नुकतेच दिवंगत झालेले स्थापत्यकार आणि नगरनियोजक चार्ल्स कोरिया यांच्या ‘कांचनजंगा’ इमारतीची ख्यातकीर्त चित्रकार अतुल दोडियांनी काढलेली चित्रं म्हणजे एका कलावंतानं दुसऱ्या कलावंताला कलेतूनच दिलेली दाद! ही चित्रं काढताना या महान वास्तुविशारदाशी त्यांची ओळखही नव्हती. परंतु पुढे त्यांच्या भेटीगाठी होत गेल्या.. त्या प्रवासाचा आलेख-
अतुल दोडिया यांच्याच शब्दांत..
मुंबईत चाळीस वर्षांपूर्वी ‘कांचनजंगा’ ही उंच इमारत उभी राहिली, तेव्हा मुंबईकरांना या इमारतीबद्दल आश्चर्य, नवनवलोत्सव अशी काहीशी भावना होती. मुंबईला तोवर जुन्या, ब्रिटिशकालीन इमारतींबद्दल अभिमान वाटे. पण आधुनिक भारतीय इमारतीबद्दल लोकांना इतकं वाटतंय, असं माझ्या पाहण्यात तोवर नव्हतंच. मलाही ‘कांचनजंगा’ आवडे. तिथं कुणीतरी राहतं, वगैरेही ठीक; पण ती ‘कलाकृती’ आहे असंच वाटायचं. जणू काही एखादं प्रचंड शिल्पच! घाटकोपरला राहणारा मी- जेव्हा केव्हा पेडर रोडवरून जायचो तेव्हा ‘कांचनजंगा’कडेच पाहत राहावंसं वाटायचं. आधी लांबून, मग जवळून. इतकी फ्रेश रंगसंगती.. इतका नवा विचार!
मग १९९४-९५ च्या सुमारास माझ्याही चित्रांमध्ये ‘कांचनजंगा’ आली.. एकदा नव्हे, दोनदा. ‘क्रुसिफिक्शन’ या चित्रात ती इमारत तिच्या छानदार रंगांनिशी दिसते. चित्राच्या पुढल्या भागात एक वयस्कर माणूस दिसतो आहे. पादचारी असला तरी तो वाहतूककोंडीत अडकलाय. मुंबईच्या गर्दीचा अदृश्य क्रूस जणू त्याच्याही खांद्यावर आहेच. त्याचा चेहराही त्रासिक दिसतोय.. मागच्या बाजूला ‘कांचनजंगा’ आहे.. मुंबईतल्या सुखाचं प्रतीक! त्या इमारतीच्या आकाराचा काही भाग कुणाला क्रूसासारखा वाटलाच, तर तो मात्र योगायोग समजावा.
दुसरं चित्र पावसाळ्यातलं आहे. त्यात कुंद वातावरणातली मुंबई दिसते. टॅक्सीच्या काचेतून इमारती दिसतात. त्यातलीच एक ‘कांचनजंगा.’ तीही त्या पावसाळी संध्याकाळी टॅक्सीच्या काचेतून पाहिल्यास राखाडीच दिसतेय.. बाकीच्या इमारतींसारखीच; पण आकारानं ओळखू येतेय!
माझ्या या पहिल्याच महत्त्वाच्या प्रदर्शनाला चार्ल्स आणि मोनिका कोरिया येऊन गेले होते. ओळखही झाली. पण आमच्यातला खरा दुवा ठरला, तो गांधींबद्दलचा आदर, हा. गांधीजींबद्दल कोरियांना किती आदर होता, महात्माजींमुळे त्यांना साधेपणाची प्रेरणा कशी मिळाली, हे सर्वाना माहीत आहे. साबरमती आश्रमातली ‘एग्झिबिशन स्पेस’ हे तर या प्रेरणेचं मूर्तिमंत उदाहरण आहे. या वास्तूत गांधीजींची साधी राहणी, स्वभावातून विचारातही आलेली ऋजुता दिसते. ‘अॅन आर्टिस्ट ऑफ नॉन-व्हायोलन्स’ हे गांधींबद्दलच्या माझ्या चित्रांचं प्रदर्शन १९९९ मध्ये भरलं तेव्हा ‘जहांगीर’च्या वरच असलेल्या केमोल्ड आर्ट गॅलरीत चार्ल्स कोरिया वारंवार येऊन गेले. एकदा तर सहकाऱ्यांसह आले होते. आमच्या गप्पांमध्ये पुढल्या काळातही ‘गांधीजी’ हा विषय असायचाच. बाकीचे विषय म्हणजे कविता, इतर वास्तुविशारदांच्या इमारती आणि मुंबई!
