01 December 2020

News Flash

उदारमतवादी समीक्षकाच्या गुजगोष्टी

प्रा. रा. ग. जाधव हे साठच्या दशकातले एक मान्यवर समीक्षक. दहा वर्षे एस.टी.त कारकुनी, दहा वर्षे प्राध्यापकी आणि वीस वर्षे मराठी विश्वकोशात मानव्य विद्यांचा प्रमुख

| June 23, 2013 01:02 am

lr14प्रा. रा. ग. जाधव हे साठच्या दशकातले एक मान्यवर समीक्षक. दहा वर्षे एस.टी.त कारकुनी, दहा वर्षे प्राध्यापकी आणि वीस वर्षे मराठी विश्वकोशात मानव्य विद्यांचा प्रमुख संपादक, अशी रा.गं.ची व्यावसायिक कारकीर्द. त्यांनी थोडंफार कवितालेखनही केलं आहे, अलीकडे ललित लेखनही केलं आहे. पण त्यांची मुख्य ओळख आहे ती समीक्षक म्हणूनच. मराठी साहित्य-समीक्षेच्या क्षेत्रात त्यांचा अतिशय आदरपूर्वक आणि कौतुकाने उल्लेख केला जातो. त्या रा. गं.च्या निवडक लेखाचे हे पुस्तक, ‘संध्यासमयीच्या गुजगोष्टी’. त्याचे शीर्षक पुरेसे बोलके आणि सूचक आहे. रा. ग. हे वृत्तीने समीक्षक आहेत आणि स्वभावाने निरागस. त्यामुळे त्यांच्या लेखनात आणि जगण्यात एक अलवार हळुवारपण असते. याचा अर्थ असा नव्हे की, त्यात ठामपणा नसतो. तो तर असतोच. पण सर्जनशील साहित्याविषयी एका मर्यादेनंतर फार ठाम विधानं करता येत नाहीत, याची स्पष्ट जाणीव असते. आणि रा. ग. पुस्तकाला एक सेंद्रिय कलाकृती मानतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे ‘साहित्याचे परिस्थितीविज्ञान’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. वय वर्षे ऐंशीच्या सांजपर्वात त्यांची लेखणी धीम्या गतीने चालूच आहे, नव्हे ती नवा काहीतरी विचार मांडू पाहते आहे, याची चुणूक त्यांनी ‘इकॉलॉजी ऑफ लिटरेचर’ ही संकल्पना मांडून दाखवली आहे. त्याची मराठी साहित्यविश्व कितपत दखल घेईल माहीत नाही. रा. गं.नाही त्याची खात्री नाहीच. माझे पुस्तक कोणी वाचणार नाही, असे त्यांनाही वाटते. असो.
प्रस्तुत पुस्तक मात्र रा. गं.च्या इतर पुस्तकांपेक्षा बरेचसे वेगळे आहे. यात साहित्यविषयक लेख आहेत, पण हे रूढार्थाने समीक्षेचे पुस्तक नाही. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर या गुजगोष्टी आहेत. मुख्य म्हणजे त्या सांजपर्वातील आहेत. म्हातारपण हे दुसरे बालपण असते, असे गमतीने(च) म्हटले जाते. पण रा. गं.बाबत ते गमतीने म्हणण्याचीही सोय नाही. कारण ते म्हणतात, ‘‘सांजपर्व माणसाला मीविषयी बोलायला प्रवृत्त करते, खरे तर संधीच देते. पूर्वी हिरीरीने मांडलेल्या विचारांना परिपक्व सहिष्णुता देते. स्वत:कडे व स्वत:च्या सर्व पूर्ण संचिताकडे हळुवार तटस्थपणे पाहण्याची दृष्टी देते. सांजपर्वाच्या छायेत म्हणून संकीर्णतेचे रंगरूप ल्यालेल्या गुजगोष्टी सुचू लागतात.’’
