|| मकरंद देशपांडे

प्रेमाचं मोजमाप करणं अवघड म्हणून वर्षांनुवर्ष कविता, शायरी, दोहे, कथा, निबंध, नाटकं लिहिली जात आहेत. खरं तर प्रेमाशिवाय लिखाणाच्या विश्वात गुरुत्वाकर्षण शक्ती संपल्यासारखं वाटेल. शेक्सपिअरचं रोमिओ-ज्युलियट हे पहिल्या प्रेमाच्या, षोडश वयाच्या आसपासच्या वयोगटातलं भोळं पण वेड लावणारं प्रेम. पण त्याची त्यानं शोककथा केली. दोघांना मारून टाकलं आणि ती कथा प्रेमापेक्षा अधिक ताकदीची, पूर्वग्रहाची, वैमनस्याची, नराश्याची झाली.

लेखक किंवा कवी शक्यतो प्रेमाचा वापर नाटय़ासाठी करत असतो. भक्ती हा त्याला अपवाद आहे, पण माणसा माणसात भक्ती शक्यतो नसतेच, असतं ते प्रेमच! पण माणूस हा मर्त्य असल्यानं प्रेमाला सतत मारलं जात असावं. पण बरीच कथानकं, चित्रपट असे आहेत- ज्यात स्वर्गात भेटू किंवा साताजन्मांची आहे आपली गाठ.. असं सांगून वर्तमानातली जवळपास असलेल्या मृत्यूची भीती मिटवली जाते.

मला असं वाटलं की, आपण मर्त्य जगातलं अमर प्रेम लिहू आणि त्यात साताजन्मांची गाठही बांधू आणि ‘गृहलक्ष्मी’ नावाचं नाटक लिहिलं गेलं. बायको ऑफिसमधून आलेल्या नवऱ्याला प्रश्नांच्या फैरी झाडून हैराण करून सोडते. नवरा थकलाय म्हणून तो त्रास करून घेत नाहीए किंवा तिची ही सवय आहे म्हणून तो रागावला नाहीए, असं नाहीए. तर तिला देवाघरी (अपघातात निधन) जाऊन दोन वर्ष झालीत, पण ती (बायको) काही केल्या जात नाहीए. तिचं म्हणणं असं की, ती नवऱ्याला सोडून जाऊ शकत नाही, कारण नवऱ्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे. नवऱ्याचं म्हणणं पडतं की बायकोलाच जायचं नाहीए. तिला हे घरच सोडायचं नाहीए. ती खऱ्या अर्थानं गृहलक्ष्मी आहे. तिच्यासाठी आयुष्य म्हणजे फक्त नवरा होता आणि आहे.

‘वटपौर्णिमेच्या दिवशी साताजन्मांची साथ द्यायची शपथ घेतलीये, मग पहिलाच जन्म असा कसा संपवू?’ असा मूलभूत प्रश्न तिला पडलेला आहे. त्यात नवऱ्यानं आपल्या बायकोच्या अकाली निधनामुळे चिडून कोणतेही अंत्यविधी केले नाहीत, तर त्याचा अर्थ तिनं असा काढला की नवऱ्याला तिला जाऊ द्यायचं नाहीए. तिनं त्याला पटतील अशी कारणं दिली. नवऱ्यानं स्वत:ला घरात बंद करून घेतलं होतं. मित्रांनी त्याला सायकिअ‍ॅट्रिस्टकडे नेलं होतं, इलेक्ट्रिक शॉक ट्रीटमेंट देण्यापर्यंत वेळ आली होती.

