News Flash

वेटिंग फॉर व्यास

कुठून आणायची नवी गोष्ट? आसुसून ऐकणारे नाहीत म्हणून जशी ती सुचत नाही, तशी माणसांची जुनी कसबे आता बिनकामाची ठरत आहेत म्हणूनही.

|| गिरीश पांडुरंग कुलकर्णी

कुठून आणायची नवी गोष्ट? आसुसून ऐकणारे नाहीत म्हणून जशी ती सुचत नाही, तशी माणसांची जुनी कसबे आता बिनकामाची ठरत आहेत म्हणूनही. कुठल्याही वयातल्या माणसाला जुनं वाटावं इतका वेग आहे या बदलांचा. बदलत्या जगात उपयुक्तता टिकवण्याकरिता नवं नवं शिकत राहायचं. उगाच पुढच्या पिढय़ांचे गोंधळ होऊ नयेत म्हणून जुनं त्यांना शिकवायचं नाही. किंबहुना, कुणीच कुणाला काही शिकवायचं नाही की कुणी कुणाचं काही ऐकायचं नाही. प्रत्येक जण राजा असण्याची ही चालू गोष्ट तंत्रज्ञानानं लिहिली की भांडवलशाहीनं? बहुधा दोघांनी मिळून संगनमतानं. जुन्या राज्यकारभारातून तयार झालेल्या दु:ख-दारिद्रय़ाच्या कल्लोळातून नवी पहाट उगवण्यासाठी ही गोष्ट लिहिली नवउद्यमींनी. भांडवलातली सर्वव्यापी ताकद दाखवून देणाऱ्या नव्या कल्पना अन् नवकल्पनांना सामथ्र्य पुरवणारं भांडवल अशा दुतोंडी गांडूळाकृती   कण्याची ही कसदार गोष्ट  हा-हा म्हणता हिट्ट  झाली. हर व्यक्ती स्वतंत्र अन् सक्षम असून तिला सर्वभोगी सुखसंपन्न  होण्याचा पूर्ण अधिकार आहे. एवढंच नव्हे तर त्याच्या उपभोगाची तृष्णा हीच मुळी दारिद्रय़ निर्मूलनाची गुप्त कळ आहे असं कथानक रंगलं. आम्ही गोष्टीतले नायक बनवलो गेलो. आम्ही म्हणजे हरएक आम आदमी. एरवी कोणा एका हिरोची वाट पाहण्याची सवय लागलेले आम्ही चकित झालो. च्यामारी! आता आली की आपली बारी! आम्हाला ‘ग्राहकराजा’ म्हटलं जाऊ लागलं. आमच्या दरबारी वस्तूंचा खच जमा होऊ लागला. तरीही या गावचा, त्या गावचा व्यापारी येऊन नवा माल दाखवू लागला. आमच्या स्वप्नातही या मालाचाच लखलखाट. हे सर्व सत्य की आभास, हा प्रश्न पडायच्या आतच आम्ही आमच्या या नव्या रूपात रंगून गेलो. आमच्या पिढय़ांनी शिकवलेल्या सगळ्याच गोष्टी निर्थक ठरवीत या नव्या गोष्टीनं सारं काही नवं आणलं. वस्तू, सवयी, माणसामाणसांतील व्यवहार, भाषा, पोशाख, अन्न, आजार अन् हवाही. या नव्या हवेत श्वास घ्यायलाही स्पर्धा करावी लागत होती एकमेकाशी. या नव्या कथेचे आम्ही लाखो नायक आपापसात स्पर्धा करू लागलो. त्यातून येणारं किलर इन्स्टिंक्ट आम्हाला ‘आपलं ते आपलंच, परंतु दुसऱ्याचं तेही आपलंच’ असा नव्या युगाचा नवा मंत्र शिकवू लागलं. नव्या हवेत घेतलेल्या श्वासानं नवी उमेद अन् नवी स्वप्नं दिली. स्वप्नपूर्तीची नवी साधनंही दिली. मग आम्ही घाईनं माणूसपणा सिद्ध करणारी पूर्वीची मूल्यं चटाचटा टाकून दिली अन् पटकन यंग झालो. शब्दावाचून लिहू लागलो अन् चिन्हांतून हसू, रडू लागलो. आमच्या संभाषणातून नित्य नव्या विश्वाच्या निर्मित्या होऊ लागल्या. एकमेकांवर कुरघोडय़ा करीत आम्ही या स्वनिर्मित गारूडाचे गारुडी बनलो. नित्य नवी खरेदी करीत, नवी कसबे हस्तगत करीत, वेग सांभाळत पळत राहिलो. आमचे देह महत्त्वाचे झाले अन् वासना प्रखर. या प्रखरतेतून नवनव्या सुखोपभोगांची निर्मिती करत राहिलो अन् एकमेकांना विकत राहिलो. कशाचाही बाजार आम्ही उभा करू लागलो. किंबहुना, बाजार मांडता येण्याकरताच आम्ही जगत राहिलो. आम्ही स्वत:चे अन् बाजाराचे गुलाम होत असलो तरी गोष्टीतले मात्र राजे होतो. गोष्ट आमची आहे  याचा आम्हाला सार्थ अभिमान होता. राजा विरुद्ध प्रजा, राव विरुद्ध रंक या  गतकाळच्या गोष्टीनंतर काळानं सिद्ध केलेली ही नवी गोष्ट ‘राजा विरुद्ध राजा’! या स्पध्रेत टिकण्याचा एकच अट्टहास मग चिकटून राहिला अन् सतत यशस्वी असण्याची गरज त्यातून निर्माण झाली. स्वत:व्यतिरिक्त कशाचेही महत्त्व उरले नाही. आम्ही प्रत्येकाचा नीरो होताना पाहत होतो. भवताल