19 February 2020

News Flash

ज्ञानशील कलावंतांचे नेतृत्व

कुमारजींच्या कलाजीवनात त्यांना बंडखोर म्हणून ओळखले गेले, परंतु त्यांनी स्वत:च त्याचे खंडन करून टाकले

(संग्रहित छायाचित्र)

‘कुमार गंधर्व- एक सृजनयात्रा’ या शिल्पा बहुलेकरलिखित पुस्तकाला मुकुंद संगोराम यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतून..

पंडित कुमार गंधर्व हे एक घराणेदार अभिजात कलावंत होते. शेकडो वर्षांची संगीत परंपरा कशामुळे टिकून राहिली आणि त्यामध्ये कोणकोणते नवनवे प्रवाह निर्माण झाले, याचा धांडोळा घेताना, काळाच्या प्रत्येक टप्प्यावर परंपरेने आलेल्या संगीत-संस्कारांना प्रश्न विचारणारे ज्ञानशील कलावंत जन्माला आले, असे दिसते. या कलावंतांनी परंपरेचे महत्त्व समजावून घेतानाच, ती टिकवून ठेवण्यासाठी तिचा नव्याने विचार करण्याची आवश्यकता ओळखली. त्यामुळे परंपरेचा नव्याने विचार करताना, तिच्यातील सत्त्वाला जराही धक्का न लावता, ती पुन्हा उजळून टाकण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. प्रबंध गायकीपासून ते ख्याल गायकीपर्यंतच्या या प्रवासात अनेकांनी आपापल्या कुवतीने हे काम केले, त्यामुळेच ही परंपरा प्रवाही राहिली. तिच्यामध्ये सतत नवनवे प्रवाह मिसळत गेले. परंपरेच्या जोखडातून बाहेर पडण्याची क्षमता तिच्यात निर्माण झाली आणि ‘फिरुनी नवे जन्मेन मी’प्रमाणे ती नवोन्मेषांच्या झळाळीने उजळत राहिली. कुमार गंधर्व हे अशा ज्ञानशील कलावंतांचे स्वातंत्र्योत्तर काळातील नेते.

रागसंगीतात नव्याने प्राण फुंकून ते अधिक टवटवीत करण्याचे श्रेय ज्या इन्यागिन्या कलावंतांना द्यायला हवे, त्यात कुमारजींचा उल्लेख अपरिहार्य असाच. अगदी लहानपणापासून ते जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत कुमारजींनी फक्त संगीत केले. संगीत हाच श्वासोच्छ्वास आणि संगीत हेच कर्म; पण हे सारे केवळ करायचे म्हणून नव्हे, तर त्यामध्ये काही वेगळे शोधण्याच्या प्रयत्नातून घडलेले. आता मागे वळून पाहताना, आश्चर्याने यासाठी अचंबित व्हायला होते, की या कलावंताने आपल्या आयुष्यात सर्जनाच्या नाना परींना किती विविधतेने पडताळण्याचा प्रयत्न केला!

कुमारजींच्या कलाजीवनात त्यांना बंडखोर म्हणून ओळखले गेले, परंतु त्यांनी स्वत:च त्याचे खंडन करून टाकले. ही बंडखोरी परंपरा मोडण्याची नव्हतीच. ती परंपरेला नव्या दृष्टीने ओळख दाखवण्याची होती. ते रागसंगीतच गात होते, जे त्यापूर्वी शेकडो वर्षे सुरूच राहिलेले होते; पण तरीही ते आधीच्या सगळ्या कलावंतांच्या खांद्यावर बसून अधिक दूरचे पाहू शकत होते. त्यामुळेच त्यांचे संगीत परंपरेला धरून असतानाही, तिची नव्याने ओळख करून देणारे ठरले. राग, लय, ताल, शब्द अशा अनेक अंगांनी त्यांनी संगीत शोधले. त्यातून त्यांच्या हाती इतके काही नवे लागले, ती ते व्यक्त करण्यासाठी कदाचित त्यांना पुरेसा वेळही मिळाला नसावा. तरीही त्यांनी जे संगीत व्यक्त केले, त्यामुळे पुढील काळात टिकून राहण्याची क्षमता संगीताच्या ठायी निर्माण झाली.