एक दिवस नवऱ्याला बायकोचा भास झाला. मग आवाज ऐकू आला. ती दिसायला लागली आणि मग सगळं व्यवस्थित झालं. इथपर्यंत नवऱ्यालाही पटलं, पण त्यानंतर बायकोनं ठरवलं की ती जिवंत असल्यासारखीच वागणार. ती स्वयंपाक, धुणीभांडी करायला लागली. त्यामुळे बििल्डगचे लोक घाबरले. खासकरून पाडगावकर- ज्यांच्या गॅलरीतून यांच्या घरातलं सगळं दिसायचं. नवरा घरी नसताना मिक्सर चालू होण्याचा आवाज, रेडिओ, टीव्हीचा आवाज आणि चालू केलेला फिरणारा फॅन दिसायचा.     नवऱ्याला घरी आल्यावर पाडगावकरांकडून दिवसभरात बायकोनं काय काय भुताटकीचे प्रकार केले हे कळायचं. खरं तर पाडगावकरांकडे दोघा नवरा-बायकोचं जाणं-येणं असल्यानं पाडगावकरांना नवऱ्याची काळजी वाटायची. सोसायटीच्या मीटिंगमध्ये ठरलं की भुतामुळे (बायकोमुळे) जर फ्लॅटचे भाव कमी होत असतील तर नवऱ्यानं घर रिकामं करावं. नवऱ्याला हे बायकोला समजावणं जमलं नाही. कारण बायकोचं म्हणणं पडलं की, ज्या घरात ती लग्न करून गृहलक्ष्मी झाली, तिला ते घर सोडण्याचा अधिकार नाही, उलट ते घर सोडल्यानं तिला पाप लागेल. नवरा हतबल. कारण आपली मृत बायको ही जिवंतपणी ‘वेड लागलंय का?’ असं म्हणता येईल या मानसिक अवस्थेत होती. आता आपल्या या गृहलक्ष्मीचं आपण काहीही करू शकत नाही असं त्याला कळून चुकतं. उलट बायकोचं म्हणणं पडतं की आपल्या खऱ्या प्रेमाची हीच परीक्षा आहे! सोसायटीवाले बिचारे गप्प होतात. आता बायको आणि नवरा, हेवा वाटावा असं आयुष्य जगतात.

नवरा, बायकोच्या सांगण्यावरून अनाथाश्रमातून एक मुलगी दत्तक घेतो. मुलीला फोटोतली आई दिसते. पण दोघं तिला मोठं करतात. ती एअर होस्टेस होते. तिचं लग्न होतं. नवरा आपल्या बायकोचं ‘नसून असणं’ कधीच आपल्या मुलीला पटवून द्यायचा प्रयत्न करत नाही. एक दिवस मुलगी आपल्या पायलट नवऱ्याबरोबर हाँगकाँगला राहायला जाते. तिथे तिला मूल होतं. तिचा आग्रह असतो की बाबांनी तिच्या मुलाला पाहायला यावं. बाबा ‘नाही’ म्हणतो, पण बायको त्याला समजावते आणि बाबा हाँगकाँगला जातो. तिथे त्याला चक्कर येते. ब्लडप्रेशर वाढतं. त्याला असं वाटतं की तो मुंबईला आपल्या बायकोकडे परतू शकणार नाही आणि त्याचा मृत्यू होतो.

इथे गृहलक्ष्मी त्याची वाट पाहते. तिला नवरा गेल्याचं माहीत नसतं, पण तिच्या प्रेमामुळे किंवा  त्याच्या प्रेमामुळे नवरा घरी पोहोचतो. दार उघडावं लागत नाही आणि नवरा-बायको दोघं त्या घरात  Happily lived ever after!!

नाटक लिहून झालं. मर्त्य जीवनाचं अमरप्रेम! गृहलक्ष्मी कोण करणार? नवरा आपणच व्हावं असं मला वाटलं आणि बायको कोण होईल, या विचारात असताना एक खूपच चांगली इंग्लिश नाटक करणारी नटी आठवली. तिनं माझी काही नाटकं पाहिली होती आणि तिला माझं लेखन-दिग्दर्शन खूपच आवडायचं. त्यामुळे मी जेव्हा तिला फोन केला तेव्हा तिने पटकन भेटायला होकार दिला. स्क्रिप्ट ऐकलं आणि एवढंच म्हणाली की, ‘ इतकं हिंदी मी कधीच बोलले नाहीए.’ मी त्यावर फक्त स्मितहास्य  केलं. कारण जेव्हा नट किंवा नटी हे कारण देतात तेव्हा समजायचं की त्यांना काम करायचं आहे, पण ते घाबरलेले आहेत.