जाळून आम्ही अंतरंग उजळण्याची अपार धडपड केली. मात्र, आम्हाला या राजसिंहासनावर बसविणारे या गोष्टीचे लेखक आमच्याशी आरंभलेल्या या खेळामधून एक अनोखी शोकांतिका उभी करीत राहिले. त्यांनी आमचा बुद्ध न होऊ देण्याची खबरदारी घेतली. त्याकरिता हरक्षणी नवा बदल जन्माला घालत त्यांनी आमच्या व्यग्रतेत खंड पडू दिला नाही. आम्हाला झोपू न देणारी सुखबरसात करीत चुकून डोळा लागलाच तर दचकून जागे करणारी विक्राळ भयस्वप्ने रचली. आमच्या जाणिवांच्या उथळपणाला नित्य खळखळाट आणणारे असत्याचे रमल रचले. विरक्तीच्या विचाराचा शीण यावा अशा अचाट भौतिकतेचे सर्जक हे नवे सृष्टीकत्रे, सृजनाची परिसीमा गाठत जणू कळीकाळ बनले. हरेक जीविताच्या अणुरेणूपर्यंत पोहोचून त्यांनी त्यावर सत्ता प्रस्थापित केली. अर्थात हे सर्व त्यांनी आम्हाला विचारून केले. ‘तुम्हाला राजा व्हायचंय काय?’ अशा सोप्या प्रश्नातून त्यांनी आम्हाला गुंगी आणली अन् आमच्या विचारचक्राचे नमुने घेतले. अनंत पायऱ्यांची गणिते मांडून मग त्यांनी या विचारचक्राची गती नियत केली आणि केला आमचा राज्याभिषेक. तद्नंतर सुरू झालेली हातघाई अन् साठमारीची कहाणी त्यांच्या कल्पनेला इंधन पुरवीत सृष्टीचा सत्यानाश करीत राहिली. आम्ही मात्र आमचीच घरे जाळून सोहळे सजवीत राहिलो. मग कधी त्यांनी आमची वर्गवारी केली, तर कधी आमचे कळप बांधले. तर कधी आम्हाला भुरळ घालणारी असाध्य साध्ये सहजी प्रचलित करून दाखविली. सर्वासाठी एकच उपक्रम, एकच पद्धत,  एकच साधन, एकच भाषा असा नंदनवनी व्यवहार घडविला. समतेच्या या दाखल्यातून कधी बंधुता, तर कधी न्याय अवतरल्याचे भ्रम तयार झाले. असं सारं उबदार असतानाही आपापसातील स्पध्रेनं आमच्यातले पशू जागविले. मग तत्परतेने आम्ही झुंडी बांधल्या अन् एकमेकांना एकेकटं गाठून मारू लागलो. तर कधी अचानक अवसान गाळून निखळ थकव्याने सामूहिक आत्महत्या करू लागलो. आमच्या झुंडीचे नियमन करणाऱ्या प्रणाल्या विकून त्यांनी त्यांचे एजंट नेमले.  एजंटांच्या छोटय़ा-मोठय़ा जहागिऱ्या उभ्या राहिल्या. त्यांचे चिरगुट झेंडे नाचवीत आम्ही लढत राहिलो. एकाच वेळी आमच्यात पशुता जागवीत ते आमची आकडय़ातून सूचना ऐकणारी यंत्रं बनवीत राहिले. विश्वाला विरोधाभासी अन् अंतर्वरिोधी बनवीत राहिले. कहाणी शेवटाकडे आणताना त्यांनी आम्हाला चिरतरुण अमरत्वाची गोळी  दिली. जन्मानं मिळालेल्या हक्काच्या मृत्यूवरच अधिकार सांगत त्यांनी जीवनातील सत्यावर पूर्ण पकड मिळवली. आता या रमलातून सुटका नाही. सुटकेचा एकमेव मार्ग म्हणजे नवी गोष्ट सांगणे. मात्र, मोठय़ा चलाखीनं त्यांनी गोष्ट सांगण्या-ऐकण्याचं आमचं मानवी कसबच हिरावून घेतलंय. एक टिकाऊ शोकांतिका साकार केली आहे. आमच्या शयनगृहातील प्रेमकूजनापासून ते मेंदूतील विद्युतकणांपर्यंत सगळ्यावर त्यांचे कान अन् डोळे लक्ष ठेवून आहेत.

अशात कशी अन् कुणी लिहावी नवी गोष्ट?

कशाबद्दल लिहावी? माणसाच्या अस्तित्व-सांगतेची असावी की यंत्रांच्या मानव्यशोधाची? निर्मितीस आवश्यक असा कल्लोळ तर केव्हाच झालाय. आता उंबरठय़ावरच्या विलयाआधी यावा कुणी व्यासासमान कवी.. जो ख्रिस्तस्थिरतेनं वाहून नेईल पाठीवर मानवी करुणेचं ओझं.. वा पाहून सांगेल सत्य स्थितप्रज्ञ कृष्णनजरेनं. किंवा मग यावा प्रत्यक्ष व्यासच- ज्याच्या काव्यास कुठल्याच विषयाचं वावडं नाही. अर्थात त्याची वाट पाहताना लिहीत राहावं प्रत्येकानं. किमान तसा प्रयत्न तरी करावा. कदाचित या जुन्या कसबातूनच सापडेल तो अन् साकारेल नवी गोष्ट!

girishkulkarni1@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 2:32 am

Web Title: girish kulkarni free of charge generation gap mpg 94
Next Stories
1 निरंतर
2 ‘गृहलक्ष्मी’
3 भास
Just Now!
X