त्यांच्या संगीताच्या समग्र अभ्यासाचे शिवधनुष्य पेलणाऱ्या डॉ. शिल्पा बहुलेकर यांच्या ‘कुमार गंधर्व एक सृजनयात्रा’ या ग्रंथाचे महत्त्व समजून घेणे म्हणूनच आवश्यक आहे. कुमारजींच्या सांगीतिक प्रवासाबरोबरच त्यांची सर्जनशीलता, त्यांचे संगीतविषयक विचार, त्यांच्या गायकीबद्दलचे मतप्रवाह, त्यांचे योगदान अशा विविध अंगांनी या ग्रंथात चर्चा करण्यात आली आहे. आजच्या काळातही कुमारजी काळापुढील कलावंत का वाटतात, याचा हा शोध खरोखरीच वाचनीय आहे. त्याबद्दल डॉ. बहुलेकर यांचे अभिनंदनच करायला हवे.

पाश्चात्त्य संगीत परंपरांमध्ये तेथील परंपरेला प्रश्न विचारणाऱ्या कलावंतांनी स्वत:ची नवी शैली निर्माण केली. नव्या काळाचे नवे संगीत म्हणून त्याची ओळखही निर्माण झाली. परंपरेतील संगीतातून व्यक्त होण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठीचा तो खटाटोप होता. तो अनेक अंगांनी यशस्वीही झाला. व्यक्त होण्यासाठीची सर्जनशीलता संगीतात अंगभूत असावी लागते. ती अपुरी पडते, तेव्हा नवनव्या प्रयोगांना प्रारंभ होतो. कलावंतांना हे प्रयोग अस्वस्थ करतात आणि ते नव्याने परंपरांची फेरमांडणी करीत राहतात. समूह संगीतातून एकल संगीतापर्यंतचा भारतीय उपखंडातील संगीताचा प्रवासही याच पद्धतीने झाला असावा. एकल संगीतातून सर्जनाच्या नाना तऱ्हा व्यक्त करण्याची सर्जक शक्यता जेव्हा प्रचंड प्रमाणात निर्माण होते, तेव्हा नव्या प्रयोगांची आवश्यकताही राहात नाही. भारतीय अभिजात संगीताला समांतर अशा ज्या नव्या परंपरा निर्माण होऊ पाहात होत्या, त्यांना मूळ परंपरेशी फटकून वागण्याची गरजच वाटली नाही, कारण या संगीतात अंगभूतच स्वातंत्र्याची व्यवस्था आहे. नियम आहेत, पण ते काटेकोरच नाहीत. व्यवस्था आहेत, पण त्या मोडून पाहण्याचीही सोय आहे. अशा या भारतीय संगीतात कुमारजींसारख्या कलावंताने जे अद्भुत प्रयोग केले, ते संगीताला अधिक वरच्या पातळीवर नेणारे ठरले, यात शंकाच नाही.

परंपरागत रागसंगीतात असलेली निसर्गाची आस कुमार गंधर्वानी अधिक स्पष्टतेने दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यात निसर्गाचा संगीताशी असलेला थेट संबंध तर त्यांनी उलगडलाच, पण निसर्गसान्निध्याचा संगीतावर होणारा परिणाम किती अभिजात असू शकतो, याचे दर्शनही घडवले. त्यांनी रचलेल्या बंदिशी तर याची साक्ष आहेतच; पण त्यातील स्वररचनांनाही ही निसर्गदत्ततेची जी देणगी मिळाली, ती कुणालाही अधिक मोहित करणारी ठरली. अभ्यास, चिंतन करण्यासाठी  कलेशी तादात्म्य पावणे म्हणजे काय, हे कुमारजींच्या संगीतातून सातत्याने दिसते. त्यामुळे गीत हेमंत, वर्षांगीत, गौड मल्हार दर्शन, ऋतुराज महफिल, माळवा की लोकधुने यांसारख्या कार्यक्रमांतून त्यांनी निसर्ग-संगीताचा जो संबंध उलगडून दाखवला, त्यामुळे त्या संगीताची खुमारी अधिकच उठून दिसली; पण कुमारजी एवढय़ावरच थांबले नाहीत, कारण ते संगीत संशोधक होते.