तालमी सुरू झाल्या. मी आणि ती. आधी वाचन आणि लगेच नाटकाची बांधणी सुरू. तिच्यासाठी ही पद्धत नवी होती, पण तिनं समंजसपणे प्रतिसाद दिला. तिच्या हिंदीकडे मी जाणूनबुजून लक्ष दिलं नाही. कारण चुकीचं हिंदी दुरुस्त करून पाठ केलं तर ते खोटं वाटतं. त्यापेक्षा हळूहळू चुकत चुकत सुधारलेलं बरं.

पंधरा दिवसांच्या तालमीत पहिला अंक बसला. जवळपास पाठही झाला होता. तिनं आपल्या जवळच्या अ‍ॅक्टर मित्राला बोलावलं तालीम पाहायला. त्यालाही माझी नाटकं आवडायची. त्याने तालीम पाहिली आणि माझ्या लक्षात आलं की, त्याला आपल्या मत्रिणीचं काम फार नाही आवडलं आणि तिलाही असं वाटलं की नीट जमत नाहीये. दुसऱ्या दिवशी आम्ही तालीम केली तेव्हा तिचं म्हणणं पडलं की, मी काल ठरवलेलं ब्लॉकिंग (बांधणी) आज बदलतो आणि कुठल्याही वाक्यानंतर कुठेही उठतो, बसतो, चालतो. माझं म्हणणं होतं की, आज आत्ता काय वाटतं ते कर आणि समजा आज वाक्यं बसून बोलाविशी नाही वाटली तर उभं राहून बोल. किंवा मोठ्ठा पॉज घे, पण काही तरी आत्ता होऊ दे. कारण नाटकाला जीवनाचा आकार घेऊ द्यावा. पण ज्या कारणांनी तिला माझी नाटकं पाहताना आवडली होती तीच कारणं आता नाटक करताना अडथळा बनू लागली. माझी नाटक बसवायची पद्धत खूप साधी, पण खूप डिमांडिंग आहे- कारण अनिश्चितता! ही अनिश्चितताच दाखवता येते आणि त्यासाठी निश्चितच विश्वास ठेवायला हवा.. आपल्या असण्यावर!

इथे एक खुलासा करतो की, अनिश्चितता म्हणजे नवीन लाइन्स म्हणणे नव्हे किंवा नवीन पंच (जोक) मारणे नव्हे. तर माहिती असलेलं पुन्हा विसरणं किंवा नव्याने आठवणं, दरवेळेस.. आणि ते करताना बांधणी बदलू शकते. पण एवढा विश्वास तिचा माझ्यावर नव्हता. हळूहळू तालमीत तिला माझा वेळेवर न येण्याचा त्रास होऊ लागला. खरं तर काही वेळा मी मुद्दाम खाली थांबायचो. कारण मला असं वाटायचं की नटांना स्वत:चा, स्वत:साठी, स्वत:वर काम करायला वेळ द्यावा.

एक दिवस मी साऊंड इफेक्ट्स (रेकॉर्डिंग) आणायला गेलो होतो, त्यामुळे तालमीला पोहोचायला वेळ लागला. मी पोहचलो आणि तिनं आपलं सामान आवरलं आणि म्हणाली की, ‘मी या पद्धतीत काम करू शकणार नाही. मी आता जाते.’ असं म्हणून ती गेली. मी तिला एक एसएमएस केला आणि सांगितलं की, नाटक हे प्रेमापोटी करावं. शिस्तीसाठी किंवा त्रासापायी करू नये. तुला नाटक सोडण्याची मोकळीक आहे. तिच्यावर परिणाम काय झाला माहीत नाही, पण तिचं तालमीला येणं थांबलं. ग्रुपमधला संजय दधीच म्हणाला की, ‘आता नाटकासाठी नवीन नटी शोधायची का?’ दिवस खूप कमी उरले होते आणि मला वाटलं की घाईघाईत नवीन नटीलाही मजा येणार नाही. मी म्हटलं की, नाटक बसवताना नाटक घडलंय तर नाटक तर होणारच, पण त्यातलं नाटय़ जास्त पोहोचणार.