थोडक्यात सांजपर्व हे स्वत:कडेच नव्याने पाहायला लावणारे, स्वत:चा शोध घ्यायला लावणारे वय असते. त्यात रा. ग. समीक्षक. त्यामुळे ते स्वत:कडेही समीक्षकाच्याच नजरेतून पाहतात, आणि स्वत:ला अजिबात झुकते माप देत नाहीत.  ‘उदारमतवादी समीक्षक’ अशी रा. गं.ची मराठी साहित्यविश्वात ओळख असली तरी ते स्वत:बाबत मात्र तितकेसे उदार नाहीत, असे दिसते. यातले काही लेख इतर लेखकांविषयीही लिहिलेले आहेत. त्यांना आदरांजली म्हणून किंवा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी. त्या सर्वामध्ये मननीयता आणि सात्त्विक स्वीकारशीलता आहे. हळुवार परिपक्वता या पुस्तकातील सर्वच लेखांमधून जाणवते.
या पुस्तकात एकंदर अठ्ठावीस लेख असून ते चार भागांत विभागले आहेत. पहिल्या विभागातील नऊ लेख हे स्वत:विषयी आहेत. त्यातून रा. गं.च्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू जाणून घेता येतील. एरवी कमालीचे संकोची, भिडस्त असणाऱ्या रा. गं.नी या विभागात स्वत:च्या मनीचे काही गुज सांगितले आहे. पण तरीही ते लिहितात, ‘काही जण मला आत्मचरित्र लिहायचा आग्रह करतात. आत्मचरित्र म्हणजे सत्याचे प्रयोग. आहे का धाडस? मग कशाला लिहा? त्या वाटेनं मी जाणार नाही. आत्मप्रौढी करण्यासाठी आत्मचरित्र लिहू नये.’
‘सध्या थोर लेखकांची अनुपस्थिती आहे, आव्हानात्मक साहित्यकृतीही निर्माण होत नाहीत, प्रयोगशीलताही कमीच दिसते. या अंधाऱ्या पोकळीत समीक्षेचे अभ्यासकच प्रकाशाचे दीप उजळतील, असे मला वाटते.’ असा विश्वास रा. ग. दाखवतात. ‘दलित लेखकांनी गांधीजींचं ‘माय एक्स्परिमेंट विथ ट्रथ’ वाचावं..मराठीखेरीज अन्य भारतीय भाषांतील दलित वाङ्मयात आयडियॉलॉजी कमी आणि वाङ्मय अधिक आहे. आपल्याकडे उलट आहे.’, ‘मनमोहन आणि ग्रेस यांच्या कवितेत फँटसी आणि इमॅजिनेशनचा संगम आहे’, ‘प्रत्यक्ष जगण्याच्या परीक्षेत बहुतेक लोक नापासाच! कारण जगातील सर्वात अप्रिय सत्य हे ‘मी’विषयीच असते’ असे काही चांगले तुकडे वा ओळी या पुस्तकातील लेखांत सापडतात. आणि त्या आपल्याला थोडय़ाशा चमकावून जातात. रा. गं.नी त्या फार साधेपणाने सांगितल्या आहेत, पण त्या तशा नाहीत.
दुसऱ्या विभागात साहित्यसंस्कृती, भाषा, साहित्य संमेलनाचे औचित्य, साहित्यातील बाप, लेखक-वाचक यांच्यातील अंतर, परिभाषा, सार्वजनिक ग्रंथालय, प्रादेशिक साहित्य या विषयांवरील एकंदर नऊ लेख आहेत. तिसऱ्या विभागातील ‘बन्सीधर, तू आता कुठे रे जाशील?’ आणि ‘अद्भुताचे ब्रह्मांड’ हे दोन्ही लेख, एकंदर जीवनाविषयी रा. गं.ना काय वाटतं, याविषयी आहेत. मात्र जीवनाकडे पाहण्याची रा. गं.ची या दोन्ही लेखांतील दृष्टी ही समीक्षकाची नसून ललित लेखकाची आहे. चौथ्या विभागातील आठही लेख तसे पाहिले तर समीक्षकीय दृष्टीचे, पण टिपणवजा आहेत. त्यातून फारसं काही नवीन हाती लागत नाही. पण तरीही काही निरीक्षणे, मुद्दे जाणून घेता येतातच. ‘श्यामची आई’, ‘स्वामी’, ‘कोसला’ या तीन कादंबऱ्या, नारायण सुर्वे, जी. ए. कुलकर्णी, वसंत आबाजी डहाके यांच्यावरील लेख हे प्रासंगिक असले तरी त्यातून रा. ग. ‘कसं पाहतात?’ हे जाणून घेता येतं. पण या लेखांची लांबी-रुंदी छोटी असल्याने त्यातून त्यांनी फार मोठा व्यूह मांडलेला नाही. ‘आधुनिक मराठी विनोद-परंपरा’हा शेवटचा लेख मराठीतील विनोदी लेखनाचा धावता आढावा घेणारा आहे.