आम्ही दोघेही मुंबईकर आणि मुंबईप्रेमी. याच धाग्यातून त्यांच्यासह काम करायचा किंवा त्यांच्या कामात थोडं सहभागी व्हायचा योगसुद्धा मला एकदा आला होता. ‘मी बांधत असलेल्या कॉटन कॉपरेरेशनच्या नव्या इमारतीत तूच एक मोठ्ठं म्यूरल (भित्तिचित्र वा भित्तिशिल्प) करायचं..’ असं त्यांनी सांगितलं होतं. बेलापूर-पनवेल भागात ही इमारत साकारणार होती. मग मीही जरा काम सुरू केलं. केव्हातरी ते माझ्याकडूनही रेंगाळलं. आणि मग पुढे काहीच झालं नाही. आणि नेमकं काय झालं म्हणून माझं काम थांबलं, हे मला आठवतही नाही. आम्हा दोघांच्या नंतरच्या गप्पांमध्येही कधी पुढे तो विषय आला नाही.
त्यांच्याशी मारलेल्या गप्पांतून त्यांचा गुणग्राहक आणि साक्षेपी स्वभाव कळत गेला. काही पटत नसलं तर ते लगेच सांगायचे. का पटलं नाही, हे त्यांच्याकडून ऐकणं लोभसच वाटे. कारण त्यातून त्यांची अभिरुची दिसायची. अशा बोलण्यातून त्यांची सौंदर्यशास्त्रीय भूमिका कळायची. निवांत भेटीगाठींबरोबरच कुठे कार्यक्रमांत, कुठे पार्टीवजा सोहळ्यांमध्ये ते भेटत, तेव्हाही पहिल्यांदा नवं काय पाहिलं, याची चौकशी करीत.
चार्ल्स कोरियांची भारतातली इतर शहरांमधली वास्तुशिल्पं मी नीट पाहिलीत असं नाही. पण बोस्टनच्या ‘एमआयटी’ची (मॅसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) एक इमारत- मला वाटतं, न्यूरोसायन्स विभागाची.. हे त्यांचं २००५ मध्ये पूर्ण झालेलं काम. तिथल्या एका महत्त्वाच्या संस्थेच्या इमारतीची आखणी करायला मिळणं, हा बहुमानच आहे भारतीयाचा. गंमत म्हणजे त्याच भागात, मला वाटतं- या न्यूरोसायन्स विभागाच्या नंतर लगेच मानसशास्त्र वगैरे विभागाची बिल्डिंग आहे.. ती बांधलीय जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार फ्रँक गेह्री यांनी! म्हणजे गेह्रीची आणि कोरियांची- दोन्ही इमारती तुम्हाला बघता येतात.. गेह्रीची शैलीच खूप कॉम्प्लिकेटेड.. व्यामिश्र. त्या तुलनेत कोरियांची इमारत साधेपणानेच उठून दिसते. कोरियांची ही अमेरिकेतली महत्त्वाची इमारत- त्यांचा जागतिक बहुमान मान्य करूनही भारतीय दिसते, हे सुखावणारं आहे.
असंच चार-पाच वर्षांपूर्वी एकदा ते मुंबई विमानतळावर भेटले. मी लंडनला निघालो होतो आणि ते लिस्बनला. उत्साहात दिसले. पोर्तुगाल सरकारनं त्यांना तिथल्या विज्ञान संग्रहालयाचं काम दिलं होतं. ‘अद्याप ड्रॉइंगच्याच पातळीवर काम आहे. तेच त्यांना दाखवायला चाललोय,’ म्हणाले. पाहिलं तर त्यांच्यासोबत हॅण्ड बॅगेजमध्येच या ड्रॉइंग्जचा पोर्टफोलिओ होता. त्यांनी मला ती ड्रॉइंग्ज दाखवली. मला वाटलं, खरं तर हे काम कुरिअरनंही होऊ शकलं असतं.. पण नाही. ते स्वत: गेले. याचं कारण बहुधा ते जिथं जिथं बांधत त्या- त्या जागेशी असलेलं त्यांचं नातं. लिस्बनची ही जी इमारत पूर्ण झाली, तिचं नाव- ‘सेंटर फॉर द अननोन’!
अलीकडे ते आजारीच होते. गोव्यात जास्त काळ असायचे. कोरिया दाम्पत्याशी माझी अखेरची म्हणावी अशी सविस्तर भेटसुद्धा तीन वर्षांपूर्वी तिथंच झाली. त्यावर्षीच्या डिसेंबरात त्यांनी कलामहोत्सव भरवला होता. त्यांनीच गोव्याची कला अकादमी बांधली. पण हा उत्सव तिथं नव्हता; तर साधासाच आणि जरा आडजागी होता. चित्रकार, साहित्यिक, संगीताच्या क्षेत्रातले लोक आणि काही वास्तुरचनाकार- असे त्यात होते. माणूस आजारी असला तरी मित्रांना भेटल्यावर सुखावतो, हे इथे दिसलं होतं. आता ते गेले असले तरी त्यांनी घडवलेली भव्य शिल्पं आपल्या आसपास जगभर आहेतच. माणसांमुळे ती वास्तुशिल्पं जिवंतच राहणार आहेत..
शब्दांकन- अभिजीत ताम्हणे