सट्टेबाजी आणि गैरव्यवहाराचा खेळ!
खेळाच्या जगतातील सर्वात जास्त पसा असलेल्या आणि आता दिवसेंदिवस अधिकाधिक बदनामी होत असल्याने सर्वात वाईट प्रसिद्धी मिळालेल्या आयपीएल, अर्थात इंडियन प्रीमियर लीग, या क्रिकेट स्पध्रेचा सहावा खेळ, म्हणजे प्रयोग आता समाप्त झाला आहे.
First published on: 02-06-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Betting and game of illegal transactions