दोनेक वर्षांपूर्वी ज्येष्ठ कोकणी लेखक रवींद्र केळेकर यांचे ‘ओथांबे’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. (ओथांबे म्हणजे ओथंबून आलेले दवबिंदू) केळेकर यांचे विविध विषयांवरील विचार त्यात एकत्र केले आहेत. रा. गं.चे हे पुस्तक काही तसे नाही. ‘माझे चिंतन’ हे त्यांचे पुस्तक त्यांच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने प्रकाशित झाले आहे, त्यातून त्यांच्या विचारांचा गाभा चांगल्या प्रकारे समजावून घेता येतो. त्या तुलनेत प्रस्तुत पुस्तकात चिंतन फारसं नाही, पण मननीयता आणि एकंदरच जगणं, मराठी साहित्य याविषयीची स्वीकारशीलता आहे.
यातील सर्वच लेख हे आठ-दहा पानांचेच आहेत. शिवाय हे समीक्षक रा. गं.नी गप्पा माराव्या तसं लिहिलेलं, हेही वैशिष्टय़च की! , पुस्तक आहे. त्यामुळे त्यात समीक्षकीय परिभाषा फारशी नाही. अनौपचारिक शैली, साधीसोपी भाषा आणि काहीशी काव्यमय लय, ही काही यातील लेखांची वैशिष्टय़े आहेत. ‘खेळीमेळी’, ‘वासंतिक पर्व’ हे रा. गं.चे दोन ललित लेखसंग्रह अनुक्रमे २००८ व २००९ साली प्रकाशित झाले. त्यानंतरचा हा तिसरा. शिवाय सांजपर्वातला. त्यामुळे यातलं मार्दव व लालित्य मनमोकळं आणि दिलखुलास म्हणावं असं आहे.
एका परीने हे बहुधा रा. गं.चं शेवटचं पुस्तक असण्याची दाट शक्यता आहे. कारण उरलंसुरलं असं या पुस्तकाचं पुस्तक आहे. वय वर्षे ऐंशीमध्येही रा. गं.ना नव्या पुस्तकाचं अप्रूप वाटतं. त्याचा पहिला पहिला नवाकोरा वास सुखावतो. गेली ४०-५० पन्नास वर्षे सातत्याने, निरलस वृत्तीने लेखन करणाऱ्या एका उदारमतवादी समीक्षकाच्या या पुस्तकाचं वाचकांनाही अप्रूप वाटावं आणि त्याच्या वाचनानं तेही सुखावेत. कारण गेली पन्नासहून अधिक वर्षे केवळ मराठी साहित्याचं चिंतन-मनन करणयात घालवलेल्या एका व्रतस्थ समीक्षकाचं हे लेखन आहे. जगाकडे, जीवनाकडे आणि मराठी साहित्याकडे सतत कुतूहलाने पाहात राहिल्याने रा. गं.कडे चार वेगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत..आणि त्या या पुस्तकात उतरल्या आहेत. त्यातून निदान काही जणांना तरी काही नव्याने सापडू शकेल.
‘संध्यासमयीच्या गुजगोष्टी’ – प्रा. रा. ग. जाधव, साधना प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १७२, मूल्य – १२५ रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2013 1:02 am

Web Title: book review of sandhyasamaichya gujgoshti
टॅग Samiksha
Next Stories
1 राष्ट्रभावनेचे जनक बंकिमचंद्र
2 येणारच तू..
3 गुलाम
Just Now!
X