बालगंधर्वासारख्या कलावंताच्या संगीताची उलगड करण्याची त्यांना गरज वाटली. त्यासाठी त्यांनी संगीतातील गंधर्वतत्त्व म्हणजे काय, याचाच ध्यास घेतला. गंधर्वशैलीचा नव्या रूपात घेतलेला हा शोध हे कुमारजींच्या अभ्यासक वृत्तीचे फलित होते; पण त्याच्याबरोबरीनेच संत तुकाराम, कबीर, सूरदास, तुलसीदास, मीरा यांच्या साहित्यातील संगीताचे अस्तरही त्यांनी शोधून काढले. या संतांच्या साहित्याचे अवगाहन केल्याशिवाय त्यांच्या विचारांमध्ये लपलेले संगीत सापडणे अशक्य होते. कुमारजींनी नेमके तेच हेरले आणि या संतांच्या रचनांना स्वरांतून व्यक्त केले. त्या स्वररचनांमधून प्रत्येक संताच्या विचारप्रवृत्ती सुस्पष्टपणे कशा वेगळ्या दिसतात, हा अनुभवण्याचाच भाग आहे. निर्गुणी हा कुमार गंधर्वाच्या संगीतातील एक अविभाज्य घटक. भारतीय तत्त्वज्ञानाच्या व्यासंगाशिवाय ते संगीतातून व्यक्त होणे अशक्यच. कुमारजींनी हा व्यासंग केला. त्या तत्त्वज्ञानाच्या मुळापर्यंत जाऊन, ते समजावून घेऊन एक स्वतंत्र कलादालन समृद्ध करण्याचे त्यांचे कार्य म्हणूनच अतिशय मोलाचे आहे. विचार आणि स्वरसंगीत यांची ही अनोखी सांगड समजून घेताना कुमारजी किती उंचीवर गेले आहेत, हे समजते आणि त्यांना कुर्निसात करता करता आपली मान आपोआपच लवू लागते. त्यांच्या एकूण संगीतप्रवासात जे दोन ठळक विभाग दिसतात, ते रागसंगीत आणि निर्गुणी. या दोन्ही विभागांना एकमेकांत मिसळू न देण्याचे कसब कुमारजींकडे होतेच. त्यामुळे रागसंगीतातील स्वरलडी आणि निर्गुणीतील स्वरांचा लहेजा यातील सौंदर्य त्यांना दिसू शकले. कलावंत आणि विचारवंत म्हणून कुमार गंधर्व यांनी जे अनन्यसाधारण कार्य केले, त्याचे समग्र दर्शन डॉ. शिल्पा बहुलेकर यांच्या या ग्रंथात होते. केवळ चर्चाच नव्हे, तर नोटेशनसह ती चर्चा समजावून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणूनच कौतुकास्पद आहे. मराठीमध्ये संगीतावरील लेखन खूपच अल्प प्रमाणात आहे. त्यामध्ये या ग्रंथाने भरच पडली आहे. संस्कार प्रकाशन या संस्थेने संगीत विषयावरील ग्रंथनिर्मितीचा घेतलेला ध्यास हेही त्यामागील एक कारण आहे. त्यामुळे प्रकाशक प्रसाद कुलकर्णी यांचेही अभिनंदन आवश्यकच आहे.

First Published on September 8, 2019 2:06 am

Web Title: kumar gandharva ek srujan yatra book review abn 97
Next Stories
1 नाटकवाला : ‘करोडो में एक’
2 संज्ञा आणि संकल्पना : मन वढाय वढाय..
3 गवाक्ष : ओलावा
Just Now!
X