संजूला म्हटलं, ‘रिहर्सल करू या.’ त्याला कळलं नाही, पण त्याचा माझ्यावर खूप विश्वास. त्याला आता उत्कंठा होती की मी काय करणार?

मला भेटायला संगीत दिग्दर्शक शैलेंद्र बर्वे येणार होता. मी तालमीला पोहोचलो. तेव्हाची माझी असिस्टंट संजालीसुद्धा होती. काय होणार कोणालाच माहीत नव्हतं आणि मी तालीम सुरू केली. ‘ऑफिसवरून नवरा घरी परततो’ इथून पहिला प्रवेश सुरूहोतो आणि बायको प्रश्न विचारून वेडं करते. मी तिचे प्रश्न मनात ऐकून उत्तरं द्यायला लागलो आणि ती आहे असं मानून तिच्याबरोबर बोलायला लागलो. कधी कधी तिचा हात डोक्यावरून बाजूला करायचो किंवा ती आता रागाने निघून गेलीये हे नजरेनं दाखवायचो. दहा मिनिटांनी ती नसून सगळ्यांना दिसायला लागली होती आणि मेलेली असल्यानं आता वेगळीच मजा आली. मर्त्य मानवाचं अमर प्रेम आता जिवंत झालं. शैलेंद्र म्हणाला, ‘‘द वॅक्यूम ऑफ लाइफ कॅन बी फेल्ट मोर इन हर अ‍ॅबसेन्स.’’ संजाली म्हणाली की, ‘‘तिच्या नसण्यानं ती मला जास्त दिसू लागली आणि तशी ती प्रत्येक प्रेक्षकाला त्यांची ती दिसेल. संजू म्हणाला, ‘‘सर नाटक तयार हो गया.. कुछ खोनेसे!’’

मी प्रयोग केला. दीड तास एकपात्री प्रयोग झाल्यावर गोविंद निहलानी म्हणाले की, ‘खूपच प्रेमळ नाटक.’ एक स्त्री प्रेक्षक प्रयोग पाहून माझ्याशी बोलायला खूप वेळ थांबली. तिला काहीतरी वेगळं बोलायचं होतं. तिच्यापर्यंत पोहोचायला रात्रीचे बारा वाजले. पृथ्वी थिएटरच्या आवारातले बरेचसे दिवे बंद झाले होते. थोडा अंधार, थोडा प्रकाश आणि शांतता.. अशा वातावरणात ती स्त्री बोलू लागली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, ‘‘मी आणि माझा नवरा नेहमी पृथ्वीला नाटक पाहायला यायचो. आता तो नाहीए. त्याचं निधन झालं. पण निघताना मी मनात त्याला म्हणाले की मी पृथ्वीला जातेय नाटक बघायला.. आणि नाटकात तर तुम्ही आपल्या मृत बायकोबरोबर अख्खं आयुष्य काढलंत, अगदी तुमच्या मृत्यूपर्यंत!  मला असं जगता येईल का?’’ आणि ती ओक्साबोक्शी रडायला लागली. तिला उत्तर अपेक्षित होतं म्हणून ती शांत झाल्यावर मी तिला म्हणालो, ‘‘तू त्याच्याबरोबर जगू शकतेस, फक्त आत्ता जर मला म्हणालीस की माझ्या नवऱ्याला भेटा आणि मी रिकामी जागा पाहिली तर मला वाटेल की तुला वेड लागलंय. पण तू जर स्वत:कडे आपल्या प्रेमाच्या आठवणींना किंवा नवऱ्याच्या प्रेमाला ठेवलंस तर काहीच हरकत नाही.’’ तिने मिठी मारली.

जय नाटक! जय प्रेम!

जय नटी! जय प्रेक्षक!

mvd248@gmail.com